प्राजक्ताचा सडा
आत्मचरित्र लिहिण्यासाठी प्रचंड हिंमत असावी लागते आणि ती खूप कमी लोकात असते असे मला वाटते. त्यामुळे ती हिंमत एकवटेपर्यत सोपं व सरळ मनातलं हितगुज लिहित आहे.
इतक्या लवकर स्वतःबद्दल काही लिहावं लागेल , असं कधी वाटलं नव्हतं . तसं छोट्या मोठ्या ब्लॉग मधून स्वतःचे अनुभव अवश्य लिहिलेत पण आत्मचरित्र तशी मोठीच गोष्ट आहे.
नाही लिहायचं असा विचार केला तर काहीच नाहीय पण जर लिहायला बसले तर दीर्घ कादंबरी होईल ,मी लिहून थकेल व तुम्ही वाचून थकाल इतके अनुभवही गाठीशी आहेत. तर ज्या वाटेवर लिखाण अवघड वाटेल तिथे यु टर्न घेईन आणि वळण घेवून जी सोपी सुलभ व सहज आहे अशी अनुभवाची शिदोरी वाटेन.
आज पन्नाशीच्या घरात पोचताना मी जेव्हा मागे वळून पाहते तर माझेच आयुष्य कसे एखाद्या उंच पर्वतावरून पडणार्या धबधब्यासारखे वाटते. . . सुंदर ,रम्य, प्रफुल्लित करणारे आपल्या सोबत सगळंच वाहून नेणारे!
कारण धबधबा सुंदर दिसण्यासाठी त्याला किती ठिकाणी आदळावं आपटावं लागतं , जितक्या ठिकाणी ठेचकाळतो तेवढा तो सुंदर दिसतो. जितके अडथळे तितकीच त्याची धार नयनरम्य दिसते. पण विखरून पडणार्या पाण्यालाच माहित असतं की त्याने काय झेललय पण प्रेक्षकासाठी ते मनोहर दृश्य असत.
तर वाचकहो-
मला महाराष्ट्रात राहताना तुम्ही दाक्षिणात्य दिसता म्हणणारे आणि दक्षिणेत राहताना तुम्ही टिपिकल महाराष्ट्रीयन दिसता असं म्हणणार्यांना सांगते की हो मी भारतीय आहे.
म्हणजे वडिलांचे मूळ गाव कर्नाटकातलं बाळूर जि. बीदर , शिक्षण व वाढले ते महाराष्ट्रात औरंगाबाद -जालना जिल्ह्यात आणि लग्न झालं आंध्र प्रदेश ( आता तेलंगणा) हैदराबाद च्या जोडीदाराशी! अशी सगळी राष्ट्रीय एकात्मता!
आत्मचरित्राच्या निमित्ताने जेव्हा स्वतःचं आत्मपरीक्षण केलं किंवा तटस्थपणे स्वतःच्याच आयुष्याकडे पाहिलं तेव्हा खूप गोष्टी लक्षात आल्या. अात्मचरित्र कसं लिहिलं यापेक्षाही स्पर्धेच्या निमित्ताने ही स्वतःलाच तिर्हाईत पणे पाहून चिंतन करण्याची संधी दिल्याबद्दल ईरा व संजना मॅम चे अभार मानते.
माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचा काळ म्हणजे बालपण! बालपण तसं सर्वांचं सुखाचं असतं पण माझ्या पूर्ण आयुष्यातल्या धडपडीला पाहिलं तर तो काळ सगळ्यात बिनधास्त व रम्य होता असं वाटतं.
एक वरदान या आयुष्याने दिलंय की जी विविधता व जीवन मूल्य शिकलीय ज्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतलाय तो अप्रतिम आहे म्हणजे अनुभवांच्या बाबतीत तर मी स्वतःला खूप समृद्ध मानते. प्रेमाची माणसं किंवा मला भेटलेल्या लोकांच्या बाबतीत म्हणाल तर मी खूप श्रीमंत आहे. . . हो मी माणसांनी श्रीमंत आहे! तस मी पैशाला कधी विशेष महत्व दिल नाही.
वडिलांची सरकारी नोकरी होती , ते इंजीनिअर मग तालूक्याला बदल्या , पंचायत समितीचे मोठे क्वार्टर्स आणि कॉलनीतलं बालपण या रम्य आठवणी गाठीशी आहेत. घर सतत माणसांनी भरलेलं आणि अाई सतत कामात असलेली पाहिलीय. वडिल शांत पण एक अनामिक धाक किंवा जरब होती त्यांच्या व्यक्तिमत्वात. ते गेल्यावरही लोक त्यांना धर्मात्मा म्हणून संबोधतात यातच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं चित्रण आलं. आई सुस्वभावी, सरळ, धार्मिक, देवभोळी आणि सर्वांना आनंदी ठेवण्यासाठी धडपडणारी.
आजी ,आजोबा, दोन काका, आई पप्पा व आम्ही तीन भावंडं ! असं मस्तच मोठं कुटुंब .
मी त्यात मधली, मोठी बहिण व लहान भाऊ आणि मजा!
एक एक किस्से लिहिले तर मोठा अध्यायच होईल.
जन्मले मी १६ सप्टेंबर १९७३ ला पण शाळेत टाकण्यासाठी १६ जून ही माझी ऑफिशिअल जन्म तारीख झाली. भालकी नावाच्या कर्नाटकातल्या तालुक्यात आजोळी माझा जन्म झाला असला तरीही कळतं तेव्हा आम्ही सिल्लोडला होतो व ३री पासून माझी १० पास होईपर्यंत आम्ही अंबडला होतो. तिथल्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेत माझं दहावी पर्यंतचं शिक्षण झालं.
म्हणजे शाळेत असताना अतिशय चुळबुळी खोडकर बडबडी आणि अभ्यासात हुशार असेच नाव झालेलं अगदी प्राथमिक शाळेपासून दहावी होईपर्यंत हे नाव मी जपलं. . . नंतरही जपलं पण त्याचं विशेष काुतुक वाटलं नाही. शिकण्याच्या वेडापायी साडेचार वर्षाच्या वयातच वय वाढवून मला शाळेत टाकलं गेलं. म्हणजे खूप उत्सुकता असायची, सगळया गोष्टींचं कुतुहल होतं. सगळंच माहीत करायचं असायचं .
त्यावेळी तितके रिसोर्स नव्हते त्यामुळे पुस्तक वाचणे ,लोकांशी बोलणे, माहिती देणे व घेणे हे शिकण्याचे मार्ग .
तसं शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणे हा माझा सगळ्यात आवडता कार्यक्रम आणि त्यासाठी मला प्रोत्साहन खूप मिळायचं . वादविवाद स्पर्धा ,भाषण, कविता वाचन ,रेकॉर्ड वरती नाच करणे, गाणे म्हणणे,चित्र काढणे हे सगळे छंद शाळेत अंगवळणी पडले तसे ते पुढेही ग्रॅज्युएशन मध्येही जोपासले गेले. पण मुळात स्टेजवर जावून बोलण्याची ही हिंमत कुठून आली असा विचार केलं तर एक प्रसंग आठवतो.
मी नुकतेच प्राथमिक शाळेतून मोठ्या शाळेत म्हणजे पाचवी ते दहावीच्या शाळेमध्ये प्रवेश घेतला होता. जून जुलै महिन्यात काहीतरी कार्यक्रम झाले आणि मी बऱ्याचशा मुलांना स्टेज वरती जाऊन बोलताना पाहिल।
मी पाचवी ची मुलगी दिसायला एवढी बुटकी चिमणी सारखी बडबड करणारी म्हणून शाळेमध्ये टोपण नाव चिमणी पडलेलं आणि त्याच्यामध्येच एक ऑगस्ट चा लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाची नोटीस आली.
माझा कॉनफिडन्स पाहून सरांनी सांगितलं "भाषणात भाग घ्यायचा ,वर्गात इतकं बोलतेस मग तिथे बोल.'
नको म्हणत असताना त्यांनी नाव दिल आणि तो दिवस उजाडला.
त्यादिवशी पर्यंत मी काहीही तयारी केली नव्हती आणि लोकमान्य टिळकांबद्दल काय बोलायचं हे देखील मला माहित नव्हतं .
पूर्ण शाळेची पाचवी ते दहावीची मुलं मैदानामध्ये बसलेली आणि सगळे शिक्षक.
माइक समोर एकेकाची भाषणे होऊ लागली व जेव्हा माझं नाव बोलावलं गेलं, मी उठले. दुसऱ्यांचे भाषण ऐकून मी थोडंतरी बोलू शकले असते पण मी खूपच इमानदारीने स्टेज वरती गेले, माईक वगैरे सेट केला आणि मी म्हणाले "नमस्कार माझे नाव स्वाती बालूरकर आणि माझी काहीही तयारी झाली नसल्यामुळे आज मी तुमच्यासमोर भाषण देऊ शकत नाही. धन्यवाद!"
आणि मी परत निघाले.
मी परत निघाल्यावर एकच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या टाळ्या वाजल्या जरी असल्या तरी ते मला खूप अपमानास्पद वाटलं आणि मग मी ठरवलं की यानंतर बिलकुलच भीती बाळगायची नाही आणि तयारी केल्याशिवाय स्टेज वरती जायचं नाही.
त्याच्यानंतर जे मी स्टेज पकडले आहे ते आजतागायत . हे कुठेही बोलवा, माइक द्या कुठल्याही विषयावरती बोलायला मी तयार असते.
आजही आठवलं की हसायला येतं.
आणि हो अभ्यासात हुशार आहे असं सगळे म्हणायचे पण मला तसं वाटायचंच नाही.
अभ्यासाच्या बाबतीत एक स्वप्न होतं, मला डॉक्टर होण्याची खूप इच्छा होती. माझ्या घरात सगळे हे गृहित धरूनच होते की ही डॉक्टर होणार व त्यासाठी सगळ्यांचा सपोर्ट होता.
शाळा अभ्यास व मस्ती होत राहीली. मग दहावी झाली. घरात विशेष अभ्यासाचं वातावरण नव्हतं. मी मनाने करायचे तेवढाच अभ्यास पुरे असायचा. कधी कधी तर बोलणे बसायचे की सारखी पुसतकात डोकं घालून बसतेस , थोडी मदत कर घरात वगैरे.
ताईचं लग्न तिची नववी झाल्यावर लगेच केलं होतं पंधराव्या वर्षी . त्यामुळे मी दहावी शिकताना तिचं लग्न झालं होतं व ती बाळंतपणासाठी आली होती. दुर्दैवाने तिचं पहिलं बाळ गेलं, ते मृत जन्मलं. घरात त्यावेळी असलेली परिस्थिती सांगणं कठिण. माझी सहामाही परीक्षा झाली होती.
बरं यासगळ्या अडचणींमधे देखील मी मन लावून अभ्यास केला आणि पेपर छान गेले. विशेष म्हणजे तोपर्यंत आमच्या घरी टिव्ही नव्हता.
क्वार्टर्स मधे कुणाच्याही घरी चित्रहार किंवा सिनेमा बघायला जायचो. कधी कधी सिरिअल्स किंवा कार्यक्रमांची व टिव्ही च्या यजमानांची जेवणाची वेळ एकच असायची. नाइलाजाने परत यावं लागायचं. ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही बघण्याचा तो किती मोह होता.
पप्पांना ते आवडायचं नाही आम्ही असं दुसर्यांच्या घरी टिव्ही पाहण्या साठी गेलेलं . त्यामुळे ते घरी येण्याची किंवा रागावण्याची भीती असायची.
पप्पा सहज टिव्ही घेवू शकत होते पण घेतला नव्हता.
तू दहावीत चांगले मार्क आणून दाखव मग घेतो असं एकदा अमीश दाखवलं होतं. परीक्षा झाल्या की मी लकडाच लावला मागे की उन्हाळयाच्या सुट्टयांमधे टिव्ही हवाच,पुन्हा कॉलेज सुरु झाल्यावर काय करायचं.
त्यांनी ते ऐकलं व १८ एप्रिल १९८८ रोजी पप्पांनी मनावर घेतलं व जालन्याला जाऊन ओनिडा कंपनीचा त्यावेळचा सगळ्यात महागडा रंगीन टिव्ही आणला. मग काय घरी स्वर्ग असल्याचा फील आला. पुन्हा महाभारत वगैरे सुरू झालं. घरात ही गर्दी, रंगीत टिव्ही मधे ते पाहण्यासाठी.
माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मान्यतेचा , अभिमानाचा किंवा गौरवाचा क्षण होता - माझे मार्क, माझ्या दहावीचं यश!
साडे चौदाव्या वर्षी दहावीची परीक्षा दिली होती आणि 1988 या वर्षात त्या वेळचे 83 टक्के मार्क मला मिळाले होते जे अगदी मेरिट लिस्ट च्या एखाद्या दोन मार्कांनी कमी असतील .
मी शिक्षकांच्या अपेक्षेप्रमाणे तालुक्यात पहिली व जिल्ह्यात दुसरी आले होते आणि तो जो मानमरातब मिळाला होता त्याने मी खूप भारावून गेले होते.
अबोल व शांत वडिलांनी त्या अानंदात गावभर ५ किलो तरी पेढे वाटले असतील. माझ्या लहान काकाला तर आकाश ठेंगणे झाले होते. लहान असताना पासून तो कधीच काका वाटला नाही , नेहमी मोठा भाऊच वाटला. त्याचं मला शिक्षणात खूप प्रोत्साहन होतं.
दहवीच्या मार्कांनी काय काय दिलं अंकुशराव टोपेंकडून सत्कार , महाराष्ट्र बँकेतर्फे सत्कार पेपरात फोटो वगैरे आणि प्रसिद्धी !
त्यानंतर पप्पांच्या माझ्याशी वागण्यात एकदमच बदल झाला.
आमच्या परिवारात (पप्पांच्या सहा भावांमधे व माझ्या पिढीत ) ग्रॅजुएशन झालेला मुलगा म्हणजे माझा लहान काका कालिदास व मुलींमधे दहावी पास झालेली मी आणि त्यातही इतके मार्क मिळवून!
मग त्याच उत्साहामध्ये वडिलांनी (अंबड तालुका प्लेस मधे सायन्स कॉलेज नव्हतं म्हणून गाव सोडून) जालना मध्ये माझे ऍडमिशन करून दिले. अकरावी सायन्स घेतलं आणि बसने अप डाऊन सुरू केले.
तिथून माझा जो संघर्ष सुरू झाला तो वेगवेगळ्या पातळीवरती आजतागायत चालूच आहे असे वाटते.
दहावीपर्यंत मराठी मिडीयम मध्ये शिकलेली मी अकरावी सायन्स इंग्लिश मीडियम तसं अवघड जात होतं. सतत डिक्शनरी हातात घेवून बसायची. प्रवासाने थकून जायची मग तब्येत खराब झाली आणि वडिलांनी जालन्याला खोली केली.
तिथे मी, माझ्या वडिलांची आई राहत होतो मला स्वयंपाक यायचा नाही. आजी अंबडला किंवा गावाला गेली की खाण्याचे हाल. पण पप्पांनी मला बर्याच गोष्टी शिकवल्या.
तो पंपचा टाकी वाला केरोसिन स्टोव्ह अन त्यावर खिचडी , उपमा , भाकरी वगैरे त्यांनीच शिकवली.
आमचे भरलं पूर्ण कुटुंब अंबड मध्ये क्वार्टर मध्ये राहत होतं. आई ,आजी, काका, काकू त्यांचा मुलगा. मन सतत तिकडे धाव घ्यायचं .दुसर्या टर्म मधला सहा महिने तो वडिलांचा खूप जवळून सहवास लाभला. मला माझे वडील काय आहेत ते कळालं आणि दुर्दैवाने घाला घातला.
अकरावीची परीक्षा दिली होती आणि अचानक टायफाईड ने आजारी पडलेले माझे वडील चार दिवसात कायमचे आम्हाला सोडून गेले.
त्यांना डायबेटिस होता व चुकुन ग्लुकोज चढवलं गेलं होतं.
तो आघात इतका मोठा व अनपेक्षित होता होता की चालता बोलता माणुस दवाखान्यात जातो व दुपारी डेड बॉडी घरी येते.
माझा लहान भाऊ राजाला मी त्यादिवशी सकाळीच म्हणाले होते की आजची तारीख आपण कधीच विसरणार नाही, तो म्हणाला का ?
अरे वेड्या आज १८ एप्रिल आहे ,आपण टिव्ही घेवून वर्ष झालं. पण
खरंच ती तारीख आमच्यासाठी आजही अविस्मरणीय आहे.
पप्पांचं जाणं, त्यांची बॉडी बीदरला नेणं, तिथे अंत्यसंस्कार व बरंच काही असं आमच्या डोक्यात सिनेमासरखं रेकॉर्ड झालंय. त्यावेळी मोठं घर बांधलं होतं .२२ दिवसांनंतर वास्तुशांती होती , खरेदी झाली होती. पप्पा त्या घरात राहिले नाहीत या गोष्टीची खंत आज ३३ वर्षानीही जात नाही.
त्यांचं जाणं खूपच जिवहारी लागलं , आम्हाला सावरायला कदाचित वर्ष लागले.
आई 35 वर्षाची होती, वडील केवळ 45 वर्षांचे होते, भाऊ 14 वर्षांचा आणि मी सोळा वर्षांची आणि ताई अठरा वर्षांची त्यात सुदैव की काय माहित नाही पण वडिलांनी केवळ पंधराव्या वर्षी नववी पास झाल्यानंतर बहिणीचे लग्न करून आत्याघरी दिलं होतं त्यामुळे पप्पा गेले तेव्हा ती तिच्या सासरी होती.
राहता राहिले मी आणि भाऊ, आई वरती तर डोंगर कोसळला होता पण माझी आई खूप हिम्मतवाली, जास्त शिक्षण नसेल फक्त आठवी पण जीवनाच्या शाळेत पक्की होती.
आमच्या सोबत माझा लहान काका व त्याची पत्नी म्हणजे माझी सख्खी मावशी त्यांचा परिवार सोबतीला होता शिवाय ताई -भाऊजी तितक्याच मजबुतीने पाठीशी उभे राहिले पण वैयक्तिक रित्या बारावीचे पूर्ण वर्ष मला काहीच करण्यात रस राहिला नव्हता.
काका-मावशीची मुलगी, पप्पा गेल्यावर जन्मली होती त्यामुळे घरात लहान बाळ असल्याने थोडं चैतन्य आलं होतं. तिचे लाड केल्यामुळे इतकी माया लागली की ती सांगायला मावस किंवा चुलत असली तरीही सख्ख्या बहिणीसारखी कनेक्टेड वाटते.
पप्पा गेले तर कसं जगायचं? असा विचार सतत मनात यायचा आणि आपलं तर काही होणार नाही, अशी भावना.
आईला त्रास द्यायचा नाही, पप्पा नाहीत तर कुणासाठी डॉक्टर व्हायचं ही गोष्ट मनात इतकी रुजली होती की मी सगळं विसरले.
केवळ आईला त्रास द्यायचा नाही एवढ्या एका गोष्टीमुळे मी जमेल तसं बारावी काढलं. जास्त परसेंटेज नाही आलं. कुठेही राहण्याची किंवा काही शिक्षण करण्याची जिद्द केली नाही.
जे सरळ सरळ जालन्यात त्यावेळी शिकता येईल ते घेतलं.
जशी वाहती नदी रस्ता मिळेल तिकडे वाहत जाते , तसे माझे शिक्षण झाले.
मी बीएससी ला ऍडमिशन घेतलं , चला डॉक्टर नाही तर झूलॉजी तरी घेऊयात आणि पहिले एक वर्ष जे ई एस सारख्या मोठ्या महाविद्यालयात रुळण्यात गेलं.
पण दुसऱ्या वर्षी जी मी गती पकडली माझ्या आयुष्यातला तो दुसरा सुवर्णकाळ जिथे बीएससी सेकंड ईयर आणि थर्ड इयर मध्ये मी प्रचंड नाव कमावलं.
कॉलेजात होणारी एकही स्पर्धा मी सोडत नव्हते.
प्रत्येकात मला भाग घ्यावा वाटे.
त्या क्षणी माझा आयुष्य असं होतं तसं मला सगळंच करायचं होतं, मला गाणं म्हणायचं होतं मला नाटकात काम करायचं होतं, मला डान्स करायचा होता, डान्स मी पुढे एवढ्यासाठी सोडला की माझ्या पप्पांना स्टेज वरती डान्स केलेला आवडायचं नाही ,भाषण केलं तर त्यांना खूप अभिमान वाटायचा, त्यामुळे कथाकथन, कविता वाचन, वादविवाद अशा अनेक अंतर महाविद्यालयीन, कॉलेज आतल्या गॅदरिंग मधल्या सगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेत राहिले व विशेष म्हणजे जिंकत राहिले. इलेक्शन मध्ये ही जिंकले.
दोन वर्ष स्नेहसंमेलनासाठी एकांकिका लिहिली, दिग्दर्शित केली, दोन वर्ष त्यात बेस्ट अॅक्ट्रेस (उत्कृष्ट अभिनेत्री) चा नटराज मिळाला .
पण बीएससी झाल्यानंतर पुन्हा तोच प्रश्न येऊन थांबला , पुढे काय? एम एस्सी करायचं होतं तर माझ्या शहरात त्यावेळी माझ्या विषयाचं पीजी अवेलेबल नव्हतं.(आता सगळं आहे) आई बाहेर ठेवायला तयारच नव्हती. त्यावेळी आईला माझ्या लग्नाची चिंता सतवत होती.
तिला काही करून ही जबाबदारी पूर्ण करायची होती आणि मी पात्र मानसिकरित्या लग्नासाठी तयार नव्हते .
मला कुठेतरी लग्नच करू नये आणि एखादी ऑफिसर बनावं आणि आईची सगळी स्वप्न पूर्ण करावी असं मनोमन वाटत होतं , पण आईला ते कळलं नाही.
तिला सतत वाटायचं की मी काही पण असेल ते नवऱ्याच्या घरी जाऊन करावं एकच लग्नाचा तगादा तिने मागे लावला .
मुख्य म्हणजे याच काळात माझ्यातली लेखिका फुलत होती बहरत होती.
माझ्या मनातल्या लेखिकेने केव्हाच जन्म घेतलेला होता, पप्पा गेल्यानंतर बारावीपासून मी हळूहळू मनातल्या भावना वहीत किंवा डायरीत लिहायला लागले होते आणि त्याचे रूपांतर बीएससी च्या तीन वर्षात एका नावावर रूपाला येणाऱ्या नवोदित लेखिकेसारखं झालं होतं .
मला आता यावेळी स्वतःलाच कळत नाही की त्या 19 - 20 व्या वर्षी मी दोन-चार समित्यांमध्ये काही ना काही पद सांभाळत होते , मी एका त्रैमासिकासाठी संपादनामध्ये मदत करत होते, मी राज्यस्तरीय काव्य आणि कथा स्पर्धा माझ्या पत्त्यावरती आयोजित केल्या होत्या, आणि प्रचंड पत्र व्यवहार सांभाळत होते.
त्यावेळी मी लिहिलेल्या कथा, कविता वर्तमानपत्रात , कॉलेजच्या मॅगझिनमधे, दिवाळी अंकात यायच्या.
बऱ्यापैकी माझं नाव झालं होतं, सुत्रसंचलन करणे व स्टेजवर बोलणे हा पण छंदच होवून बसला होता.
बीएससी झालं पुढे काही रस्ता सापडला नाही म्हणून मी एम ए इंग्लिश करायला घेतलं आणि एम ए इंग्लिश संपेपर्यंत, पहिलं वर्ष संपेपर्यंत माझे लग्न झालेले होते .
हे सगळं अचानकच झालं .
अचानक म्हणजे बिदरला माझ्या अजोळी काहीतरी कार्यक्रम साठी मी कुटुंबासोबत तिथे जाते काय आणि माझे पती संतोष देशपांडे तिथे कार्यक्रमाला येतात काय आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला पाहून मला असं वाटलं की माझं लग्न झालं तर या माणसाशी व्हावे.
आईने नातेवाइकांच्या इतक्या दबावातही मला एकदा शब्द दिला होता की "मी तुझं लग्न तू म्हणशील तेव्हा व म्हणशील त्या मुलाशी लावून देईन फक्त तू खूप उशीर करू नकोस व मुलगा ब्राम्हणच असावा म्हणजे जातिबाहेर नको."
आता तो शब्द पाळण्याची वेळ होती जेव्हा तिच्या चौकशी मुळे मी आईला स्पष्ट सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की माझं लग्न त्या मुलाशी व्हावं.
तेव्हा आईने ठरवूनच टाकलं.
मला तर शंभर टक्के खात्री वाटली होती की हा मुलगा म्हणजे ते (संतोष) मला नकार देईल कारण ते मेट्रो सिटी हैदराबाद सारख्या ठिकाणी राहिलेले हँडसम यंग मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह , तर मी तालुक्यातली साधारण सावळी मुलगी . . . मग ते जेव्हा नाही म्हणतील तेव्हा आईला असं म्हणूया की तो नाही म्हणाला तर आता मला कोणाशीच लग्न करायचं नाही आणि मग मी हवं ते करू शकेन पुढे शिकेन वगैरे.
पण झालं उलटच. त्यांच्याकडून लगेच पसंती आल्याने चार दिवसात लग्न ठरलं व सहा महिन्यात ४ मे १९९४ ला माझं लग्न झालं.
अशा प्रकारे साडे वीस वर्षाला ,21 वर्षे पूर्ण होण्याआधीच मी माझ्या सासरी जाऊन स्थिरावले होते.
सासरी घरी सासू-सासरे, माझे लहान धीर आणि माझे मिस्टर असं कुटुंब होतं त्यांना मुलगी नसल्यामुळे त्यांनी खूप सहज मला मुलीसारखा वागवायला सुरुवात केली आणि मी खूप लवकर माझ्या घरी जोडले गेले. घरात सगळं मराठवाडी वातावरण स्वयंपाक वगैरे होता कारण ते मूळ उस्मानाबादचे होते.
फक्त या सगळ्यात असं झालं की परराज्यात गेल्यामुळे माझ्या आवडती मातृभाषा माझ्या मराठीची साथ सुटून गेली आणि मला लिहिण्यासाठी वाचण्यासाठी तिकडे काही विशेष मिळत नव्हतं आणि हळूहळू मी घरामध्ये इतके अडकले किंवा रमले की त्या सगळ्या गोष्टींचा मला आपआप विसर पडला . माझ्यातली लेखिका हळू हळू लुप्त झाली.
त्यावेळी ते ऑनलाइन रायटिंग किंवा इंटरनेट नव्हतं ,त्यामुळे पत्र प्रपंचाने लिखाण चालू ठेवणे खरच खूप अवघड होतं.
कदाचित त्यामुळेही असेल किंवा मी लिहिलेलं वाचणारं , दाद देणारं मराठी कोणी नव्हतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझ्यातले लेखिका त्यावेळी 1994 नंतर सहा महिन्यात बंद झाली. विषय संपला.
संसार सुरू झाला, संसार वेलीवर पहिलं फूल माझा मोठा मुलगा शशांक 1995 डिसेंबर मध्ये तो जन्मला , वयाच्या साडे 22 व्या वर्षी मातृत्व मिळाले आणि मग त्याला वाढवताना कुणीकडे दिवस गेले कळंले नाही. एक वेगळं कंहीतरी झालं की तो सहा महिन्याचा झाला त्यावेळी मात्र काहीतरी करण्याची उमेद वर येवू लागली. सासू-सासर्यांनी मुलाला सांभाळण्याची हमी दिली आणि माझा मुलगा सहा महिन्याचा असताना मी नोकरी शोधली व शिक्षिकेचा पेशा स्वीकारला तो आजपर्यंत अविरत चालू आहे.
या क्षेत्रात मला या ६ जून ला 27 वर्ष पूर्ण झाली.
त्यावेळी ती बीएससी केल्यामुळे मी सायन्स टीचर म्हणून नोकरीला लागले. अॅक्चुअली माझा बी एड फॉर्म नॉन लोकल म्हणून रिजेक्ट झाला होता म्हणून मी घरूनच हिन्दी विद्वान (हिन्दी बी ए ) केलं होतं . माझी हिंदी खूप चांगली आहे असं माझ्या सासऱ्यांच्या लक्षात आलं आणि दक्षिणात्य भागांमध्ये हिंदीला खूप मान असतो म्हणून त्यांची खूप इच्छा होती की त्यांच्या सुनेने हिंदी टीचर बनावं. आणि त्यांनी मला तिथल्या प्रादेशिक हिंदी प्रचार सभांमधून हिंदी विद्वान आणि हिंदी पंडित असे शिक्षण करवले.
हिंदी पंडित जे हिंदी भाषा शिक्षणातले बी एड मानले जाते , ते तर मी लग्नानंतर पूर्ण केले . दोन वर्ष सायन्स टीचर नोकरी करून , तिसर्या वर्षी रेग्युलर ९-५ कॉलेज केलं. या सगळ्यात संतोषचा खूप सपोर्ट होता. तुझ्या टॅलेंट ची कदर व्हावी असं ते नेहमी म्हणायचे.
जेव्हा मी कॉलेजात जायचे तेव्हा माझ्या मोठ्या मुलाला माझे सासू-सासरे आणि दिर खूप प्रेमाने सांभाळायचे, त्यांच्या अंगा खांद्यावर खेळूनच लाडात तो मोठा झाला .
पंडित ट्रेनिंग संपली व निकाल येण्या अगोदर हैदराबाद च्या प्रसिद्ध ICSE शाळेत मला नोकरी लागली.
संसाराबद्दल लिहिताना अजून एक वाईट आठवण अशी की माझ्या मोठ्या मुलाच्या वेळी मुलगी व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा होती, पण मुलगा झाला. पहिल्यावेळी मुलगा झाला म्हणून पाच वर्षानंतर पुन्हा एकदा दैवयोगाने चांगली बातमी दिली परंतु दुर्दैवाने ते बाळ मुलगी असूनही जगू शकलं नाही .
त्याच्या मेंदूत पाणी आहे हे आठव्या महिन्यात कळाले होते. मग असहाय्य!
ती मुलगी आम्हाला गमवावी लागली.
ते दुःख बरेच वर्ष मनात सलत राहिलं आणि दैवयोगाने पुन्हा पाच वर्षानंतर जेव्हा मला दिवस राहिले तेव्हाही नऊ महिने मुलीचाच विचार करत मी ते गर्भारपण काढलं आणि त्यावेळी माझा दुसरा मुलगा उत्कर्ष जन्मला .
त्यामुळे आमच्या दोन मुलांमध्ये पूर्ण दहा वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे आम्हा सर्वांना तरूण ठेवण्याचं काम उत्कर्ष उर्फ चिक्कूने केलं.
माझी नोकरी चालू होती. प्रोफेशनली मी खूप समृद्ध होत होते , माझी इंग्रजी भाषेवरची कमांड वाढत होती, ट्रेनिंग केल्यानंतर मी हिंदी टीचर म्हणून जॉईन झाले होते , मोठ- मोठ्या जिम्मेदार्या व पोस्ट मिळत गेल्या, प्रमोशन झाले .
परंतु एक गोष्ट मनात चुभत होती, माझ्या मराठीची साथ सुटली होती.
संतोषने फिल्ड बदलले होते व अकाउंटंट झाले होते. मी सरकारी नोकरीचा प्रयत्न केला नाही कारण मला तिथली भाषा येत नव्हती. मी २ वर्षात तेलुगु बर्यापैकी फ्लुएंटली शिकले, समजायची व बोलता पण यायला लागली पण लिहिता वाचता येत नव्हतं .
त्यांची प्रायव्हेट नोकरी होती, माझी प्रायव्हेट नोकरी होती, लग्न झालं त्याच वर्षी सासरे रिटायर झाले होते त्यांची पेंशन होती त्यामुळे आमचा आर्थिक संघर्ष चालू होता खूप वाईट नसेल पण खूप आर्थिक सुबत्ताही कधी नव्हती. महिन्यावारी पगारीवर बर्यापैकी चालून जायचं .पण त्याचा मी कधीच त्रास करून घेतला नाही कारण मी माझ्या आवडत्या माणसा सोबत संसार करत होते हेच खूप होतं. त्यांचा व माझा स्वभाव काही काही बाबतीत खूप सारखा तर काही बाबतीत अगदीच विरुद्ध होता.
आम्ही स्वतःची तुलना कधीच दुसऱ्यांशी केली नाही , जमेल तशी हौस मौज केली , जबाबदार्या घेतल्या, काडीकाडीने संसार उभा केला . हफ्यांवर वस्तु घेतल्या त्याचा आनंदच वेगळा.
२००४ मधे स्वतःचा फ्लॅट घेतला तो आनंदाचा क्षण.
मला बाकीच्या शानशौकी पेक्षा सरळ साधं राहणं आवडायचं , सतत आपल्या व्यक्तिमत्वाला कसं अजून भारदस्त बनवता येईल आणि कशी माणसं कनेक्ट करता येतील, कशी नाती जोडून ठेवता येतील. . मी फक्त यासाठी झटत राहिले.
27 वर्षात घर-परिवार एकत्र बांधून ठेवणं आणि ते पण असे वेगवेगळया स्वभावाची माणसं असताना ते थोडं चॅलेंजिंग होतं पण जमलं. पण
होईल तितकं सगळ्यांना आनंदी ठेवणे या शर्यतीत अक्षरशः कळसुत्री बाहुली सारखे रमले, गुंगले व स्वतःचं असं काही अमलात आणलं नाही.
त्यावेळी माझी नोकरी व माझं घर हेच माझं कार्यक्षेत्र व कर्मभूमी आहे असं वाटायचं. मुलं शिकत होती , मोठी होत होती. दिराचं लग्न करून दिलं होतं. तो सेटल झाला होता. सासू सासरे थकत होते. लहान मुलाला जन्मल्यावर एका वर्षात फुड कलरची अॅलर्जी होती. त्याचे खूप दवाखाने काढले, आर्टीकेरिया आहे हे कळायलाच एक वर्ष गेलं. पाच वर्षे त्याचे वाढदिवस केले नाहीत की त्याला वाढदिवसाला पाठवलं नाही. घरात बेकरी प्रॉडक्ट , क्रीम बिस्कीट, केक -पेस्ट्री वर्ज्य !
मग त्याची ती सिंथेटिक कलरची अॅलर्जी कमी झाल्यावर तो नॉर्मल झाला, चिंता मिटली.
शशांक जन्मण्यापुर्वी झालेला आमचा बस अॅक्सीडेंट , उत्कर्ष जन्मण्यापुर्वी अचानक झालेलं माझं अपेंडिक्स चे अॉपरेशन, बरेचदा संतोषचे काढलेले दवाखाने , सासू सासर्यांची ची आजारपणं, सणवार , पाहुणे रावळे आणि नोकरी!
त्यात घरातली काही भांडणं आणि वेगळं राहून पुन्हा एकत्र आणणं हे सगळं अगदी कमर्शिअल सिनेमासारखं वाटतं कधी कधी! त्यात वैयक्तिक आयुष्यात आलेली काही वादळे. . . पण सगळं झेलुन तटस्थ राहण्याची शक्ती माझ्या कृष्णाने दिली. मिो फार जास्त पूजा पाठ किंवा कर्मकांड करत नाही पण अश्रद्ध पण नाही. देवावर विश्वास आहे त्यातही मी कृष्णवेडी आहे आणि तो सतत सोबत असतो ही प्रचिती येत असते.
आमच्या माहेरच्या कुटुंबात घडलेली एक लक्षात राहण्याजोगी गोष्ट म्हणजे माझे पप्पा गेले तेव्हा आम्ही दोघं भावंडं होतो ज्यांची काळजी पप्पांना होती, त्यामुळे ते मरताना दोन बोटं दाखवत होते. कालू काका म्हणजे लहान काकाने आईला सपोर्ट देत ते कर्तव्य निभावलं. माझं कन्यादान केलं व राजूला (भावाला)पोलिटेक्निक शिकवून वडिलांच्या जागी नोकरीसाठी खूप प्रयत्न केला व इंजिनीयर म्हणून नोकरी लावली.
२०१४ मधे तोच काका ५५ व्या वर्षी अचानक हार्टफेल होवून गेला. पुन्हा माघारी त्याचा मुलगा व त्याची मुलगी या जबाबदार्या होत्या.
माझ्या भावाने पुन्हा तेच केलं माझ्या चुलत बहिणीचं कन्यादान केलं व माझ्या चुलत भावाला काकाच्या जागी अनुकंपातून नोकरी लावून दिली.
म्हणजे जे कराल ते याच जन्मात देणं घेणं आहे यावर विश्वास बसतो.
तर जिंदगी है. . . चलती रहती है! जिंदगी हर कदम इक नई जंग है प्रमाणे. . .माझं सगळं रूटीन चालू होतं.
या सगळ्यांमध्ये 2018 साली माझ्या आयुष्यात वैयक्तिक रूपाने , लेखिकेला जागवेल असं काहीतरी वेगळं घडलं.
2017- 2018 मध्ये मला सतत असं वाटायला लागलं की आपण काहीतरी मराठी पुन्हा वाचायला हवं , जुने छंद जपायला हवेत.
चित्रकला , डान्स-गाणं किंवा अभिनय हे सगळे छंद केव्हाच मागे पडले होते. आहे त्या साच्यात वाचन किंवा लिखाण हे दोन छंद जपण्यासारखे होते.
त्यावेळी माझ्याकडे पहिला स्मार्ट फोन आला आणि मी इंटरनेट वरती मराठी वाचनासाठी काही ॲप मिळतं का हे शोधत होते.
त्यावेळी योगायोगाने प्रतिलिपि मराठी सापडले (जे नवीनच सुरू झालेले होते) आणि काही दिवस त्यावर वाचत राहिले आणि एक दिवस अचानकच त्यावर कसे लिहायचे शिकून घेतले.
माझी वीस वर्ष जुनी कविता वेदना , मग प्रतीक त्याच्यावर टाकली तर त्या कवितेला ५ स्टार मिळायला लागले. चांगल्या कमेंट यायला लागल्या आणि माझ्यात इतके दिवस दाबून ठेवलेली लेखिका -कवयित्री पुन्हा हळूच डोकं वर काढू लागली.
मग कधी जुने साहित्य शोधून टाईप करून टाकायचे, कधी नवीन काहीतरी कविता किंवा लेख लिहायला घ्यायचं.
हे सर्व करायला संयुक्त कुटुंब असल्यामुळे वेळ मिळायचा नाही पण तो वेळ मी काढायला सुरुवात केली. शाळेच्या बसमधे जाता -येता एक तास आणि रात्री 11:30 च्या नंतर अर्धा तास मी स्वतःसाठी बसायचे आणि त्यालिखाणात मला जो आनंद मिळायचा तो वर्णनातीत होता .
म्हणजे 24 वर्षानंतर सुद्धा माझी जोपासलेली भाषा माझ्या मनात सुप्त पणे जागृत होती, ती जगली होती .
आंध्र प्रदेशात राहूनही माझी मराठी खराब झाली नव्हती किंवा हिंदीत प्रभुत्व आले म्हणून मराठी विसरले नाही ,जास्त काळ तेलुगु लोकांत राहिले म्हणून हिन्दीत हैदराबादी टोन आला नाही, इंग्रजीची फ्लुएंसी वाढली असेल, कन्नड अलरेडी घरी बोलून येतच होती व तेलुगु भाषा शिकून घेतली होती. . . .
पण माझी मायबोली मराठी तशीच राहिली हेच ते मातृभाषेचे मातीतले नाते आहे.
मग घरी मोठी सुनबाई, आई, बायको ,शाळेत शिक्षिका , एच ओ डी एवढ्या सगळ्या जिम्मेदार्यांमधे अजून एक लेखिका पण अॅड झाली होती.
त्याच पद्धतीने 2018 , 2019, 2020 असे तीन वर्ष प्रतिलिपीने मला खूप काही दिलं. कितीतरी स्पर्धा, कधीतरी मित्र-मैत्रिणी , किती चांगले वाचक , पुरस्कार,सन्मान ,फेलोशिप, आव्हाने आणि प्रसिद्धी !
मी बऱ्यापैकी लेखिका म्हणून ओळखली जाऊ लागले. केली पण प्रीती , जस्ट फॉर यू अशा कथामालिकांची लेखिका म्हणून नावाने ओळखले जावू लागले. वाचकांच्या प्रतिक्रिया भारावून टाकत होत्या. एक नशा होती आनंदाची जी मी चाखत होते. बाबा म्हणायचे नुसतं फुकट आनंद घेवून काय करायचं, या कलेचे पैसे पण मिळाले पाहिजेत ना! मिळतील बाबा मिळतील असं मी म्हणायचे.
संतोषला विशेष वाचनाची आवड नव्हती त्यामुळे मी काय लिहिते त्यात त्यांनी कधी डोकं घातलं नाही.
इकडे प्रोफेशनल लेवलला वेगळा संघर्ष व घरात परिवार जपण्याचा संघर्ष चालूच होता, पण ते जे सुख मी लिखाणात शोधत होते त्याची जाण किंवा त्याची समज फक्त मला होती.
दुसऱ्या कुठल्याच आनंदाशी, ते लिहिल्या नंतर मला जर मानसिक आनंद मिळेल त्याची तुलना करू शकत नाही.
लिहायला लागले म्हणून मग नवीन सुचायला पण लागले.
लेखनाच्या करियरचा विचार केला तर 2020 पर्यंत प्रतिलिपि मराठी शिवायही मी स्टोरी मिरर,योर कोट तर कधी कधी मॉम्स प्रेसो वर लिहित होते.
२०२१ जानेवारी महिन्यात राधिका कुलकर्णी या माझ्या मैत्रिणीकडून मला ईरा ब्लॉगिंग बद्दल कळालं. मी थोडे दिवस पाहिलं पण जमलं नाही म्हणून सोडून दिलं होतं. संजना मॅडम तेव्हाही अडचण आली तर कॉलवर पर्सनली बोलायच्या. मग फेब्रुवारीत अचानक एक स्पर्धक कमी आहे तर पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२१ मधे एका संघात जॉइन होशील का असे विचारताच मी होकार दिला. पहिली चॅम्पियन ट्रॉफी मी शगुफ्ता सोबत मनरंगी टीममधे होते. दोन कथा लिहून पुन्हा रामराम ठोकला.
मधे सगळं थांबलं होतं मग पुन्हा डिसेंबर २०२१ पासून ईरा ब्लॉगिंग वर जे लिहितीय ते आजतागायत चालू आहे.
२०२२ तर मी 'गोष्ट छोटी डोंगराएवढी ' मधे प्रचंड लिहिलं , साहित्य शिरोमणी झाले. २०२२ च्या चॅम्पियन ट्रॉफीत सहभागी झाले. आमचा मैत्र संघ व झिम्मा ग्रुप म्हणजे अविस्मरणीयच. मला पुरुषवादी लेखन स्पर्धेत पुरस्कार मिळाला, राज्यस्तरीय मधे संजना मॅडम नी सरळ कॅप्टन घोषित करून तो अनुभव दिला. हल्ली मॉम्स , स्टोरी मिरर व योर कोटवर लिखाण बंद आहे . फक्त ईरावर व कधी कधी मधेच प्रतिलिपि वर लिहिते.
लेखणी माझी आधाराची काठी झाली आहे.
लिहिल्याने एक वेगळाच आनंद मिळतो. देवाची , दैवाची व आपल्या माणसांची कृपा आहे की सगळे चालू आहे.
तर मुद्दा असा की १९९४ पासून २०१९ पर्यंत हैद्राबादला असलेली मी आता औरंगाबाद ला कशी ? तर्
2019 च्या जून महिन्यात महाराष्ट्रातल्या औरंगाबाद इथे आम्ही फॅमिली शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला.
मोठा मुलगा आता हैदराबाद ला पोस्ट ग्रॅज्युएशन करत होता. औरंगाबाद आम्हा दोघांचं आवडतं शहर होतं. आता मेट्रो शहराची दगदग सोडून म्हातारपणी निवांत इथे राहूयात म्हणून पूर्ण परिवारासहित आम्ही इथे राहायला आलो. मला वुडरिज हायस्कूल मधे छान जॉब मिळाला होता आणि मी माझ्या राज्यात, माझ्या भाषेतल्या लोकांमध्ये , परत आले हा आनंद होताच.
सगळं सेटल होईपर्यंत वर्ष लागले . घर भाड्याचे पण सुंदर होते , शाळा चांगली चालली होती आता संतोषला इथे काही बिझिनेस वगैरे करायचे होते असे म्हणेपर्यंत व नियोजन करेपर्यंत मार्च 2020 मध्ये कोरोनाचे थैमान सुरू झाले.
त्यावेळी मला घरात जो वेळ मिळाला त्यात लिखाणात विशेष उन्नती झाली नाही कारण मी जास्त वेळ देऊ शकले नाही पण वाचन करायला वगैरे मिळाले थोडे.
सगळ्या बायकांसारखी मी पण कामवाली बनून गेले होते कारण कामवाल्यांनी येणे थांबवल्यामुळे सहा माणसांचे घर सांभाळणं आणि दिवसभर किचनमध्ये राहणे,भांडे , कपडे , फरशी! संतोषनी मात्र पहिल्या लॉकडाऊन मधे स्वतःतला कुक जागृत केला व यु ट्युब वर पाहून एकापेक्षा एक रेसिपि बनवत होते. पोळ्या सोडल्या तर सगळा स्वयंपाक त्यांनी मस्त शिकून घेतला होता. हाताला चव भारीच होती. त्यांची पनीर बटर मसाला , दम बिर्यानी , सांबार व भाज्या तर अविस्मरणीयच!
या सगळ्या घर काम व आर्थिक अडचणीत आणि पुन्हा शाळा ऑनलाइन सुरू झाली ते काम चॅलेंजिंग होत गेलं.
जसं ऑनलाइन झालं तसं व्यक्तिशः खूप काही शिकायला मिळालं.
तंत्रज्ञानाशी आमचा हिन्दीचा तसा विशेष संबंध नव्हता.
मी फोन चांगल्यापैकी वापरत होते इतकंच, लॅपटॉप वापरताना माहिती गोळा करणे ,टाइपिंग करणे असंख्य नव्या टेक्निकल कितीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या .
त्या तणावामध्येही वेळ काढून थोडं लिखाण मी करतच होते. कोरोना मुळे पगार अर्धी झाली होती पण खर्च काही विशेष कमी झाले नव्हते.
पण पुढे काय वाढून ठेवलय ही आपल्याला कल्पना नसते.
जगात कुठेतरी असलेला कोरोना तो आपल्या देशात आला, आपल्या देशात त्याने लोकांना घाबरून सोडले पण त्याने आपल्याला काहीच होणार नाही असं वाटलं.
सहज आठवलं की एकदा कुठल्यातरी वर्कशॉप मध्ये "तुम्हाला कुठली भीती आहे असे विचारलं होतं ,तेव्हा मी माणसं गमावण्याची भीती!" असं लिहिलं होतं कारण मी माझ्या वडिलांना जे गमावलं त्यांच्या जाण्याने माझ्या आयुष्याची दिशा बदलली ती पुन्हा तशी ठीक झालीच नाही.
जे एखाद्या नदीला जिकडे रस्ता मिळतो तसा ती वाहत जाते तशी मी वाहत राहिले पण नियोजित असं आखलेला आयुष्य जगता आलं नाही , हे सगळं मान्य पण ती मी तेव्हा लिहिलेली भीती कदाचित देवाकडे नोंद झाली असावी आणि मग 2021 मध्ये माझ्या आयुष्यात इतकं मोठं वादळ आलं की तो एक प्रसंग होता ज्याने सतत माझ्या आईची आठवण करून दिली . आईसारखी हिंमत करायची.
यापूर्वी ईरा ब्लॉगिंग वरती 'गोष्ट छोटी 'नावाच्या सिरीज मध्ये मी हा अविस्मरणीय प्रसंग व त्यानंतरचा गणपतीचा प्रसंग ही पूर्ण लिहिलाय त्यामुळे इथे लिहू इच्छित नाही .
कारण ते लिहिताना मी पुन्हा पुन्हा त्याच भावनांमध्ये बुडून जाते आणि त्यातून बाहेर येणं खूप कठीण जातं.
फक्त एवढं थोडक्यात सांगू इच्छिते त्यांच्यासाठी ज्यांना कदाचित माहीत नसेल 2021 च्या एप्रिल मध्ये उन्हाळ्यात आम्ही हैदराबादला सुट्टीसाठी गेलो होतो. सासूबाईंची जिद्द होती की तिकडे कोरिना कमी आहे तर आपल्या घरात मला महिनाभर रहायचं आहे ,जायचंच आहे.
तिकडे गेल्यानंतर महिनाभर सगळे ठीक होतो आणि त्यानंतर अचानक १४ मे रोजी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये घरातल्या सहा जणांना एकाच वेळी कोरोना पॉझिटिव्ह चा रिपोर्ट आला.
औषध गोळ्या घेऊन सावरेपर्यंत बाबांचे ऑक्सिजन कमी झाले . १५ मे ला त्यांना रेल्वे हॉस्पिटल मधे अॅडमिट केले व तीन दिवसात १८ मे रोजी सासरे गेले .
सासऱ्यांच्या जाण्याचा धक्का खूप जबर होता. संतोषला ते मान्यच होत नव्हतं . नंतर सासूबाईंना त्रास वाढल्यामुळे २४ मे रोजी दवाखान्यात ऍडमिट करावे लागले.
त्याच्यानंतर दोन दिवसानंतर संतोष बोलेचनात म्हणून त्यांना गांधी मेडिकल कॉलेज मधे ऍडमिट केले आणि दुर्दैव पाठीशीच होते अठरा मे ला सासरे गेले तर 26 मे ला संतोष ला ऍडमिट केले आणि पंधराव्या दिवशी एक जूनला त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. माझ्यासमोर माझ्या हातात ते निष्प्राण झाले अन मी?. . जणु जिवंत प्रेत!
त्यांच्यानंतर 21व्या दिवशी दवाखान्यात सासूबाईंनी देह सोडला .
सव्वा महिन्यामध्ये घरातली तीन माणसं अचानक गमावली आणि आयुष्य उद्ध्वस्त झाल.
औरंगाबादहून हैदराबादला जाताना सहा जण गेलो होतो, तीन महिन्यानंतर परत आलो केवळ तिघेजण, मी आणि माझी दोन मुलं !
ते काढलेले चाळीस दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात वाईट दिवस असतील. सगळ्याच स्तरांवरती त्यातही मधले 22 दिवस तर मी त्याला जिवंतपणे भोगलेला नरक असं समजते त्यानंतर ऍक्च्युली पुन्हा तीच सगळी पण खूप जास्त विरक्ती आली होती जी पप्पा गेल्यानंतर आली होती पण आता परिस्थिती वेगळी होती कारण समोर एक तरुण मुलगा एक किशोरवयीन मुलगा होता.
मोठा मुलगा थोडासा हिमतीने सावरला आणि मला आधार देऊ लागला पण धाकटा मुलगा जो शांत झाला तो आजतागायत आहे , पुन्हा पूर्वीसारखा नॉर्मल मोकळा दिसतच नाही.
या सगळ्या प्रसंगात माझ्या मनस्थितीच्या वर्णन करण्याची गरज किंवा परिस्थितीबद्दल सांगायची गरज मला या क्षणी वाटत नाही, पण हो काही गोष्टी लक्षात राहतात ते अशा की आईचं सतत स्मरण होत राहिलं, तिने जे भोगलं ते पुन्हा पुढे आलं. आपल्यालाही तशीच हिम्मत दाखवायची आहे, मुलांसाठी जगायचं आहे. राजा म्हणजे माझा भाऊही सतत तेच सांगत होता. महत्वाची गोष्ट अशी की माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असलेला माझा भाऊ संतोष गेल्यानंतर जो पाठीशी उभा राहिला तो माझा' बाप' झाला ,
त्यानंतर बापाच्या स्थानी असलेले माझे भाऊजी त्यांच्या मॉरल सपोर्टमुळे पुन्हा जगण्याची हिंमत आली आणि माझी मोठी बहीण नीता ती सोबत होती व आहे. ती कधी मोठी बहीण, क्षणी मैत्रीण होते तर क्षणात ती माझी आई होते. भावाचा परिवार , बहिणीचा परिवार, आई व काही मित्रमंडळी व मनाने जवळची माणसं या सगळ्यांच्या हिमती वरती त्या प्रसंगातून निघाले.
हैदराबाद सोडून पुन्हा औरंगाबादला परत आले. शाळेच्या मॅनेजमेंट चा दिलेला मॉरल सपोर्टही मी कधीच विसरणार नाही. त्या अाधारावरच मी इथे परत आले. नाहीतर तिकडेच राहिले असते.
सहा महिने सगळं खूप अवघड होतं मग त्यानंतर पुन्हा एका क्षणी वाटलं लेखणीलाच आपला आधार बनवावा आणि आपल्या भावना मोकळ्या कराव्यात.
या उद्देशाने मी पुन्हा लिखाण सुरू केलं ,2021 नोव्हेंबर मध्ये पुन्हा लिहायला लागले आणि ती आतापर्यंत लिहीत आहे. आतातर जगण्याचा पवित्र मी बदलला आहे प्रत्येक क्षणी जगायचं , दुःखी राहण्यापेक्षा आनंदी राहणे पसंद करते कारण माहित नाही कुठला क्षण शेवटचा असेल, माहित नाही की कुठला माणूस आज भेटला आहे तो उद्या पुन्हा दिसणार नाही, देवाने जिवंत ठेवलंय त्यामागे काहीतरी उद्देश असेल जगून घेऊयात असा विचार करून पुन्हा जोमाने कामाला लागले.
मी लिखाणात स्वतःला झोकून दिलं आणि मुलांना पंखाखाली घेऊन राहावं तशी पक्षिणी प्रमाणे जगत आहे.
आमच्या मुलांच्या मुंजी झालेल्या नव्हत्या ,त्यांना श्रद्धाचा अधिकार मिळणार नाही म्हणून हे सगळेजण गेल्यावरती सहा महिन्यांनी नोव्हेंबर मधे जालन्याच्या घरी माहेरी अंगणात थोडक्यात पण दुखवटीच्या मुंजी केल्या . माझी ताई , माझी भावजय, माझी नाशिकची जाऊ या सगळ्यांचा खूप आधार होता मला पुन्हा उभं करण्यात !
मुंजी पाहून आईला आनंद वाटला पण माझ्या घरातले तीन माणसं नव्हती त्यामुळे तिकडे माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं .
ते नाहीत याचं दुःख होतं तर मुलांच्या मुंजी झाल्या याचा आनंद ही होता.
वर्ष होत आलं.
त्यानंतर मे 2022 मध्ये संतोष चे पहिले वर्ष श्राद्ध होतं ,हिमतीने सगळ्यांना बोलवण्याचं ठरवलं. एक महिना अगोदर माझी आई ट्रीटमेंटसाठी औरंगाबादला आली आणि माझ्याकडे जी राहिली ते मी इथेच राहते म्हणाली. श्राद्ध झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही , 22 मे पर्यंत मी इथुन हलणार नाही असं म्हणून ती नेटाने माझ्याकडे राहिली.
लहान बाळाप्रमाणे तिचे लाड पुरवण्याचे ,तिची सेवा करण्याचे भाग्य मला मिळालं .
पण दुर्दैव पाठीशी होतंच .
श्राद्ध चार दिवसा वरती आलं त्यावेळी अचानकच तिचा सोडियम आणि हिमोग्लोबिन कमी झाले.
रक्त चढवण्यासाठी दवाखान्यात ऍडमिट केले, दोन दिवस ती ठीक होती आणि तिसऱ्या दिवशी तिला जोराचा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तिचे एक एक अवयव दगा द्यायला लागल।
डॉक्टरांनी इथे काही होणार नाही घरी न्या म्हणून सांगितलं.
श्राद्ध दोन दिवसा वरती आलं होतं, शेवटी भाऊ बहीण आणि मी आम्ही असं ठरवलं की आई जर असं म्हणाली असेल की' मी 22 तारखेपर्यंत औरंगाबाद सोडणार नाही तर ती 22 पर्यंत जगही सोडणार नाही ,ती शब्दाची पक्की होती "
म्हणून आम्ही अगदी वेगळ्याच टेंशन मधे व विचित्र मनस्थितीत दोन दिवसात मासिक श्राद्ध व वर्ष श्राद्ध करून घेतलं.
श्राद्धाच्या दिवशी रात्री आईला दवाखान्यातून घरी जालन्याला नेलं आणि 23 मे रोजी पहाटे पाच- सहा वाजेच्या वेळी झोपेतच आईने जग सोडलं.
नियतीने घातलेला अजून एक घाव अनपेक्षित होता.
एका वर्षाच्या आत मी पूर्णपणे अनाथ झाले होते. म्हणजे कुणा- कुणाच्या आठवणीने रडावं असं होवून गेलं.
अनाथ झालेच होते,पप्पा नंतर आता सासू-सासरे ,नवरा, आई सुद्धा गेली म्हणजे कुणीच मोठं राहिलं नाही.
हे सगळं एक्सेप्ट करून पुन्हा ही जगण्याचा प्रयत्न करत आहे.
हल्ली मी छान तयार होते, आनंदात राहते, सगळ्यांशी बोलते, वाटेल तितकं लिहिते, मजेत राहण्याचा प्रयत्न करते.
सगळ्या वाईट गोष्टींमध्ये एक चांगलंही घडलं या दरम्यान झालेली आनंदाची गोष्ट म्हणजे 5 मे 2023 रोजी माझ्या मोठ्या मुलाचं शशांकचं लग्न झालं, अहो मला आता गोड सुनबाई आली आहे - मेघा!
साधारण मागच्या वर्षी आई गेल्यानंतर मला कळालं की त्याची शिकतानाची कोणी मैत्रीण आहे आणि तिच्याशी लग्न करण्याची त्याची इच्छा आहे.
त्याच्या प्रेमाचा मान ठेवून मी लगेच त्याला परवानगी दिली आणि देवाने सगळं जुळून आणलं.
पुन्हा माझ्या भावा बहिणींचा मैत्रिणींचा व जवळच्या हितचिंतकांच्या सहकार्याने लग्नाचे कार्यक्रम व लग्न निर्विघ्न पणे आनंदात पार पडले.
आयुष्य आहे चालत राहणार , आपण अनुभवाने समृद्ध व्हावे हा माझा पावित्रा!
कधी कधी जगताना हे दुःख लपवते तेव्हा असं वाटतं की आपलं आयुष्य प्राजक्ताचा सडा आहे म्हणजे जितकं आपण झाडावरून खाली पडतोय निखळतोय तितकं कदाचित तरीही जगण्याचा सुगंध देत आहोत.
प्राजक्ताचं फूल झाडावर जास्त वेळ टिकत नाही. निखळून खाली पडणे हा त्याचा गुणधर्म पण कुठेही पडले तरीही ते दरवळत राहते. ते पडलं म्हणून रडत बसत नाही. माझ्या आयुष्याबरोबर प्राजक्ताचं साधर्म्य पाहून या चरित्राला प्राजक्त सडा हे नाव द्यावं असं वाटलं.
चला लेखणीचा सुगंध पसरवूया आणि लोकांशी संपर्कात राहूया, आनंदात नोकरी करूयात, येणाऱ्या पिढीला घडवूयात आणि मुलांना प्रेमाने सांभाळून यात असं स्वतःला रोज सांगत असते.
*मनातलं काहीतरी -
ईराशी लेखणीमुळे जोडले गेले हे माझे एक भाग्य आहे. इथे मिळालेल्या लेखिका मैत्रिणी त्या मला प्रोत्साहन देतात ,त्या मला खूप कंफर्टेबल करतात. पुण्याच्या स्नेहसंमेलनाला जाऊन आल्यापासून तर ईरा ब्लॉगिंग हा माझा अजून एक परिवार आहे किंवा परिवाराचा भाग आहे असं मनाला वाटून गेलं.
आपण एकटे नाही आहोत हे जाणवत राहतं, आपली काळजी करणारे नातेवाईकांशिवायही प्रेनाचे लोक आहेत याचा आनंद वाटतो.
( खरंचच ही संधी मिळाली म्हणून तर तळागाळातून स्वतःला धुंडाळून स्वतःच्या आयुष्याकडे तटस्थपणे पाहून लिहिण्याची उमेद जागली आणि हे आत्मचरित्रपर लेखन माझ्याकडून झालं, नाही तर ते कदाचित शक्य झालं नसतं.
धन्यवाद इरा! धन्यवाद संजना, या कल्पनेसाठी!????)
दिनांक ०९ .०८ .२०२३
©® स्वाती बालूरकर देशपांडे, सखी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा