Login

प्रारंभ...भाग 2

स्वतःच्या स्वप्नांसाठी जगा
प्रारंभ...भाग 2

त्या रात्री शुभांगी झोपलीच नव्हती.
तिला आठवलं – तिचं तारुण्य, ते गाण्याचे दिवस, मंचावर उभं राहून गायल्यानंतर मिळणाऱ्या टाळ्यांचा कडकडाट.
आणि मग डोळ्यांसमोर आलं आजचं चित्र – शांत घर, एकसुरी दिनचर्या आणि तिचं विसरलेलं स्वरांचं जग.
ती आणि तिचे स्वर दोघांचं असलेलं घट्ट नातं.

"मी स्वतःला हरवून बसले आहे," असं तिला वाटलं.
ती खूप उदास झाली. तिला एकाकीपणा जाणवायला लागला. तिच्यात न्यूनगंड निर्माण झाला.

दुसऱ्या दिवशी शुभांगीनं कपाटातली जुनी पेटी काढली.
त्यात तिचा जुना हार्मोनियम ठेवलेला होता. धूळ बसली होती, पण तिने तिच्या बोटांनी ती हलकेच पुसली.

आवाज होताच ती दचकली, किती दिवसांपासून तिने असा आवाज ऐकलाच नव्हता, तिने असा स्पर्शही केलेला नव्हता.
हार्मोनियमकडे बघून तिचे डोळे पाणावले. हृदय धडधड करायला लागलं.

हार्मोनियमसमोर बसून ती गाऊ लागली.
पहिल्यांदा सूर लागत नव्हते. बोटं थरथरत होती. पण हळूहळू त्या स्वरांमध्ये एक ओळखीची जादू परत आली.
आणि तिच्या डोळ्यातून पाणी आलं.

"हीच तर मी आहे… हीच खरी शुभांगी आहे!"

त्या क्षणी तिनं ठरवलं – आता स्वतःसाठी काहीतरी करायचंच. स्वतःसाठी जगायचं.
तिच्या मनाला उभारी आली.
तिला इतका आनंद झाला की काय करू नी काय नको असं झालं होतं.
शुभांगीला नव्याने शिकायचं होतं. तिने शिकवणी वर्गाची माहिती काढायला सुरुवात केली.
ती एका स्थानिक संगीत वर्गात दाखल झाली.
पहिल्याच दिवशी तिला मुलांसोबत बसताना संकोच वाटला.
"लोक काय म्हणतील? वय झालंय, आता कशाला हे?"
अशा अनेक शंका तिच्या मनात उठल्या.

पण तिनं स्वतःला समजावलं –
"मी आजवर सगळ्यांसाठी जगले. आता थोडा माझ्यासाठी जगून घ्यायचं आहे. आता कुणाचाही विचार करायचा नाही. फक्त स्वतःचा विचार करायचा आहे. "

सुरुवातीचे दिवस कठीण होते. आवाज जुळत नव्हता, सूर तुटायचे.
पण ती चिकाटीनं सराव करत राहिली.
हळूहळू तिचं गाणं परत खुलायला लागलं.

घरी सुरुवातीला कुणालाच हे पटेना.
मुलगा म्हणाला,

"आई, आता या वयात काय शाळेत बसतेस? थोडं आराम कर ना. आता तुझे आरामाचे दिवस आहेत. हे काय नवीन लावून घेतलं तुझ्यामागे. आई बरं दिसतं का ते? तू ते विसर बघू आता."

शुभांगी शांत उभी होती.