संपूर्ण हॉल फुलांनी सजलेला होता, सगळीकडे रोषणाई होती, मधुर संगीत सुरू होत. पाहुण्यांची चहेलपहेल सुरू होती.
लग्नाची संपूर्ण तयारी झालेली होती, नवरदेव घोड्यावर बसून आलेला, मंगलाष्टक झालेली, पण हार घालायचा वेळी निनादने लग्नाला नकार दिला आणि त्याने आनंदीला कॅरेक्टरलेस ठरवलं. लग्न न करताच तो तिथून निघून गेला. मागोमाग त्याच्या घरचे गेले, त्यानंतर सगळे पाहुणे मंडळी निघून गेले.
प्रिन्सिने आनंदीला सावरलं आणि तिला खोलीत घेऊन गेली.
“आनंदी काय झालं? तू मला सांगणार होतीस पण काही बोलली नाहीस. बोल आता, तो तुला कॅरेक्टरलेस का बोलला?”
प्रिन्सिने खूपदा विचारलं तेव्हा आनंदीने घडलेली सगळी घटना सांगितली. प्रिन्सिने सगळं तिच्या आईबाबांना सांगायला सांगितलं.
दोघीही खोलीतून बाहेर यायला निघाल्या, तर दारात अभिजीत उभा होता. दोघींचं बोलण अभिजीतने ऐकलेलं होतं. तो लगेच आत आला आणि त्याने दार लावून घेतलं.
अभिजीतकडे बघून आनंदीने मान खाली घातली.
“सर तुम्ही इथे?” आनंदी
“आनंदी इतकी मोठी घटना घडली आणि तू मला सांगितले देखील नाही.” अभिजीत
“सॉरी सर पण मी तुम्हाला काय सांगणार होते, निनाद सोबत माझं लग्न होणार होतं. त्यामुळे तो जसा म्हणेल तसं मला वागावचं लागलं, माझा नाईलाज होता. माझी इच्छा नसतानाही मी त्याच्यासोबत तिथे गेले आणि आता लग्न होणार म्हणून मी ही गोष्ट कुणालाही सांगितलेली नाही.” आनंदी
“आणि आता तू तुझ्या आई बाबांना सांगणार होतीस?” अभिजीत
“हो, माझ्या समोर कुठलाही पर्याय नाही. त्यांना सगळं कळायला हवं. माझी काहीही चूक नसताना शिक्षा मला मिळत आहे. मी चुकीची नाही हे त्यांना कळायला हवं. माझी खरचं काही चूक नाही.” आनंदीला पुन्हा रडायला आलं.
“नाही, तू आता हे सगळं तुझ्या आई बाबांना सांगणार नाही आहेस?” अभिजीत
“पण का सर?” आनंदी
“आनंदी आधीच तुझ्या आईला किती त्रास आहे, त्यात अजून भर घालू नकोस. त्या माऊलीने खूप सहन केलंय. आता त्यांना अजून काही त्रास व्हायला नको.” अभिजीत बोलत होता आणि आनंदी त्याच्याकडे बघत होती.
‘खरचं सर इतके चांगले असू शकतात? की इथेही माझा विश्वासघात होतोय. सर इतके चांगले बोलत आहेत, आई बद्दल इतका विचार करत आहेत.’ आनंदीचे विचार सुरू होते.
“काय विचार करत आहे आनंदी.” अभिजीत
आनंदी विचारातून बाहेर पडली.
“तू बाहेर चल.” असं म्हणत अभिजीतने आनंदीचा हात पकडला आणि तो तिला बाहेर घेऊनगेला.
दोघेही बाहेर गेले, त्या दोघांना असं बघून विक्रम आणि निशाला आश्चर्य वाटलं.
ते बाहेर आले आणि सर्वांसमोर अभिजीतने बोलायला सुरुवात केली.
“मी आनंदीशी लग्न करायला तयार आहे.” असं म्हणून त्याने घोषणा केली.
आनंदी त्याच्या चेहऱ्याकडे बघतच राहिली, आनंदीला हे सगळं अनपेक्षित होतं. अभिजीतने डोळ्याच्या पापण्या हलवून इशाऱ्याने तिला दिलासा दिला.
निशा आणि विक्रम समोर आले,
“अभिजीत सर पण तुम्ही?” विक्रम समोर काही बोलणार अभिजीत बोलला.
“सर म्हणू नका बाबा, मी आता तुमचा जावई होणार आहे.”
“पण हे सगळं तुम्ही का करताय? यात तुमचा काय संबंध? असं तर नाही आहे ना की माझ्या मुलीचं लग्न तुटलं तर तुम्ही तिच्याशी लग्न करून उपकार वगैरे करताय? आणि सिम्पथी दाखवताय? विक्रमने शंका व्यक्त केली.
“बाबा हे स्थळ मी घेऊन आलो होतो आनंदीसाठी, त्यामुळे या सगळ्याला संपूर्णपणे जबाबदार मी आहे. अश्या परिस्थितीत मी आनंदीला एकटं टाकणार नाही. मी आता आनंदीला असं वार्यावर सोडणार नाही. मी तिचा जीवनसाथी बनून तिला सांभाळेल. तुमची हरकत नसेल तर.?” अभिजीतने विक्रमला आणि निशाला बरच समजावलं.
त्यानंतर सगळे लग्नाला तयार झाले.
“पंडितजी करा सुरू.” विक्रम
पुन्हा मंगलाष्टके सुरू झाली, दोघांनी एकमेकांना हार घातले.
आनंदी आणि अभिजीतचं लग्न पारपडलं.
सप्तपदी झाली, वचनांची देवाणघेवाण झाली. दोघांनीही एकमेकांना वचने दिली.
सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आनंदीच्या पाठवणीचा क्षण आला.
आनंदी निशा आणि विक्रमच्या पाया पडली.
ती निशाला बिलगून खूप रडली, तिला बालपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या,निशा सोबत घालवलेले एक एक क्षण डोळ्यासमोर यायला लागले, निशा आणि आनंदीचं बॉंडिंग खूप छान होतं, दोघीही एकमेकींना समजून घ्यायच्या.
“काळजी घे बाळा, स्वतःची पण आणि अभिजीतरावांचीपण.”
आनंदीने होकारार्थी मान हलवली.
त्यांनतर आनंदी विक्रम जवळही खूप रडली.
तो सख्खा नसला तरी दोघांचं एकमेकांवर खूप जीव होता.
आनंदी त्याच्याशी सगळं शेअर करायची,अगदी लहान लहान गोष्टी त्याला सांगायची.
अभिजीत आणि आनंदी जायला निघाले.
सगळ्यांनी हसऱ्या चेहऱ्याने त्यांना निरोप दिला.
दोघेही गाडीत बसले, आनंदी अगदी शांत बसली होती, तिच्यासाठी हे सगळं अनपेक्षित होतं, अचानक तिचं आयुष्य बदललं होतं, ज्याची स्वप्न बघितली होती,तो तर आता डोळ्यासमोरही नव्हता, ज्याच्यासोबत आयुष्याची स्वप्न रंगवली होती,तो तर अर्ध्यावरती सोडून गेला होता.
तिच्या डोक्यात विचार चक्र सुरू होते.
“आनंदी काय विचार करत आहे? अग इतकं टेन्शन घेऊ नको. मी तुला आनंदात ठेवेल, तू काळजी करू नको. तुला काहीच त्रास होणार नाही.”
आनंदी गप्प होती.
अभिजीत बोलत होता आणि ती शांत ऐकत होती.
काही वेळाने गाडी अभिजीतच्या घरासमोर येऊन थांबली. अभिजीतच्या घरी कुणीही नसल्यामुळे साध्या पद्धतीने त्याने आनंदीचा गृह प्रवेश केला.
“अग थांब अशीच येऊ नको,हा माप ओलांडून ये, सॉरी आनंदी मी जास्त काही करू शकलो नाही.”
आनंदीने माप ओलांडला आणि आनंदीचा गृहप्रवेश झाला.
आनंदीने गृहप्रवेशाची जी काही स्वप्न बघितली होती ती पूर्ण होऊ शकली नाही. अभिजीतने आनंदीला शब्द दिला की
“आनंदी यापुढे तुला कुठलाही त्रास होणार नाही. तुला कोणत्याही गोष्टीची काही कमी होणार नाही, हे मी तुला वचन देतो.”
सगळं छान पार पडलं.
विक्रम आणि निशा घरी आले, बाकीचे पाहुणे मंडळी सुद्धा आले.
हळूहळू आनंदी अभिजीतच्या घरी रुळायला लागली, अभिजीत सोबत मनमोकळेपणाने बोलायला लागली. सगळे छान सुरु होतं. दोघांनी ऑफिस जॉईन केलं, दोघेही सोबत जायचे.
एक दिवस निशाने आनंदीला फोन केला,
“हॅलो आनंदी कशी आहेस?”
“मी बरी आहे. तू कशी आहेस आणि बाबा कशे आहेत?”
“आम्ही छान आहोत पण तुझी कमी जाणवते ग, तू होतीस तर घर भरल्यासारखं वाटायचं आता रिकामं वाटतं, विक्रम त्याच्या कामात व्यस्त असतो मग मला एकटीला घर खायला उठतं.
“आई तुही तुझं काही काम करत जा ना?”
“आता या वयात काय काम करणार आहे मी?”
“अग आई तुझे छंद जोपास, तुला जे जे आवडतं ते कर. कसं असत ना आई आपण आपल्या कामात इतके व्यस्त होतो की आपल्याला आपले छंद जोपासायला वेळही मिळत नाही, आपण तर विसरूनही जातो की आपल्याला काय आवडतं? आता तुझ्याकडे वेळ आहे ना तर तू तुझ्या आवडीच्या गोष्टी कर.”
“बापरे किती कठीण काम सांगितलंस तू मला?” अस म्हणून ती हसायला लागली.
“अग त्यात हसण्यासारखं काय आहे? अच्छा मला सांग तुला काय काय आवडतं?”
निशा विचार करत बसली.
“आई इतका का विचार करतेस? अग मी फक्त तुझी आवड विचारली?”
“विचार तर येईलच ना ग, आज पहिल्यांदा मला कुणीतरी असं काही विचारलंय. खरं सांगू मला काय आवडतं याचा मी कधी विचार केलाच नाही, आधी काही आवडत असेलही पण ती आवड काळासोबत मागे गेली.कधी मला विचार करायला वेळच मिळाला नाही, किंवा काही कारणास्तव ते मागे राहिलं. आता तर आवड ही आठवत नाही” निशा बोलता बोलता उदास झाली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा