Login

पोळलेल्या विटा ३

एका वीटभट्टीवरील कुटुंबाची कथा
भाग ३: एका वीटेत अडकलेले भविष्य

 

शाळेच्या पहिल्या दिवशी वीरूच्या घरातील सकाळ फारच उत्साही होती.

शिवाने आंघोळ केली, गीतेने त्याचे केस नीट विंचरले, आणि मग तो पांढऱ्या शर्टात, जरा ओढलेल्या पायजम्यात, आणि डोक्यावर बॅग लटकवत तो दरवाज्यात उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत काहीसा संकोच आणि भरपूर कुतूहल दाटलेले होते.

“आई, मी शाळेत गेलो की तुझी नक्की आठवण काढीन,” तो म्हणाला.

गीतेने त्याला घट्ट मिठी मारली.

“माझ्या राजा… खूप अभ्यास कर. उद्या तुझ्या वहीत तुझे नाव मोठ्याने लिही. समजले?”

वीरू काही बोलला नाही. पण त्याने हात पुढे करून शिवाच्या पाठीवर थाप दिली. नजरेत प्रेम आणि अभिमान होताच... पण त्याहीपेक्षा जास्त, मनातले दबलेले अश्रू होते.

शाळेच्या वर्गात शिवा नवखा होता. बाकी मुले ओळखीची, आपसांत बोलणारी. शिवा कोपऱ्यातल्या बाकावर बसला. तास सुरू झाला.

पहिलाच प्रश्न: “तुझे नाव काय?”

“शिवा,” त्याने ओठांखालून सांगितले.

“घरी कोणकोण असते?”

“आई, बाबा.”

“बाबा काय करतात?”

या प्रश्नावर तो काही क्षण थांबला. वर्ग शांत झाला.

त्याच्या डोळ्यांसमोर वीटभट्टी आली — बाबाचे मातीने भरलेले अंग, कंबरेत वाकून गोळा करणारे हात, उन्हात तळत गेलेले शरीर.

 

तो थोडासा लाजला. पण लगेच छाती ताठ करून म्हणाला,

“माझे बाबा वीट बनवतात. ते खूप मेहनत करतात. लोकांच्या स्वप्नाच्या घरासाठी !”

वर्गात काही जण हसले, काही जण स्तब्ध झाले. पण बाईंनी गोड हसत त्याचे कौतुक केले,

“शिवा, तू खूप भाग्यवान आहेस. मेहनती माणसाचा मुलगा आहेस.”

शिवाचं मन फुलून आलं. त्याने मनाशी ठरवलं — “मी शिकून मोठठ होऊन दाखवणार!”

दिवस सरकत गेले. शिवा दररोज शाळेत जात असे. संध्याकाळी आल्यानंतर वह्या घेऊन आईला दाखवत असे. काही अक्षरे  उलटीसुलटी, काही चित्रे रंगावलेली आईला ते बघायला खूप आवडत असे तिचे मन मायेने भरून येई.

वीरूला कामावरून यायला आता रोज उशीर होत असे. त्याला जास्तीत जास्त विटा घडवायच्या असायच्या. त्याच्या शेठने एक नवीन मशीन लावले होते, जे मातीच्या गोळ्याचे विटात  रूपांतर करून बाहेर देत असे. काम वेगाने व्हायचे, पण त्यासाठी गती आणि दक्षता लागायची.

 “हे मशीन आहे ना, थोडे धोकादायक  आहे,” रघू नावाचा एक दुसरा कामगार म्हणाला होता.

 पण वीरूने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याला आराम नव्हे, कमाई हवी होती.

त्या दिवशी सूर्य जास्तच तापलेला होता. मशीनचा आवाज सतत कानांत घुमत होता — घडघड-भडभड-धडधड! विटा भरभरून बाहेर येत होत्या.

वीरू त्याचवेळी एका बाजूला ठेवलेल्या विटा उचलत होता. अचानक मशीनची ट्रॉली कोसळली. वजनाचा अंदाज चुकला. पायाखालची विटा घसरली. वीरूचा पाय वळला आणि मागची ट्रॉली त्याच्या खांद्यावर जोरात आपटली.

“अंss!” एक वेदनांनी भरलेला आवाज सगळीकडे घुमला.

कामगारांनी धाव घेतली. वीरू जमिनीवर पडलेला, चेहऱ्यावर वेदनांचा रंग. रघू आणि इतरांनी त्याला धरून बाहेर काढले .

डॉक्टरने तपासून सांगितले, “हाड मोडले नाहीये, पण मणक्याजवळ चांगलीच सूज आलीये. पाच-सात दिवस तरी पूर्ण आराम दयावा लागेल.”

वीरूने विचारले ,

“म्हणजे काम करता येणार नाही?”

डॉक्टरने मान हलवली. “नाही. हलले की सूज वाढेल. थोडा आराम करणे गरजेचा आहे.”

रात्री गीता त्याच्या डोक्याजवळ बसली होती. शिवा शेजारी गप्प होता.

“थोडे दिवस विश्रांती घे. तुझे काही बिघडणार नाही,” गीता म्हणाली.

“बिघडणार नाही?” वीरू हसला. “सकाळपासून चार वीटा कमी बनवल्या तर दुपारचे वरण पातळ होते ग.

‘आराम’ म्हणजे आपल्या घरात दिवसभर उपास.”

गीतेच्या डोळ्यात अश्रू तरळले. “तू आम्हाला किती वेळा वाचवतोस, आता आम्ही तुझ्यासाठी थोडा वेळ निभावू. मी जरा जास्त काम करीन.”

शिवा हलक्या आवाजात म्हणाला, “आई, मी पण मदत करेन. अभ्यासानंतर विटा मोजतो.”

वीरू त्याच्याकडे पाहून म्हणाला, “नको रे. तू फक्त शिक. या सगळ्या परिसरातून तुला बाहेर निघायचे आहे, या मातीच्या ढिगाऱ्यातून...”

आणि त्याच वेळी त्याच्या खांद्याला कळ आली. तो थोडासा आक्रंदला.

त्या रात्री झोपडीत शांतता होती. पण हृदयात बरेच आवाज घुमत होते मशीनचा आवाज, डॉक्टरचे म्हणणे , गीतेचं सांत्वन, आणि सर्वात जास्त  शिवाचं स्वप्न.

बाहेर भट्टीत विटा हळूहळू भाजल्या जात होत्या, पण त्यापलीकडे कुठे तरी एका जखमी माणसाचे मन जळत होते.

क्रमशः  

©®  भालचंद्र नरेंद्र देव 

जलद लेखन स्पर्धा जुलै २०२५ 
0

🎭 Series Post

View all