Login

पिंजरा (भाग 01) : जलद कथामालिका लेखन स्पर्धा

This is a heart touching love story show the shade of one of tha major social fact.

                                             



                                            "सागर प्रितीचा कॉल आहे." अंघोळ करत असतांना आईचा आवाज सागरच्या कानावर पडला. तोच त्याने घाईघाईत आंघोळ आटोपती घेतली. लवकर तयारी करून घराच्या बाहेर केंव्हा पडतो व केंव्हा प्रितीला कॉल करतो असं त्याला वाटत होतं. आईने नाष्टा करण्याचा आग्रह केला. पण नाष्टा न करताच तो घराच्या बाहेर पडला. थोड्या अंतरावर जाताच प्रितीला कॉल केला. पण प्रितीने कॉल रिसिव्ह केला नाही. पुन्हा कॉल करू की नाही ? या विचारातच त्याने पुन्हा कॉल केला. पण यावेळेही प्रितीने कॉल रिसिव्ह केला नाही. आता मात्र सागर अपसेट झाला. "आपण त्याच वेळी अंघोळीला का गेलो ? आधी किंवा नंतर आंघोळ केली असती तर काय फरक पडला असता ? निदान प्रिती सोबत बोलायला तरी मिळाले असते. आता ती केव्हा कॉल करते अन केव्हा नाही." असं त्याच्या मनात सारखं येतं होतं. आता त्याला आंघोळ करण्याचा देखील पश्चताप होत होता. तोच त्याला प्रितीचा कॉल आला. 


"हॅलो.s..प्रिती..बोलss."
"तू मला विसरून जा! व पुन्हा कॉल करू नको."
"सॉरी..प्रिती मी पुन्हा नाही काढणार तो विषय."
"तू नेहमी असंच म्हणतोस आणि पुन्हा तोच एपिसोड. मला कंटाळा आला आता याचा."
"असं नको बोलू प्रिती प्लिज."
" मी किती वेळेस तुला समजावून सांगितले आहे की, मी तुला फक्त मित्र म्हणूनच स्वीकारू शकते. तू जसा विचार माझ्या बाबतीत करतो, तसा विचार मी नाही करू शकत. पण तुला ते कळत नाही."
असं बोलून प्रितीने फोन कट केला.
"प्रिती..प्रिती.."
प्रितीचं असं बोलणं ऐकून सागर बराच वेळ हताशपणे तिथेच उभा राहिला. समोरून येणाऱ्या वाहनांच्या कर्कश आवाजाने भानावर आला व परत घरी जाण्यासाठी निघाला.

                थोड्या वेळाने सागर घरी आला. कोणाशी काही न बोलता सरळ त्याच्या रूममध्ये गेला. आतून खोलीचा दरवाजा बंद केला. बेडवर जाऊन पडला. तो सारखा प्रितीला कॉल करत होता. पण ती कॉल रिसिव्ह करत नव्हती. शेवटी त्याने बाईक काढली. सरळ तृप्तीच्या रूमवर गेला. नेहमीप्रमाणे त्याच्या डोक्याला, दाराजवळ असलेला रिकामा पिंजरा लागला. तृप्ती व तो एकाच कॉल सेंटरला काम करत होते. तिथंच त्यांची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले होते. त्याचं प्रितीवर प्रेम आहे, हे त्याने स्वतःहून तृप्तीला सांगितले होते. शेवटी मनमोकळं करायला त्याला तिचाच आधार वाटत होता. आज घडलेला सर्व प्रकार तिला सांगत असतांना त्याचा हतबलपणा तृप्तीच्या नजरेने नेमका टिपला होता. त्याची अशी दयनीय अवस्था पाहून तृप्तीला वाईट वाटलं. पाण्याचा ग्लास त्याच्या हातात देत, ती त्याला म्हणाली,
"सकाळ पासून तू काही खाललेलं दिसत नाही."
"ते जाऊ दे ग!"
"असं कसं जाऊ दे. थांब थोडा वेळ. तुझ्या आवडीचे आलूचे पराठे बनवते, आवडतात ना तूला ?"
"तुला कसं माहीत ?"
"अरे, बाबा जिवलग मित्र आहेस तू माझा. ठेवावं लागत आवडी निवडीवर लक्ष."
"थँक्स! पण सांग तुला कसं माहीत ते."
"बरं! सांगते पण एका अटीवर ? तुला माझ्याहातचे आलूचे पराठे खावे लागतील."
"अरे यार! आता तू पण प्रिती सारखी अटी ठेवायला लागली. तसंही तुम्ही दोघी सारख्याच हट्टी आहात. तू काय मला आता तसं जाऊ देशील ?"
"काही नाही रे, मागच्या वेळेस घरी आली होती, तेव्हा तुझ्या आईने सांगितले तुझ्या आवडीबाबत. बरं चल, फ्रेश होऊन घे! बनवते मी लवकर पराठे." सागर रिकाम्या पिंजऱ्याकडे पाहत म्हणाला,
"तृप्ती, हा पिंजरा नेहमी रिकामाच पाहिला मी ?"
"अरे, आपला नाही तो पिंजरा, रूम मालकाचा आहे." तृप्तीने लगेच विषय टाळला, पिंजऱ्याचा विषय निघाला की ती नेहमी विषय टाळत होती. ती किचनमध्ये गेली. तेवढ्यात सागर तिला म्हणाला,
" तृप्ती ऐक ना! तुझ्या सोबत बोललं की खूप बरं वाटतं."
"हो का ? चला एक तरी गुण आहे, आमच्यात जो प्रितीकडे नाही."
"तिच्या सोबत बोललं की पण.." तो बोलता-बोलता मध्येच थांबला व थोडा लाजला.
त्याचा असा लाजरा चेहरा पाहून तिला हसायला आलं.
"हसा आमच्यावर सर्व हसा.. हसण्यासारखीच परिस्थिती आहे आमची."
"अरेs सागर, मस्करी करत होती."
थोड्या वेळाने दोघांनीही सोबत जेवण केले. पण अजूनही सागर त्याच्या विचारातून बाहेर आला नव्हता. त्याला बोलतं करत तृप्ती त्याला म्हणाली,
"सागर, तुला राग येणार नसेल तर एक बोलू ?"
"असं का बोलतेस ? मला नाही येत तुझा राग, बोल तू."
"आता काही दिवस प्रितीकडे हा विषय नको काढू. तिचा मूड पहा व एक दिवस सर्व स्पष्ट सांगून दे तिला आणि एकदाचा निर्णय घे बाबा. तुला नेहमी असं अपसेट नाही पाहवत मला." ती असं बोलत असली तरीही तिच्या चेहऱ्यावरची काळजी तिला लपवता आली नाही. सागर जेवन संपवून हात धूवत तिला म्हणाला, "माझं खूप प्रेम आहे ग तिच्यावर, पण तिला ते कळत नाही, मात्र तू म्हणतेस ते ही खरंचं आहे म्हणा. एकदाचा काय तो निर्णय घ्यावा लागेलच. तू नको काळजी करू." थोडा वेळ तिथे थांबून सागर त्याच्या घरी निघून गेला.

                 इकडे प्रिती विचारमग्न स्थितीत खिडकीजवळ उभी होती. समीक्षा व प्रिती गेल्या तीन वर्षापासून रूममेंट. खूप कमी वेळात त्यांची घट्ट मैत्री देखील झाली होती. एवढी की, एकदुसरीच्या वैयक्तिक गोष्टी, सूख-दुःख त्या वाटून घेत. त्या दोघींना एकमेकींचा खूप आधार होता. एक-दुसरीसाठी काहीही करण्याची व कोणत्याही थराला जाऊन मदत करण्याची तयारी होती. त्या नुसत्या मैत्रीनी नसून बहिणी सारख्याच राहत. विशेषतः समीक्षा प्रितीला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती. समीक्षा प्रितीपेक्षा फक्त एका वर्षानी मोठी होती. तरीही मोठ्या बहिणी सारखीच तिला सांभाळून घेत होती. 

                 प्रिती विचारात मग्न असतांनाच समीक्षा आनंदाने ओरडतच आत आली.
"हे प्रीत आपण दोघीही LLB 5th Sem पास झालोत." 
प्रिती खोटा आनंद चेहऱ्यावर ठेऊन म्हणाली,
"हो का. अभिनंदन."
"काय ग, तू अशी कशी ? एवढी आनंदाची बातमी दिली तर नुसतं अभिनंदन ? नाही, आज आपण पार्टी करूया. बाहेर जेवायला जाऊ ?"
"नको ग! आज मूड नाही पुन्हा कधीतरी जाऊ."
"काय झालं ? पुन्हा सागरसोबत भांडलीस."
"मी भांडते का त्याच्यासोबत ? तो एकच विषय लावून धरतो, सांग तूच मी काय करू ?"
"मी काय सांगणार तुला, तुमच्यामध्ये मला पडायचं नाही तू तुझं ठरव."
"ठरव ? काय ठरवू ? तुला तर सर्व माहिती आहे ना ? असं असतानाही म्हणतेस ठरव. कमाल आहे तुझी."
"त्याला सर्व सांगून टाक. त्याला घेऊ दे निर्णय काय तो एकदाचा. असं किती दिवस चालेल ? किती दिवस असंच भांडत राहणार तुम्ही ?"
"काय सांगू ? वेडी झालीय का तू ? त्याला माझे पूर्वआयुष्य आणि माझ्याबद्दल सर्व सांगितले तर तो प्रियकर सोड, साधा मित्र पण राहणार नाही माझा. मी एक चांगला मित्र देखील गमावून बसेल. तो माझं तोंड देखील पाहणार नाही कधी. निघून जाईल कायमचा माझ्या आयुष्यातून. त्यामुळेच त्याला सांगायचं बळ माझ्यात नाहीय."
"मी तृप्तीला सांगू का ? ती त्याची जवळची मैत्रीण आहे. आणि ती सांगेन त्याला समजावून."
"नको ग बाई! राहू दे ऐवढ्यात. आणि सांगायचं झालं तर तिलाच सांगावं लागेल." असं बोलतांना चिंताग्रस्त भाव प्रीतीच्या चेहऱ्यावर उमटले. ते पाहून समीक्षा विषय आवरता घेत तिला म्हणाली,
"ठीक आहे. ठरव तू काय करायचं ते ? पण त्याला एक कॉल करून घे अगोदर व बोल त्याच्यासोबत. पुढचं काय ते पुढे पाहू.. okay..??"
"करेन मी त्याला कॉल." 
"हो नक्की कर आणि आता मी छानसी स्ट्रॉंग कॉफी बनवते आपल्यासाठी. तुला फ्रेश वाटेल." असं बोलत-बोलत समीक्षा किचनमध्ये कॉफी बनवायला निघून गेली.

                   प्रितीने सागरला कॉल करून पुन्हा तो विषय काढणार नाही असं वचन घेतले होते. तसेच त्याला व तृप्तीला संध्याकाळी LLB 5th sem पास झाल्याच्या पार्टीसाठी रूमवर बोलवले होते. संध्याकाळी सर्व जमले आणि सर्वांच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर केली होती. सर्वांनी मिळून छान पार्टी एन्जॉय केली. पुढे काही दिवस असेच निघून गेले. पण सागर अधून-मधून अप्रत्यक्षपणे त्याचं प्रेम प्रितीकडे व्यक्त करतच होता. पण नेहमीप्रमाणे प्रिती त्याला टाळतच होती. दिवाळीजवळ येत होती व समीक्षा पार्टटाईम जॉब करत असल्यामुळे रूमची साफसफाई करण्याची जबाबदारी प्रितीने घेतली होती. असंच एका दिवशी साफसफाई करत असतांना तिने वर्तमानपत्रे, काही अनावश्यक कागदपत्रे जाळण्यासाठी वेगळे काढली. त्यात तिला समीक्षाची डायरी देखील दिसली. ती तिची पर्सनल डायरी होती. तीने डायरी बाजूला ठेवली. साफसफाई पूर्ण केली. दुपारी तिला समीक्षाचा कॉल आला होता. आज ती काही कामानिमित्त रात्री रूमवर येणार नाही असं तिला तिने सांगितले होते आणि सोबतच दरवाजा, खिडक्या, गॅस सिलेंडर.. बंद करशील हेही सांगायला ती विसरली नव्हती.

                   रात्र झाली. आज समीक्षा घरी नसल्यामुळे तिला करमत नव्हतं व झोपही येत नव्हती. तोच तिचं लक्ष समीक्षाच्या डायरीवर गेलं. तीने डायरी हातात घेतली व वाचू की नाही ? या संभ्रमात पडली. समीक्षा आपली मैत्रीण आहे. तिचं सर्व आपल्याला माहीतच आहे. असं काय वेगळं असेल डायरीत ? की जे आपल्याला माहीत नसेल आणि वाचली तरीही तिला काही वाईट वाटणार नाही. जुनकाही तिचं मन तिला डायरी वाचण्याकरिता सकारात्मक करीत होते. 

क्रमशः To Be Continued...........