Login

पोटगी गॅंग

मिशन फत्ते करण्यासाठी लग्न केलेल्या मायाला प्रेमाची भुरळ पडली
"नाही...मी नाही त्याच्याशी विश्वासघात करू शकत.. मला माफ कर..मला संसार करायचा आहे, त्याच्यासोबत आयुष्य काढायचं आहे..मला तुमच्या टोळीतून मुक्त करा प्लिज..."

(6 महिन्यांपूर्वी)

"तर माया मॅडम, तुम्हाला सगळा प्लॅन समजलाय ना? आपला एक मध्यस्थी मुलाच्या कुटुंबाशी सलगी करून तुमचं स्थळ सुचवेल. त्या मुलाशी प्रेमाचं नाटक करायचं, त्याला घोळात घ्यायचं आणि लग्न करायचं. काही ना काही कारण देऊन त्याच्याशी संबंध टाळायचे आणि नवरा मारहाण करतो, त्रास देतो असे आरोप करून घटस्फोटाचा अर्ज टाकायचा.. पोटगी म्हणून भरभक्कम किंमत मागायची, त्यातले 50% तुम्हाला आणि 50% मला..ते काम झालं की दुसऱ्या शहरात दुसऱ्या मुलाला शोधायचं... समजलं??"

कमाईचं हे अजबच प्रकरण ऐकून माया स्तब्धच झाली होती. अनाथाश्रमात वाढलेली ती, मागेपुढे कुणीही नव्हतं. कमाई करायला पुरेसं शिक्षण नव्हतं. पोटगी गॅंग बरोबर अश्या मुलींसोबत हातमिळवणी करत बरेच पैसे कमावत होती. त्यात मुख्य बॉस, एक मुलगी आणि एक मध्यस्थी सामील होते. अनाथाश्रमात वाढली म्हणून मुलाच्या आणि त्याच्या घरच्यांबद्दल सहानुभूती मिळवत या मुलींना बरोबर लग्नासाठी पुढे केलं जाई.

"माया, ही तुझी पहिलीच वेळ आहे. सावधगिरी बाळग. नवरा त्रास देणारा नसेल तर काहीही करून त्याला उकसवायचं, त्याला राग येईल असं वागायचं..त्याच्यातला सैतान बाहेर काढायचा आणि कोर्टात केस करण्यासाठी पुरावे जमा करत जायचे.."

मायाला सगळ्या सूचना मिळत होत्या आणि ती मान डोलावत होती.

अर्जुन देसाई, ग्राफिक डिझायनर..मोठ्या फर्ममधे मोठ्या पगारावर कामाला.. राजबिंडा, रुबाबदार.. मायासुद्धा त्याच्यापुढे फिकी पडेल असा!

ठरल्याप्रमाणे मध्यस्थीने अर्जुनच्या घरी सलगी केली, त्यांचा विश्वास संपादन करत मायाचं नाव अर्जुनसाठी सुचवलं. माया मुळात खूपच सुंदर होती, तिला बघताक्षणी कुणीही तिच्या प्रेमात पडेल अशी. सर्वांची पसंती झाली आणि लग्नाचं फायनल झालं. मायाबद्दल सहानुभूती असल्याने सगळा खर्च मुलाकडच्यानी उचलून थोड्या माणसात लग्न उरकलं. लग्नाची एकेक विधी पार पडत असतांना मायाच्या मनात चलबिचल होत होती. एकीकडे हे लग्न तिला हवंहवंसं वाटत होतं पण दुसरीकडे आपल्या प्लॅनबद्दल विसरूनही चालणार नव्हतं. अर्जुनकडे बघताच तिला सगळा विसर पडे.

लग्न झाल्यानंतर माया अर्जुनसोबत मुंबईला आली. एका 1 bhk फ्लॅटमध्ये तो राहत होता. मायासाठी हे सगळं स्वप्नवत होतं. हे सगळं आपलं आहे, हा राजबिंडा पुरुष आपला नवरा आहे आणि आपण या घरची लक्ष्मी आहोत ही भावना तिला स्वीकारावीशी वाटताच तिला बॉसचे फोन येऊ लागले,

"काम सुरू आहे ना? लवकरात लवकर काम फत्ते करून पुढच्या लग्नासाठी तयार व्हायचं आहे तुला..."

माया भानावर आली. खायचे वांदे असताना बॉसच्या टोळीने मला काम दिलं आणि दोन वेळच्या किमान जेवणाची सोय झाली हे विसरून चालणार नव्हतं. तिने स्वतःला समजवलं आणि अर्जुनशी पहिल्याच दिवशी भांडू लागली,