Login

पोलखोल-1

जबाबदारी टाळण्यासाठी भावावर आरोप
"सगळं मलाच बघावं लागतंय, बाकीची लोकं मजा करतात आणि मीच एकटा सहन करतोय"

सुधीरचं सततचं हे वाक्य ऐकून त्याच्या थोरल्या भावाला अपराधी वाटत असे. थोरला भाऊ नोकरीनिमित्त बाहेरगावी असायचा, त्यामुळे घरातल्या बऱ्यापैकी जबाबदाऱ्या सुधीरवर पडायच्या. थोरल्या भाऊ अन वहिनीला याची जाणीव होती. त्यामुळे घरातला भार कमी व्हावा म्हणून दोघेही घरातला बऱ्यापैकी खर्च स्वतः उचलत. ओढाताण होत असली तरी सुट्टीच्या दिवशी घरी जाऊन येत असत.

सुधीरची नोकरी स्थिर नव्हती. कॉलेजचं शेवटचं वर्ष असताना नेमकं आई आजारी पडली होती, थोरल्याने चार दिवस सुट्टी टाकून दवाखाना केला पण नंतर त्याला परत जाणं भाग होतं. नवऱ्याची तारांबळ बघता त्याच्या बायकोने ठरवलं की नवरा नाही तर किमान आपण घरात असावं, जेणेकरून जबाबदारी समान वाटली जाईल.

थोरली वहिनी नवऱ्याला तिकडे पाठवून सासरीच राहिली. या काळात सुधीरने कॉलेज सोडलं, आईकडे लक्ष देता यावं या कारणास्तव. कसलातरी कोर्स करून नोकरीवर रुजू झाला. थोरली वहिनी घरातल्या, बाहेरच्या आणि आर्थिक जबाबदारी अंगावर घेत होती. सुधीरला काहीच बघावं लागत नव्हतं.

आईची तब्येत बरी झाली तसं थोरली वहिनी नवऱ्याकडे परत गेली. इकडे सुधीरवर परत जबाबदारी पडली आणि त्याच्या जीवावर येऊ लागलं. आई बरी झाली असली तरी तिला दवाखान्यात नेणं, औषध पाणी बघणं सुरूच असायचं.

काही महिन्यांनी सुधीरचं लग्न झालं. त्याची बायको आली खरी पण जबाबदारीच्या नावाने सगळी बोंब होती. तिचे नखरे पेलता पेलता सुधीरच्या नाकी नऊ यायचे. त्यात थोरल्या भावाने मेहनतीने स्वतःचं घर आणि गाडी घेतली ते सुधीरला जास्त खुपत होतं. थोरली वहिनी आणि भाऊ फिरायला जातात, वहिनी भारीतले कपडे घालते ते बघून सुधीरची बायको सुधीरकडे तगादा लावत असे, मलाही असं आयुष्य हवं आहे असा हट्ट करे.

एकदा सुट्टीच्या दिवशी थोरले भाऊ आणि वहिनी घरी आले असता सुधीरने आकांडतांडव केला. भावाची प्रगती बघून त्याच्या पोटात दुखत होतं आणि तो राग दोघांवर काढला.

"इकडे सगळं मला बघावं लागतं आणि तुम्ही लोकं खुशाल मजा मारताय, जबाबदारी नावाची काही गोष्ट आहे की नाही तुम्हाला? की सगळं माझ्यावर सोडून मोकळं झालात?"

सुधीरने मोठ्या भावाला इतकं ऐकवलं की भाऊ रडकुंडीला आला, त्याला अपराधी वाटू लागलं. त्याच्या मनात चलबिचल सुरू झाली, वाटू लागलं की नको ती नोकरी अन पैसा, इथेच एखादं काम बघून राहावं..थोरल्या वहिनीला नवऱ्याचे भाव कळले आणि आत्तापर्यंत झाकली मूठ सव्वा लाखाची बाहेर आली..वहिनीने आक्रमक पवित्रा घेत दिराला सुनावलं,
क्रमशः
0

🎭 Series Post

View all