Login

प्रणिती भाग ८

प्रणिती! जी आपला भूतकाळ मागे टाकत त्याच्याशी लग्न करून त्याच्या घरी आली. त्याच्या मुलांना सावत्र असूनही सख्ख्या आईप्रमाणे जीव लावला. त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्यांना मात्र तिने चांगलाच धडा शिकवला. नंतर मग सुखाचा संसार! असा हा प्रवास जाणून घेण्यासाठी वाचा, सौ. जानकी नारायण कटक लिखित, ' प्रणिती! '
नमस्कार सर्वांना! सर्वप्रथम मी सर्वांची माफी मागेन, कारण बरेच महिने झाले मी कथेचे भाग टाकले नव्हते. त्याचं कारण वैयक्तिक होतं, ज्यामुळे मला ईरावर कथा प्रकाशित करता येणार नव्हती. असो, आज भाग टाकत आहे. कृपया गोड मानून घ्या. कथेच्या या भागाचा संदर्भ लागावा म्हणून मागील ७ वा पूर्ण भाग वाचावा ही विनंती. ज्यांना ७ वा भाग वाचायचा नसेल त्यांनी स्किप करून थेट ८ वा भाग वाचला तरी चालेल. आता कथेला सुरुवात करूयात.


********************



" आरू, बाळा उठ आता. किती वेळ झोपणार आहेस? " प्रणिती केव्हापासून मुलांच्या जवळ बसून विचार करत होती.

आता अकरा वाजले होते तरीही तो झोपलेला होता म्हणून तिने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. सर्वजण खाली एकत्र असतील आणि आपण असं मुलांजवळ बसून आहोत म्हणून तिलाच अवघडलेपणा जाणवत होता. इतक्या उशिरा खाली गेल्यानंतर घरातले काय म्हणतील? या विचाराने ती घाबरली होती. आरवने उठून बसत आपली या अंगावरची कुस त्या अंगावर बदलली आणि पुन्हा झोपून गेला. तिने त्याच्या त्या कृतीवर हसून दिलं.

" बाळा, उशिरापर्यंत झोपणे बॅड हॅबिट असते. तू गुड बॉय आहेस ना? चल बरं आता, लवकर लवकर फ्रेश हो. मी तुझ्यासाठी मस्तपैकी ड्रायफ्रूट्स घालून दूध बनवते हा. " जसं त्याने दुधाचं नाव ऐकलं तसा तो खाडकन उठून बसला. आत्ताही तिला त्याच्या वागण्याचं हसू आलं होतं.

" मम्मा, कधी बनवणार आहेस दूध? " त्याने निरागसपणे तिच्याकडे पाहून मोठे मोठे डोळे करून विचारलं.

" लग्गेच! पण त्याआधी तुला फ्रेश व्हावं लागेल. जर तू पाच मिनिटांत आंघोळ करून बाहेर आलास, तरच मी तुला ड्रायफ्रूट्स घालून दूध देईन. " ती त्याच्याकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाली.

" आत्ता जातो मम्मा. तू तोपर्यंत दूध बनवतेस का? " तो बेडवरून खाली उतरत म्हणाला.

" नाही, तू फ्रेश होऊन आल्यावर तुला घेऊनच खाली जाणार. " ती हाताची घडी घालून म्हणाली.

" ओके मम्मा. " मम्माच्या आज्ञाधारी मुलाने लगेच तिची आज्ञा पाळली.

तो धूम पळतच बाथरूममध्ये शिरला. त्याला ड्रायफ्रूट्सचे छोटे छोटे काप टाकून उकळलेलं दूध खूप जास्त आवडत होतं. आता आवडीचं दूध तो कसा सोडणार ना!

तिने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून झाल्यानंतर छोट्या परीकडे नजर टाकली. दोन तीन मिनिटांतच तो बाहेर आला. ती तर त्याच्याकडे आश्चर्याने पाहायला लागली होती.

" चल मम्मा. " असं म्हणत त्याने तिचा हात धरला, पण ती मात्र आश्चर्याने त्याच्याकडे खालून वर नजर फिरवून पाहत होती.

त्याने अंगाला जी साबण लावली होती ती व्यवस्थित धुतली गेली नव्हती. केसही थोडे थोडे तेलकट वाटत होते. कपडे सुद्धा त्याने अंगावर चढवले नव्हते. दात तरी घासले असतील की नाही याचा अंदाज नव्हता. याचा अर्थ त्याने अंगावर साबण लावून फक्त पाणी ओतायचं काम केलं होतं.

" हे काय आहे आरू? " तिने त्याला विचारलं, तशी त्याने स्वतःच्या अंगावर नजर फिरवली.

" मी आंघोळ करून आलो मम्मा. चल ना आता दूध बनवून द्यायला. " दूध पिण्यासाठी त्याचा उतावळेपणा पाहून तिला हसू आलं.

" आधी बाथरूममध्ये चल. केस तेलकट दिसत आहेत. साबणही व्यवस्थित निघाली नाही आहे अंगाची. मी तुला व्यवस्थित आंघोळ घालते. " ती त्याचा हात धरून त्याला बाथरूममध्ये नेत म्हणाली. तोही मग गुपचूप तिच्यामागे गेला.

पाच मिनिटांनी तिने त्याला बाहेर आणलं. छानपैकी अंग पुसून व्यवस्थित कपडे घालून दिले. तोंडाला, गळ्याला पावडर लावली. केसांना तेल लावून व्यवस्थित विंचरून दिले. तो पूर्णपणे तयार झाल्यानंतरच ती त्याला घेऊन खाली जायला निघाली, मात्र तेवढ्यात प्रिन्सेसही उठली. उठल्याबरोबर तिने रडायला सुरुवात केली. कदाचित तिलाही भूक लागलेली होती.

" अरे माझी प्रिन्सेस उठली. रडू नये, रडू नये बाळा. आपण खाली जाऊयात हा. खाली जाऊन गोड गोड दुदू पिऊयात. " असं म्हणत प्रणितीने पटकन प्रिन्सेसला आपल्या हातावर उचलून घेतलं आणि तिला शांत करत खाली जायला निघाली. तिच्या मागेच आरव सुद्धा निघाला.

" आई, तुम्ही प्रिन्सेसला घ्या. मी या दोघांसाठी दूध गरम करून आणते. " खाली गेल्यानंतर प्रणिती नर्मदा यांच्याकडे पाहून म्हणाली.

नर्मदा, प्रज्ञा, यशवंतराव, शोभा आणि रजनी सगळेच डायनिंग टेबलच्या भोवती बसलेले होते. तिने हसून नर्मदा यांना सांगितलं तशा त्याही हसल्या.

" नको गं प्रणिती. मी गरम करून ठेवलं आहे दोघांचं दूध. त्यांच्या उठण्याची वेळ माहित आहे ना, म्हणून म्हटलं तूही मुलांसोबत खाली आल्यानंतर थेट आमच्यासोबत जेवण करायला बसशील. आता तू आमच्यासोबत बसून घे. मग प्रिन्सेस रडायला लागल्यानंतर तुझं जेवण होणार नाही. " नर्मदा प्रेमाने म्हणाल्या, तशा शोभा आणि रजनी चिडल्या.

प्रज्ञा त्या दोघींवरच नजर ठेवून होती. त्यांच्या चेहऱ्यावरचे चिडलेले भाव तिने बरोबर ओळखले. तिने शोभाला हलकाच इशारा करून तिचं लक्ष आपल्याकडे वळवलं. शोभानेही तिच्याकडे पाहिलं. तिने पाहिल्यानंतर प्रज्ञाने दोन्ही भुवया उंचावून 'काय?' असा इशारा केला. ज्यामुळे शोभा आणखीनच चिडली, आणि आपली चीड लपवून ठेवणार ती शोभा कसली!

" ताई, राजवीर आणि प्रणितीच्या लग्नाला पाच सहा दिवस झाले आहेत. मला वाटतं की आता प्रज्ञाने तिच्या सासरी जायला हवं. एकतर तिच्या सासरचे सगळेजण लग्न लावून कामामुळे तिथूनच माघारी गेले होते. त्यात प्रज्ञा अशी आठ दहा दिवस इथे राहिली तर त्यांना राग येईल ना. " शोभा प्रणितीचा सगळा राग प्रज्ञावर काढत होती, त्यामुळे प्रज्ञाही चिडली होती.

" त्यांची काळजी करू नका वहिनी. आम्ही त्यांना फोन करून सांगितलं आहे की जोपर्यंत प्रणिती घरात रुळत नाही, तोपर्यंत प्रज्ञा तिकडे येणार नाही. त्यांनीही त्यावर काही आक्षेप घेतला नाही. " यशवंतराव यांनी लगेच टोकत सांगितलं, कारण शोभाचा स्वभाव चांगलाच परिचयाचा असल्याने ती जे बोलली होती ती तिची चीड होती हे त्यांच्या लक्षात आलं होतं.

यशवंतराव मध्येच बोलल्यामुळे शोभाला पुढे बोलता आलं नव्हतं. ती मग गुपचूप आपलं जेवण करण्यात गुंग झाली होती. मात्र रजनी रागाने प्रणितीकडे पाहत होती. तिने नर्मदा यांनी गरम करून ठेवलेलं दूध दुधाच्या बाटलीत ओतून आणून बाळाला पाजायला सुरुवात केली होती. आरवलाही दूध प्यायला दिलं होतं. बाळाशी लाडिकपणे बोलताना सहजच प्रणितीची नजर रजनीकडे गेली. तिच्या डोळ्यातला राग पाहून प्रणितीलाही राग आला होता.

" रजनी ताई, तुमचं जेवण आणखीनच गरम होण्याची शक्यता आहे. जरा फुक मारून खाल. " प्रणिती सुद्धा काही कमी नव्हती.

तिच्या रागाला हसून टशन देत होती. तिचं बोलणं ऐकून नर्मदा, यशवंतराव एकमेकांकडे पाहत होते, शोभा आणि रजनी रागाने तिच्याकडे पाहत होते, तर प्रज्ञा तोंडावर हात ठेवून कोणाला दिसणार नाही अशी हसत होती.

" ताटात घेतल्यानंतर जेवण गरम होत असतं का? " शोभाने रागाने विचारलं.

" हो तर, एकदा तुमच्या मुलीकडे नजर टाका. ती ज्या पद्धतीने माझ्याकडे पाहत आहे, त्यातून तरी जेवण थंड होण्याच्या ऐवजी आणखीनच गरम होईल. " प्रणिती तिला डिवचत म्हणाली, तशी शोभाने रजनीकडे नजर टाकली.

" रजनी ताई, जरा डोक्याला थंड ठेवत जावा. हे असं गरम करून काही उपयोग नाही. उलट आपलं नुकसान होतं. जेवढा आपण राग राग करू, तेवढे आपलेच लोक आपल्यापासून दूर होत जातात. " प्रणिती म्हणाली, तसा रजनीने चिडूनच तोंडात घास कोंबला.

" रजनी, अशी काय वागत आहेस तू? असं उघडपणे तिच्याकडे पाहत जाऊ नकोस. चार चौघात अपमान होतो अशाने. जरा डोकं शांत ठेवून काम कर. " शोभा फक्त तिलाच ऐकू जाईल अशा हळू आवाजात बोलत होती.

" या बाईला पाहिल्यावर मला त्रास होतो मम्मी. कशी सहन करणार आहे मी हिला? आता जोपर्यंत हिला घरातून बाहेर काढत नाही, तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही. " रजनी दात ओठ खात म्हणाली.

" त्यासाठी तुला तिच्याशी जरा जुळवून घ्यावं लागेल. अशा लोकांचा गोड बोलून काटा काढायचा असतो. त्यांच्या नजरेत येऊन तू स्वतःचं नुकसान करून घेशील. " शोभा तिला समजावत म्हणाली. तेव्हा कुठे रजनीने स्वतःचा राग गिळला.

" अहो, तुम्ही आवरा लवकर. राजवीरचा टिफिन देऊन यायचा आहे तुम्हाला. " नर्मदा यशवंतरावांना घाई करत म्हणाल्या.

" अगं हो हो. इतकी घाई नको करूस. ऑफिसमध्ये त्याने थोडाफार नाश्ता केला असेल. " यशवंतराव हात धुण्यासाठी उठत हसून म्हणाले.

अजून राजवीरचा डबा द्यायचा बाकी आहे हे समजल्यानंतर रजनीला जास्तच आनंद झाला. तिला ही आयती संधी मिळाली होती जणू.

" आत्या, मी देऊन येऊ का राजवीरचा डबा? " रजनी डोळ्यांत चमक आणत म्हणाली, पण आता तिला होकार द्यावा की नकार यामध्ये नर्मदा अडकल्या होत्या.

" चालेल, उलट हे तर चांगलंच झालं. आई, रजनी ताई जाणार म्हणत आहेत यांचा डबा घेऊन, मग त्यांच्यासोबत मी सुद्धा जाणार. " प्रणितीलाही ही चांगली संधी मिळाली होती. तिच्या बोलण्यावर सर्वजण आश्चर्याने डोळे मोठे करून तिच्याकडे पाहत होते.

जेव्हा रजनी राजवीरचा डबा घेऊन जायचं म्हणाली होती, तेव्हाच प्रणितीच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना तयार झाली होती. आता ती कल्पना कृतीमध्ये उतरवायची बाकी होती.

" नाही नको, मी एकटीच जाते, किंवा तू एकटी जा. " रजनीला तिच्यासोबत जायला आवडणार नव्हतं हे स्पष्ट तिच्या बोलण्यावरून समजत होतं.

" अहो ताई, तुम्ही घाबरत आहात का? अहो तुम्ही माझ्या नणंदबाई आहात. मी तुमची वहिनी आहे, मग मला एवढं घाबरण्याची काय गरज आहे? " प्रणितीने जसं तिला नणंद म्हणून संबोधलं, तसे शोभा आणि तिच्या चेहऱ्याचे रंग उडाले. प्रज्ञाला तर त्यांचे चेहरे पाहून खूपच मजा वाटायला लागली होती.

" मी तुझी नणंद नाही आहे. " रजनी चिडून म्हणाली.

" असं कसं? नातं बदलणार थोडी ना आहे. जे आहे तेच राहणार. " प्रणिती टेबलवर आपला हात उभा ठेवून त्यावर हनुवटी टेकवत म्हणाली.

" आई, तुम्ही प्रिन्सेसला आणि आरवला थोडावेळ सांभाळा. तुम्ही टिफिन पॅक करून ठेवला असेल तर द्या. आम्ही दोघी नणंद भावजय मिळून जातो. जास्त वेळ लागणार नाही आम्हाला यायला. " प्रणितीने पुन्हा एकदा त्या नात्याने तिला संबोधलं, तशी तिच्या तळपायाची आग मस्तकात चालली होती.

नर्मदा यांनी किचनमधून राजवीरचा डबा आणून तिच्यासमोर ठेवला. तिने प्रिन्सेसला नर्मदांच्या हातात सोपवलं. आरवला गोड बोलून समजावून सांगितलं आणि जाण्यासाठी निघाली.

तिला निघताना पाहून रजनी चिडली, म्हणून ती उठून तिच्या रूमकडे जायला निघणार की प्रणितीने पटकन पुढे जाऊन तिचा हात पकडून तिला बाहेर न्यायला सुरुवात केली. आता तिने हात धरला होता म्हणून रजनीला काही बोलताही आलं नव्हतं. गुपचूप तिच्यामागे निघाली होती. मात्र पुढे काय होणार आहे यापासून ती अनभिज्ञ होती.