प्रणिती भाग ७

प्रणिती! जी आपला भूतकाळ मागे टाकत त्याच्याशी लग्न करून त्याच्या घरी आली. त्याच्या मुलांना सावत्र असूनही सख्ख्या आईप्रमाणे जीव लावला. त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्यांना मात्र तिने चांगलाच धडा शिकवला. नंतर मग सुखाचा संसार! असा हा प्रवास जाणून घेण्यासाठी वाचा, unknown Words जानकी लिखित, ' प्रणिती '...
सर्वप्रथम सर्वांची माफी मागते. मागच्या काही महिन्यांपासून आजारपण आणि त्यात डिप्रेस झाल्यासारखं वाटत होतं. त्यासाठी थोडी लिव्ह घेतली होती. भाग पोस्ट करू शकले नव्हते. आणि ही कथा मी आधी शॉर्ट लिहिलेली होती. इथे लिहायला घेण्यासाठी मी या कथेचं भागांमध्ये रूपांतर केलं, त्यामुळे लिखाण मस्ट होतं. काही अन्य जबाबदाऱ्या आणि लिखाण हे मला आजारपणामुळे जमत नव्हतं, म्हणून काही दिवस इरा प्लॅटफॉर्मपासून लांब राहिले होते. जमलं तर सर्वांनी प्लीज माफ करा.


मागील भागात


मध्यरात्री अचानक राजवीर आणि प्रणितीच्या रूमचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला, तशी प्रणितीला जाग आली. तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला. आवाजाने राजवीरही उठला होता. तिने दरवाजा उघडल्याबरोबर प्रज्ञा बाळाला घेऊन उभी दिसली. प्रिन्सेस खूपच रडत होती. नाईलाजाने प्रज्ञाला प्रिन्सेसला घेऊन यावेळी तिच्याकडे यावं लागलं होतं. प्रिन्सेसचा रडण्याचा आवाज ऐकून राजवीरही दरवाजात आला. प्रणितीने पटकन प्रिन्सेसला हातात घेतलं आणि हाताचा पाळणा करून तिला झुलवू लागली. तशी ती इतकुशी प्रिन्सेस तिच्या आईच्या कुशीत शांत झाली. घरातले सर्वच तिच्या रडण्याच्या आवाजाने जागे झाले होते. ती रडतच तशी होती. तिलाही दोन दिवसांत प्रणितीच्या कुशीची, मायेची सवय झाली होती. अचानक जाग आल्यानंतर तिला ती मायेची कुशी तिच्या शेजारी जाणवली नाही म्हणून ती रडत होती. ती आता तिच्या आईच्या कुशीत शांत झाली होती. तसे सगळे हसले. नर्मदांच्या आणि राजवीरच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. प्रणितीने प्रिन्सेसच्या दूधाची बाटली मागवून घेतली. तिने सर्वांना झोपायला जायला सांगितलं. आरवनेही त्याच्या मम्माजवळच झोपणार म्हणून हट्ट केला. प्रणितीने त्याला आत घेतलं आणि दरवाजा लावून घेतला. आपल्या दोन्ही लेकरांना मध्ये घेऊन ते दोघेही झोपी गेले, पण जागी झाल्यामुळे प्रणितीच्या डोक्यातलेही विचार पुन्हा जागे झाले होते.


आता पुढे


प्रणितीला सकाळी लवकर जाग आली. रात्री उशिरा झोपूनही तिला सकाळी लवकर उठायची सवय असल्याने लवकर जाग आली होती. उठल्यावर तिने देवाचं नाव घेतलं आणि एकदा मुलांकडे नजर टाकली. मुले अगदी शांतपणे तिच्या कुशीत झोपलेली होती. तिने हसून त्या दोघांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि नंतर फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली. आत गेल्यानंतर कितीतरी वेळ ती बाथरूममधल्या त्या भल्या मोठ्या आरशासमोर जाऊन उभी राहिली. एकटक आपल्या त्या प्रतिमेकडे पाहत होती. रात्री राजवीरसोबत झालेला संवाद आठवू लागला. आत्ताही ती त्याचाच जास्त विचार करत होती.

( मागच्या भागातील काही संवाद. )

" तुला माहित आहे प्रणिती? निताही अगदी तुझ्यासारखीच होती. सुंदर, सालस, सर्वांना समजून घेणारी आणि सर्वांना आपलंसं करणारी. मलाही तिने तशीच तिच्या मनमोहक स्वभावाने भुरळ घातली होती. "

" तुम्ही खूप प्रेम करत होतात ना त्यांच्यावर? "

" खूप! "

" एक विचारू का? "

" तुमचं तुमच्या पहिल्या पत्नीवर एवढं प्रेम असतानाही, तुम्ही माझा स्वीकार कसा काय केलात? तेही एवढ्या लवकर? म्हणजे आपल्या लग्नाला फक्त ५ दिवस झाले आहेत. तुम्ही लग्नाच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच मला स्वीकरलं आहे. असं का? "


" प्रणिती...! " प्रणिती रात्रीचं बोलणं आठवत होती की तेवढ्यात कोणीतरी तिला आवाज दिल्यासारखं जाणवलं, तसं तिने दचकून भानावर येत इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली. आजूबाजूला तिने नजर फिरवली, पण तिला कोणीच दिसत नव्हतं, तेवढ्यात पुन्हा एकदा तिला आवाज ऐकू आला.

" प्रणिती, मी आहे. तुझ्या समोरच आहे. इकडे बघ. " प्रणितीला पुन्हा एकदा आवाज ऐकू आला, तसं तिने इकडे तिकडे पाहायचं सोडून समोर आरशाकडे पाहिलं आणि तिचे डोळे मोठे झाले.

समोर आरशात तिचं प्रतिबिंब न दिसता निताचा चेहरा दिसत होता. अचानक तिला आपल्या जागी पाहून प्रणिती घाबरली आणि घाबरूनच मागे भिंतीला जाऊन धडकली.

" प्रणिती, घाबरू नकोस. मी आत्मा नाही आहे. नीट बघ, तुझ्या चेहऱ्याच्या जागी माझा चेहरा दिसत आहे. कारण तू म्हणजेच मी आहे आणि मी म्हणजेच तू आहेस. " निता हसून तिच्याकडे पाहत म्हणाली, तशी प्रणिती तिच्या बोलण्याचा अर्थ न समजून तशीच घाबरून तिच्याकडे पाहू लागली.

" रात्री तुमच्यामध्ये झालेल्या बोलण्याचा एवढा विचार करू नकोस प्रणिती. अगं आपला राजवीर असाच आहे. रात्रीपासून तुझ्या मनात जो प्रश्न घोंगावत आहे, त्याचं उत्तर मी देऊ का? " निता तसंच हसू आपल्या चेहऱ्यावर कायम ठेवून तिला विचारत होती, तशी प्रणिती घाबरतच हळूहळू पुढे आली आणि पुन्हा आरशासमोर येऊन उभी राहिली. दोन मिनिटे ती फक्त आरशाकडे पाहत राहिली आणि नंतर होकारार्थी मान हलवली.

" तू अजून राजवीरला ओळखलं नाही आहेस प्रणिती, आणि म्हणूनच तू त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेत आहेस. " निता तिला समजावत होती, पण प्रणितीच्या डोक्यात काहीच घुसत नव्हतं. ती न समजून तिच्याकडे पाहत होती.

" काल त्यांनी स्वतः सांगितलं आहे की तुमची छबी माझ्यामध्ये दिसते, म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केलं. माझ्यामध्ये तुम्ही दिसलात म्हणून त्यांनी मुलांची आई म्हणून मला निवडलं. आणि आत्ता तुम्हीही तेच सांगत आहात, मग यात फरक काय आला? गैरसमज कसा न व्हावा? " प्रणितीने तिच्या बोलण्याचा अर्थ न समजून विचारलं, तशी निता हळूच हसली.

" तेच मी म्हटलं ना, की तू अजूनही नीटसं त्याला ओळखलं नाही आहेस. कितीही तो म्हटला असेल ना की माझी छबी तुझ्यात दिसते म्हणून त्याने तुझ्याशी लग्न केलं, पण त्या व्यतिरिक्तही काहीतरी वेगळंपण नक्की आहे तुझ्यामध्ये, ज्यामुळे त्याने तुला होकार दिला आहे. आपल्यामध्ये बऱ्याच गोष्टी समान आहेत, पण आपला स्वभाव काही अंशी वेगळा आहे. जास्त नाही, पण थोडा वेगळा आहे. तुला माहित आहे माझा स्वभाव कसा आहे ते? माझा स्वभाव जरी जशास तसा असला तरी मी नेहमीच मोठ्यांचा मान राखून वागत होते, आणि अनेकदा माझ्या या स्वभावाचा फायदा घेतला गेला होता. शोभा मामी आणि त्यांची ती मुलगी तुला माहितच आहे. मला राजवीरच्या आयुष्यातून, या घरातून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रकारचे प्रयत्न केले होते. " निता सांगत होती, पण मध्येच ती हळवी झाल्यासारखी वाटत होती. तिचे डोळे हलके पाणावल्यासारखे वाटत होते. तिच्या डोळ्यात पाहून प्रणितीला कसंतरीच झालं होतं.

" प्रणिती, तुला नाही माहित की राजवीरला मिळवण्यासाठी त्या रजनीने कितीतरी वेळा आपल्या आरवचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. " निताने जशी तिला ही हकिकत सांगितली, तशी प्रणिती धक्का लागून, आपल्या तोंडावर हात ठेवून पुन्हा भिंतीला जाऊन धडकली.

निताने आत्ता जे सांगितलं ते ऐकून तिला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ती तशीच तोंडावर हात ठेवून, डोळे मोठे करून आरशातल्या निताकडे पाहत होती.

" विश्वास नाही बसत आहे ना? पण हेच खरं आहे प्रणिती. रजनी जशी दिसते तशी अजिबात नाही आहे. मॉडर्न आहे, पण तेवढीच राक्षसीणही आहे. तितकीच क्रूर, तितकीच कपटी आहे. त्यावेळी रजनीने कितीतरी वेळा अशी चूक केली होती आणि शोभा मामींनी कितीतरी वेळा आपल्या मुलीची चूक लपवून ठेवून मला दाबण्याचा प्रयत्न केला होता. नेमकं त्यावेळी मला माझा जशास तसा स्वभाव सोडावा लागत होता. त्यांच्यासमोर झुकावं लागत होतं, आणि जर मी झुकले नसते तर त्यांनी माझ्या संसारात आग लावली असती. त्यांना मी या घरातून काढूही शकत नव्हते, कारण जेवढं हे घर माझं आहे तेवढंच शोभा मामींच्या नणंदेचं म्हणजेच, आपल्या आईंचंही आहे. असं नाही की मी प्रयत्न केला नसेल त्या दोघींना धडा शिकवण्याचा, त्या दोघींची खरी रूपे सर्वांसमोर आणण्याचा, पण व्हायचं असं की मी काही करायला जायचे आणि त्या दोघीजणी मलाच खोटं पाडायच्या. प्रत्येक वेळी हार माझी व्हायची. प्रत्येक वेळी हार आरवच्या आईची व्हायची. पण बघ ना, या सर्व खेळांमध्ये वेळ अशी निघून गेली की मला पुन्हा एकदा दिवस राहिले आणि डॉक्टरांनी माझं आयुष्य कमी सांगितलं. " निता प्रणितीला सर्व हकीकत सांगत होती, तसे प्रणितीचे डोळे झरझर करत वाहत होते.

" ज्यावेळी मला डॉक्टरांनी सांगितलं होतं, तेव्हाच मी राजवीरकडून वचन घेतलं होतं दुसऱ्या लग्नाचं. अगदी माझ्यासारखी मुलगी त्याला सांभाळणारी, त्याच्या मुलांची आई आणि विशेष म्हणजे शोभा मामी आणि तिच्या मुलीला धडा शिकवणारी या घरची सुन. जी माझ्यासारखी दबून राहणारी नव्हे, तर धीटपणे सामना करणारी हवी. आणि तू तशी आहेसही. धीट आहेस निडर आहेस. नक्कीच हे राजवीरने परखलेलं असणार आणि तेव्हाच त्याने तुला निवडलेली असणार. प्रणिती, राजवीर साधा आणि भोळा आहे गं. पण इतकाही भोळा नाही की चुकीच्या हातात आपलं सर्वस्व, आपलं भविष्य, आपली मुले आणि घरदार सोपवेल. नाही प्रणिती, तो एवढा मूर्ख नाही. या पाच दिवसांत तुला ओळखल्यानंतरच त्याने रात्री तुमच्या नात्यासाठी पुढे पाऊल उचललं होतं. हा आता, प्रेम व्हायला थोडा वेळ लागेल, पण तुझा पत्नी म्हणून स्वीकार त्याने मनापासून केला आहे. त्याला गरज आहे ती तुझ्या सोबतीची, तुझ्या प्रेमाची. जेवढा तो तुझ्यावर प्रेम करेल ना, यापेक्षा जास्त किंवा तेवढंच जरी प्रेम तू त्याला दिलंस, तरी तो कधीच तुझा हात, तुझी साथ सोडणार नाही. कधीच नाही! तुझ्या मनातील सर्व गैरसमज काढून टाक आणि त्याच्यावर प्रेम करून बघ. तुला त्याच्या नजरेत स्वतःसाठी फक्त प्रेम दिसेल. फक्त आणि फक्त प्रेम! " एवढंच बोलून निताचं प्रतिबिंब त्या आरशातून गायब झालं आणि प्रणितीचा चेहरा दिसू लागला.

कितीतरी वेळ ती तशीच गप्पपणे विचार करत उभी राहिली. नंतर तिला लक्षात आलं की ती कितीतरी वेळपासून बाथरूममध्ये आलेली आहे. विचारांतून बाहेर येत तिने झटकन पटकन अंघोळ आवरली आणि बाहेर आली. तिची नजर लगेच बेडकडे गेली, तर राजवीर तिला उठून बसलेला दिसला. मुले अजूनही झोपलेली होती. ती बाहेर आली हे जाणवताच त्याने तिच्याकडे पाहिलं. नजरानजर होताच तो मंद हसला, तशी तीही हसली.

नंतर ती पुन्हा बेडवर जाऊन बसली आणि राजवीर फ्रेश व्हायला निघून गेला. आज त्याला ऑफिसला जावं लागणार होतं, म्हणून तो फ्रेश होऊन आल्यावर लगेच तयार व्हायला लागला. तो कपडे घालत असतानाच ती त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली. त्यालाही समजलं होतं की तिला काहीतरी बोलायचं आहे, म्हणून तोही तिची बोलण्याची वाट पाहत होता. प्रणिती दोन मिनिटे तिथेच घुटमळत राहिली आणि मग हिंमत करून बोलायला सुरुवात केली.

" अहो, एक विचारू का? " प्रणितीने कचरतच विचारलं, तसा तो मंद हसला आणि तिच्याकडे वळला.

" अगं बोल ना! विचारायचं काय त्यात! " राजवीर हसू कायम ठेवत म्हणाला, तशी तिने मान खाली घातली.

" तुम्हाला... कालच्या माझ्या बोलण्याचा राग नाही आला ना? " प्रणितीने मान खाली घालत विचारलं.

" अजिबात नाही! उलट चांगलं वाटलं की तू आपल्या नात्याला सहज स्वीकारत आहेस. " राजवीर प्रेमाने म्हणाला, पण बहुतेक ती कशाबद्दल विचारत आहे हे त्याच्या लक्षात आलं नव्हतं.

" नाही, मी त्याबद्दल नाही म्हणत आहे. ते... मी... निता ताई... आ... आणि मी... ते... " प्रणितीला कसं बोलावं ते समजत नव्हतं, म्हणून ती अडखळत होती. यावेळी मात्र त्याच्या लक्षात आलं की तिला काय बोलायचं आहे, तसे त्याने आपले दोन्ही हात तिच्या दोन्ही खांद्यांवर ठेवले.

" हे बघ प्रणिती, मी तुला आधीही सांगितलं होतं आणि आत्ताही सांगत आहे. गैरसमजाला मनात जागा देऊ नकोस. अशाने नातं पुढे जाण्याआधीच... " राजवीर पुढे काही बोलणार की तिने घाबरून त्याच्या तोंडावर हात ठेवला.

" अहो असं बोलू नका. मला जो गैरसमज झाला होता तो निघून गेला आहे. माझ्या मनात आता कुठलीही शंका वगैरे नाही आहे. मी काल तुमच्याबद्दल जो गैरसमज करून घेतला होता, त्याबद्दल माफी मागणार होते. प्लीज मला माफ करा. मी असा गैरसमज मनात करून घ्यायला नको होता. निता ताई तुमचा भूतकाळ होत्या. आपलं नातं हे वर्तमान आणि भविष्य आहे. हे नातं मला तुमच्या साथीने पुढे न्यायचं आहे. " प्रणिती त्याची माफी मागत म्हणाली, तसा तो खुश झाला आणि त्याने तिचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरला.

" मलाही हेच हवं आहे प्रणिती. एकमेकांच्या साथीने आपण आपलं नातं पावित्र्याने पुढे न्यायचं आहे. " राजवीर तिचा चेहरा आपल्या हातांच्या ओंजळीत धरत म्हणाला, तशी ती हसली.

" चल मी आता निघतो. बाकी गप्पा रात्री मारूयात. " राजवीर हसून म्हणाला, तशी तिने होकारार्थी मान हलवली.

राजवीर ऑफिसला निघून गेला, तशी प्रणितीने अजूनही झोपलेल्या त्या दोन लेकरांकडे नजर टाकली. हळूच जाऊन ती त्या दोघांजवळ बसली आणि प्रेमाने दोघांच्या डोक्यावरून हात फिरवू लागली.

" जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत माझ्या लेकरांना आणि माझ्या संसाराला कोणीही धक्का लावू शकणार नाही. त्या शोभा मामींना आणि त्यांच्या मुलीला कशी धडा शिकवते ते बघाच, कारण मी निता नाही, प्रणिती आहे. " प्रणिती निर्धार करत म्हणाली आणि स्वतःशीच क्रूर हसली.