प्रणिती भाग ५

प्रणिती! जी आपला भूतकाळ मागे टाकत त्याच्याशी लग्न करून त्याच्या घरी आली. त्याच्या मुलांना सावत्र असूनही सख्ख्या आईप्रमाणे जीव लावला. त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्यांना मात्र तिने चांगलाच धडा शिकवला. नंतर मग सुखाचा संसार! असा हा प्रवास जाणून घेण्यासाठी वाचा, unknown Words जानकी ?? लिखित, ' प्रणिती '...
                      
                  देवाचं नाव घेऊन राजवीरने गाडी सुरु केली. पण त्याआधी त्याने त्याच्या मागच्या सीटवर बसलेल्या प्रणितीला पाहण्यासाठी समोरचा आरसा सेट केला. रजनी प्रणितीच्या शेजारीच जाऊन बसलेली होती. ही गोष्ट रजनीच्याही लक्षात आली होती. तसा तिचा जळफळाट झाला. तिने लगेच एक आयडिया केली. 

" प्रणिती, अगं मला ना प्रवासात उलटी व्हायची सवय आहे. मला कधीही उलटी होऊ शकते. सो, मी खिडकीकडून बसू का? " रजनी एवढुसं तोंड करून म्हणाली. तशी प्रणिती विचार करत असतानाच अचानक राजवीरने हॉर्न वाजवला. तसं प्रणितीचं  लक्ष समोर गेलं. तर तिला राजवीर तिच्याकडेच पाहत असताना दिसला. तिच्या बरोबर लक्षात आलं की रजनीला इथे का बसायचं आहे ते, तशी आता तिला पण आयडिया सुचली. 

" अहो आई! " प्रणितीने नर्मदांना आवाज दिला, ज्या दुसऱ्या बाजूला बसल्या होत्या. 

" काय झालं बाळा? प्रिन्सेस त्रास देते का? माझ्याकडे देतेस का? " नर्मदा काळजीने म्हणाल्या, तशी प्रणिती हसली. 

" नाही आई, प्रिन्सेस पहा कशी खिडकीतून बाहेर बघत आहे. खुप खूश होते ती. पण काय झालं ना कि प्रिन्सेसला सुद्धा इथे बसायचं आहे आणि रजनीला मळमळचा त्रास होतो, म्हणून तिलाही इथं बसायचं आहे. तर मग मी काय म्हणते की तुम्ही इकडे सरकून बसा माझ्याकडे. रजनी तिकडे बसेल. हो की नाही प्रिन्सेस? ( तशी प्रिन्सेस हसली ) पहा ना आई, प्रिन्सेस सुद्धा हो म्हणते आहे. " प्रणिती म्हणाली, तसा रजनी हा मोठ्ठा आ वासून तिच्याकडे पाहू लागली. तिची ती रिअॅक्शन पाहून प्रणिती गालातल्या गालात हसली. मग नर्मदा रजनीच्या आणि रजनी नर्मदांच्या जागी बसल्या. 

                जेजुरी आता थोड्याच अंतरावर होती. अजून एक तासभर तरी त्यांना लागणार होता. तसा आरव आता भूक लागल्याने चुळबुळ करू लागला. प्रिन्सेसला प्रणितीने सोबत आणलेलं दूध पाजलं होतं. 

" मम्मा, मला खूप भूक लागली आहे. " आरव बारीक तोंड करून म्हणाला. तसं बाकीच्यांना आठवलं की त्यांनी गडबडीत छोटं मोठं काही खायचं सामानच घेतलं नव्हतं. 

" थांब रे बाळा, देते मी. " असं म्हणत प्रणितीने बॅगेतून एक चिप्सचा पुडा काढला, फोडला आणि त्याच्या हातात दिला. त्याने तो पटकन घेऊन खाऊ लागला. बाकीचे सगळे तिच्याकडे पाहू लागले. त्यांना तसं पाहून ती बोलली. 

" आई, मी ते सकाळी किचनमध्ये गेले होते. म्हटलं लक्षात नाही राहिलं तर! म्हणून मग मी सकाळीच बॅगेत टाकले. मुलांना कधी भूक लागेल सांगता येत नाही ना! " प्रणिती म्हणाली, तसा मामींना तर भांडणासाठी विषयच भेटला. 

" प्रणिती, तुला कळत नाही का? असं कोणाच्याही घरात, त्यांच्या मर्जीशिवाय कुठेही हात लावू नये म्हणून! " शोभा मामी म्हणाल्या, तशी प्रणिती नाराज झाली. ते राजवीरला पाहावलं गेलं नाही आणि शोभा मामींचं बोलणंही आवडलं नाही. बाकीच्यांनाही त्यांच्या बोलण्याचा राग आला होता. तिला नाराज झालेलं पाहून राजवीर बोलला. 

" मामी, तुम्ही विसरता आहात की प्रणिती माझी बायको आहे. " राजवीर थोडं चिडून म्हणाला. 

" हो, आणि आमची सून! त्यामुळे घरातल्या प्रत्येक गोष्टीवर तिचा अधिकार आहे. तिला जे वाटेल ते ती करू शकते. " यशवंतराव जे इतक्या वेळचे शांत होते ते बोलले. 

" आणि मामी, तुमची रजनी घरात जिथे नाही तिथे फिरत असते, जे नाही ते करत असते. आम्ही काही बोलतो का तिला? मग प्रणिती तर हक्काची आहे त्या घरात. ती घराची मालकीण आहे. त्यामुळे तुम्ही तिच्याबद्दल असं बोलू शकत नाही. " प्रज्ञानेही हात साफ करून घेतला. एकतर मामी आणि रजनी कितीतरी महिन्यांआधी तिथे आलेल्या होत्या, ज्या अजूनही जायचं नाव घेत नव्हत्या. म्हणून तिचीही चिडचिड होत होती.

" ताई अहो काय हे? प्रज्ञाही आता चुरुचुरु बोलायला लागली आहे. हम्म, नवीन नवरीचे रंग आहेत हे. " शोभा मामी रागात पुढे बसलेल्या प्रणितीकडे पाहत म्हणाल्या. 

" मामी...! "  प्रज्ञा पुढे काही बोलणार त्या आधीच नर्मदा बोलल्या. 

" प्रज्ञा ऽ ऽ ऽ, शांत बस बाळा. आपण देवदर्शनाला चाललो आहोत, तर वाद नको उगाच. " नर्मदा शांतपणे बोलल्या. 

" हो आई, प्रणिती तू नको वाईट मानून घेऊस. तोंडं कुठेही आणि कसेही उघडतातच! " प्रज्ञा जी मागे मामीजवळ बसलेली होती, ती प्रणितीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. तशी प्रणिती हलकी हसली. समोरून राजवीर तिला पाहत होता. त्याला तिचा उतरलेला चेहरा पाहून खूपच वाईट वाटत होतं. 

                     थोड्याचवेळात ते सगळे जेजुरीत पोहोचले. त्यांनी चप्पल गाडीतच काढून ठेवले. सगळे गडाच्या पायथ्याशी येऊन उभे राहिले. तसं राजवीरने कोणीही न सांगता प्रणितीला उचलून घेतलं. कारण त्याला माहित होतं बायकोला उचलून घ्यावं लागतं ते. त्याला नितासोबतचं देवदर्शन आठवलं. त्याने तिला उचलून घेतल्यावर तो आणि ती एकमेकांच्या डोळ्यांत पाहू लागले होते. त्याने तसाच गड चढायला सुरुवात केली. त्याला आपण किती वर चढलो हे पण कळत नव्हतं. त्याचा पायही अडखळत नव्हता. बाकीचे मात्र धापा टाकू लागले होते. त्याला मात्र कशाचंही भान नव्हतं.  तिने भानावर येऊन इकडे तिकडे पाहिलं, तर तिला जाणवलं की त्याने तिला घेऊन अर्ध्याच्या वर गड चढला होता. तशी ती काळजीने त्याच्याकडे पाहू लागली. 

" अहो, खूप वरपर्यंत आलो आहोत आपण. सोडा ना आता खाली. मी चढते इथून पुढे. " ती काळजीने त्याच्याकडे पाहत म्हणाली. 

" असूदेत! काही नाही होत. " तो बेफिकरीने म्हणाला. 

" अहो, असं काय करता? त्रास होईल तुम्हाला. " प्रणिती पुन्हा काळजीने म्हणाली. 

" काही नाही होणार. नको काळजी करू. " राजवीर अजूनही तिच्याकडेच पाहत होता. 

" प्रणिती, तू कायम माझ्यासोबत राहशील ना? " तो थोडासा चिंतेने म्हणाला. 

" अहो, असं का बोलत आहात? मी नेहमीच तुमच्यासोबत राहीन. अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत! " प्रणितीही त्याच्या डोळ्यांत डोळे घालून म्हणाली. तसा तो हसला आणि तिला खाली उतरवलं. तिने पाहिलं तर ते गडावर पोहोचले होते. तसं तिने पुन्हा काळजीने त्याच्याकडे पाहिलं, तर तो हात झटकून मोकळे करण्याचा प्रयत्न करत होता. ती त्याच्याकडे जाणार तर सर्वजण तिथे पोहोचले. घरी गेल्यावर त्याचे हात चेपून देऊ असं ठरवून ती सर्वांसोबत पुढे निघून गेली. ती चालता चालता मागे पाहत चालत होती. तोही हसून तिच्याकडे पाहत होता. त्यांनी मंदिराजवळ प्रवेश केला. सोन्याची जेजुरी त्या भर उन्हात खूपच धमकत होती. त्यांनी हात जोडले आणि जोरजोरात जयघोष करत खोबरं भंडारा उधळला. राजवीर आणि प्रणितीने देवाचं दर्शन घेतलं. हातोहात तळी पण उचलून घेतली. देवाचं दर्शन झालं म्हणजे आता सर्व मंगलमय होईल हीच सर्वांची आशा होती. पण आता शोभा मामी आणि रजनीमुळे कोण कोणत्या संकटांना त्यांना सामोर जावं लागणार होतं ते त्या देवालाचा ठाऊक. दर्शन घेऊन सर्वजण पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले. आजपासून राजवीर आणि प्रणिती आपल्या सुखी संसाराकडे वाटचाल करणार होते. 







क्रमशः