Login

पोळलेल्या विटा १

एका वीटभट्टीतल्या कुटुंबाची कथा
भाग १: मातीच्या गोळ्यातली स्वप्ने 


सूर्य अजून डोंगराच्या मागेच होता, पण आकाशात थोडीशी तांबूस झळाळी दिसू लागली होती. ओलसर हवेतल्या मातीचा वास आणि कुत्र्यांच्या लांबून ऐकू येणाऱ्या भुंकण्याने सकाळची चाहूल लागली होती. वीरूने हळूच हात चालवला, गीता अजून त्याच्या शेजारी झोपलेली होती. छोट्याशा झोपडीत कोपऱ्यात झोपलेला शिवा पांघरूणात कुशीत गुडघे घेऊन गुंग होता.

वीरू उठला, एक आळस झाडला आणि झोपडीतून बाहेर आला. वीटभट्टीच्या त्या विस्तीर्ण जागेवर अजून संपूर्ण शांतता होती. पण वीरूला माहीत होते, ही शांतता फार काळ टिकणार नव्हती. काही वेळातच साऱ्या जागेत घाम, धूळ आणि घड्याळाच्या काट्याशी शर्यत करणारी माणसे दिसणार होती.

त्याने हात पाण्यात बुडवला, चेहऱ्यावर पाणी मारले, नंतर गीतेला उठवले.

"उठ ग... माती अजून ओलसर आहे. उन्हं लागायच्या आधी गोळा करू." गीता डोळे चोळत उठली, तिचे केस विस्कटलेले होते.

"हो, उठते. आधी शिवाला दूध देते."

तिघांचे घर – म्हणजे वीटभट्टीच्या एका कोपऱ्यात बांधलेली झोपडी होती. फाटकी प्लास्टिकचे छप्पर, मातीची जमिन आणि एका कडेला जुनाट उशी-चादरींचा ढीग. पण त्या छोट्याशा जागेत एक गोष्ट होती ते म्हणजे प्रेम. तिघांचे एकमेकांवरचे  जीवापाड प्रेम.

थोड्याच वेळात तिघेही भट्टीजवळच्या माळरानावर पोहोचले. वीरू आणि गीता मातीचे मोठमोठे ढिग हाताने उचलून घमेल्यात टाकू लागले. शिवा आपल्या छोट्याशा हाताने आई-बाबांना मदत करत होता, पण अधूनमधून त्याचे मन त्याच्या छोट्या लाकडी ट्रककडे वळत होते.

"शिवा, आत्ताचे काम झाले की मी तुला ट्रक खेळायला देईन," गीता हसत म्हणाली.

"आई, तू मला उद्या शाळेची वही घेऊन देशील का?" शिवाने विचारले.

वीरू थांबला, गीतेने त्याच्याकडे पाहिले, दोघे काही बोलले नाहीत. पण काही क्षणांनी वीरूच्या ओठांवर हळूच एक स्मित उमटले.

"देईन ना … यावेळी विटा चांगल्या भाजल्या, तर मालक बोनस देईल. मग तुला वहीच नव्हे, एक नवी बॅग देखील घेऊन  देईन!"

शिवा एकदम खूश झाला. त्याच्या डोळ्यांत चमक आली.

दुपारचे ऊन थेट डोक्यावर आले. अंगातून घाम गळू लागला, आणि पायाखालची माती गरम होत गेली. वीरू आणि गीता आता विटा घडवण्याचे काम करत होते. मातीच्या गोळ्यांना आकार देऊन एका रांगेत वाळत ठेवायचे, त्यात आकार थोडा जरी बिघडला तर पुन्हा सर्व सुरुवातीपासून करावे लागायचे.

गीता मन लावून काम करत होती. तिला मध्येच आठवले – तिच्या लग्नाच्या वेळी तिच्या आईने सांगितले होते,

“ही आयुष्यभर माती मळायची वेळ आहे, पण माणसात माणूस टिकवायचा असेल, तर प्रेम सोडायचे नाही.”

ती ओठांवर स्मित ठेवून काम करत होती. ती पहात होती, वीरू, हातात भरपूर माती घेऊन, आपली सगळी ताकद त्या गोळ्यांना घडवण्यात घालवत होता. त्याच्या डोळ्यात थकवा होता, पण त्याच्याच कष्टांनी त्याचे घर चालत होते, म्हणून त्याच्या मनात समाधान होते.

संध्याकाळी सूर्य मावळू लागला. आकाशात संधिप्रकाशाची जादू फुलत होती. मातीने माखलेले हात, उन्हाने तांबड्या झालेल्या मानेवरून घाम पुसत वीरू आणि गीता झोपडीच्या दिशेने परतले. शिवा पुढे-पुढे धावत होता, त्याच्या हातात एक अर्धी फुटलेली वीट होती – जणू तो ती खेळण्यात वापरत होता.

घरी आल्यावर गीतेने चुलीवर पाणी तापवले. गार वाफ येत होती. वीरूने अंग धुतले आणि एका कोपऱ्यात बसून तांदळाचा भात आणि वरण लावले. वीरू आणि शिवा तिच्याबरोबरच बसले. झोपडीच्या बाहेर आकाश काळे होत होते. आतमधल्या दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात तिघांचे चेहरे चमकत होते.

"आज ५० वीटा केल्या आपण. उद्या अजून जास्त करू," वीरू म्हणाला.

"हो. आणि उद्या मला वही मिळणार," शिवा हसला.

गीता हसली. "पण आधी बघूया की तू माझ्या सारखा मातीचा गोळा बनवू शकतोस का नाही!"

शिवाने लगेच हातातल्या भाताचा गोळा उचलून, हसतहसत म्हणाला, "हा बघ आई, माझा गोळा!"

सगळे हसले. त्या झोपडीच्या भिंतींवर ते हसणे आदळून परत परत घुमत राहिले. कष्टांनी भरलेला दिवस, पण त्या हसण्यातून उमटणारी संपत्ती – अमूल्य होती.

रात्री गीतेने शिवाला कुशीत घेतले.

"झोप रे, उद्या नवीन दिवस येणार आहे."

शिवा म्हणाला, "आई, मी मोठा झालो की आपले घर सिमेंटचे करीन."

गीतेच्या डोळ्यात पाणी आले. पण तिने ते लपवले. ती म्हणाली,

"हो रे... पण आत्ता झोप. स्वप्नात पहा, कसा दिसतो तुझा सिमेंटचा बंगला."

वीरूने दोघांकडे पाहिले, मातीच्या कुशीत वाढणारी त्यांची स्वप्ने त्यालादेखील दिसत होती. मग त्याने डोळे मिटले.

बाहेर दूर वीटभट्टीत अजूनही काही विटा भट्टीत जळत होत्या.

क्रमशः 

©®  भालचंद्र नरेंद्र देव