Login

प्रेम रंग-2

प्रेमाचा रंग

किशनच्या बायकोला धीर देण्यासाठी ती जवळ गेली..जाताना प्रत्येक पावलागणिक तिला त्यांचा भूतकाळ आठवत होता.

ती किशनची प्रेयसी. कॉलेजमध्ये जडलेलं प्रेम, पण अल्लड नव्हतं. त्यांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्याच्या घरी तिलाच होणारी सून म्हणून बघितलं जात होतं. तीसुद्धा आयुष्याची स्वप्न त्याच्यासोबतच रंगवत असायची.

पण त्यांच्या प्रेमाला दृष्ट लागली आणि मेघना त्यांच्या आयुष्यात आली.

मेघना त्यांची मैत्रीण म्हणून आली पण तिचा सगळा डोळा किशनवर. मेघना खूप वेगळी मुलगी होती. बिनधास्त, बोल्ड...किशनच्या आईची मैत्रीण मेघनाची आई. त्यामुळे आईला हाताशी धरून तिने किशनच्या घरात एन्ट्री केलेली आणि हळूहळू किशनच्या मनात.

पण हिला आपल्या प्रेमावर विश्वास होता. मेघनाचे इरादे तिला समजत होते, पण किशन तिला भुलणार नाही याची तिला खात्री होती.

पण किशन बदलला. हिच्या साधेपणावर, सुंदरतेवर प्रेम करणारा किशन आता मेघनाच्या मॉडर्न आणि कृत्रिम सौंदर्यावर भुलू लागला. मेघनाचं बिनधास्त वागणं, बोलणं बघून किशन बदलला..मेघनाने याचीच संधी साधून किशनला कायमचं आपलं केलं...

हिला मात्र जेव्हा कळलं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. ज्याच्यासाठी अख्ख्या दुनियेशी लढायला ती तयार होती त्यानेच आज तिला एकटं पाडलं होतं.

सरसकट विश्वासघात केला होता किशनने. किशनच्या घरच्यांनी त्याला समजावलं, त्यांनाही माहीत होतं की किशनसाठी मेघना नाही तर ती योग्य आहे. पण किशनने कुणाचंच ऐकलं नाही..आणि मेघना सोबत संसार थाटला...

ती मात्र एकटी पडली. कित्येक दिवस स्वतःला आरशात बघत नव्हती..

आपलं साधं राहणं, साधं असणं हाच आपला शाप असं ती समजू लागली. तिला सावरायला बरीच वर्षे लागली.

पण आज किशन असा अचानक पुढ्यात दिसला आणि तिच्यातील माणुसकी म्हणा किंवा प्रेम, उफाळून आलं...

मेघनाकडे ती पावलं टाकत होती, तिला धीर द्यायला..

मेघना मात्र दुरूनच तिला म्हणाली,

"जेवढे उपकार केलेस तेवढे पुरे...आता नको डोकावू आमच्या आयुष्यात.."

तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले...ती तिथून जायला निघाली तोच समोरून त्याचे आई वडील येताना दिसले..

तिला खूप वाटत होतं, त्यांच्या जवळ जावं, त्यांना धीर द्यावा.. पण ती मागे फिरली...कोणत्या नात्याने ती जाणार होती?

एका बाजूला चेहरा लपवून ती बसली. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले,

"तातडीने B निगेटिव्ह रक्ताची गरज आहे...शक्य तितक्या लवकर.."

घरचे फोन फिरवू लागले, कितीही म्हटलं तरी अरेंज करायला वेळ लागणार होता..

तिने ऐकलं तशी ती मागे फिरली,

"डॉक्टर माझं घ्या, मी आहे B निगेटिव्ह.."

"मॅडम तुमचं आधी HB चेक करावं लागेल..."

"10 आहे.."

"सॉरी मॅडम, 13 च्या वर असेल तरच आम्ही रक्त घेऊ शकतो, नाहीतर तुमची तब्येत बिघडेल.."

"मरणार तर नाही ना??? सांगा ना डॉक्टर.ते काही नाही, काहीही झालं तरी किशनचा जीव वाचला पाहिजे ."

किशनच्या आई वडिलांना तिथेच रडू कोसळलं...मेघना मात्र उपकार मानायचं सोडून तिथेच दात ओठ खात बसली.

किशनच्या आईने तिला मिठी मारली. आईचं सोकावलेलं शरीर, निस्तेज डोळे बरंच काही सांगून जात होते. तिने जसा त्यांच्या खांद्यावर हात ठेवला तसा आईला धीर मिळाला.

तिने रक्त दिलं खरं, पण तिला चक्कर येत होती. ती तिथेच पडून होती.. सलाईन सुरू होती..

डॉक्टर अतोनात प्रयत्न करत होते, किशनला वाचवायचा.