Login

पिंजरा (भाग 2) जलद कथामालिका लेखन स्पर्धा

This is a heart touching love story show the shade of one of tha major social fact.



                                               



                                          अशा विचारातच तीने डायरी वाचायला सुरुवात केली. जवळपास अर्धी डायरी वाचून झाली. त्यातील प्रत्येक गोष्ट तिला समीक्षाने संगीतली होती. मात्र तिच्या लेखणीतून एक-एक गोष्ट उलगडत असतांना तिला वेगळी उत्सुकता वाटत होती. डायरीच्या निमित्ताने समीक्षाच्या वैक्तिमत्वाच्या विविध पैलूचे दर्शन तिला नव्याने होत होते. वाचता-वाचता मध्येच तिला तहान लागली. ती पाणी पिण्यासाठी उठली. पाणी घेतले व पुन्हा बेडवर जाऊन पडली. आता रात्र खूप झाली होती. तिने डायरी बाजूला ठेवली व झोपण्याची तयारी केली. मात्र तिला झोप लागत नव्हती. उर्वरित डायरी वाचावी असं तिला अधून-मधून वाटत होतं. शेवटी न राहवून तिने पुन्हा लाईट ऑन केला व डायरी वाचण्यास सुरुवात केली. भराभरा डायरीचे पाने ती वाचत होती. वाचता-वाचता कधी पहाट झाली तिला कळलं देखील नाही. डायरी वाचून पूर्ण होत होती. आता फक्त शेवटची दोनच पाने शिल्लक राहिली होती. एक पान वाचले. शेवटच्या पानावरचे, "सागर तुला पाहताक्षणीच मी तुझ्या प्रेमात पडली होते." हे वाचून तिला झटकाच बसला. हे तिच्यासाठी अनपेक्षित होतं. वाचून तिला विश्वासच बसत नव्हता. ती पुन्हा-पुन्हा तीच ओळ वाचत होती. आपण वाचलेलं खरं आहे याची खात्री करून घेत होती. पण ते खरंच होतं. तीने स्वतःला सावरले व पुढे वाचन सुरूच ठेवले.


                \"सागर तुला पाहताक्षणीच मी तुझ्या प्रेमात पडली होती. पण या डायरीत तुझ्याबाबत लिहू की नाही ? हा प्रश्न माझ्या समोर उभा होता. बऱ्याच वेळेस त्या प्रश्नाकडे मी दुर्लक्षही केलं होतं. हे प्रेमाचं पान असंच कोर ठेऊन याबाबत काही लिहायचं नाही असा निर्णयही मी घेतला होता. नंतर मात्र माझं पाहिलं प्रेम, माझ्या डायरीतील \"सोनेरी पान\" जर मी लिहलं नाही तर कदाचित माझी डायरी अपूर्णच राहिली असती. म्हणून आज डायरीच्या शेवटच्या पानावर माझ्या प्रेमाबाबत लिहीत आहे. तुझं प्रितीवर खूप प्रेम आहे, हे मला माहिती आहे. पण मला हेही माहिती आहे की, तिचं पूर्वआयुष्य आणि तिच्याबद्दलचं सर्वकाही तुला माहीत पडलं तर तुमचं मिलन होणार नाही. पण तू मला मिळावा म्हणून मी तुला तिच्याबद्दल कधीच काही सांगणार नाही. कारण मी तुला सांगितले तर प्रिती माझ्यापासून कायमची दूर जाईल हे मला नको आहे. मला तिला दुःख द्यायचं नाही. तिच्याशिवाय मी राहू शकत नाही. ती छोट्या बहिणीसारखी मला प्रिय आहे. पण सागर मला तू देखील हवा आहेस कारण तू माझं पाहिलं प्रेम आहेस. \"तुझा नुसता विचार जरी मनात आला की, एक थंड हवेचा गारवा मनात शिरून गुणगुणत आहे असं वाटतं.\" एक वेगळचं सुख मिळतं. आयुष्यभर तुझी सोबत हवी आहे. तुझा हात-हातात घेऊन चांदण्यारात्री फिरायचं आहे. तू जेव्हा समोर असतो तेव्हा मी माझीच राहत नाही. तुझ्याशी ऐकांतात तासंतास बोलणारी मी, तुझ्यासमोर मात्र गप्प बसते. मला काही सुचत नाही. एक वेगळंच दडपण माझ्यावर येतं. हे दडपण मला हवेहवेसेही वाटतं. पण तुला माझ्याबाबत असे काही वाटत नाही, हेही मला चांगलच माहीत आहे. म्हणून उद्या तू जरी माझ्या आयुष्यात नसलास तरी, हे माझ्या डायरीचे पान माझ्यासोबत कायमचं राहिल. ते कोणीच हिरावून घेऊ शकनार नाही माझ्याकडून. म्हातारपणी मला हे पान वाचायचं आहे. पुन्हा हेच प्रेम अनुभवायचं आहे, ते जगायचं आहे, त्या भावनेत रममाण व्हयाचं आहे, मनमुराद हसायचं देखील आहे. तू तेव्हा सोबत असशील की नाही ? खरंच माहीत नाही. पण या पानामधून तुला माझ्या आयुष्यात कायमचं ठेवायचं आहे. 

                  डायरी वाचून संपली. आता मात्र प्रिती सुन्न झाली होती. आपण एक स्वप्न पाहत आहोत असंच तिला वाटतं होतं. पण हे स्वप्न नव्हतं. समीक्षाने आपल्याला काहीच सांगितले नाही. याचाही तिला राग आला होता. पण तिच्याजागी दुसरं कोणी असतं तर आपल्याबाबत सागरला कधीच सर्व सांगून टाकले असते. स्वतःचा स्वार्थ साध्य केला असता. पण समीक्षाने तसं काहीच केलं नव्हतं. अशा अगणित विचारात ती मग्न होती. आता काय करावं ? तिला काही सुचत नव्हतं. बराच वेळ ती फक्त कूस बदलत होती. सकाळ झाली तरीही तिला झोप लागत नव्हती. सूर्याची कोवळी किरणे खिडकीच्या काचेतून आत डोकावू लागली. त्याच क्षणी तीने कधीनव्हे ते सागरला तिच्याबद्दल सर्व सांगण्याचा व समीक्षाच्या, प्रेमाच्या मार्गातून कायमचं निघून जाण्याचा निर्णय घेतला. तीने सागरला कॉल करून संध्याकाळी रूमवर बोलवले. स्वतःबद्दलच सर्व सांगण्याचं शिवधनुष्य पेलण्याचं बळ मिळावं म्हणून मनोमन देवाकडे प्रार्थना केली व सकाळची सर्व कामे करायला सुरुवात केली.

                प्रिती तिची कामे करत होती. पण तिचं लक्ष कशातच लागतं नव्हतं. आजची संध्याकाळ तिच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देणारी ठरणार होती. तिच्यासाठी सर्वकाही खूप कठीण होतं आणि आता पुढे काय होईल ? याची धास्ती तिच्या मनाला लागली होती. आपण सर्व सांगितल्यावर सागर कसा वागेल ? मला मित्र म्हणून तरी तो त्याच्या आयुष्यात नंतर स्थान देईल का ? माझ्याशी बोलणं तर सोडणार नाही ना ? खरंच काय विचार करेल तो माझ्याविषयी ? असे असंख्य प्रश्न जणूकाही सागराच्या लाटेप्रमाणेच तिच्या मनात उसळ्या घेत होते. मात्र या प्रश्नांची उत्तरे तिच्याकडे नव्हती. तिला सागरसोबत झालेली पहिली भेट, त्यांची ओळख, नंतर हळूहळू वाढत गेलेली त्यांची जवळीकता, त्याच्यासोबत घालवलेले क्षण हे सर्व असे काही आठवत होते की, जणूकाही चलचित्रच तिच्या डोळ्यासमोर तिला दिसत होतं. का पडला सागर माझ्या प्रेमात ? पडला नसता तर आजचा दिवस उगवलाचं नसता ? का मित्र म्हणूनच राहला नाही तो ? तिचं मन पुन्हा अशा अनेक प्रश्नाच्या जाळ्यात अडकलं होतं.

                दुपार झाली. समीक्षा रूमवर आली. जेवनाकडे प्रितीचं लक्ष नाही, हे तिच्या नजरेतून सुटलं नव्हतं.
"काय झालं प्रीत? कुठे लक्ष आहे तुझं आज ? पुन्हा सागर सोबत भांडण झाले का ?"
"नाही."
"मग काय झाल ? मी आले तेव्हापासून तू खूप अपसेट दिसतेस ? मला काही सांगणार नाही का ?"
"तू तरी कुठे मला सर्व सांग...." प्रिती बोलतांना मध्येच थांबली.
"का काय झालं ? स्पस्ट बोल. कोड्यात नको बोलू."
"मी काय कोड्यात बोलू ? माझं जीवनच पिंजऱ्यात पडलेल्या पक्षासारखं आहे." तिच्या तोंडून पिंजरा हा शब्द ऐकताच समीक्षा सावध झाली. तिचा मूड पाहून नंतर बोलूया, नाहीतर विषय भलतीकडेच जायचा या भीतीने समीक्षाने आवरते घेतले व तिला म्हणाली,
"जाऊ दे नको सांगू. जेवन कर आधी."
जेवण झाल्यावर समीक्षा पुन्हा प्रीतीजवळ आली. तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला म्हणाली,
"प्रीत, सांग बाळा काय झालं ?"
"काही नाही आज सागरला रूमवर बोलवले आहे. त्याला सर्व सांगून टाकते एकदाचं."
"तो त्याच विषयाच्या पुन्हा मागे लागला वाटतं. ठीक आहे, सांगून दे." सागरचं असं वागणं समीक्षाला माहित असल्यामुळे ती पुढे काहीही बोलत नव्हती.
प्रितीने समीक्षाचा हात-हातात घट्ट पकडून तिला म्हणाली,
"तू कुठेचं जाऊ नको. माझ्या सोबतच रहा! मला एकटीला नाही ते बळ."
समीक्षा तिला मिठीत घेत म्हणाली,
"मी कुठेच नाही जाणार, तुझ्यासोबतच आहे. घाबरू नको." त्या मिठीचा खूप आधार प्रितीला वाटला.


To be continued...

3rd Part will be publish tomorrow at 11.00 Am.              Copyright                                                         

जगदीश लक्ष्मण वानखडे.                     

All Rights Reserved.

0

🎭 Series Post

View all