संध्याकाळ होते. ठीक सहा वाजता सागर रूमवर पोहचला. समीक्षाने त्याला पाणी दिले व चहा ठेवण्यासाठी निघून गेली. "ऐ समीक्षा ऐक ना!..प्रिती कुठे आहे ?"
"आहे आत, तू चहा घे. मी बोलावते तिला." सागरने चहाचा शेवटचा घोट घेतला तोच प्रिती त्याच्यासमोर येऊन बसली. 
त्याच्या हातातला चहाचा कप टेबलावर ठेवत प्रिती त्याला म्हणाली,
"बोल, सागर तुला जे बोलायचं आहे ते." 
सागर समीक्षाकडे पाहून म्हणाला, "आता ? इथे?" 
प्रितीच्या लगेच लक्षात आलं, ती त्याला म्हणाली,
"हो तिच्यासमोरच बोल, ती कुठे जाणार नाही आहे." 
"बरं, तुला काही अडचण नसेल तर काही हरकत नाही. पण मी काय बोलणार, तुला सर्व माहीतच आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे." 
"किती ?" 
"हे काय नवीन ? प्रेमाचं कुठं मोजमाज असतं ? पण एवढं नक्की आहे की, मी तुला आयुष्यात कधीच एकटं सोडणार नाही. माझ्यापेक्षाही तुला आनंदी ठेवेन मी."
"तुला माझ्या व माझ्या पूर्वायुष्याबद्दल काही माहिती नाहीय."
सागर तिच्याकडे पाहत म्हणाला,
"त्याचा मला काही फरक पडत नाही आणि ते सांगण्याची काही गरजही नाही. प्रिती तुला एक सांगतो...."
प्रिती त्याला मध्येच थांबवत म्हणाली,
"थांब सागर. पण मला माझ्याबद्दल तुला सांगण्याची गरज आहे. फक्त सांगण्याआधी मला एक वचन दे."
"दिलं वचन."
"तू समजतो तेवढं सोपं नाही ते सागर....!."
अचानकच प्रितीचा आवाज वाढला. सागरलाही काही कळतं नव्हतं. समोर उभ्या असलेल्या समीक्षाने तिला हातानेच शांत राहण्याचा सल्ला दिला. समीक्षाकडे पाहून प्रितीने स्वतःला सावरले व पुढे बोलायला लागली.
"मी तुला माझ्याबद्दल सर्व सांगितल्यानंतर तू माझ्यासोबत बोलणे सोडनार नाहीस व एक मित्र म्हणून कायम माझ्यासोबत राहशील." बोलता-बोलता प्रितीचा आवाज घोगरा होतो. थोड्या वेळापूर्वी आवाज वाढवणारी प्रिती अचानक भावनिक होते. तिच्या अशा वागणूकीमुळे सागरला थोडं आश्चर्य वाटलं होतं. त्याने प्रितीला असं कधीच पाहिले नव्हतं. ती हळव्या आवाजात त्याला म्हणाली, 
"बोल सागर देशील वचन." सागर तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला,
"हो, दिलं वचन, बोल तू मनमोकळं, विश्वास ठेव, मी तुला कधीच सोडून जाणार नाही. मला जरी वाटलं तरी ते माझ्याकडून कधीच शक्य होणार नाही." त्याचं असं आश्वासक बोलणं ऐकून प्रितीने एक मोठा श्वास घेतला. बराच वेळ ती काहीच बोलली नाही. शेवटी न राहून सागर आवाज वाढवून तिला म्हणाला, "प्रिती बोल.. लवकर बोल काय ते ?"  प्रितीने शरीराचं सर्व बळ जिभेवर आणले व डोळे मिटून म्हणाली,
"माझं तुझ्यावर नाही तर तृप्तीवर प्रेम आहे."
                प्रितीच्या अशा बोलण्याने रूममध्ये निरव शांतता पसरली. सागर व समीक्षा दोघेही हे ऐकून अवाक झाले. समीक्षाला थोडी कल्पना होती. त्यामुळे तिला जास्त काही वाटलं नव्हतं. सागर मात्र अचानक जोरजोराने हसायला लागला.
"तू काय थट्टा चालवली आहेस ही ?"
"ही थट्टा नाही आहे सागर, वास्तविकता आहे."
सागर पुन्हा हसायला लागला. 
"माझा यावर विश्वास नाहीय."
"सागर विश्वास ठेव. हेच खरं आहे. वयाच्या 14 व्या वर्षापासून मला हे जाणवायला लागलं होतं. की मी खूप वेगळी आहे. इतर मुलीसारखी नाही. मला मुलीसारखं राहायला आवडत नव्हतं. उलट मुलांसारखं राहायला, मिरवायला आवडायचं. म्हणूनच मी तुला टाळत होते."
"ऐ, बस कर प्रिती. पुढे काही बोलू नको." असं बोलून तो जागेवरून उठला. प्रितीने त्याचा हात धरला पण त्याने एका झटक्यात तिला बाजूला केले. तेव्हा प्रिती त्याला म्हणाली,
"सागर यामध्ये माझी काय चूक आहे तूच सांग ? देवाने मला असे बनवले त्याला मी तरी काय करू ? आणि तू मला वचन दिले आहेस की निदान एक मित्र म्हणून तरी तू माझ्यासोबत राहशील." ती जिवाच्या आकांताने त्याची विनवणी करू लागली. पण सागर काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
"ऐ गप्प बस तू." सागरचा आवाज प्रचंड वाढला. रागाने त्याचा गोरा चेहरा लालबुंद झाला. सागरचं असं रूप दोघींनीही या आधी कधीच पाहिलं नव्हतं. हा वेगळाच सागर त्या दोघी अनुभवत होत्या. त्याचा असा अवतार पाहून दोघींनाही आश्चर्य वाटलं. सागर मोठ्याने ओरडला.
"मी काय वेडा वाटतो तूला ? आता मला माझीच लाज वाटायला लागली आहे की, मी कोणावर प्रेम केलं ते. तू...तू.."  बोलताना त्याचे ओठ थरथर कापत होते. त्याचं स्वतःवरच पूर्ण नियंत्रण सुटलं होतं. तो रागाने मोठया आवाजात बोलू लागला. 
"खूप घाणेरडी आहेस तू. तुझा मित्र तर काय तुझ्या सावलीत देखील मी उभा राहनार नाही कधी." प्रिती रडून-रडून त्याच्या पायाशी पडली पण त्याला तिचं काहीच वाटत नव्हतं. 
"स्पर्श नको करू मला...ssssss सर्व घाण भरली आहे तुझ्यात." आता तो तिला घाण-घाण बोलू लागला व त्याने तिला पायाने ढकलून दिले. तोच त्याच्या जोरात कानशिलात बसली. पाहतो तर काय.? बराच वेळ शांत बसलेली समीक्षा आता रागाने लालबुंद झाली होती. तिचंही स्वतःवरचं नियंत्रण सुटलं होतं. तिने सागरच्या एकामागून एक दोन-तीन कानशिलात लागावल्या व त्याच्या डोळ्यात पाहून म्हणाली,
"चल, निघ इथून आणि पुन्हा कधी येऊ नकोस. दाखवलीस तू तुझी लायकी. मोठा म्हणे, प्रेम करतो, आनंदी ठेवेल, कधी साथ सोडणार नाही, आयुष्यात कधीच तुझं घाणेरडं थोबाड ही दाखवू नकोस. आता एक शब्द जरी बोलला तर गाठ माझ्याशी आहे. चल चालता हो." सागर रागारागात तिथून निघून गेला. समीक्षाने जोरात दरवाजा बंद केला. प्रितीला उठवून बेडवर बसविले. किचनमधून तिला पाणी आणून दिले व स्वतःला सावरले. 
               समीक्षाचं असं वागणं पाहून प्रितीला आश्चर्याचा धक्काच बसला. याच सागरवर तिचं प्रेम होतं. प्रेमाबाबत डायरीत एवढं सर्व लिहून, तिने तिच्या भावनेला वाट मोकळी करून दिली होती. त्याच सागरला तिने कानशिलात लागावल्या होत्या. त्याला हाणून-पाडून बोलली होती. शिवाय आतापर्यत तिने सामीक्षा म्हणजे एक सालस, निरागस, सामंजस्य, अशीच पाहली होती. तिचा असा रुद्र अवतार तिने प्रथम अनुभवला होता. तिच्या हातून पाण्याचा ग्लास घेताना तिने समीक्षाला जवळ बसविले व तिला म्हणाली,
"ज्या सागरवर जीवापाड प्रेम केलं, त्याच सागरला आज तू माझ्यासाठी मारलेस." तिचं असं बोलणं ऐकून समीक्षा हसायला लागली तिला म्हणाली,
"माझं...अन सागरवर प्रेम ? खरंच वेड लागलंय तुला." 
"खोटं बोलू नको, माफ कर मला! पण मी तुझी डायरी वाचली आहे रात्री." तिचे बोल ऐकून समीक्षा सावध झाली. 
"हे तू ठीक नाही केलं, अशी कोणाची डायरी वाचायची नसते."
"ते सोड, त्यासाठी मी तुझी क्षमा मागितली आहे आणि तू जी शिक्षा मला देशील ती मी भोगायला तयार आहे. पण आता तूझ्या प्रेमाचं काय.?" प्रिती बोलत असतांना तिच्या चेहऱ्यावरचे चिंताग्रस्त भाव समीक्षाने अचूक हेरले.
"हो माझं होतं त्याच्यावर प्रेम. पण कालपर्यंत पाहिलेल्या सागरवर होतं. आज जो सागर मी पाहिला या सागरवर व यापुढच्या सागरवर माझं प्रेम कसं असेल ? तूच सांग. तो फक्त नावाचा सागर निघाला. त्याचं मन तर घाणेरड्या डबक्यासारखं आहे. आज त्याने परिस्थिती संयमाने हाताळली असती तर कदाचित मी त्याच्या प्रेमात अखंड बुडाली असती. पण त्याला प्रेमाची साधी व्याख्या देखील माहीत नाही. अशा व्यक्तीवर कसं प्रेम करू मी ?  प्रेमाचे किती प्रकार आहेत ? प्रेम हे किती शुद्ध, स्वच्छ, सुंदर, निर्मल, निष्पाप भावना आहे हे त्याला काय माहीत ?" समीक्षा बोलत असतांना ती जणूकाही तिच्या नावाप्रमाणे प्रेम या शब्दाची समीक्षाचं करत होती, असं प्रितीला वाटतं होतं. समीक्षा पुढे बोलू लागली, "डबक्यातल प्रेम नको गं मला. उलट मीच तुझे आभार मानते तुझ्यामुळेच त्याचं खरं रूप आज माझ्या समोर आलं." 
"पण कोणाला मारणे हा तुझा स्वभाव नाही समीक्षा." 
"कोणी तूला माझ्यासमोर अशी वागणूक दिली तर मी काय करणार.? मारणारच ना त्याला. शेवटी तू माझ्या आयुष्याचा अभिन्न भाग आहेस. तू माझ्या मनाचा एक कोपरा व्यापला आहेस. तू निरागस आहेस." बोलताना समीक्षा खूप भावुक झाली होती. तीच्या पडत्या काळात प्रितीने तिला खूप संभाळून घेतले होते. तिचे आई-वडील अपघातात गेल्या नंतर तिला त्या मानसिक धक्क्यातून सावरलेही होते. आता LLB चा बराचसा खर्च देखील प्रितीच करीत होती. त्यामुळे रक्ताचे नसले तरीही त्या बहिणी सारख्याच एकदुसरीला आधार देत होत्या. समीक्षाचे पाणावलेले डोळे पाहून प्रितीला देखील रडू आले. आता त्या दोघीही रडू लागल्या.
To be continued.....
4th & Final Part Will be Publish today at 4.00 P.M
Copyright 
जगदीश लक्ष्मण वानखडे 
All Rights Reserved 
