प्रणिती भाग २

प्रणिती! जी आपला भूतकाळ मागे टाकत त्याच्याशी लग्न करून त्याच्या घरी आली. त्याच्या मुलांना सावत्र असूनही सख्ख्या आईप्रमाणे जीव लावला. त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्यांना मात्र तिने चांगलाच धडा शिकवला. नंतर मग सुखाचा संसार! असा हा प्रवास जाणून घेण्यासाठी वाचा, unknown Words जानकी ?? लिखित, ' प्रणिती '...
                   
                





                  प्रणितीने गृहप्रवेश केला. राजवीर आणि प्रणितीने पुढे येऊन सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. आधी राजवीरच्या आईवडिल म्हणजेच नर्मदा  आणि यशवंतराव यांचा आशिर्वाद घेतला. मग शोभा मामी आणि प्रज्ञाचाही घेतला. शोभांनी वरवर हसून त्यांना आशीर्वाद दिला, पण आतून फारच जळफळाट होत होता. प्रणितीच्या जागी त्यांची मुलगी रजनी असती, तर अष्टपुत्र भवःचा आशीर्वाद दिला असता. पण प्रणितीला फक्त सौभाग्यवती भवःचाच दिला. राजवीरचे मामा प्रकाशराव हे 4 वर्षांपूर्वीच अटॅकने गेले होते. त्यामुळे शोभा मामी इथेच राहत होत्या त्यांच्या मुलीबरोबर. 

                  घरात जास्त सदस्य नव्हते. राजवीरचे आईवडिल, यशवंतरावांची आई सीताबाई ज्या मागच्या काही दिवसांपासून तब्येत खालवल्याने बेडवर पडून होत्या.  शोभा मामी आणि रजनी, राजवीर आणि घरातले काही मेड्स होते. प्रज्ञाचं एक वर्षापूर्वीच लग्न झालेलं होतं. आता प्रणिती पण या घरची सदस्य झाली होती. तिने सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि नर्मदा तिला आजींच्या रूमकडे घेऊन गेल्या. सीताबाई शांत झोपून होत्या. पण त्यांची झोप नेहमी जागृत राहायची. कुणाचीही चाहूल लागली की लगेच डोळे उघडायच्या. आताही तेच झालं होतं. प्रणिती, राजवीर आणि नर्मदा त्यांच्या रूममध्ये येताच त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्याकडे पाहिलं. प्रणितीने त्यांच्याकडे पाहिलं आणि गोड हसली. त्यांनीही हसून प्रतिसाद दिला. राजवीर आजींच्या पाया पडायचं म्हणून बेडच्या पायथ्याशी थांबला, पण प्रणिती पुढे चालून आजींजवळ जाऊन उभी राहिली आणि त्यांचा हात हातात घेतला. राजवीर आणि नर्मदा ती त्यांच्याकडे का गेली म्हणून प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. मग प्रणितीचे शब्द त्यांच्या कानावर पडले. 

" आजी, माफ करा! पण झोपलेल्या माणसांच्या पाया पडू नये म्हणतात म्हणून मी पाया नाही पडणार. तुम्ही असाच मला आशीर्वाद द्या. " प्रणिती म्हणाली आणि तिने आजींचा तोच हात तिच्या डोक्यावर ठेवून घेतला. तसे आजींच्या डोळ्यांत अश्रू आले .

नक्कीच त्यांना कोणाची तरी आठवण आली. त्यांनी तिला सुंदर आशीर्वाद दिले. मग राजवीरही त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिला. त्यांनी त्याच्याही डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. 

" नर्मदा, लक्ष्मी शोधलीस बघ तू आपल्या राजवीरसाठी. " आजी म्हणाल्या, तशा नर्मदा गोड हसल्या, पण प्रणितीने मान खाली घातली. 

" चल प्रणिती, बाहेर जाऊ आता. आजींना आराम करूदेत. " नर्मदा प्रणितीचा हात धरत म्हणाल्या.

" हो आई. " प्रणिती हसून म्हणाली.

" आजी, तुम्ही आराम करा. मी पुन्हा येईल तुमच्याशी बोलायला. " प्रणिती बाहेर जाता जाता म्हणाली. 

" हो बाळा, नक्की ये. आराम करा आता. मी वाट पाहीन तुझ्या येण्याची. " आजी हसून म्हणाल्या, तशी प्रणिती गोड हसून बाहेर निघून गेली. 

                नर्मदा, राजवीर आणि प्रणिती  तिघेही येऊन बाहेर सर्वांसोबत बसले. सगळेच थकलेले होते दिवसभराच्या धावपळीत. पण नवीन नवरी घरात आली, तर सर्वांना जणू तरतरी आली होती. प्रणिती होतीच तशी. अगदी हसतमुख राहायची. पण तिचं हसणं शोभा मामी आणि रजनी सोडून सगळे एन्जॉय करत होते. रजनी तर कितीतरी वेळा तिला खालून वरपर्यंत न्याहाळत होती. प्रणितीचं राहणीमान जरी साधं असलं, तरी दिसायला खूप सुंदर होती. म्हणून रजनीचा जळफळाट होत होता. राजवीरही कधी बोलत होता, तर कधी प्रणितीकडे बघत होता. आता कोणत्याही क्षणी तिला खरं कळणार होतं, त्यामुळे घरातले सर्वजण घाबरलेले होते. शोभा मामी आणि रजनी तर वाट पाहत होत्या बॉम्ब फुटण्याची आणि तो फुटलाच. एक लहान साधारण ५ वर्षांचा छोटा मुलगा धावत पायऱ्यांवरून खाली येत होता. 

" पप्पा ऽऽऽ, पप्पा ऽऽऽ! " असं म्हणत तो खाली येत होता. तसे सगळेजण उठून उभे राहिले. आता पुढे काय होईल यानेच सर्वांचा श्वास घश्यात अडकला होता. तो मुलगा धावत आला आणि सरळ राजवीरच्या पायांना बिलगला. 

" पप्पा ऽऽऽ! " तो राजवीरकडे बघत गोड आवाजात म्हणाला. तो त्याला पप्पा म्हणत आहे पाहून प्रणितीने आधी सर्वांकडे, मग राजवीरकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तिच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. राजवीर आणि घरातले पण तिच्याकडे पाहत होते. 

" पप्पा, कधी आलात तुम्ही? मी आणि प्रिन्सेस तुमची कधीपासून वाट पाहतोय! तुम्ही मम्माला आणायला गेले होते ना? आली का मग मम्मा? " त्या मुलाने निरागसतेने विचारलं. प्रणिती अजूनही आश्चर्याने सर्व पाहत होती. तसं त्या मुलाने प्रणितीकडे पाहिलं आणि राजवीरला विचारलं. 

" ही आहे का माझी मम्मा? " त्या मुलाने विचारलं, तशी राजवीरने फक्त होकारार्थी मान हलवली. 

" मम्मा ऽऽऽ! " तो मुलगा खुश होऊन राजवीरला सोडून प्रणितीला बिलगला. ती मात्र तशीच स्तब्ध उभी होती. तिला काय बोलावं? काय करावं काहीच सुचेना. तशीच ती एकटक त्याच्याकडे पाहत होती.

                 तेवढ्यात राजवीरच्या रूममधून एका छोट्या बाळाचा रडण्याचा आवाज येऊ लागला. एक मेड एका छोट्या बाळाला म्हणजेच, साधारण एक महिन्याचं बाळ असेल त्या बाळाला घेऊन खाली येऊ लागली. ती येऊन घाबरून सर्वांपुढे उभी राहिली, तसा प्रणितीला बिलगलेला तो मुलगा बोलू लागला.

" मम्मा, प्रिन्सेस कधीपासून रडत आहे. दूध पण नाही पीत आहे. " तो मुलगा चेहरा पाडून बोलला. कारण ते बाळ खूप वेळापासून रडत होतं. आज घरात बहुतेक कोणाची चाहूल न लागल्याने रडत होतं.

आता पुढे काय होतं ते पाहण्यासाठी शोभा मामी आणि रजनी तर उत्सुक होत्या, पण पुढचं चित्र पाहून त्यांचे डोळेच मोठे झाले. प्रणिती त्या इवल्याश्या प्रिन्सेसला हातावर घेऊन शांत करण्याचा प्रयत्न करत होती. 

" अरे अरे, काय झालं माझ्या प्रिन्सेसला? हम्म, भूक लागली वाटतं! पण आता रडू नये. मम्मा आली आहे ना आता. मग प्रिन्सेस दूदू पिणार आहे. " असं म्हणत ती त्या बाळाला हातावर झुलवत होती. सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. प्रणिती अशी काही वागेल, हे सर्वांसाठी अनपेक्षित होतं.

" मावशी, जरा दूध थोडं कोमट करून आणता का? बाळाला पाजावं लागेल नाहीतर रडून रडून घसा दुखेल. " प्रणिती प्रेमाने पुढे उभ्या असलेल्या मेडला पाहून म्हणाली. मेडनेही हसून मान हलवली आणि किचनमध्ये निघून गेली. 

            प्रणितीच्या प्रेमळ बोलण्याने तर सर्वजण अजूनच आश्चर्यचकित झाले होते. शोभा मामींचे तर डोळेच बाहेर यायचे बाकी होते, एवढे मोठे झाले होते. थोड्यावेळात मेड दूध घेऊन आली. प्रणितीने दूधाची बाटली बाळाच्या तोंडाला लावली, पण बाळ काही दूध पित नव्हतं. हे नेहमीचंच होतं सर्वांसाठी. कधी कधी तर बाळ उपाशीच झोपत होतं, त्यामुळे सर्वांना बाळाची काळजी सुद्धा वाटत होती.

 बाळ दूध पित नाही पाहून प्रणितीने बाळाला मेडकडे दिलं. आपल्या साडीच्या पदराची पिन काढली, तशी यशवंतरावांनी मान थोडी बाजूला केली. पण प्रणितीने कोणाकडेही लक्ष दिले नाही. ती तिचं काम करत राहिली. बाकी सगळे ती काय करत आहे पाहू लागले. तिने साडीची पिन काढली. पदर मोकळा करून तिने वन साइड पदर घेऊन पुन्हा पिन लावली. बाळाला तिने स्वतःकडे घेतलं आणि सोफ्यावर जाऊन बसली. दूधाची बाटली तिने पदराखालून छातीला लावली आणि निप्पल बाळाच्या तोंडात घातलं. तसा बाळाच्या रडण्याचा आवाज बंद झाला. तिच्या या कृतीवर सर्वजण कौतुकाने तिच्याकडे पाहत होते. तिने मात्र अजूनही कोणाकडे पाहिलं नव्हतं, की एक शब्दही बोलली नव्हती. नक्कीच ती चिडली असणार म्हणून सर्वजण समजून घेत होते. तिच्यासाठी हे सर्व समजून घ्यायला अवघड असणार हेही त्यांना लक्षात आलं, त्यामुळे सध्या सर्वजण शांतच होते. प्रणितीच्या अशा वागण्यावर शोभा मामी आणि रजनीने मात्र नाक मुरडलं. तो छोटा मुलगा प्रणितीजवळ जाऊन बसला होता. अगदी तिला खेटून बसला होता. तसा तिने हसून त्याच्या डोक्यावर हात फिरवला. 

" नाव काय तुझं? " प्रणितीने त्याला हसून विचारलं. 

" माझं नाव ना मम्मा आरव आहे. आपल्या प्रिन्सेसचं नाही ठेवलं अजून. " आरव निरागस हावभाव करत म्हणाला, तशी प्रणिती हसली. 

" आरव, नाईस नेम! आपल्या प्रिन्सेसचं सुद्धा ठेवूयात आपण लवकरच. " प्रणिती हसून म्हणाली, तसा आरवही गोड हसला.

 थोड्याचवेळात बाळ झोपी गेलं, तसं तिने बाळाला अलगद आपल्या हातावर घेतलं आणि राजवीरच्या रूमकडे घेऊन गेली. बाकीचे पण तिच्या पाठोपाठ निघाले होते.



क्रमशः