आधीच्या भागात आपण बघितले की,
डॉक्टरने सांगितले की आनंदी कोमात गेली, आता ती कधी शुद्धीत येईल काही सांगता येणार नाही. तिघांनाही खूप धक्का बसला, पण तिघांनी एकमेकांकडे बघत स्वतःला सावरलं. त्यानंतर अभिजीतने निशा आणि विक्रमला घरी पाठवलं, त्यांच्यासाठी जेवणाची सोय केली. काही वेळाने निनादचा फोन आला. अभिजीतने निनादला सगळं सांगितलं. निनाद आनंदीला बघायला आला.
काही वेळाने तो तिथून निघून गेला. अभिजीत घरी गेला, फ्रेश होऊन दोन घास खाल्ले आणि गच्चीवर गेला. सगळीकडे आनंदीच्या आठवणी होत्या. ज्याचा अभिजीतला खूप त्रास होत होता.
आता पुढे,
अभिजीत पलंगावर येऊन बसला, बसल्या बसल्या त्याला झोप लागली. सकाळी उठला तेव्हा इकडे तिकडे बघितलं आणि अचानक उठून बाहेर आला.
"आनंदी.. आनंदी.." म्हणत बाहेर आला.
निशाने चहा केलेला होता,
"अभिजीतराव बसा,चहा केलाय,आणते."असं म्हणत ती किचनमध्ये गेली, तिने अभिजीत साठी चहा आणला.
"आई मला चहा नको, मला आता आनंदी कडे जायचं आहे."
"अभिजीत राव बसा, आधी चहा घ्या, मग निघा." विक्रमने मोठ्या आवाजात सांगितलं. अभिजीतने चहा घेतला.
अंगावर कपडे चढवले आणि जायला निघाला.
अंगावर कपडे चढवले आणि जायला निघाला.
"आई बाबा येतो मी."
मागेहुन आवाज आला.
मागेहुन आवाज आला.
"सांभाळून जा हो."आणि निशा पलटली तर समोर विक्रम उभा होता.
"असं काय बघताय माझ्याकडे?"
"बघतोय तू काल जे काही केलंस ते खरं होतं की आताच खर आहे. काल बोलली ना की नाही मी पाण्याचा थेंबही पिणार नाही आणि आता तू किचनमध्ये जाऊन चक्क चहा केलास म्हणून तुझ्याकडे असा बघत होतो."
"हो मी अन्नाचा एकही घास घेतलेला नाही आणि पाण्याचा एक थेंबही घेतलेला नाही. ते मी चहा अभिजीत साठी बनवलाय. तो दिवसभर हॉस्पिटलमध्ये असेल काही खाईल नाही खाईल काय माहिती म्हणून म्हटलं थोडसं चहा घेईल तर बरं वाटेल त्याला म्हणून चहा बनवला होता."
"त्याच्यासाठी? मग मला देणार नाहीयेस?"
निशा हसली.
"तुम्हाला पण देते, बसा."
"निशा मी चहा घेईन पण त्यासाठी माझी एक अट आहे."
"आता काय झालं?"
"तू जर माझ्यासोबत चहा घेतलास तरच मी चहा घेणार नाही तर नाही."
"तू जर अशी वागलीस आणि नंतर आनंदीला कळलं तर तिला किती वाईट वाटेल? हो ना?" विक्रमने तिला बराच वेळ समजावलं, तेव्हा निशा तयार झाली.
"हो हे खरंच आहे."
निशाने दोन कप चहा आणला, दोघेही चहा प्यायले आणि तयार होऊन हॉस्पिटलला जायला निघाले.
"अहो हॉस्पिटलला जायच्या आधी आपण मंदिरात जायचं का?"
"हो चालेल, वाटेवरचा महालक्ष्मी मातेचे मंदिर आहे तिथे जाऊया आणि तिथून समोर हॉस्पिटलला निघूया."
दोघेही घरून निघाले, आधी मंदिरात गेले. मंदिरात दर्शन घेतले. निशाने आनंदीसाठी साकडं घातलं, नवस बोलली. तिथून दर्शन घेतल्यानंतर ते हॉस्पिटलला गेले.
दोघेही रोज हॉस्पिटलला जायचे, दिवसभर राहायचे आणि घरी परत यायचे. अभिजीत दिवस रात्र हॉस्पिटलमध्येच असायचा. तिच्या बाजूला जाऊन तिच्याशी बोलायचा. तिला आठवणी सांगायचा. आनंदी काहीतरी बोलेल या आशेवर तो तिच्याशी गप्पा मारायचा. पण काहीच फायदा होत नव्हता. एक दिवस मोबाईलवर आनंदीच्या आवडीचं गाणं लावलं आणि तो मोबाईल तिच्या कानाजवळ ठेवला. आनंदी बघू शकत नाही पण तिच्या कानातून आवाज गेला तर ती काहीतरी रिस्पॉन्स करेल या भाबडया आशेवर त्याने ते गाणं लावलं होतं. बराच वेळ गाणं वाजत राहिलं पण काहीच हालचाल होत नव्हती. शेवटी अभिजीतला खूप रडायला आलं.
"आनंदी उठना ग, आता तरी उठ ना ग. माझे सगळे प्रयत्न करून झाले.काय करू आता मी तुझ्यासाठी? सांग मला. तुझ्याशी दिवसभर इतकं बोलतो मी, आपल्या जुन्या आठवणी काढतो. आपले ते सुंदर क्षण तुला सांगतो. आज तुझ्या आवडीचं गाणं लावलं.आता अजून काय करू सांग ना , उठ आता. तुला असं बघवत नाहीये आणि तुला उठायचं नसेल ना तर मला तुझ्या सोबत घेऊन जा. मला इथे एकट्याने नाही राहायचं. घेऊन जा मला तुझ्या सोबत घेऊन जा आनंदी घेऊन जा." असं म्हणून त्याने तिच्या हातावर डोकं ठेवलं.
अभिजीतला काहीतरी हालचाल जाणवली, त्याने बघितलं तर त्याला हाताची बोट हळूहळू हलताना दिसली.
"नर्स..डॉक्टर.. बघा आनंदी.. आनंदी कोमातून बाहेर आली. डॉक्टर.. नर्स.. नर्स.." अभिजीत जोरात ओरडायला लागला.
नर्स आली तिने बघितलं, तिला थोडी हालचाल जाणवली. ती लगेच डॉक्टरांना बोलवायला गेली, डॉक्टर आले त्यांनी बघितलं.
"काय झालं डॉक्टर? आली ना आनंदी शुद्धीवर? आली ना?"
"नाही आनंदी शुद्धीवर नाही आली, हे बघा अशा अवस्थेत एखाद्या भागाची मंद गतीने हालचाल होऊ शकते. एखाद्या हाताचा बोट पायाचा बोट असा होऊ शकतो पण म्हणून तो पेशन्ट पूर्ण शुद्धीत आलेला नसतो, ती अजूनही कोमातच आहे." असं म्हणून डॉक्टर तिथून निघून गेले.
अभिजीत मात्र तसेच शब्द उभा राहिला.
"अभिजीत किती दिवस हॉस्पिटलमध्ये राहणार आहेस? मला असं वाटतं तू ऑफिस जॉईन करावं."
"पण बाबा?"
"हे बघ अभिजीत आता तू माझा जावई नाहीस माझा मुलगा आहेस आणि त्याच नात्याने मी तुला एकेरी हाक मारतोय. माझी एक मुलगी तर मला सोडून गेली, आता दुसरा मुलगाही अशी अवस्था करून बसलेला मला नाही बघवणार. मला असं वाटते तू ऑफिस जॉईन करावं. तू तुझं कामावर लक्ष केंद्रित करावं आणि आनंदी कडे बघायला आम्ही आहोतच ना. आम्ही असू इथे दिवसभर."
"पण बाबा आनंदीच्या अशा अवस्थेत माझे लक्ष कसे लागेल?"
"अभिजीत तुला हे सगळं करावं लागेल, तुला यातून बाहेर पडायला लागेल. किती दिवस असा कुढत राहशील. आनंदीला जेव्हा बर व्हायचं असेल तेव्हाच बरी होईल. तू ऐकलं नाहीस डॉक्टर काय बोलले कोमातला पेशंटचं तर काही सांगता येत नाही कोणी एक महिन्यात शुद्धीत येतं तर कोणी कधीच येत नाही."
"नाही बाबा असं बोलू नका, माझ्या जगण्याचे एकमेव कारण आनंदी आहे. तीच माझ्या आयुष्यातून निघून गेली तर कुणासाठी जगायचं मी?"
"तू असा बोलतोयस मग निशाने काय बोलावं. तिच्याकडे बघ ती अशीच मागे लागली होती, देव पाण्यात टाकून बसली होती तिने हट्ट धरला होता काही खाणार नाही पिणार नाही पण मी तिला समजावलं आणि आता ती समजली आहे. ती जर समजू शकते तर तू समजू शकणार नाहीस."
दुसऱ्या दिवशी अभिजीत ऑफिसला गेला. ऑफिसमध्ये गेल्या गेल्या सगळ्यांचे प्रश्न सुरू झाले. कारण ऑफिसमध्ये सगळ्या गोष्टी सगळ्यांना कळलेल्या होत्या. अभिजीत कुणाशी काही न बोलता त्याच्या कॅबिनमध्ये जाऊन बसला. बाहेर सगळ्यांची कुजबुज कुजबुज सुरू झाली. सगळ्यांनी प्रश्न केल्यामुळे आता अभिजीतला अजून नर्वस वाटत होतं. उगाच ऑफिसमध्ये आलो असं झालं होतं. तो आता घरी जाण्याचा विचार करतच होता. तितक्यात विक्रमचा फोन आला.
"बाबा मी आता तुम्हाला फोन करणार होतो."
"का रे काय झालं?"
"ऑफिसमध्ये आलो आणि सगळ्यांचे प्रश्न सुरू झाले. या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला सध्या माझी मानसिकता नाही आहे, मी आता घरी येण्याचा विचार करत होतो तितक्यात तुमचा फोन आला."
"असं करून कसं चालेल. हे बघ जशी परिस्थिती आहे ना तसा आपल्याला राहावं लागतं. परिस्थितीशी झगडावं लागतं. तुझ्यासमोर असे प्रश्न उभे राहणारच. तू तुझ्या परीने उत्तर दे. असा किती दिवस त्यांना टाळणार आहेस
जा तुझ्या सगळ्या स्टाफशी शांतपणे बोल. त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांग. ते तुला नक्की समजून घेतील." विक्रमने फोन ठेवला
अभिजीत कॅबिनमधून बाहेर गेला, सगळ्यांची कुजबुज सुरूच होती. अभिजीतला बघून सगळ्यांनी एकमेकाकडे चेहऱ्याकडे बघितलं आणि शांत झाले, सगळे खाली मान घालून उभे राहिले.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा