भाग ५: राखेतले स्मरण
शिवा वाचला नाही. भरपूर वेळ मातीखाली राहिल्याने त्याला श्वास घेता आला नव्हता. डॉक्टर आले, पण त्याचे फक्त एक वाक्य होते
"अतिशय क्षमस्व… उशीर झाला."
त्या क्षणात वेळ थांबली.
वीरू एका जागी बसून होता, हातात अजूनही विटेचे भिजलेले तुकडे. त्याच्या डोळ्यांत पाणी नव्हते , पण ते डोळे पोकळ झाले होते – जसे कोणीतरी त्यातले सर्व आयुष्य शोषून घेतले होते. गीता थरथरत त्याच्या शेजारी बसली, शिवाच्या थंड शरीराच्या कुशीत तिचे डोके गडप झाले.
"बघ ना रे... आपला शिवा गेला रे..." ती फक्त तेच सांगत राहिली.
शिवा ज्या मुलाच्या शाळेच्या वह्यांसाठी त्यांनी आपले आयुष्य जगायचे ठरवले होते, ज्याच्या एका पांढऱ्या शर्टासाठी त्यांनी स्वतःला वीटांच्या ढिगाऱ्यात गुंतवून घेतले होते तोच आता त्या ढिगाऱ्यामुळे नाहीसा झाला होता, तो मुलगा आता या जगात नव्हता.
दुसऱ्या दिवशी शिवाचे अंतिम संस्कार झाले.
ज्यांच्या स्वप्नांना शिक्षणाचे तेज द्यायचे असे त्यांनी ठरवले होते, त्यांनी त्या स्वप्नांना आता चितेवर ठेवले होते.
ओबडधोबड झालेल्या ओल्या विटांसारखे त्यांचे भविष्य आता एक वळण गाठून चिरंतन थांबलेले होते.
शिवाच्या वह्यांवर गीता बसून राहायची. त्याने चित्र काढलेले पान तिच्या ओंजळीत सतत असायचे, एका मोठ्या घराचे चित्र, त्यात एक बाग, दोन खुर्च्या आणि कोपऱ्यात एक कुत्रा आणि घराच्या बाहेर एका फलकावर लिहिले होते,
"शिवा वीरू देशमुख,आर्किटेक्ट."
गीता दर दिवशी तेच बघायची. आणि विचारायची
"का रे बाबा, तु आम्हाला सोडून गेलास ?"
वीरू काही बोलत नसे. सकाळी उठायचा, मूकपणे भट्टीकडे जायचा. विटा उचलत उचलत अचानक एका जागी थांबायचा. तीच जागा — जिथे शिवा अडकला होता.
तेथील माती तो हलवायचा, जणू अजूनही कुठे तरी त्याच्या मुलाचा स्पर्श त्याला अनुभवायला मिळेल, अशा आशेने.
लोक म्हणू लागले “तो वेडा झाला आहे. जिवंत आहे, पण आतून संपलाय.”
एका रविवारी गीता म्हणाली, “चल, आपण गावाकडे जाऊ. पुरे झाले हे सगळे.”
वीरू काही म्हणाला नाही. फक्त झोपडीत बसून शुन्याकडे नजर ठेवली होती. भिंतीवर अजूनही शिवाचा शर्ट लटकत होता. त्याला हात लावून गीता म्हणाली,
“आपण हे असे किती दिवस काढणार ?”
वीरूने नजरेने उत्तर दिले " तो गेला नाही, मी अजून त्याच विटांमध्ये शोधतोय त्याला..."
त्या आठवड्यात एक नवी भट्टी उभी राहिली. नवीन मजूर आले, मशीन मोठे झाले. पण वीरू नेहमी त्याच जुन्या कोपऱ्यात काम करत राहिला.
एक दिवस, पावसाळा पुन्हा सुरू झाला. तोच ऋतू , तीच हवा, तोच मातीचा वास.
वीरू विटा उचलत होता. एका विटेला त्याने हळूच हात लावला, जणू त्यातल्या उष्णतेत त्याला शिवाचा स्पर्श जाणवला.
तो काही क्षण तसाच उभा राहिला. नंतर कुणीतरी पाहिले वीरू डोंगराच्या दिशेने चालत चालत निघून गेला.
त्या रात्री तो परतलाच नाही.
दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह एका झाडाखाली सापडला. त्याने स्वतः जवळ ठेवलेली एकच गोष्ट होती शिवाचे चित्र.
त्याच्या डोळ्यांत फक्त एकच भाव होता –
"माझं स्वप्न मी चिखलातून परत शोधत आहे ."
गावी परतताना गीता काहीच घेऊन गेली नाही. फक्त वीरूच्या एका चपलेच्या जोडीचा एक भाग तिच्या बोचक्यात ठेवला होता, आणि शिवाच्या वहीतले ते पान.
आता ती गावाच्या शाळेच्या आसपास झाडाजवळ राहत होती. रोज सकाळी ती त्या शाळेच्या गेटजवळ उभी रहायची. लहान मुले बघायची. त्यांच्या बॅगांमध्ये शिवाचे भविष्य पाहायची.
कधी कोणी विचारले – "ताई, काय करताय इथे?"
ती म्हणायची – "माझे बाळ आत आहे. मी त्याला दररोज पाठवायला येते."
समाप्त
©® भालचंद्र नरेंद्र देव
जलद लेखन स्पर्धा जुलै २०२५
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा