Login

पिंजरा- आवडता चित्रपट

माझ्या आवडता चित्रपट पिंजरा बद्दल थोडसं समीक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे..
चित्रपट व माझं एक अनोखे नातं. आवड व मनोरंजन म्हणून चित्रपट पाहत होते. पण त्यातूनही घेण्यासारखं बरंच काही असतं हे वाढत्या वयानुसार कळतं गेलं, असो..

चित्रपट पाहायला मला खूप आवडते, खूप सारे चित्रपट पाहिले पण एक असा चित्रपट मनाला भावलेला आणि कायमस्वरूपी मनात घर करून गेलेला चित्रपट म्हणजे पिंजरा .

व्ही. शांताराम दिग्दर्शित पिंजरा पहिला रंगीत तमाशाप्रधान चित्रपट प्रदर्शित झाला आणि मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड  ठरला.

या चित्रपटाची कथा ही एका तत्वनिष्ठ व ब्रम्हचारी शिक्षकाची केवळ एका तमासगीरच्या क्षणिक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक आणि सामाजिक अधःपतनाची कथा आहे. संपूर्ण कथेला तमाशाची पार्श्वभूमी आहे. चांगल्या - वाईट गोष्टींचा संघर्ष, नायिकेचं हृदयपरिवर्तन तरीही आदर्श शिक्षकाचे अटळ नुकसान होते. ते देशोधडीला लागतात.

चित्रपटाची सुरुवातचं 'आली ठुमकत, नार'  ह्या गाण्याने होते. तमाशाचे खेळ करण्यासाठी तमासगीरांचे संपूर्ण कुटुंबकबिला गावागावात जाऊन तळ ठोकते. उदरनिर्वाहासाठी तमाशांचे खेळ केले जातात. ज्या गावात ती मंडळी येतात त्या गावात चित्रपटाचे नायक एक हाडाचे शिक्षक श्रीराम लागू ह्यांच्या विचारांचा गावकऱ्यांवर प्रभाव असतो. गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी ते झटत असतात. त्यांना गावात अतिशय मान असतो. एकदम आदर्श असे ते गाव असते. तिथे कुठल्याही वाईट विचारांना, संगतीला थारा नसतो.

गावात तमाशा करण्यासाठी मंडळी आल्याचे समजताच श्रीराम लागू (गुरूजी) तमाशाचे खेळ गावात करण्यास विरोध करतात. त्यांना अपमानास्पद बोलतात. त्या तमाशाफडातील चित्रपटाची नायिका संध्या (चंद्रकला) त्या आदर्श शिक्षकाच्या तत्त्वाने, झालेल्या अपमानाने त्वेषाने पेटून उठते. त्याच आवेशात ती शपथ घेते की, " या गुरुजींना मी माझ्या नादी लावल्याशिवाय राहणार नाही." त्याप्रमाणे ती नायकाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी तिच्या सौंदर्याचा, मादकतेचा प्रभाव पाडण्यास सुरुवात करते. तिच्या पायाला चमक भरली असे सांगताच गुरुजी औषधी पाने आणून त्याचा पाला वाटून नायिकेच्या पायाला बांधतात. कधीही स्त्रीला स्पर्श देखील न केलेल्या गुरुजींना नायिका तिला स्पर्श करण्यास भाग पाडते. नायक जरी आदर्श शिक्षक असले तरी शेवटी पुरुषचं. नायिकेच्या मोहाला ते बळी पडतात. त्या स्त्रीमध्ये ते इतके गुंततात की, तमासगीरांच्या फडात ते राहू लागतात. गावात त्यांना मानाचे स्थान असते आणि इथे एखादया बांडगुळासारखे जीवन त्यांना जगावे लागते. त्यांना नोकरांच्या पंगतीत वाढले जाते. तरी ते नायिकेच्या प्रेमापोटी सगळं सहन करतात. कालांतराने त्यांच्यातील एक होतात. इथे सुडाने पेटलेल्या नायिकेची शपथ तर पूर्ण होते पण नायिका सुद्धा गुरुजींमध्ये गुंतत जाते.

इथे गावकरी अजूनही गुरुजींना त्यांचा आदर्श मानत असतात. गुरुजी गावात बरेच दिवस दिसत नसल्याने गावात खळबळ माजलेली असते. गावकऱ्यांचा देव्हाऱ्यातील देवचं नाहीसा झालेला असतो.

त्या तमाशातील फडात एक अशी व्यक्ती असते जिला नायक - नायिकेचे प्रेम बघवत नाही. कायम गुरुजींवर ती व्यक्ती जळफळाट करत असते. एके दिवशी अगदी अनाहूतपणे गुरुजींच्या हातून त्या व्यक्तीचा खून होतो. गुरुजी अतिशय घाबरून जातात. ते त्या मृत व्यक्तीला आपले स्वतःचे कपडे घालतात ज्याने करून सगळ्यांना वाटले पाहिजे की, गुरुजींचा खून झाला. गावातील लोकांच्या मनातील स्वतःबद्दलची प्रतिमा तशीच कायम राखण्यासाठी गुरुजी हे पाऊल उचलतात. गावकऱ्यांना वाटते की, गुरुजींचा खून झाला म्हणून गावकरी त्यांच्या देवासारख्या गुरुजींचा पुतळा उभारतात. गावकऱ्यांचे प्रेम बघून गुरुजींना अपराधी वाटू लागते. गुरुजी गावकऱ्यांना सांगतात की, गुरुजींचा खून माझ्या हातून झाला आहे. गावकरी संतापून गुरुजींना स्वतःच्याच खुनाच्या आरोपाखाली पोलिसांच्या हाती स्वाधीन करतात. गुरुजींना कोठडीत बंद केले जाते. गुरुजी बंद तुरुंगात त्यांचे प्रायश्चित घेतात. इथे नायिका जी गुरुजींवर खरोखर प्रेम करू लागलेली असते तिला आपल्या कर्माची उपरती होते. गुरुजींना शिक्षेपासून वाचविण्यासाठी ती न्यायालयात हेच खरे गुरुजी आहेत असे सांगण्याचा प्रयत्न करते. पण गुरुजींच्या सत्वामुळे नायिकेची वाचा जाते. अखेर मास्तर निरपराध सिद्ध होत नाहीत आणि त्या दोघांचे आयुष्य उध्वस्त होते.

या चित्रपटातील संवाद अप्रतिम आहेत. त्यातील दोन संवाद.." पिंजरा त्यो कोनाला चुकलाय ? अवो, मानसाचं घर तरी काय असतंय ? त्योबी येक पिंजराच की."

" व्यक्ती मेली तरी चालेल समाजातील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत "

चित्रपटातील गाण्यांबद्दल काय बोलू आजही ती प्रत्येकाच्या मनाच्या पिंज-यात कैद आहेत. अप्रतिम गाणी आहेत यात. गीतकार जगदीश खेबूडकर यांच्या शब्दसाजला संगीतकार राम कदम यांनी अप्रतिम संगीतबध्द केलंय. लतादी,उषादी, विष्णू वाघमारे, सुधीर फडके यांचे सुमधूर स्वरसाज आहे.

गं साजणी या गाण्याविषयी काय बोलू ..वा!  हे शब्द नकळत निघेल ओठांतून. यात गाण्यातील कोरस अप्रतिम.

१)दे रे कान्हा, छबीदार छबी..
२)नका तोडू पावणं जरा थांबा..
३)तुम्हांवर केली मी मर्जी बहाल..
४)लागली कुणाची उचकी..
५)दिसला गं बाई दिसला..
६)कशी नशीबने थट्टा आज मांडली..

असे एकापेक्षा एक अवीट, दर्जेदार, सदाबहार गाणी जे कर्णसेनाना सुखवून टाकतात.

यातील सर्वात माझं आवडतं गाणं म्हणजे कशी नशीबाने थट्टा आज मांडली हे आहे. या एकाच गाण्यात पूर्ण चित्रपट डोळ्यासमोरूनतरळून जातो. ह्रदय हेलावून जातं. सुधीर फडके उर्फ बाबुजीने इतकं अप्रतिम गायलंय की त्यात नक्कीच आपण हरवून जातो. तेच गाणं इथे सादर करते. (लिहून )

दहा दिशांनी , दहा मुखांनी. आज फोडिला टाहो,
आसवांत या भिजली गाथा, श्रोते एका हो

माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

गंगेवानी निर्मळ होता, असा एक गाव
सुखी समाधानी होता, रंक आणि राव
त्याची गुण गौरवान  कीर्ती वाढली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

अशा गावी होता एक भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला, कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्टी लागली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला, नदीपार केली
नार सूड भावनेना, उभी पेटली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

पिसळलेल्या नागीनिनीने थयथयाट केला
नाचगाण्यासाठी सारा गाव येडा झाला
त्यांनी लाज भीड नीती सारी सोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

जाब विचारया गेला, तिने केला डाव
भोवरयात शृंगाराच्या सापडली नाव
त्याच्या पतंगाची दोरी तिने तोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

खुल्या जीवा कळला नाही, खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल
त्याला कुत्रा मांजराची दशा आणली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

जन्मभरी फसगत झाली तिचा हा तमाशा
जुळुनीया गेली आता जगायची आशा
आज हुंदक्यान भिरवी मी गायली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

याची देही याची डोळा पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
माझ्या कर्मा सोहळ्याची यात्रा चालली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली

या चित्रपटातील सर्व कलाकारांचा अभिनय अप्रतिम. डाॅ. श्रीराम लागू यांनी साकारलेले गुरूजी, संध्या यांनी साकारलेली चंद्रकला अप्रतिम. चेह-यानेही नृत्य करता येतं हे यांनी दाखवून दिले. निळू फुले, उषा नाईक या कलाकारांनी उत्तम साथ दिली.

अनैतिकतेच्या पिंजऱ्यात भले भले जरी अडकले तरी अधःपतनाशिवाय मागे फिरण्याचा रस्ता नाही ही शिकवण ह्या चित्रपटाने दिली.

या चित्रपटाला १९७२ चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

थोडं जास्तच लिहिले. पण या चित्रपटाबद्दल जेवढं लिहावं तेवढं कमीच आहे. आजही हा चित्रपट मनाला मोहिनी घालतो म्हणजेच या चित्रपटाची जादू  कायम आहे असे म्हणायला हरकत नाही.
आवर्जून पाहावा असा हा माझा आवडीचा चित्रपट.. 'पिंजरा'.

©️ जयश्री शिंदे

🎭 Series Post

View all