Login

प्रणिती भाग ९

प्रणिती! जी आपला भूतकाळ मागे टाकत त्याच्याशी लग्न करून त्याच्या घरी आली. त्याच्या मुलांना सावत्र असूनही सख्ख्या आईप्रमाणे जीव लावला. त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणाऱ्यांना मात्र तिने चांगलाच धडा शिकवला. नंतर मग सुखाचा संसार! असा हा प्रवास जाणून घेण्यासाठी वाचा, सौ. जानकी नारायण कटक लिखित, ' प्रणिती! '
                                      मागील भागात
                                  


" अहो ताई, तुम्ही घाबरत आहात का? अहो तुम्ही माझ्या नणंदबाई आहात. मी तुमची वहिनी आहे, मग मला एवढं घाबरण्याची काय गरज आहे? " प्रणितीने जसं तिला नणंद म्हणून संबोधलं, तसे शोभा आणि तिच्या चेहऱ्याचे रंग उडाले. प्रज्ञाला तर त्यांचे चेहरे पाहून खूपच मजा वाटायला लागली होती.

" मी तुझी नणंद नाही आहे. " रजनी चिडून म्हणाली.

" असं कसं? नातं बदलणार थोडी ना आहे. जे आहे तेच राहणार. " प्रणिती टेबलवर आपला हात उभा ठेवून त्यावर हनुवटी टेकवत म्हणाली.

" आई, तुम्ही प्रिन्सेसला आणि आरवला थोडावेळ सांभाळा. तुम्ही टिफिन पॅक करून ठेवला असेल तर द्या. आम्ही दोघी नणंद भावजय मिळून जातो. जास्त वेळ लागणार नाही आम्हाला यायला. " प्रणितीने पुन्हा एकदा त्या नात्याने तिला संबोधलं, तशी तिच्या तळपायाची आग मस्तकात चालली होती.

नर्मदा यांनी किचनमधून राजवीरचा डबा आणून तिच्यासमोर ठेवला. तिने प्रिन्सेसला नर्मदांच्या हातात सोपवलं. आरवला गोड बोलून समजावून सांगितलं आणि जाण्यासाठी निघाली.

तिला निघताना पाहून रजनी चिडली, म्हणून ती उठून तिच्या रूमकडे जायला निघणार की प्रणितीने पटकन पुढे जाऊन तिचा हात पकडून तिला बाहेर न्यायला सुरुवात केली. आता तिने हात धरला होता म्हणून रजनीला काही बोलताही आलं नव्हतं. गुपचूप तिच्यामागे निघाली होती. मात्र पुढे काय होणार आहे यापासून ती अनभिज्ञ होती.


                                    आता पुढे



                           घरातून बाहेर पडल्यानंतर प्रणितीने तिचा हात सोडला. बाहेर दुसरी कार उभी होतीच. तिने ड्रायव्हर सीटकडे जाऊन ड्रायव्हरला बाहेर यायला सांगितलं. तोही तिची आज्ञा पाळत लगेच गाडीतून खाली उतरला. मग ती स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसायला जाणार होती, पण रजनी अजूनही गाडीचा दरवाजा उघडून आतमध्ये बसली नव्हती.

"कोणी येणार आहे का?" प्रणितीने आजूबाजूला नजर फिरवत तिला विचारलं. मात्र तिचा प्रश्न तिला समजलाच नव्हता.

"म्हणजे?" अर्थ न कळाल्यामुळे तिने विचारलं.

"ड्रायव्हर दादा केव्हाचे निघून गेले आहेत. आपल्यालाही लवकर निघायचं आहे. निघण्यासाठी मुहूर्त काढण्याचा विचार आहे का तुझा?" प्रणिती तिच्याकडे रोखून पाहत तिच्यासमोर येऊन उभी राहत म्हणाली.

"माझ्याशी असं बोलायचं नाही हा अजिबात." तिच्या बोलण्याच्या पद्धतीने रजनीला राग आला होता. ती तिच्याकडे बोट करत बोलत होती.

"हे बोट मला पुन्हा कधी दाखवू नकोस. आज पहिलीच वेळ आहे म्हणून सोडते. पुन्हा जर मला बोट दाखवून बोललीस तर त्या बोटाचे कितीतरी तुकडे करून तुझ्या तळहातावर देईन." प्रणिती अगदीच थंड आवाजात म्हणाली. आश्चर्य म्हणजे रजनीनेही घाबरून पटकन हात खाली घेतला.

"घाबरताना चांगली दिसतेस तू. अशीच घाबरत जा. फुकटचा ॲटीट्यूड तुला शोभत नाही." प्रणिती ड्रायव्हिंग सीटकडे जाण्यासाठी वळत म्हणाली.

"कोण समजतेस कोण तू स्वतःला? एखादी महाराणी आहेस का तू?" रजनी तावातावाने बोलत होती. प्रणितीने मागे वळून तिच्याकडे पाहिलं.

"होय, महाराणीच आहे. माझ्या यांच्या हृदयाची महाराणी! आणि तुझी मोठी वहिनी आहे मी. तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे. यापेक्षा आणखी कोणती ओळख द्यायची आहे का?" प्रणिती आपल्या ओठांचा एक कोपरा उंच करत हसत म्हणाली.

रजनीचा मात्र जळफळाट झाला होता. तिने राजवीरमध्ये कधीच भाऊ पाहिला नव्हता. जशी मोठी होत होती, तशी तिने त्याच्यासोबत लग्नाची स्वप्न रंगवली होती. आज प्रणितीला असं बोलताना पाहून तिला राग आला होता.

"खूपच जास्त टिवटिव करायला लागली आहेस तू. लवकरच तुझी ही फडफड बंद करणार आहे मी. किती दिवस उडतेस ते मलाही पहायचं आहे." रजनी चिडून म्हणाली.

"मी सुद्धा पाहणार आहे, की तू... या घरात किती दिवस टिकतेस. माझ्याकडे तुझ्यासोबत बोलण्यात घालवायला वेळ नाही आहे. पटकन गाडीत बस. मी तुझी नोकर नाही जे तुझ्यासाठी दरवाजा उघडेन." प्रणिती तिचं बोलणं दुर्लक्षित करत म्हणाली.

"येणार नव्हते मी. तूच जबरदस्तीने मला घेऊन आली आहेस." प्रणिती आपल्या हाताचं मनगट चोळत म्हणाली.

"अगं, आयती संधी दिली आहे मी तुला त्यांना पाहण्याची. कित्ती कित्ती वेडी आहेस तू! काहीच दिवसांत तुझी हकालपट्टी करणार आहे मी इथून, रोज रात्री ते घरी आल्यानंतर माझ्यासोबत वेळ घालवतील. पुन्हा सकाळी उठून ते कामावर जातील, त्यामुळे पुढे तुला घरातून जाईपर्यंत त्यांना पहायला मिळणार नाही. आता मी संधी दिली आहे तर घे ना त्याचं सोनं करून. एक शेवटचं पाहून घे त्यांना. नंतर... नो चान्स!" आज रजनी एका नवीन प्रणितीला पहात होती.

आजपर्यंत तिने जी पाहिली होती ती अगदीच लाजाळू, प्रेमळ, आज्ञाकारी प्रणिती होती. आजची प्रणिती ही निडर, साहसी, आत्मविश्वासी होती. नेमकी कोणती प्रणिती खरी आहे? याचा तिला अंदाजही लावता येत नव्हता. डोळे मोठे करून ती प्रणितीकडे पाहत होती. तिला आपल्याकडे असं पाहताना पाहून प्रणितीने डोळे फिरवले.

"ते डोळे खोबणीतून बाहेर येतील. बारीक कर त्यांना. बस पटकन आता आत. मला माझ्या नवऱ्याला उपाशी ठेवायचं नाहीय." ती रजनीच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवत म्हणाली. तिने पटकन आपले डोळे बारीक केले.

पुढे काहीच न बोलता प्रणिती ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसली. रजनीनेही नाखुशीने दरवाजा उघडला आणि आत बसली. ती बसल्यानंतर प्रणितीने लगेच गाडी सुरू केली.

"सीट बेल्ट लाव. हे सुद्धा सांगावं लागतं का तुला? मी काही तुझा हिरो नाही आहे की तुझ्याजवळ येऊन सीट बेल्ट लावून देईन." प्रणिती तिच्याकडे न पाहताच म्हणाली. ती जेवढी बोलत होती तेवढा रजनीला राग येत होता.

"तुझ्यासारखा उद्धट मुलगा जरी असता तरी मी त्याला माझ्या आजूबाजूला फिरकू दिलं नसतं. मला सीट बेल्टची गरज नाही." रजनी नाक मुरडत म्हणाली.

"विचार कर रजनी. महागात पडायला नको." प्रणितीने जणू तिला शेवटची संधी दिली तिचा निर्णय घेण्याची, पण त्यावर रजनीने हात झटकत नाक मुरडलं.

"ठीक आहे, नंतर रडू नकोस म्हणजे झालं." असं म्हणत प्रणितीने कार सुरू केली. रजनीने एकवार तिच्याकडे पाहिलं.

"तुला गाडी चालवता येते ना पण?" रजनीने विचारलं, त्यावर प्रणितीने रजनीसारखंच हात झटकून नाक मुरडलं. मग मात्र ती घाबरली.

"ऐ थांब थांब! तुला गाडी चालवता येत नाही?" तिने तिला थांबायला सांगितलं, मात्र प्रणितीने कानाडोळा केला.

"मी तुला विचारलं काहीतरी प्रणिती." तिने चिडून विचारलं, पण त्या चिडण्यापेक्षाही जास्त ती घाबरली होती.

"आता तू बसलीच आहेस गाडीत. गाडी सुरू झाल्यानंतर समजेलच तुला मला चालवता येते की नाही ते. तोपर्यंत प्लीज बडबड करू नकोस. उगाच गाडीवरचं नियंत्रण सुटेल माझं." प्रणितीच्या उत्तराने तिचं समाधान झालं नव्हतं. तिच्या शेवटच्या वाक्यावर ती प्रचंड घाबरली, म्हणून ती मनातल्या मनात देवाचा धावा करत होती.

'हे देवा! या चांडाळणीच्या हातातून मला मरण येऊ देऊ नकोस.' रजनी देवाला प्रार्थना करत होती, तितक्याच वेळात प्रणितीने गाडी मुख्य रस्त्यावर आणली.

सकाळची वेळ होती त्यामुळे रहदारी सुद्धा होतीच रस्त्यावर. रजनी कधी रस्त्यावर तर कधी प्रणितीच्या तोंडाकडे पाहत होती. थोडं अजून पुढे गेल्यानंतर प्रणितीने सुनसान रस्ता लागताच गाडीचा वेग वाढवला. आणि तो वेग एवढा होता की रजनी सीट बेल्ट बांधलेला नसल्यामुळे इकडे तिकडे आदळत होती. मध्येच ती जोरात गाडी पळवत होती, मध्येच वेग कमी करत होती, ज्यामुळे घायाळ झालेली रजनी त्याही परिस्थितीत चिडली होती.

"हे काय करतेस प्रणिती? अशी कोणी गाडी चालवतं का?" रजनीने चिडून विचारलं, तसा प्रणितीने काहीच न बोलता वेग वाढवला. रजनी समोर हात टेकवून बसली होती.

प्रणितीने वेग कमी केला, तशी रजनी स्वतःचा अडकलेला श्वास सोडण्याचा प्रयत्न करत होती. ती त्या प्रयत्नात असतानाच प्रणितीने वेग वाढवला, ज्यामुळे रजनीचा श्वास पुन्हा अडकला. तिने समोर टेकवलेले हात मागे घेऊन सीट गच्च पकडून ठेवली.

"ऐ येडे! कुठल्यातरी एकाच स्पीडने चालव ना गाडी. मला मारून टाकण्याचा विचार आहे का तुझा? स्वतः बसली महाराणी सीट बेल्ट लावून. इथे माझा जीव जाण्याची वेळ आली आहे." रजनी अशी म्हणालीच होती की प्रणितीने अचानक ब्रेक मारला.

ब्रेक मारल्यामुळे रजनी पुढे आदळता आदळता राहिली. डोकं फुटणारच होतं, पण वेळीच तिने सीटवरचे आपले हात काढून डोक्यासमोर ठेवले.

"मघाशीच सांगितलं होतं की सीट बेल्ट लाव. तुला ऐकायचं नसतं ना माझं? तू स्वतःच्या चुकीमुळे इकडे तिकडे आदळत आहेस. यात माझी काहीच चूक नाही बॉ!" प्रणिती अक्षरशः आपले दोन्ही हात वर करत म्हणाली.

"मुद्दाम केलंस ना तू हे? मुद्दाम मला त्रास देत आहेस ना तू?" गाडी थांबलेली असल्यामुळे रजनी आता व्यवस्थित बोलू शकत होती.

"तुला त्रास देऊन मला काय मिळणार आहे? तुझ्याशी माझी कुठली शत्रुता वाया चालली आहे ज्यामुळे मी तुला त्रास देऊ?" प्रणितीही तिच्याच भाषेत तिच्याशी बोलत होती.

"अजून माझी वेळ आलेली नाही. जेव्हा माझी वेळ येईल ना, तेव्हा तुला सांगेन." रजनी रागीट कटाक्ष तिच्याकडे टाकत म्हणाली.

"अस्सं? काय बरं सांगणार आहेस तू मला?" बसल्या बसल्याच तिने हाताची घडी घालून विचारलं.

"ते आत्ताच नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा तुला कळेलच. मला त्रास देताना तुला जो आनंद होत आहे ना, तोच आनंद तुला त्रास होताना पाहून मी घेणार. ती वेळही लवकरच येईल असा माझा विश्वास आहे." रजनी तिच्याकडे बोट करत म्हणाली.

"पाहूयात." असं म्हणत प्रणितीने तिच्याकडे पाहतच किंचित हसत स्टेरिंगवर हात ठेवले.

ते पाहून रजनी घाबरली. तिने पटकन सीट बेल्ट आपल्या अंगाभोवती गुंडाळून घेतला. तिच्या या कृतीवर खरंतर प्रणितीला हसू येत होतं, पण तिला जर आता जास्त चिडून दिलं, तर घरी शोभा मामी होतीच उरलेली कसर काढायला, म्हणून प्रणितीने आता हळूहळू गाडी चालवायला सुरुवात केली.


काय बरं करणार आहे रजनी? तिच्यामुळे कुठलं संकट तर नाही ना येणार?