Login

पिंजरा (भाग 4 अंतिम ) : जलद कथामालिका लेखन स्पर्धा

This is a heart touching love story show the shade of one of tha major social fact.





                                         असेच दिवसा मागून दिवस करत-करत, काही महिने निघून गेले. त्या दोघीनिही सागरच्या धक्यातून एकमेकींना सावरण्याचा प्रयत्न केला व बऱ्यापैकी त्या सावरल्या देखील. त्यातच LLB  last sem ची exam जवळ येत असल्यामुळे दोघींनीही अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला होता. प्रिती देखील दोघींसाठी नोट्स काढण्याच्या कामाला लागली. मात्र त्या घटनेनंतर समीक्षाच्या वागणुकीतील बदल प्रितीला जाणवायला लागला. ती जरा जास्त वेळ रूमच्या बाहेर राहायला लागली. माध्यन्तरी दोन दिवस ती रूमवर आली पण नव्हती. तिला विचारलं तर समीक्षाने तिला पार्टटाईम जॉबचं कारण सांगितलं होतं. अभ्यासासाठी कांही दिवसात जॉब सोडनार आहे. म्हणून राहिलेले काम पूर्ण करण्याकरिता कांही दिवस जास्तीचे काम करावे लागत आहे व त्यासाठी एक-दोन दिवस बाहेर गावी पण लागेल. असं तीने प्रितीला सांगितले होते. पण प्रीतीला ते फारसं पटलं नव्हतं. समीक्षाच्या मनात काहीतरी वेगळचं चालत आहे. असं तिला सारखं वाटत होतं. पण प्रत्येक वेळेस समीक्षा तिला सांगण्याचं टाळत होती. काही दिवसांनी exam सुरू झाली. शेवटचा पेपर झाला. त्याच संध्याकाळी काही दिवसात प्रितीचा वाढदिवस असल्यामुळे, वाढदिवस साजरा केल्यानंतर दोघींनीही रूम सोडून घरी जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी समीक्षाने तृप्तीची रूम गाठली.


                समीक्षा रूमजवळ पोहचली. रूमची डोर बेल वाजविली. तृप्तीने दरवाजा उघडला. पण समीक्षाला असं अचानक पाहून तृप्तीला आश्चर्य वाटलं. कारण ती प्रथमच तिच्या रूमवर आली होती. तृप्तीने तिला आत बोलावले. चहापाणी झालं. समीक्षा सारखी तृप्तीकडे एकटक पाहत होती. तिच्या नजरेची तृप्तीला भीती वाटत होती. त्यामुळे ती तिच्या नजरेला नजर भिडवीत नव्हती. तेवढ्यात समीक्षाचं लक्ष दरवाजा समोर लटकलेल्या रिकाम्या पिंजऱ्याकडे गेलं. पिंजऱ्याचा दरवाजा बंद होता. आता ती पिंजऱ्याला निरखून पाहू लागली. 
तेवढ्यात हिम्मत एकवटून तृप्ती तिला म्हणाली, 
"तू अशी अचानक ?  कॉल न करताच आलीस. काही महत्वाचं काम आहे वाटतं ?" समीक्षा तिच्याकडे पाहत तिला म्हणाली, 
"सागरला भेटली का एवढ्यात.?" 
"नाही."
"का ? तू तर जवळची मैत्रीण आहेस ना त्याची."
तृप्ती त्रासून तिला म्हणाली,
"होती त्याची मैत्रीण. पण आता नाही, ते जाऊ दे, तुझं काय काम आहे ते सांग ? का आलीस ?"
"बरं ठीक आहे. कसलीच प्रस्तावना देत नाही. आता सरळ विषयावर येते. माझी मैत्रीण प्रिती तिला तू आवडतेस, तिचं प्रेम आहे तुझ्यावर."
"काय मूर्खा सारखं बोलतेस तू ? तुझ्या जिभेला काही हाड. वेडी झाली आहे ती आणि तुझ्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसून येतो तिच्यासोबत राहून."
समीक्षा हसायला लागली, हसतच तिला म्हणाली,
"का ? तुझं प्रेम नाही तिच्यावर ?"
"समीक्षा आवर घाल तुझ्या तोंडाला येईल ते बोलू नको."
"तृप्ती, तू रूमवर येत होती तेव्हा ज्या नजरेने तू प्रितीकडे पाहत होती ते माझ्या नजरेतून सुटलं नव्हतं. जवळजवळ गेल्या तीन वर्षांपासून मी प्रिती बरोबर राहते. तेव्हा मला तुझ्या नजरेतले भाव समजत नव्हते असं समजू नकोस." अचानक तृप्तीचा आवाज वाढला, 
"समीक्षाsss..तू जा इथून. खरंच वेड लागलं तुम्हाला, सागर म्हणत होता तेच खरं आहे." एका हाताने पिंजऱ्याला गोल फिरवत समीक्षा तिला म्हणाली,
"आवाज नको वाढवू , तुला खरं ऐकायचं आहे ना ? आता खरंच सांगते तुला."
"मला काही ऐकायचं नाही. तू जा आधी इथून."
"हो जाते, पण खरं सांगून जाते. मी कधीनव्हे ते प्रितीसोबत खोटं बोलली. ऑफिसच काम सांगून उशीरा रूमवर जात होती. दोन दिवस तर रूमवर गेली देखील नव्हती."
तृप्तीने तिला मध्येच थांबविले व वैतागून तिला म्हणाली,
"हे सर्व मला का सांगतेस ? माझा काय संबंध ?"
"हो तुझाच संबंध आहे."
"म्हणजे ?"
"मी तुझ्याबद्दल माहिती गोळा करीत होते. तू कॉल सेंटरचा जॉब सोडला! सागरचं व तुझं भांडण झालं! आता तू त्याच्यासोबत बोलत नाहीस! तुझ्या मित्र-मैत्रीनिना पण भेटले. एवढंच नाही तर तुझ्या घरीदेखील जाऊन आले. तुझ्या घरचे पण तुला आता स्वीकारत नाहीत. कारण तूही प्रिती सारखीच आहेस. म्हणून तू एकवेळेस आत्महत्येचा देखील प्रयत्न केला होतास. तेव्हा आता खोटं बोलण्यात काही अर्थ नाही." आता मात्र तृप्तीचा बांध फुटला ती खाली बसून ढसा-ढसा रडायला लागली. 

                 समीक्षा तृप्तीजवळ गेली. तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला म्हणाली "रडू नकोस तृप्ती." पण तृप्तीचं रडणं काही केल्या थांबत नव्हतं. ती आजवर जे जगापासून लपवत आली होती. तेच आता तिच्यासमोर येऊन उभं राहिलं होतं. एक वेळेला आई-वडिलांना सांगण्याची हिम्मत तिने केली होती. पण समाज काय म्हणेल ? समाजाच्या भीतीने आई-वडिलांनी तिचा स्वीकार केला नव्हता. त्यामुळे आधीच आत्मविश्वास गमावलेली ती फार कोसळून गेली होती. शेवटी पुण्याला येऊन कॉल सेन्टरला जॉब करीत होती. इथे तिला सागरचा खूप आधार वाटत होता. पण नशिबाने इथेही तिची थट्टा केली होती. त्या दिवशी समीक्षा व प्रितीच्या रूमवर झालेला सर्व प्रकार तृप्तीला सांगत असताना सागर राक्षसी हसत होता. त्यामुळे तिने सागर सोबतचे संबंध तोडले होते. त्याचसाठी कॉल सेंटरचा जॉबही सोडला होता. इथून पुढे मुंबईला जाण्याची तयारी केली होती. समीक्षाच्या येण्याने तिचा भूतकाळ तिच्यासमोर पुन्हा येऊन उभा राहिला होता. तिला तिच्या भूतकाळातील प्रत्येक गोष्ट आठवत होती. आता समीक्षाही काही न बोलता तिला मनसोक्त रडू देत होती, तिचं मन मोकळं होऊ देत होती.

                   काही वेळाने ती शांत झाली. तेव्हा समीक्षा तिला म्हणाली, 
"चल निघुया. पॅकिंग कर." तृप्तीने आश्चर्याने विचारले,
"कुठे ?"
"जिथे तुझा सन्मान आहे तिथे."
"म्हणजे ?"
"प्रिती जवळ आमच्या सोबत."
"नाही, नाही, मी वाईट आहे, अनैसर्गिक आहे, मी पापी आहे."
"कसलं वाईट ? काय अनैसर्गिक ? काय पाप ? काय बोलतेस तू ? असं काही नसतं तुही तेवढीच नैसर्गिक आहेस जेवढी मी."
"नाही असं असतं तर माझ्या आई-बाबांनी मला सोडलं नसतं."
"त्यांनी तुला सोडले म्हणून तू लगेच असा विचार करू नको. तुझ्या माहितीसाठी प्रितीच्या आई-वडिलांनी तिला सोडलेलं नाही. उलट रोज त्यांचा एक कॉल तिला येतो. तिची काळजी ते घेतात. एक दिवस तुझ्या ही आई वडिलांना त्यांची चूक कळेलं. आपण बोलूया त्यांच्या सोबत."
"नको राहू दे, मला एकटीला. मागच्या जन्मात काही पाप केले असतील ते भोगू दे एकटीलाच."
"हे बघ, मी प्रितीच्या आई-वडिलांसोबत बोलली आहे. आता रूमवर गेल्यावर प्रितीलाही सर्व सांगणार आहे. तू फक्त माझ्या सोबत चल. पुढचं आयुष्य खूप सुंदर आहे. विश्वास ठेव माझ्यावर."
तृप्ती काहीही न बोलता गप्प बसलेली होती. सरतेशेवटी तिच्याकडे पाहून समीक्षा उठत तिला म्हणाली, 
"आता मी काही जास्त बोलणार नाही. शेवटी तुझा निर्णय तुलाच घ्यावा लागेल. पण एक सांगते, तू खूप चुकीचा विचार करतेस. तुम्ही काही पाप केलं नाही. उलट तुम्ही देवाची लाडकी, निष्पाप लेकरं आहात. लक्षात ठेव, हाच जन्म पहिला व शेवटचा, आता तूचं ठरवं तुला जन्म-पुनर्जन्म, पाप-पुण्य या निरर्थक गोष्टीत अडकून एकट्याने आयुष्य काढायचं आहे की, जिथे सन्मान व समान वागणूक आहे, अशा तुझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत जगायचं आहे." बोलता-बोलता समीक्षा पिंजऱ्याजवळ गेली. पिंजऱ्यातून तृप्तीकडे पाहू लागली. तृप्तीचा अंधुक, अस्पष्ट चेहरा तीला दिसू लागला. तिने हळूच पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. पण तृप्तीचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. समीक्षा पुन्हा तृप्तीजवळ गेली. तिचे अश्रू पुसत तिला म्हणाली,
"तू ही प्रितीवर प्रेम करतेस हे चांगलं माहीत आहे मला. तिचा वाढदिवस आहे. सात मे ला, म्हणजेच दोन दिवसांनी. ती तुझी वाट पाहत राहील, चल येते मी." असं बोलून समीक्षाने जातांना पुन्हा तिच्याकडे एक नजर टाकली व तिथून निघून गेली.

                      समीक्षाने रूमवर गेल्यावर घडलेली सर्व हकीकत प्रितीला सांगितली. आधी प्रितीला समीक्षाचं असं वागणं आवडलं नव्हतं. मात्र तीचं मन आता तिच्याच वाढदिवसाची कधीनव्हे ते आतुरतेने वाट पाहत होतं. मनोमन ज्या तृप्तीवर मी प्रेम करत होते खरंच ती येईल का ? तिला काय वाटत असेल माझ्याबद्दल ? आता काय विचार करत असेल ती ? तीचं मन पुन्हा विचारांच्या चक्रव्यूहात अडकलं होतं. तिकडे तृप्तीही विचारात मग्न झाली होती. आता तिचा हा निर्णय तिच्या आयुष्याची दिशा ठरवणारा होता. आतापर्यत ज्यांना-ज्यांना तिच्याबाबत माहीत पडलं होतं, त्यांच्या हीन नजरेने तिला अपमानित व्हावं लागलं होतं. पण पहिल्या वेळेस कोणीतरी तिला सन्मानाची वागणूक दिली होती. त्यातच प्रितीची तिला वाटणारी ओढ, तिच्याबद्दलचं प्रेम, ती रोखू शकत नव्हती. पण ती आत्मविश्वास गमावून बसली होती. त्यामुळे एवढा मोठा निर्णय घेण्याचं सामर्थ्य तिच्यात नव्हतं. दोघीही विचारमग्न झाल्या होत्या. एक वादळच जणूकाही त्याच्या मनात तयार झालं होतं. आता हे वादळ नक्की कशाचं होतं. त्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी करणार होतं की, आतापर्यत जीवन जगताना झालेला अपमान,अवहेलना, घुसमट नष्ट करणारं होतं. याची उत्तरे काळाच्या काळजात दडली होती. 

                     प्रितीच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला. समीक्षाने वाढदिवसाची सर्व तयारी केली होती. संध्याकाळ झाली. दोघीही तृप्तीची वाट पाहत होत्या. पण तृप्ती काही आली नाही. दोघीही खूप निराश झाल्या. केक न कापता, जेवण न करता अंथरुणावर पडल्या. आता मात्र दोघीही रडायला लागल्या होत्या. मात्र कोणीच कोणाचं सांत्वन करीत नव्हतं. अशी स्थिती त्यांच्यावर पहिल्या वेळेसच आली होती. अचानक रात्री 11 वाजता दारावरची बेल वाजली. एवढ्या रात्री कोण आलं असेल ? म्हणून समीक्षाने दरवाजा उघडला. पाहते तर काय ? तृप्ती एका हातात बॅग व दुसऱ्या हातात पिंजरा घेऊन उभी होती. पिंजऱ्याचा दरवाजा उघडा होता. समीक्षाने आनंदी होऊन प्रितीला मोठ्याने आवाज दिला. प्रिती उठून उभी राहली. तिला दरवाजा जवळ तृप्ती उभी दिसली. तोचं समीक्षा बाजूला झाली. दोघीही चालत येऊन समोर-समोर उभ्या राहिल्या. दोघींच्या डोळ्यातून अश्रुच्या धारा वाहत होत्या. पण ते आनंदाअश्रू होते. त्या एकमेकींना फक्त पाहतच होत्या. जणूकाही डोळ्यानीच त्यांचा संवाद सुरु होता. बराच वेळ त्या तशाच उभ्या राहिल्या. भावना अनावर झाल्या. सरतेशेवटी त्या दोघीं मिठीत विलीन झाल्या. आज खऱ्या अर्थाने त्या दोघींची प्रीत जूळून त्यांना कायमची तृप्ती मिळाली होती. त्यांना पाहून समीक्षाचा आत्मा सुखावत होता. आत्मिक सुख म्हणजे नेमकं काय ? याची अनुभुतीच तिला होत होती. त्या दोघींना काही वेळ एकांत मिळावा म्हणून ती त्यांना एकटं सोडून तिथून निघून गेली. जातांना ती मनात 'उमैर नजमी' यांचा शेर पुटपुटली, 

"निकाल लाया हू एक पिंजरे से एक परिंदा, 
अब इस परिंदे के दिल से पिंजरा निकालना है.'

2 वर्षानंतर 

                         प्रिती व समीक्षा नामांकित वकील झाल्यात. समीक्षा, प्रिती व तृप्ती ह्या तिघीं मिळून एका संस्थे स्थापना करतात. समीक्षा व प्रितीचा कामाचा व्याप पाहून संस्थेची जबाबदारी तृप्ती स्वतःकडे घेते. तसेच संस्थेअंतर्गत 'मोकळा श्वास' नावाचा एक उपक्रम राबिविल्या जातो. त्यामध्ये समलिंगी मुलींना लघु उद्योगाचे प्रशिक्षण देऊन आर्थिक व मानसिक आधार देण्याचं काम केले जाते. तसेच या उपक्रमाअंतर्गतच समलैंगिकता हे अनैसर्गिक नसून नैसर्गिकच आहे याबाबत समाजात जनजागृती सुद्धा केली जाते. कालांतराने तृप्तीच्या आईवडिलांना देखील त्यांची चूक समजते. आपल्या मुलीने न केलेल्या चुकीची शिक्षा आपण आतापर्यत तिला देत होतो याचा त्यांना पश्चताप होतो.

समाप्त.