Login

प्रारंभ...भाग 1

स्वतःसाठी थोडं तरी जगायला हवं
प्रारंभ...भाग 1
चॅम्पियन ट्रॉफी 2025
ऋतुजा वैरागडकर

शुभांगीचं आयुष्य वरून पाहता सुखी आयुष्य वाटायचं. अगदी परिपूर्ण सुखी आयुष्य....

सकाळी उठल्यावर अंघोळ करून देवाला नमस्कार, स्वयंपाकघरात स्वयंपाकाची तयारी, घरभर सुगंधी अगरबत्तीचा सुगंध आणि खिडकीतून येणारा मंद वारा.
हाच तिचा नित्यक्रम असायचा.

मुलगा- मुलगी मोठे झाले होते. मुलगा नोकरीसाठी शहरात राहायचा. मुलगी परदेशात शिक्षणासाठी गेली होती.
घर आता फारसं गजबजलेलं नव्हतं. दोघेच असायचे.

प्रमोद तिचा नवरा, अजून काही वर्षं त्याची नोकरी होती. रोज सकाळी निघायचा, संध्याकाळी थकल्यासारखा परत यायचा.
दोघं एकटेच राहायचे.

पहिल्या नजरेत हे आयुष्य शांत, निवांत वाटायचं.
पण शुभांगीनं स्वतःला आरशात बघितलं की प्रश्न पडायचा –
"ही खरंच मी आहे का? हेच माझं आयुष्य आहे का? मी स्वतः साठी जगले आहे का? काय उद्देश होता माझ्या आयुष्याचा..?"

ती जेवढी दिवसभर भरभरून काम करत होती तेवढं आता तिच्या हाती उरलं नव्हतं. तिला रिकामं वाटायचं. काहीतरी रिते झालंय असं जाणवायचं.
मुलांच्या आठवणीतं तिचा वेळ जात होता.. पण प्रत्यक्षात ती एकटी पडली होती. फक्त एकटी...


सकाळचं स्वयंपाकघर, दुपारचं रिकामं घर आणि संध्याकाळी नवर्‍याचं थकलेलं मौन…
या एकसुरीपणानं तिच्या मनात घालमेल वाढवली होती.

"मी आता फक्त संसारापुरतीच उरले आहे का? माझं स्वतःचं काही उरलं नाही आहे का? मी सगळ्यांसाठी जगले पण आता माझ्यासाठी कोण आहे? माझ्याजवळ तर कुणीही नाही.

एक दिवशी कॉलेजच्या मैत्रिणीचा फोन आला.
दोघी खूप दिवसांनी बोलत होत्या, गप्पांमध्ये ती म्हणाली.

"अगं शुभांगी, आठवतंय का तुला? आपल्या कॉलेजमधल्या गाण्याच्या स्पर्धेत तू पहिली आली होतीस. तेव्हा तुझ्या आवाजावर सगळे फिदा झाले होते! आता पण गातेस ना?"

हा प्रश्न शुभांगीच्या हृदयाला एकदम टोचून गेला.
गायन... तिचं पहिलं प्रेम... कित्येक वर्षांपूर्वीच हरवलं होतं.
संसाराच्या व्यापात, मुलांच्या शाळा, नोकरी, लग्नं… या सगळ्यात तिचं गाणं कोठे तरी हरवल गेलं होतं.
ती स्तब्ध झाली.

"काय ग शुभांगी ऐकतेस ना?.."
"ह्म्म मी नंतर बोलते." म्हणून तिने फोन ठेऊन दिला आणि
स्वतःच्याच विचारात गढून गेली.
'काय मिळवलंय मी स्वतःसाठी? स्वतःसाठी किती जगले? जगले की जगलेच नाही.' असंख्य प्रश्नांनी भडीमार केला होता तिच्या मनावर.