चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा (संघ कामिनी)
लघुकथा (संघ कामिनी)
शीर्षक : पोस्टमन
गावच्या चौकात उभी असलेली ती लाल रंगाची पोस्टपेटी हल्ली कोणी जास्त वापरत नव्हते. मोबाईल, ई-मेलने त्याचे महत्त्व अगदी कमी केले होते; पण कधीकाळी संपूर्ण गावाच्या आशा-अपेक्षा त्या एका पेटीतच दडलेल्या असायच्या आणि त्या आशा पोहोचवण्याचे काम होते 'रामभाऊ' या गावच्या पोस्टमनकडे.
पस्तीस वर्षे त्यांनी निष्ठेने ही सेवा एकाच गावात पार पाडली होती. आता निवृत्तीची वेळ जवळ आली होती. आज शेवटून दुसरा दिवस होता. पुढल्या दिवशी शेवटच्यांदा गावभर पत्रे वाटायला जायचे होते. रात्री रामभाऊंनी आपली झिजलेली कॅनव्हासची बॅग काढली, शेवटचा दिवस म्हणून त्यांनी ती व्यवस्थित पुसली. त्यांच्या मनात जुन्या जुन्या आठवणी येऊ लागल्या.
नवीन जेव्हा या गावात आले होते तेव्हा कशी त्यांची तारांबळ उडत होती... प्रत्येक घरात जाऊन नुसते पत्रच द्यावे लागायचे नाही, तर त्यांना ते वाचून देखील दाखवावे लागे. माणसांना घसा कोरडा पडेपर्यंत शिरा ताणेपर्यंत सांगावे लागे, कारण म्हाताऱ्या माणसांना ऐकायला कमी येत असे. किती तरी लोकांना पत्रे लिहून देखील द्यावी लागत. या सगळ्या जुन्या आठवणी मनात येऊन ते भारावले गेले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी ते पत्रे टाकण्यासाठी निघताना त्यांच्या टेबलमधील एक खण निसटला आणि खाली पडला. त्या खणाच्या मागच्या बाजूला अचानक एक पिवळसर झालेले, धुळीची पुटे बसलेले पत्र त्यांच्या नजरेस पडले. त्यावर लिहिले होते, "जानकीला रमणकडून..."
रामभाऊंच्या कपाळावर आठ्या चढल्या की 'हे पत्र इथे कसे अडकले?'
ते पत्र जवळजवळ वीस वर्षांपूर्वीचे वाटत होते. नाव ओळखीचे होते. त्यामुळे त्यांच्या आठवणी उलगडल्या. रमण, गावातला हुशार मुलगा, पुण्यात शिक्षणाला गेला होता आणि जानकी गावातील सुंदर, साधी मुलगी होती. लहानपणी एकत्र खेळताना दोघांच्या मैत्रीबद्दल चर्चा व्हायची; पण नंतर रमण अचानक परदेशात गेला. जानकीचे लग्न गावात ठरले आणि पुढे सगळे रमणला विसरून गेले.
हे पत्र जर वेळीच जानकीला पोहोचले असते, तर त्या दोघांचे आयुष्य वेगळे झाले असते का? या विचाराने रामभाऊची पावले जवळ जवळ थांबलीच.
ते थेट जानकीच्या घराकडे गेले. दारात एक प्रौढ स्त्री उभी होती. चेहऱ्यावर सुरकुत्या आणि कष्टाच्या खुणाही दिसत होत्या. डोळ्यांत एक प्रकारची हुरहुर दाटलेली होती. हो, जानकीच होती ती...
“अरे रामभाऊ! पत्र आले वाटते कुणाचे तरी… या... या ना.”
रामभाऊंनी मिळालेले पत्र थरथरत्या हातांनी तिच्याकडे सोपवले.
जानकीने हातात घेऊन वाचायला सुरुवात केली. इतक्या वर्षांनंतर देखील तिला रमणचे हस्ताक्षर ओळखू आले, थरथरत्या हातात धरून तिने त्यावर नजर टाकायला सुरुवात केली.
"जानकी, मला तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करायचे आहे. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही; पण त्याआधी तुझा याला होकार असेल तर पुढच्या पौर्णिमेला विठ्ठलाच्या मंदिरात येशील का? मग लवकरच मी तुला सगळ्यांसमोर मागणी घालीन.
तुझाच, रमण."
हे वाचताक्षणी तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.
“रामभाऊ हे काय… हे पत्र मला वेळेवर मिळाले असते, तर माझे आयुष्य वेगळे असते. मी रमणची कित्येक दिवस वाट पाहत होते; पण त्याच्याकडून काहीही कळले नाही, म्हणून मग मी लग्नाला होकार दिला आणि नंतर माझे लग्न ठरले; पण मन मात्र कधीच त्याच्यापासून दुरावले नाही.”
रामभाऊ अपराधीपणे म्हणाले, “माझ्याच दुर्लक्षामुळे हे पत्र टेबलमध्ये खणाच्या मागे अडकून राहिले होते. जमले तर मला माफ कर.”
जानकीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, “आता माफी मागून काहीही उपयोग नाही, जे झाले आहे ते काही बदलता येणार नाही. तुम्ही हे पत्र नसते आणले तरी चालले असते. आता मात्र गेलेल्या त्या दिवसांबद्दल मी तुम्हाला दोष देत राहणार आणि माझे त्याच्याबरोबर नसणे हे तुम्ही मुद्दामहून तर केले नाही ना? असे मला वाटत राहणार. मी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही.”
आता पुढील कुठल्याच रात्री रामभाऊ झोपू शकणार नव्हते. त्यांच्या मनाला अपराधगंड कुरतडत होता. कधी एक माशी न मारलेल्या त्यांनी दोन जीवांची ताटातूट केलेली होती. 'माझ्या हातूनच एका जोडप्याचे आयुष्य अधुरे राहिले.' असे त्यांना वाटत राहिले.
संध्याकाळी त्यांच्या निवृत्तीचा समारंभ होता. गावातली लहानापासून मोठ्यांपर्यंत, अगदी सगळी मातब्बर मंडळी देखील रामभाऊंबद्दल चांगले चांगले बोलायला आलेली होती; पण रामभाऊंच्या डोळ्यांत मात्र ओलावा दाटून आला होता आणि त्यात नोकरी संपण्यापेक्षा त्यांच्या हातातून झालेल्या त्या चुकीचा पश्चात्ताप जास्त दिसत होता.
त्याच वेळी गावात एक तार आली, परदेशात असणाऱ्या रमणचा मृत्यू झाला होता. अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने तो गेल्याचे कळले.
रामभाऊंच्या अंगावर जणू वीजच कोसळली. जे नाते आज सकाळी एका पत्रामुळे जणू नव्याने जिवंत झाले होते, ते फक्त काही तासांच्या आतच कायमचे संपलेसुद्धा होते.
त्या संध्याकाळी रामभाऊ पुन्हा जानकीच्या घरी गेले. ती अंगणात बसली होती. रामभाऊंच्या हातात तीच तार होती. डोळ्यांतून सतत अश्रू वाहिल्यामुळे ते लाल झाले होते.
जानकीने ती तार वाचताच, ती रामभाऊंना खूप वाईट पद्धतीने बोलली.
“रामभाऊ… आता ही तार दाखवून तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा करता? हिचा माझ्यासाठी काहीच उपयोग नाही. तो माझा झाला नाही, कदाचित एकटाच तेथे राहिला आणि एकटाच निघूनही गेला. माझ्या हृदयातले अधुरे प्रेम कधीच पूर्ण झाले नाही आणि पुढेही कधीच होणार नाही.”
रामभाऊ निःशब्द उभे राहिले. त्यांना जाणवले, एक पत्र वेळेत न पोहोचल्यामुळे दोन जिवांचे संपूर्ण आयुष्य बदलले होते.
गावात दुसऱ्या दिवशी लोकांनी पत्रपेटीजवळ रामभाऊंना पाहिले. रामभाऊंनी त्यांच्याकडून शेवटचे पत्र त्या पोस्टाच्या लाल पोस्टपेटीत टाकले. पत्रावर कुणाचाच पत्ता नव्हता. त्यावर फक्त एकच शब्द लिहिलेला होता.
“मला माफ करा.”
रामभाऊंनी टोपी खाली ठेवली आणि हळूच डोळे मिटले.
त्या दिवशी गावचा पोस्टमन गावातून आणि या जगातूनसुद्धा निवृत्त झाला होता.
समाप्त
©भालचंद्र नरेंद्र देव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा