Login

पोळलेल्या विटा २

एका वीटभट्टीवरील कुटुंबाची कथा
भाग २: ऊन, घाम आणि हसणे


“शिवाला शाळेत घालायचंय,” गीताने हलक्या आवाजात म्हटले. ती रात्री चुलीशेजारी बसून भात शिजवत होती. लाकूड सळसळत होते आणि त्याच्या आगीच्या प्रकाशात तिच्या चेहऱ्यावर एक दृढ निश्चय झळकत होता.

वीरूने आळसटलेल्या अंगाने मान हलवली. “हो, घालायचंय. पण फी, वह्या, गणवेश, पुस्तके ... हे सगळे करायला पैसे लागतात ग. आणि आपल्याकडे काय आहे?”

गीता थोडीशी थांबली. मग म्हणाली,

“पैसे नाहीत, पण त्याच्या डोळ्यात जे आहे, ते सगळ्यांपेक्षा मोठे आहे, त्याला शिकायची इच्छा आहे. रोज जेव्हा आपल्या हातात मातीचा गोळा असतो ना, तेव्हा त्याच्या हातात पुस्तक असावे असे मला नेहमी वाटते.”

वीरू काही बोलला नाही. पण त्याने गीताकडे पाहिले. तिच्या डोळ्यांत एक वेगळीच आग होती आईची इच्छा.

त्या दिवसापासून वीरू जरा वेगळाच झाला. नेहमीपेक्षा लवकर उठायचा, विटा जास्त बनवायचा, जेवण उशिरा करायचा,  विश्रांती कमी. त्याचे त्याचं ध्येय ठरले होते – शिवाला शाळेत घालणे.

“तू स्वतःच्या तब्येतीचा विचार करत जा ,” गीता त्याला नेहमी म्हणायची.

“जेव्हा आपला शिवा शाळेतून बॅग घेऊन घरी येईल ना... तेव्हा माझा थकवा निघून जाईल,” असे म्हणून तो हसायचा.

त्या वीटभट्टीचा मालक – काळकुट्ट रंगाचा, गुबगुबीत पोट असलेला वसंत शेठ फारसा लोकांशी बोलत नसे. पण एक दिवस, त्याने वीरूच्या विटांची रांग पाहिली आणि थबकला.

“हं! एकसारख्या, नीट मापाच्या... ह्यावेळी चांगले दाम येणार वाटते !” तो म्हणाला.

त्याच आठवड्यात शेठने सगळी कामगारी तपासली आणि चार कामगारांना बोनस जाहीर केला. त्यात वीरूचे नाव सगळ्यात वर होते.

“तुझ्या विटांची मागणी आलीय नागपूरहून. चांगले काम केलेस. हे घे – हजार रुपये बोनस,” शेठ म्हणाला.

वीरूने थोडा वेळ तो लिफाफा हातात धरून पाहिला. त्यात साऱ्या महिन्याच्या घामाचा मान होता – त्याच्या आणि गीताच्या स्वप्नाचा मान.

त्या रविवारी त्यांनी काम न करण्याचा निर्णय घेतला. तिघे पहाटेच उठले. गीतेने शिवासाठी तेल लावून त्याचे केस विंचरले. वीरूने स्वतःचा जुना पण धुतलेला शर्ट घातला. आणि मग तिघे रिक्षाने शहरात गेले.

बाजारात सगळीकडे रंग दिसत होते, साड्यांचे, खेळण्यांचे, फळांचे. गीता थोडी गोंधळलीच.

“आपण कितीही गरीब असलो, पण इथे आपण हक्काने निवडू शकतो,” वीरू म्हणाला.

शिवा एका दुकानात पांढऱ्या शर्टकडे बघत होता – खराखुरा स्कूल शर्ट.

“हा हवा आहे,” त्याने हळूच म्हटले.

“हं... तू यात खूप छान दिसशील,” गीता म्हणाली.

दुसऱ्या दुकानात गीता एक साडी पाहू लागली – निळसर हिरव्या रंगाची, छोट्या फुलांच्या बुट्टीसह. वीरू तिच्याकडे पाहत होता.

“ही घे ग. जेव्हा शाळा सुरू होईल ना, त्या दिवशी शिवा आणि तू दोघं छान दिसाल.”

गीता थोडीशी लाजली. तिने साडी घेतली.

पुढे एका पानपट्टीजवळ वीरू थांबला. तिथं फाटलेल्या बुटासारख्या चपला होत्या. पण एका कोपऱ्यात एक साधी, मजबूत रबरची चप्पल होती.

“ही घेणार,” तो म्हणाला.

“जरा महाग आहे,” गीता म्हणाली.

“शिवा शाळेत जाताना तू मला घालायला सांगशील ना? मग मी अभिमानाने घालीन,” असे म्हणून वीरूने चप्पल घेतली.

त्या दिवशी बाजारातून परतताना शिवाच्या हातात शर्ट होता, गीतेच्या मांडीवर साडी आणि वीरूच्या पायात नवीन चप्पल. रिक्षात ते तिघे हसत होते. गीता म्हणाली,

“आज किती छान वाटतंय ना.”

“आज आपण 'श्रमिक' नाही... आज आपण 'कुटुंब' आहोत,” वीरू म्हणाला.

शिवा म्हणाला, “आई, मी शाळेत जाईन, शिकेन आणि मोठा होईन. मग आपल्याला ही वीटभट्टी करावी लागणार नाही!”

त्याच्या त्या वाक्यावर काही क्षण कोणीच बोलले नाही. मग गीता त्याला जवळ घेत म्हणाली,

“हो रे... एक दिवस आपण नुसते वीटा बनवणारे नसू. तू मोठा हो आणि मग मोठमोठी घर बांध मग आपले देखील मोठे घर होईल ”

त्या रात्री त्यांनी बाजारातून आणलेला समोसा वाटून खाल्ला. तो दिवस त्यांच्या आयुष्यात सणासारखा होता. गरिबीतला एक छोटासा दीपोत्सव.

बाहेर अजूनही विटा भाजत होत्या. पण त्या दिवशी त्यांच्या घरात पहिल्यांदाच उजळले होते. शिवाचे शर्ट, गीतेची साडी आणि वीरूच्या चपलेतून उमलणारा अभिमान.

क्रमशः 

©®  भालचंद्र नरेंद्र देव 

जलद लेखन स्पर्धा जुलै २०२५ 
0

🎭 Series Post

View all