चोरीची योजना (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
चोरीची योजना

रामा आणि गुंडप्पा तिथून बाहेर पडले. महालात फिरताना रामा स्वतःशीच बोलू लागला; ‘कुठे गेले असतील आचार्य आणि त्याची भ्रष्ट मंडळी? इतक्या रात्री सगळ्या टोळक्या सोबत इथे काय करतायत काय माहित.’

इतक्यात पुढे गेलेला गुंडप्पा मागे आला.

“लामा…” तो बोलत होता पण रामाने त्याचे तोंड दाबले.

“हळू बोल. त्या आचार्य आणि त्याच्या मंडळींना कळता कामा नये इथे आपण आहोत.” तो हळू आवाजात म्हणाला.

इथे आचार्य आणि बाकी लोक चालले होते.

“आचार्य! आता तुम्हाला एक असा मार्ग दाखवतो जिथून चंद्रमणी आणला जाण्याची पूर्ण शक्यता आहे.” कोतवाल म्हणाला.

“मग आधीच का नाही दाखवला? उगाच सगळीकडे फिरायला लावलं.” आचार्य म्हणाला.

“उलट तुम्हीच कुठेतरी गायब झाला होतात आणि आम्ही तुम्हाला शोधत फिरत होतो.” कोतवाल म्हणाला.

“ही कसली भाषा आहे? गायब झालो होतो म्हणजे?” आचार्य रागाने म्हणाला.

“बरं कुठेतरी प्रस्थान करत होतात.” कोतवाल म्हणाला.

“चल आता दाखव आधी मार्ग.” आचार्य म्हणाला.

इतक्यात त्याला गुंडप्पाने रामाला हाक मारलेली ऐकू आली आणि तो चालता चालता एकदम थांबला.

“त्या उद्धट पंडिताने काय जादू केली आहे काय माहित. आत्ताही आम्हाला त्याचं नाव ऐकू आलं. असं वाटलं जसं कोणीतरी त्याला हाक मारतय.” आचार्य म्हणाला.

“असं असेल तर तुमच्या सोबत राहून तुमचाही कुप्रभाव नाही नाही सुप्रभाव आमच्यावर पडला आहे. आम्हालाही तेच ऐकू येतंय जे तुम्हाला येतंय.” मणी म्हणाला.

“आम्हालाही ऐकू आले आचार्य.” कोतवाल म्हणाला.

“तुलाही ऐकू आले?” आचार्य म्हणाला.

“हो.” कोतवाल म्हणाला.

“चला मग इथे नक्कीच कोणीतरी आहे.” आचार्य म्हणाला आणि ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने ते गेले. रामा आणि गुंडप्पाने त्यांना येताना पाहिलं आणि ते त्यांची नजर चुकवून लपले. आचार्य आणि बाकी सगळे पुढे होते तर रामा आणि गुंडप्पा त्यांच्या मागे एका खांबाआड लपले होते. चालता चालता धनी, मणी एकमेकांना धक्का मारत होते आणि त्यांच्यात वाद होऊ लागला.

“जरा हळू बोला.” आचार्य त्यांना हळू आवाजात ओरडला.

“मी आत्ता पडलो असतो गुरुजी. हा बघा ना.” मणी म्हणाला.

“पडलात तरी आवाज न करता पडा. दाखवू का आम्ही?” आचार्य म्हणाला.

“अजून किती पडणार गुरुजी तुम्ही? आधीच चंद्रमणी चोरीची योजना करून पडताय अजून काय पडायचे बाकी आहे?” धनी म्हणाला.

आचार्यने रागाने मणीच्या कानाखाली मारली आणि त्याने धनीला मारले. ते लोक पुढे निघून गेल्यावर रामा आणि गुंडप्पा तिथून बाहेर निघाले.

“लामा अले हे आचाल्य आणि त्याची भ्लस्ट मंडली चोली कलनार आहेत आणि तू बिचाल्या अतिथी लोकांवर संशय घेतला.” गुंडप्पा म्हणाला.

“जोपर्यंत कार्यक्रम संपन्न होत नाही तोवर सगळेच संशयित असणार ना! चल बाहेरच्या चोरांना नंतर बघू आधी या आंतरिक चोरांना वाटेला लावू. आता मी सांगेन त्याला फक्त हो ला हो कर. आणि थोड्या मोठ्या आवाजात बोल.” रामा म्हणाला.

“ठीक आहे लामा.” तो जोरात म्हणाला.

“आत्ता नाही. मी सांगेन तेव्हा. चल पटकन.” रामा म्हणाला आणि त्याला घेऊन मुद्दाम आचार्य आणि बाकी लोकांच्या पुढे चालू लागला.

“गुंडप्पे तुला काय वाटलं मी इथे फक्त सगळ्या पाहुण्यांना काढा द्यायला आलो होतो. तर तसं नाहीये. मी इथे चंद्रमणी कसा न्यायचा याची योजना करायला आलो होतो.” रामा म्हणाला.

“हो?” त्याने विचारलं.

“हो. मी सगळी योजना केली देखील आहे. चोराला वाटेल मी कोणत्यातरी गुप्त मार्गाने चंद्रमणी आणणार पण खरी योजना तर वेगळीच आहे. थांब इथे कोणी नाहीये ना हे बघू दे मग तुला सांगतो.” रामा म्हणाला आणि त्याने मुद्दाम सगळीकडे नजर फिरवली.

आचार्य आणि बाकी लोक आधीच त्याचा पाठलाग करत त्याच्या मागावर लपून उभे होते.

“कोनी नाहीये बोल लामा बोल.” तो म्हणाला.

रामा आणि गुंडप्पा तिथे असणाऱ्या शाही मंचकावर बसले.

“नीट कान देऊन ऐक हा गुंडप्पे. चोरांना वाटत असेल तो चंद्रमणी गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी दरबारात आणला जाईल पण तो मी उद्याच दरबारात घेऊन जाणार आहे. चोरांना वाटत असेल तो सशस्त्र सेनेच्या देखरेखीखाली आणला जाईल तर तसेही नाही. तो आणणार आहे खिशातून.” रामा म्हणाला.

"कोनाच्या खिशातून?" त्याने विचारलं.

"तुझ्या गुंडप्पे! तुझ्या." रामा म्हणाला.

“पन मला तल खिसा नाहीये.” तो म्हणाला.

“अरे गुंडप्पे आपण शिवून घेऊ खिसा.” रामा म्हणाला.

त्याने मान डोलावली.

“तू लहान आहेस आणि कोणी विचारही केला नसेल तुझ्याकडे चंद्रमणी सारखा बहुमूल्य हिरा असेल. तू तो हिरा घेऊन मला द्यायचा आणि मी तो महाराजांना देईन. मग आपण या जबाबदारीतून सुटलो. आता फक्त कोणाला समजलं तर ते तुझ्या अपहरणाचा प्रयत्न करू शकतील पण कोणाला कळणारच नाही ना! त्यामुळे तू काळजी करू नकोस.” रामा म्हणाला.

गुंडप्पा खुशीत मानेने हो म्हणाला.

“चल आता रात्र खूप झाली आहे आपण निघू. उद्या महत्त्वाचं काम करायचं आहे ना.” रामा म्हणाला आणि ते दोघे तिथून गेले.

ते दोघे तिथून गेल्यावर आचार्य आणि बाकी लोक बाहेर आले.

“हा स्वतःला विद्वान आणि शहाणा समजतो ना! स्वतःच चंद्रमणी चोरीची योजना आपल्या हातात देऊन गेला आहे. उद्या आता एकीकडे त्या गुंडप्पाचे अपहरण होऊन तो हिरा आपण चोरला की दुसरीकडे महाराज त्या पंडित रामावर चिडून त्याला पदावरून काढून टाकतील आणि आपला मार्ग कायमचा मोकळा.” आचार्य खुश होत म्हणाला.

ते सगळे देखील लगोलग तिथून निघाले.

दुसऱ्या दिवशी महालात गणरायाचे आगमन झाले आणि राजा आरती करत होता. आचार्य आणि त्याच्या साथीदारांचे लक्ष गुंडप्पावर होते. रामा देखील त्या लोकांकडे लक्ष ठेवून होता. आरती सुरु असतानाच रामाने गुंडप्पाला डोळ्यांनी हळूच खूण केली. तो हळूच मागे मागे जाऊ लागला. आचार्यने ते पाहिले आणि धनी, मणीला त्याचे अपहरण करण्यासाठी मागावर पाठवले. गुंडप्पाला ते दोघे त्याच्या मागावर आहेत हे माहीत होतं. तो मुद्दाम खांबाआड लपून त्यांची मजा घेत होता. दोन तीन वेळा तो धनी, मणीच्या हातून सुटला. धनी त्याला पकडायला धावत होता पण मणीने त्याला थांब अशी खूण केली आणि त्याने घंटी काढल्या. त्या घंटी बघून गुंडप्पा स्वतः त्यांच्या समोर आला आणि त्या दोघांनी त्याला धरले.

तर इथे आचार्य सारखा मागे बघत होता हे पाहून रामा त्याच्याजवळ आला.

“काय झालं आचार्य? सारखं मागे काय पाहताय? गणपती बाप्पा तर समोर आहेत.” रामा म्हणाला.

“काही नाही. किती जनसमुदाय गोळा झालाय ना! तेच पाहतोय.” आचार्य म्हणाला.

रामा ते ऐकून पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन उभा राहिला. इतक्यात आरती संपली आणि आचार्यने “गणपती बाप्पा मोरया” असा जयघोष केला.

सर्व झाल्यावर अम्माच्या लक्षात आले गुंडप्पा दिसत नाहीये. तसे तिने खुणा करून शारदाला सांगितले आणि शारदाने रामाला.

“तुम्ही दोघी काही काळजी करू नका. आता फक्त मी सांगतो तसं करा.” रामा म्हणाला.
******************************
इथे दुसरीकडे गुंडप्पाला पोत्यात घालून धनी, मणी एका कक्षात आले होते.

“मणी या म्हाताऱ्याच्या कुकर्मात साथ देऊन माझी दृष्टी तर गेली नाही ना? मला काही दिसत नाहीये.” धनी म्हणाला.

“म्हातारा दिवे लावायला विसरला असेल.” मणी म्हणाला.

गुंडप्पा मला सोडा, बाहेर काढा म्हणून ओरडत होता. इतक्यात आचार्य आणि कोतवाल तिथे आले.

“इथे एवढा अंधार कसा?” कोतवाल म्हणाला.

“आम्ही तर सगळे दिवे लावले होते पण जाऊदे. चंद्रमणी हातात आला की सगळीकडे लख्ख प्रकाश पडेल.” आचार्य म्हणाला.

गुंडप्पा पुन्हा ओरडला म्हणून आचार्यने त्यांना त्याला बाहेर काढायला सांगितले. त्या दोघांनी पोते सोडले आणि त्याला बाहेर काढले.

“मला का आनल इते?” गुंडप्पा म्हणाला.

“तो चंद्रमणी कुठे आहे?” आचार्यने विचारलं.

“एवलच? आदी तांगायच ना! आदीच दिला असता.” तो म्हणाला.

त्याने लगेच त्याच्या खिशातून काहीतरी काढून मणीच्या हातात दिले.

“गुरुजी! किती छान आहे हा चंद्रमणी. हा घ्या.” तो आचार्यकडे देत म्हणाला.

“शक्यच नाही! हा चंद्रमणी नाहीये. चंद्रमणी पाताळातील अंधाराला देखील उजळवून टाकेल असा आहे. हा चंद्रमणी नाही. काहीतरी गडबड आहे.” तो म्हणाला.

इतक्यात धनीच्या पायावर कसलातरी वार बसला.

“गुरुजी काहीतरी गडबड आहेच. मला असं वाटलं कोणीतरी माझ्या पायावर काठीने मारलं.” तो म्हणाला.

इतक्यात आचार्यच्या देखील पायावर वार बसला. असे करता करता कोतवाल, धनी, मणी आणि आचार्य चौघांना वार बसू लागले. अंधारात रामा, शारदा आणि अम्मा होते जे त्यांना काठीने मारत होते. त्या तिघांनी मिळून या चौघांना एकावर एक असे समोरच असलेल्या चौरंगावर पाडले आणि मारू लागले.

“कोण आहे?” आचार्यने इवळत विचारले.

“देवाची काठी आहे ही. जिचा आवाजही येत नाही आणि जी दिसतही नाही.” रामा थोडा आवाज बदलून म्हणाला आणि त्यांना चांगलेच बुकलून ते लोक बाहेर पडले.

रामा आणि त्याच्या घरचे आता घरी पोहोचले होते आणि आचार्य वर हसत होते.

“आज खूप मजा आली. आचार्य आणि त्याच्या भ्रष्ट मंडळींना चांगलाच मार बसला आहे.” रामा हसत हसत म्हणाला.

“हो हो. आता ते लोक एकमेकांना शेकत बसले असतील.” अम्मा खुणा करून म्हणाली आणि शारदाने सांगितलं.

यावर रामा आणि सगळेच पुन्हा हसू लागले.
******************************
इथे आचार्य आणि बाकी लोक मार खाऊन इवळत बसले होते.

“कोणीतरी दिवे लावा.” आचार्य इवळत म्हणाला.

धनीने कसेबसे उठून दिवे लावले आणि तोही तिथेच इवळत बसला. मणीच्या हातात तो खोटा चंद्रमणी होता तो त्याने पाहिला आणि जवळजवळ हातातून उडवला.

“हे अंड आहे.” तो म्हणाला.

धनीने देखील लगेच ते उडवले आणि ते आचार्यच्या हातात पडले. त्यानेही ते उडवले. कोतवालने ते नीट पाहिले.

“आचार्य! हे अंडे नाही. दगडाला पांढरा रंग लावला आहे. बघा.” कोतवाल ते आचार्यकडे देत म्हणाला.

आचार्य काही ते घेत नव्हता.

“खरंच आचार्य! हे अंडे नाहीये.” कोतवाल पुन्हा म्हणाला.

आचार्यने ते नीट पाहिले. खरेच दगडाला पांढरा रंग दिलेला होता.
**************************
तर इथे सगळं नीट झालेलं असलं तरी शारदाला गुंडप्पाची काळजी वाटत होती ती बोलू लागली; “पण या सगळ्यात गुंडप्याच्या जीवाला धोका होता ना? त्याला जर काही झालं असतं तर? शेवटी आहे तर तो एक लहान मुलगा ना!” शारदा म्हणाली.

“ये रे गुंडप्पे!” रामा म्हणाला आणि गुंडप्पा त्याच्या मांडीवर जाऊन बसला. रामा पुढे बोलू लागला; “असं कसं काही होऊ दिलं असतं मी? माझाही तो सगळ्यात जवळचा मित्र आहे. याच्यासाठी तर मी माझाही जीव दिला असता. आचार्य आणि त्यांच्या भ्रष्ट मंडळींनी काहीच केलं नसतं याची मला खात्री होती. कारण त्यांना गुंडप्पाशी काहीच घेणेदेणे नव्हते. त्यांना हवा होता फक्त चंद्रमणी. जर गुंडप्पाने तो दिला नसता तर मात्र त्याच्या जीवावर बेतलं असतं म्हणूनच चंद्रमणी म्हणून आपण त्यांच्या हाती अंड दिलं. दगडाचे अंडे. आता त्याच दगडाने ते लोक डोके फोडत बसले असतील.” रामा हसत हसत म्हणाला.
************************
आचार्यने ते पाहिल्यावर त्याची तळपायाची आग मस्तकात गेली होती.

“चला बरं झालं.” धनी म्हणाला.

“काय बरं झालं?” आचार्यने रागाने विचारलं.

“भले तो चंद्रमणी खोटा निघाला पण निदान हे अंडे नव्हते. धर्म तरी भ्रष्ट होण्यापासून वाचला.” मणी म्हणाला.

“रामा!” आचार्य रागाने दातओठ खात म्हणाला.

“तुम्ही एवढ्या विश्वासाने कसे सांगू शकता यामागे रामाचं होता म्हणून?” कोतवालने विचारलं.

“अजून कोण असू शकतं कोतवाल साहेब? जगात सगळे एकदाच होळी खेळतात पण तो रामा आमच्या गुरुजींसोबत दर चार पाच दिवसांनी होळी खेळतो.” मणी म्हणाला.

“म्हणजे?” कोतवालने विचारलं.

“एक रामाच तर आहे जो आमच्या गुरुजींना काळा, निळा, पिवळा करून जातो.” धनी म्हणाला.

“आणि आज तर तो लाठीमार होळी खेळून गेलाय.” मणी म्हणाला.

यावर आचार्य अजूनच चिडला आणि टकलावर हात नेत रागाने; “रामा” म्हणाला.

क्रमशः…..

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all