Login

पोळलेल्या विटा ४

एका वीटभट्टीवरील कुटुंबाची कथा
भाग ४: होरपळलेली आशा


पंधरा दिवसांनी वीरू पुन्हा कामाला लागला.

खांद्यावर अजूनही सूज होती, आणि शरीर कधीकधी झटके देत असे. पण त्याच्यासाठी 'आराम' ही चैन होती आणि अशा चैनीच्या तुकड्यांनी गरिबाच्या कढईत भाजी शिजत नाही.

"थोडे थोडे करून काम करतो," असे सांगत तो पुन्हा विटा उचलू लागला. पण दर तीन चार विटांनंतर त्याला थांबावे  लागे. गीता डोळ्यांत काळजी लपवत म्हणायची,

"वीरू, अजून थांब ना. दोन दिवस नाही केले तर चालेल?"

"पण आपली चूल कशावर पेटवणार मग?" वीरूचे उत्तर तयारच असे. पण त्याच्याकडून कामे कमी होऊ लागली, त्यात यंत्र आणल्यामुळे शेठ पैसे देखील कमी देऊ लागला.  

या सगळ्यात एका संध्याकाळी शिवा त्याचं शाळेचे पुस्तक घेऊन बसला होता. पण त्याचे लक्ष गोंधळलेले दिसत होते. गीता त्याच्या शेजारी बसली होती,

"काय झालं रे?"

शिवा थोडा वेळ शांत राहिला. मग म्हणाला,

“आई... बाबाचे काम फार कठीण आहे. तूही थकतेस. मी ना... शाळेनंतर थोडा वेळ विटा उचलतो. फक्त मदतीसाठी.”

गीता दचकली. “नको रे. तुझे काम म्हणजे शिकणे. आम्ही आहोत ना अजून?”

पण शिवा ऐकत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी गुपचूप तो वीरूबरोबर विटा रचायला गेला. लहानशा हातांनी तो एकेक वीट उचलत होता, पण त्यातही त्याला एक प्रकारचा अभिमान वाटत होता, बाबाची मदत करायचा.

“हा बघ, माझा मुलगा,” वीरू हसत आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला. पण त्या हसण्यात अपराधाचे सावट होते.

शाळा हळूहळू मागे पडत गेली. वह्यांमध्ये धूळ साचायला लागली आणि हातात वीट बसू लागली. गीता रोज रागवायची, वाद घालत होती, पण शेवटी शेवटी तीचाही आवाज थकू लागला. गरिबीतल्या प्रत्येक वाक्यात शेवटी एकच युक्तिवाद जिंकतो  “पोट.”

एक दिवस आषाढात जोरदार पाऊस आला.

सकाळपासून आकाशात काळसर ढग, आणि दुपार होताच आभाळ फाटल्यासारखे मुसळधार कोसळायला लागले. विटभट्टीवर नव्या घडवलेल्या विटा पसरून ठेवल्या होत्या, पावसात भिजल्या तर सगळी मेहनत वाया जाईल.

सगळे कामगार धावत धावत त्या विटा झाकायला लागले. काहीजण प्लास्टिक ओढत होते, काहीजण दोऱ्यांनी विटा रचत होते.

शिवा तिथेच होता. पावसाच्या धारांतून तो धावत धावत एका ढिगाजवळ पोहोचला. दोन तीन ओल्या विटा उचलून एका कोरड्या जागीकडे नेत असतानाच, बाजूचा भिंतीसारखा रचलेला वीटांचा मोठा ढिग अचानक खचला.

धडाम!!

पाण्याने मऊ झालेली माती घसरली. एकाएकी शिवा त्यात अडकला.

"शिवा!" कोणीतरी ओरडले.

लाखो थेंबांच्या गडगडाटात त्याचा आवाज हरवला. एक क्षण... दोन क्षण... कोणी दिसेना.

कामगार पळाले, गडबड सुरू झाली. रघू ओरडला, “अरे एक मुलगा आत अडकलाय!”

विरू त्या वेळी झोपडीत होता. पण एव्हाना कोणीतरी त्याला धावत जाऊन सांगितले.

"वीरू! पळ! शिवा ढिगाऱ्याखाली गेला आहे!"

वीरू, डोक्यावरची ओढणी फेकून, वेड्यासारखा विटाभट्टीकडे धावला. पावसाचे थेंब इतके होते की डोळ्यात काही दिसत नव्हते. पण त्याच्या डोळ्यांपुढे एकच चित्र होते "शिवा."

तो तिथे पोहोचला तेव्हा, तर मातीचा ढिग अजूनही थोडासा हलत होता. काही कामगार हाताने माती बाजूला सारत होते. वीरू धावत गेला, त्याच्या पायातल्या चपला गाळात अडकल्या, तरी तो धावत राहिला.

"शिवा!!"

पाऊस, माती, घाम आणि भय सगळे एकत्र झाले होते.

शेवटी अर्ध्या तासानंतर एक हात दिसला. कामगारांनी ओल्या विटा काढल्या. शिवाचा चेहरा ... मातीने भरलेला , डोळे मिटलेले, आणि शरीर थिजलेले.

गीता त्या वेळी भिजतभिजत आली. ती ओरडली,

"शिवा! माझा बाळ!!"

शिवाला उचलून झोपडीत नेण्यात आले. पावसाचे थेंब अजूनही थांबले नव्हते, पण त्या घरात आता वेदनांची भरती आली होती.

वीरूच्या हातात भिजलेल्या विटांचे तुकडे होते — त्याच विटा, ज्यांनी त्याचे भविष्य बनवायला सुरुवात केली होती. पण आज त्याच विटांनी... त्याचे सगळे ओरबाडून नेले होते.

डोळ्यांतून अश्रू नव्हते — कारण आतून सगळे कोरडे झाले होते.

क्रमशः 

©®  भालचंद्र नरेंद्र देव 

जलद लेखन स्पर्धा जुलै २०२५ 
0

🎭 Series Post

View all