Login

प्रचिती(लघुकथा)

कथा आहे मुलाची आणि त्याच्या पालकांना आलेल्या प्रचितीची!
#लघुकथा

शीर्षक:- प्रचिती

सुमती आणि नरेश ह्यांना विराज नावाचा दहा वर्षांचा मुलगा होता. स्पर्धेच्या या युगात आपल्या मुलाने टिकण्यासाठी त्यांनी त्याला विविध शिकवण्या लावल्या होत्या, म्हणजे गणितासाठी वेगळी तर विज्ञानासाठी अजून वेगळी शिकवणी. पुन्हा शाळा ही सकाळी आठ ते दुपारी तीन. त्यानंतर घरी आल्यावर तो सर्व करायचा.

एकदिवस परीक्षेचा निकाल लागणार होता म्हणून सुमती आपल्या मुलाच्या शाळेत गेली.

"तुम्ही विराजच्या आई ना?"  एका शिक्षिकेने त्यांना विचारले.

"हो, विराज माझा मुलगा आहे." त्या नवीन बदली झालेल्या शिक्षिका होत्या.

त्याचे निकालपत्र पाहून सुमतीचा चेहरा गंभीर झाला होता.

"मॅडम, नेहमी हुशार असणारा माझा मुलगा एका विषयात नापास झाला आहे. ह्यावर मला विश्वासचं बसत नाहीये." तिने चिंता व्यक्त करत विचारले.

"तुम्ही फक्त एका विषयात नापास झाला आहे तेवढेच पाहिलेले दिसते. त्याच्या खाली चित्रकला हा विषयही आहे, त्याला त्यात पैकीच्या पैकी गुण प्राप्त झालेत." त्या शिक्षिकेने सांगितले.

"अहो, त्या विषयात पैकीच्या पैकी गुण असून काय फायदा? गणितात तो नापास झाला आहे." आई म्हणून तिला तर आपल्या मुलाचा रागच आला होता.

"बरं, तो काल शाळेत का आला नव्हता?" त्यांनी तिला विचारले.

"त्याची तब्येत ठीक नव्हती. डोके दुःखत होते. म्हणून त्याचे बाबा बोलले की शाळेत नको जावूस." आपला मुलगा गैरहजर राहण्याचे कारण सुमतीने त्यांना सांगितले.

"तो ह्या दोन-तीन महिन्यांत जास्तच आजारी पडत आहे, असे तुम्हाला नाही का वाटतं? मी कालच सर्व मुलांचे हजेरी पट तपासत होते तेव्हा मला समजले." शिक्षिकेने प्रश्न विचारला आणि त्याबद्दल जाणून घेण्यासाठी अपेक्षेने विराजच्या आईकडे पाहिले.

"हो,पण आराम केला की बरे वाटते. तसेही डॉक्टर बोलले की असे होतेच." डॉक्टरांनी सांगितलेले तिने शिक्षिकेला सांगितले.

"तुमच्या मुलाला चित्रकलेत जास्त रस आहे. बाकी सर्व विषयाला तुम्ही शिकवण्या लावल्या पण ह्या विषयाला न लावता त्याला एवढे चांगले गुण प्राप्त झाले. ह्याचा विचार करा. तुमचा मुलगा सुरू असलेल्या तासिंकात मध्येच झोपतो. कारण तुम्ही वेगवेगळ्या शिकवण्या त्याला लावल्या आहेत. त्याचा आणि शाळेचा अभ्यास करण्यात त्याचा वेळ जातो. तो कधी खेळण्यासाठी बाहेर जातो का?" त्यांनी विचारले.

"तो झोपतो हे मला तुम्ही आधी का सांगितले नाही ? ह्या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचे असेल तर सर्व त्याला यायला हवे. नाहीतर पुढे त्याला महाविद्यालयात आणि  पदवीच्या तसेच ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यात कसा तो तग धातून राहील सांगा बरं?  आणि आता पहिल्यासारखे सर्व कुठे  शाळेत शिकवले जाते? आम्हालाही त्याचा अभ्यास घ्यायचा म्हंटले तर काही गोष्टी समजत नाहीत." आपला मुद्दा मांडत सुमती म्हणाली.

"तुम्ही एक काम करा. त्याच्या सर्व शिकवण्या एका महिन्यांसाठी बंद करा. तसेच त्याला फक्त अभ्यासाच्या संबंधितच नाही तर इतर स्पर्धेतही भाग घ्यायला सांगा." विराजच्या शिक्षिका सुमतीला समजावत म्हणाल्या.

"ठीक आहे." एव्हढेच म्हणून सुमती तिथून निघून गेली.

दोन महिन्यांनंतर,

"चला तर मग पुढचे उत्कृष्ट चित्रकला क्रमांकाचे बक्षीस आपण देत आहोत कुमार. विराज सोनवणे ह्यांना. तर टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे स्वागत करणार आहोत." असे म्हणून त्यांनी सभागृहात घोषणा केली.

सुमती आणि नरेश आपल्या मुलाकडे कौतुकाने पाहत होते. कारण राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत त्यांच्या मुलाला विजेते पारितोषिक प्राप्त झाल्याने सगळीकडे त्याचे कौतुक होत होते. फक्त तासिका बंद करण्याचा निर्णय आणि सोबतच त्याला ह्यावेळेस सर्व विषयांत उत्तम गुण मिळाले तर होतेच पण चित्रकलेतही लहान वयातच त्याने हे यश संपादन केले होते म्हणून विराजच्या शाळेपासून ते नातेवाईकांमध्ये सगळीकडे आनंदी आनंदच होता.

त्याची डोकेदुखी कमी झाली होती आणि तो शाळेत खूप कमी वेळा गैरहजर राहायला लागला होता. त्याच्या मनावर आधी आलेले दडपण आणि त्यामुळे त्याची होणारी अधोगती ही शिक्षिकेने अचूकपणे ओळखल्याने विराजच्या आईला त्यांनी सांगितले होते. तसेच त्याच्या आईनेही ते ऐकले होते.

विराजने पुढे काय करायचे ह्याचा निर्णय सुमती आणि नरेशने त्याच्यावरच सोडला होता कारण आपल्या मुलांच्या मनाविरुद्ध केल्यावर काय होते ह्याची प्रचिती त्यांना आली होती.आपल्या मुलाचे स्वास्थ ठीक असेल तर तो त्याच्या कलाने सर्व काही करू शकतो हेही त्यांना समजले होते.

पालकांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेणे गरजेचे असल्याचे शिक्षिकेला समजल्यामुळे आपला विद्यार्थी हा फक्त अभ्यासात हुशार असून चालत नाही त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल हे पाहणे आवश्यक असते हेच विराजच्या शिक्षिकेने अचूकपणे ओळखून त्याबद्दल त्याच्या आईशी संवाद करून त्यांना योग्य प्रकारे विचार करण्यात मदतच केली होती.

समाप्त.

© विद्या कुंभार.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
0

🎭 Series Post

View all