Login

प्रारब्ध: वेगळी वाट

परिस्थितीसमोर हार न मानणाऱ्या एका जिद्दी मुलीची अनोखी कथा !
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.


शीर्षक:- प्रारब्ध: वेगळी वाट.


"दादा, माझा थोड्यावेळापूर्वी निकाल लागलेला आहे आणि मला आता प्रशिक्षणासाठी जावं लागणार आहे." आभा खूप आनंदी होती आणि ती आपल्या भावाला सांगत होती.

आभाने नुकतीच एक स्पर्धा परीक्षा दिलेली होती आणि त्याचमध्ये तिला पोलीस खात्यामध्ये नोकरीसाठी तिची निवड झालेली होती.

आभाचे स्वप्न होते की आपल्या देशाची सेवा करावी म्हणून तिने विविध स्पर्धा दिलेल्या होत्या आणि आता तिला त्यातल्याच एका स्पर्धेमध्ये यश प्राप्त झाले होते.

"हो आभा, मला तर खूप आनंद झालेला आहे." अभय तिला म्हणाला.

अभय तिचा मोठा भाऊ होता. त्याने तिच्या डोक्यावर कौतुकाने हात ठेवला.

दोघा बहीण-भावाचे प्रेम पाहून त्यांच्या आई-वडिलांना सुद्धा खूप आनंद झालेला होता. कारण एकमेकांना काही सांगितल्याशिवाय ते राहत नव्हते त्या दोघांचे नाते खूपच घट्ट होते.

प्रशिक्षणाला जाण्यासाठी तिला ज्या काही गोष्टी लागणार होत्या त्याची तिने खरेदी भावाला सोबत घेऊन केली होती. तिला आकाश ठेंगणे झाले होते.

सरकारी नोकरी लागलेली होती त्यामुळे सर्वांना तिचा खूपच अभिमान वाटत होता.

आईबाबा तिला प्रशिक्षण केंद्रामध्ये सोडायला येणार होते परंतु अभयनेच मी तिला सोडतो आणि तुम्ही तिला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा भेटायला जा असे सांगून आपल्या मुलीला त्यांनी प्रशिक्षणासाठी पाठवले होते.

गाडीत बसल्यावर ती नेहमी पुढे बसणारी आज मात्र मागे बसलेली होती. कारण सकाळी लवकर उठून सगळी तयारी केलेली होती. त्यामुळे तिला झोप येत होती. ड्रायव्हिंग सीट वरती अभय बसलेला होता.

मस्त दोघे बोलत बोलत जात होते पण थोड्या वेळाने ती झोपून गेली. रस्त्यावरती खूप रहदारी दिसत होती परंतु सुट्टीचा दिवस होता तर खूप कमी गाड्या हे वाहतुकीचे नियम पाळत होते. त्यामुळे अभय खूप काळजी घेऊनच गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होता.

तिकडे पोहोचण्यासाठी थोडासा वेळ लागणार होता त्यामुळे एका ठिकाणी थांबून त्यांनी जेवण करण्याचे ठरवले.

"दादा, मला तर तुमच्या सगळ्यांची जास्त आठवण येईल." तिला आता त्यांच्यापासून दूर जाण्याची जाणीव होत होती म्हणून ती भावाला म्हणाली.

"आम्हालाही बाळा, तुझी खूप आठवण येईल पण आता फोन करण्याची सुविधा आहे. तसेच काही महिनेच तुला तिथे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी थांबावे लागेल. त्याच्यानंतर तू आमच्या जवळच असशील." तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता.

खरंतर पोस्टिंग कुठेही होऊ शकते पण सध्या तो विषय न काढता दोघेही एकमेकांच्या सहवास अनुभवत होते.

लहानपणापासून तिला कधी दूर न केल्यामुळे अभयला तिची थोडी काळजी वाटत होती पण बहिणीच्या ध्येयाच्यामध्ये आपण यायला नको म्हणून त्याने स्वतःच्या भावना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला होता.

पुन्हा गाडीमध्ये त्यांचा पुढे जाण्याचा प्रवास सुरू झाला. आणि मध्येच एक रस्ता असा होता की त्याच्यावरती खूप जास्त अपघात होत असायचे त्यामुळे अभय काळजी घेऊनच कार चालवत होता पण अचानक "थडामss" करून आवाज आला आणि त्याचं डोकं स्टेरिंगवरती आपटले गेले. कारण त्यांच्या गाडीला मागून कोणीतरी खूप जोरात ठोकलेले होते.

त्याची शुद्ध हरपण्याच्या आधी त्याला जोरात किंचाळण्याचा आवाज आलेला होता त्याने मागे वळून बघण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत त्याचे डोळे झाकले गेले.

खूप वेळ झाला होता. अपघात झाल्यावरती तिथे कोणीच नव्हते, कारण पोलीस केस होईल म्हणून कोणी पुढे येऊन मदत करण्यासाठी टाळाटाळ करत होते पण खूप वेळानंतर त्यांना मदत मिळाली.

दोघांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तसेच मागून ठोकल्यामुळे कार पूर्णपणे चेपली गेली होती आणि मागे आभा बसलेली असल्यामुळे तिला सर्वात जास्त दुखापत झालेली होती.

थोड्यावेळाने अभय शुद्धीवर आला आणि आपल्या बहिणीबद्दल विचारू लागला तेव्हा तिच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात येत आहे असे सांगितले.

त्याच्या जवळ असलेल्या गाडी चालवण्याच्या परवान्यावर असलेल्या माहितीवरून त्यांच्या घरी कळवण्यात आले होते. म्हणून त्यांचे पालक अपघाताची बातमी समजताच धावत हॉस्पिटलमध्ये आलेले होते.

"आपल्या मुलांसोबत हे असे कसे काय झाले ?" आभा आणि अभयची आई रडतच म्हणाली.

"हे बघ आता त्यांच्यावरती उपचार होत आहेत ते लवकरच बरे होतील त्यामुळे तू त्यांच्यासमोर रडून त्यांना अजून त्रास देऊ नकोस." असे बाबा म्हणाले.

थोड्या वेळाने डॉक्टरांनी त्यांना बोलवले आणि आता पायाला फ्रॅक्चर असल्यामुळे अभयला व्हीलचेअर वरती बसवलेले होते. तो सुद्धा आपल्या बहिणीची काय स्थिती आहे ते समजण्यासाठी आपल्या आई-वडिलांसोबत त्यांच्या केबिनमध्ये गेला.

"हे बघा, मी तुम्हाला काही खोटी आशा देणार नाही पण जेव्हा तुमच्या मुलीला मागून गाडीने ठोकले तेव्हा त्यामुळे तिच्या मणक्याच्या हाडाला दुखापत झालेली आहे. म्हणून दुर्दैवाने तिच्या एका पायाच्या संवेदना बंद झाल्या आहेत." हे ऐकून तिघांच्याही पायाखालची जमीनच सरकली.

कारण आपल्या आभाने खूप मेहनत घेऊन त्या परीक्षेमध्ये प्राविण्य मिळवले होते आणि आता तिचे ते स्वप्न भंग होताना पाहून त्या तिघांचे डोळे भरून आलेले होते.

"ह्यावर काहीतरी उपचार असतील ना?" अभय डॉक्टरांना विचारत होता.

" त्यांचा पाय बरा होण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि एवढ्या भीषण अपघातातून त्यांचा जीव वाचला हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आता तुम्हाला त्यांना व्यवस्थित सांभाळायला हवे. तसेच याबाबत त्यांना सांगताना तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. कारण ही गोष्ट समजून घेऊन ती पचवणे खूप कठीण असते आणि कधीकधी यामध्ये व्यक्ती खचून सुद्धा जातात. त्यामुळे तुम्हाला आता त्यांना सकारात्मक विचारांकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे." असे म्हणून डॉक्टर तिथून निघून गेले.

अभयला तर स्वतःची चूक आहे असे वाटत होते कारण त्याने जर तिला मागे बसायला सांगितलेच नसते तर आज असे झालेच नसते; असे त्याला अपराधी भावनेने वाटत होते.

थोड्यावेळाने आभा शुद्धीवर आल्यावर तिच्या तोंडून फक्त "दादा" हा एकच शब्द निघाला.

"आभा, मी ठीक आहे. तुला काही त्रास होतोय का?" त्याने व्हीलचेअर जवळ नेत तिला विचारले.

"नाही दादा, मला काही त्रास होत नाही. तुला खूप लागलं आहे का?" तो व्हीलचेअरवर बसलेला होता ते बघून तिने विचारले.

" थोडीशी दुखापत झाली आहे." असे तो म्हणाला.

तिने हालचाल करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा तिचा डावा पाय हलत नव्हता हे तिला समजले तेव्हा तिने तो खूप जोरात हलवण्याचा प्रयत्न केला पण फक्त उजवा पाय हलत होता.

"दादा, माझ्या पायाला काय झाले? " ती घाबरून विचारत होती.

अभयसह आईबाबा सुद्धा काय सांगायचे म्हणून विचार करत होते.

"तुझ्या पायाला लागले आहे. नंतर ठीक होईल ." अभयने तात्पुरते तिला सांगितले.

त्यानंतर तिने काही विचारले नाही पण पाय लवकर ठीक व्हावा असे तिला वाटत होते.

तिला काही दिवसांनी हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले. तिचा पाय अजून ठीक झाला नव्हता. अभयचे सुद्धा प्लास्टर निघाले होते.

"बाबा, माझ्या अपघाताबद्दल प्रशिक्षण केंद्रात सांगावे लागेल ना." ती भावाच्या मदतीने खोलीत जात बोलत होती.

तिघेही एकमेकांकडे बघत होते.

"काय झाले? मी पायाबद्दल काहीही विचारले की तुम्ही असे का एकमेकांकडे बघता."

"अगं, काही नाही." अभय तिला पलंगावर बसवून म्हणाला.

"तुम्ही मला खरे काय ते सांगा. मला तुमचे आणि डॉक्टरचे वागणे खूप विचित्र वाटत आहे." आभा तिघांवर नजर रोखत म्हणाली.

आता सांगण्याशिवाय पर्याय नाही म्हणून अभय तिचा हात हातात पकडून समोर बसून बोलू लागला, "बाळा, आपला अपघात झाला तेव्हा तुझ्या मणक्याला मार लागला आणि म्हणून डाव्या बाजूच्या कमरे खालून पायाच्या संवेदना तुला जाणवत नाहीत."

ते ऐकल्यावर आपण काही चुकीचे तर ऐकले नाही ना असे समजून ती धक्क्याने थोडी मागे सरकली.

"न... नाही. असे नाही होऊ शकत." ती अडखळत म्हणायला लागली.

तिचे स्वप्न क्षणांत नष्ट झाल्यासारखे तिला वाटू लागले आणि ती हमसून हमसून रडायला लागली.

"बाळा, शांत हो." आई आणि बाबा तिच्या बाजूला बसत आणि अभय तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाले.

आपल्या नशिबात हे काय लिहिले म्हणून ती मोठ्याने रडू लागली.

त्या दिवसानंतर तिने स्वतःला खोलीतच जणू बंदिस्त केलेले होते. ती खोलीच्या बाहेर जात नव्हती.

अभय खूप वेळा तिला त्यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करायचा पण ती शांतच बसायची.

नातेवाईकांना अपघाताबद्दल समजले तसे तिला भेटायला यायचे. तिच्यासाठी हळहळ व्यक्त करायचे. आता पुढे कसे होणार हेच बोलायचे.

"म्हणजे लवकर मदत मिळाली असती तर असे झाले नसते." एक पाहुणे बोलत असताना तिने ऐकले.

तिच्या मनात काही न काही सुरू होते. स्वप्न भंग होणे ह्यासारखे मोठे दुःख नसते हे ती स्वतः अनुभवत होती.

आता ती काही ना काही लॅपटॉपवर बसल्या बसल्या करत रहायची. तिचे मन दुसरीकडे गुंतत आहे म्हणून घरचे थोडे निश्चिंत होते. ती आता हळू हळू एक पाय जो ठीक होता त्यावर चालण्याचा आणि स्वतःची कामे स्वतः करण्याचा प्रयत्न करत होती.

काहीच दिवसांनी एका स्पर्धेचा निकाल लागला होता.
त्यात आभाचे नाव झळकले होते. कारण अपघात झाल्यावर तातडीने मदत मिळण्यासाठी तिने एक ॲप तयार केला होता. जशा अत्यावश्यक सेवा असतात तसेच त्यात तिने घरातील सदस्यांचा मोबाईल नंबर आणि जवळ असणाऱ्या हॉस्पिटल आणि पोलिस स्टेशनचा नंबर हे एकत्रितपणे जोडण्याचे आणि जलद पद्धतीने त्यांना फोन व मेसेज एकाच वेळी एक क्लिक केल्यावर जाईल अशा पद्धतीची सुविधा त्या ॲपमध्ये बनवताना केली होती.

सरकारने ती स्पर्धा आयोजित केलेली होती. त्याचे पेटंटही तिला मिळणार होते. ह्यामुळे लवकरात लवकर अपघात झाल्यावर मदत तर मिळणार होतीच आणि जीव वाचवला जाण्याची शक्यता होती. अशा पद्धतीनेही तिने देशासाठी काही करण्याचे स्वप्न ती पुढेही चालू ठेवेल असे तिच्या सत्कार समारंभात तिने सांगितले होते.

"काय गं आभा? तू तर सगळीकडे आता प्रसिद्ध झालीस की." अभय तिला जवळ घेत म्हणाला.

तिने हसून फक्त प्रतिसाद दिला.

"बाळा,आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो." आभाचे आई-बाबा तिला जवळ घेऊन म्हणाले.

सरकारी नोकरी नशिबात असूनही आलेल्या संकटावर मात करत तिने दुसऱ्यांचा विचार करून शोध लावला होता. आपले दुःख बाजूला सारून इतरांसाठी आभा प्रेरणा ठरली होती. वेगळी वाट निवडताना तिचे प्रारब्ध तिने स्वीकारले होते.

समाप्त.

© विद्या कुंभार

कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.

0

🎭 Series Post

View all