प्रणिती भाग ४

प्रणिती! जी आपला भूतकाळ मागे टाकत त्याच्याशी लग्न करून त्याच्या घरी आली. त्याच्या मुलांना सावत्र असूनही सख्ख्या आईप्रमाणे जीव लावला. त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्यांना मात्र तिने चांगलाच धडा शिकवला. नंतर मग सुखाचा संसार! असा हा प्रवास जाणून घेण्यासाठी वाचा, unknown Words जानकी ?? लिखित, ' प्रणिती '...
                    सकाळी सकाळी घरात धावपळ सुरु झाली होती. आज सर्वजण देवदर्शनाला जाणार होते. राजवीर केव्हाचा खाली तयार होऊन आला होता. त्याने स्पेशल त्याची skoda kodiaq काढली होती. ती त्याची फेवरेट गाडी होती. बेडरूममध्ये आरव नेहमीप्रमाणे बडबड करत होता आणि प्रणिती तिचं आवरता आवरता त्याचं बोलणं ऐकत होती. बोलता बोलता आरव प्रिन्सेसला पण खेळवत होता. त्याची बहिण म्हणजे त्याचा जीव की प्राण. प्रणितीने आरवचं आवरून दिलं. त्याला तिने सेम टू सेम राजवीरचा लूक दिला होता. व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पँट. आरव मस्तपैकी आवरून दिल्यावर खुश झाला. तसाच खाली राजवीरकडे निघून आला आणि सर्वांना फिरून फिरून ड्रेस दाखवू लागला. 

" काय रे आरव? तुझी लाडकी मम्मा कुठे आहे? " शोभा मामी नाक मुरडत म्हणाल्या. 

" मम्मा तिचं आणि प्रिन्सेसचं आवरून येत आहे. पप्पा, तुम्हाला माहिती आहे? मम्मा खूप सुंदर दिसते आज! " आरव हातानेच अॅक्शन करत म्हणाला. तसा राजवीर हसला. 

" हुह! सुंदर? आणि ती प्रणिती? माझ्या रजनीपेक्षा तर नक्कीच नसणार! माझ्या मुलीची सर कोणीही करू शकत नाही. " शोभा मामी त्यांच्या मुलीची नजर काढत म्हणाल्या. जिने जीन्स आणि टाइट शर्ट जो स्लीव्हलेस होता, त्याला खांद्यावर ट्रान्स्परंट बेल्ट होता तो घातला होता. चेहर्‍यावर नक्कीच २ किलोचा मेकअप थोपलेला असणार. 

" रजनी, अगं आजच्या दिवस तरी चांगला ड्रेस घालायचा होता. देवदर्शनाला चाललो आहे आपण फिरायला नाही. " नर्मदा थोडं चिडून म्हणाल्या.

" यात काय खराबी आहे आत्या? आजकाल असेच ड्रेस घालतात सर्व. तुमच्या सुनेनेही काहीतरी काकूबाई टाईपच घातलेलं असणार. मला नाही आवडत तसं ओल्ड फॅशन. मला माहित आहे की राजवीरलाही नाही आवडणार कारण, निताही जरा फॅशनेबलच होती राहणीमानात. कुठे ती होती आणि कुठे ही काकूबाई प्रणिती. " रजनी फारच बोलत होती, पण लगेच तिची बोलती बंद झाली. समोरून येणाऱ्या प्रणितीला पाहून. 

                 हिरवी पैठणी लाल काठ असलेली, छानसा त्यावर शोभणारा डिझायनर ब्लाऊज, पैठणीवर खालच्या साईडने मोरांची डिझाईन, पूर्ण पदर मात्र डिझाईनने काठोकाठ भरलेला होता. चेहर्‍यावर मेकअप म्हणून तिने फक्त पावडर, लिपबाम आणि काजळ एवढंच काय ते लावलं होतं. हातात लग्नाचा हिरवागार चुडा. गळ्यात छोटासा नेकलेस आणि तिच्या सौंदर्यात भर घालणारे ३ महत्त्वाचे साज, ते म्हणजे भांगेतलं कुंकू, कपाळावरची शोभणारी लाल टिकली आणि गळ्यातलं सोन्याचं मंगळसूत्र! नॅच्युरल ब्युटी जे काही म्हणतात ना ते हेच. एकदम सौंदर्यवती भासत होती ती. तिला इतकं सुंदर, साजेसं सजलेलं पाहून घरातले सगळेच खुश झाले होते. पण शोभा मामी आणि रजनी मात्र जळून जळून राख झाल्या होत्या. अजून एका व्यक्तीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ती म्हणजे प्रिन्सेस! तिला पण प्रणितीने हिरवा कलरचा छोटासा फ्रॉक घालून छान टोपडं घातलं होतं, ज्यात ती खुपच क्युट दिसत होती. 

                     प्रणिती बाळाला दोन्ही हातांवर सावरत राजवीरच्या दिशेने येऊ लागली होती. राजवीर तर डोळ्यांची पापणी ही न लवता तिच्याकडे पाहत होता. क्षणभर तिच्याही ते लक्षात आलं, तशी ती लाजली. ती त्याच्या जवळ येऊन उभी राहणार तेवढ्यात रजनी तिथे उभी राहिली. तिला तिथे पाहून प्रणिती थबकली. काही प्रमाणात नाराज सुद्धा झाली होती. ती तिची जागा होती, पण रजनी तिथे आपला हक्क दाखवायचा प्रयत्न करत होती. रजनीला वाटलं की ती जेलस फिल करेल आणि दुसरीकडे जाऊन उभी राहिल, पण तसं झालंच नाही. 

" एक्सक्युज मी!" प्रणिती रजनीकडे पाहत म्हणाली. 

" एस! " रजनीही अॅटिट्युडने म्हणाली. 

" जरा बाजूला होता का? मला आणि माझ्या मुलीला तिथे यायचं आहे. " प्रणिती कॉन्फिडेंटने म्हणाली, तशी रजनी मोठं तोंड करून तिच्याकडे पाहू लागली. रजनीची अवस्था पाहून सगळेच तोंड दाबून हसू लागले, तशा शोभा मामी चिडल्या. 

" तुला दुसरीकडे जागा नाही का कुठे? तिथेच काय उभं राहायचं आहे तुला? " शोभा मामी दात ओठ खात म्हणाल्या, तशी प्रणिती मामींकडे पाहू लागली. 

" हेच मी रजनीला म्हणू शकते. तिला दुसरीकडे कुठे जागा नाही का उभं राहायला? राजवीर माझे हजबंड आहेत. सो, त्यांच्याजवळ उभं राहण्याचा, बसण्याचा अधिकार फक्त माझा आहे." प्रणिती पण तोडीस तोड होती. न घाबरता ती बोलली. तिचं उत्तर ऐकून मामी रागावल्या.

" अहो, बरोबर आहे ना? " प्रणितीने राजवीरकडे पाहत विचारलं, तसा तो हसत तिच्याजवळ जाऊन उभा राहिला. तो गेला म्हणून आरव पण जाऊन उभा राहिला. तसे सगळ्यांचे डोळे चमकले. एकदम परफेक्ट फॅमिली तयार झाली होती. राजवीर, त्याच्या शेजारी प्रणिती, राजवीरच्या पुढे आरव आणि प्रणितीच्या हातात झोपलेली क्युटशी प्रिन्सेस. 

               प्रणितीने एकदा नर्मदा आणि यशवंतरावांकडे पाहिलं आणि त्यांच्या दिशेने गेली. खाली वाकून दर्शन घ्यायच्या वेळी तिने राजवीरलाही खुणावलं. तसा तोही तिच्या शेजारी उभा राहिला. दोघांनी जोडीने नमस्कार केला. नर्मदा आणि यशवंतराव तिच्याकडे एकटक बघत होते, म्हणून ती जरा गोंधळली. 

" आई, मी ठीक तर दिसत आहे ना? " तिने हळू आवाजात विचारलं, तसे ते दोघेही हसले. 

" खूप सुंदर दिसत आहे माझं बाळ! " नर्मदा तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या. 

" बाबा? " तिने यशवंतरावांकडे पाहिलं. 

" खूप गोड, एकदम लक्ष्मी दिसतेस बघ! " त्यांनीही प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला, तशी ती गोड हसली. 

" चला आता, निघुयात? " प्रज्ञा घाई करत म्हणाली, कारण पुढे उशीर झाला असता.

" हो हो, चला. " सगळेजण लगबगीने सर्व सामान उचलत म्हणाले.

सगळे पुढे निघून गेले, तसा राजवीरने प्रणितीचा हात धरून तिला थांबवलं. आणि हळूच तिच्या कानात म्हणाला. 

" इतकी पण गोड नको दिसू. एकतर नजर लागेल, नाहितर मुंग्या! " तो हसत म्हणाला, तशी ती खूपच लाजली. 

" सोडा तुमचं काहितरीच! " असं म्हणत ती लाजतच पुढे निघून गेली, तसा राजवीरही हसला. त्याने एकदा मागे वळून निताच्या फोटोकडे पाहिलं आणि फोटोकडे पाहतच पुटपुटला. 

" प्रणिती पण सेम तुझ्यासारखीच आहे निता. तू पण तर अशीच होतीस. गोड, समंजस, जशास तशी! आता तर तुला आपल्या मुलांची काळजी नाही ना गं? " तो फोटोकडे पाहत बोलला. त्याचे डोळे हलकेच पाणावले होते. तसा कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने मागे वळून पाहिलं तर त्याला निता दिसली. तसा राजवीर शॉक झाला. 

" आता कसलीही काळजी नाही. " निता म्हणाली, तसा राजवीर तिला बिलगला. रडत होता तो. तिने त्याला सावरत बाजूला केलं. तसं त्याने तिच्याकडे पाहिलं तर त्याला आता प्रणिती दिसली. ती त्याच्याकडे पाहून प्रेमाने हसली. 

" मी आहे ना! " प्रणिती विश्वासाने म्हणाली.

प्रणिती म्हणाली, तसं त्याने अलगद पुन्हा तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. ती प्रेमाने कधी त्याच्या पाठीवर, तर कधी त्याच्या डोक्यावर हात फिरवत होती. एक आधार वाटला त्याला तिचा. तो बाजूला झाला, तसा तिने त्याचा हात हातात घेतला आणि बाहेर पडली. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. काहीच फरक नव्हता निता आणि प्रणिती मध्ये. दोघीही सारख्याच स्वभावाला. त्याने मनोमन देवाचे आभार मानले आणि तिचा हात घट्ट पकडला. ते दोघेही बाहेर आले, तशी नर्मदांनी त्या दोघांची नजर काढली आणि मग सगळे गाडीत जाऊन बसले. सर्वांनी देवाचं नाव घेतलं आणि देवदर्शनाला निघाले. 











क्रमशः


🎭 Series Post

View all