Login

प्रतिक्षा फक्त तुझीच भाग २

अतिशय कडक स्वभाव. कामावर असताना चेहऱ्यावरून माशीही हलणार नाही इतका निर्विकार चेहरा. ती शेवटचं कधी हसली होती? ते देखील तिला सांगता येणार नव्हतं. त्या निर्विकार चेहर्‍यावर राग सोडला तर दुसरी कोणतीच भावना दिसत नव्हती.
मागील भागात.

त्याच्या हातात तो बिझनेस गेल्यापासून नीरजने त्याची जबाबदारी चांगली पार पडली होती. तो दिल्लीला जरी होता तरी तो तिथूनच सर्व काही हाताळत होता. त्यामुळे तो सतत दिल्ली ते मुंबई प्रवास करत राहायचा. म्हणून विकासला जास्त जाण्याची गरजच लागत नव्हती. अगदीच काही महत्वाचे निर्णय घायचे असतील तरच विकास ऑफिसला जात असायचा.

“पण तिने तुला ओळखल तर?”

विकासाच्या या प्रश्नावर दोघी विचारात पडल्या.

आता पूढे.

त्यांना विचारात पडलेल बघून नीरजने बोलायला सूरवात केली.

“माझी खरी ओळख तरी कुठे आहे तिला?” नीरज हलकेच हसत बोलला. “आताही साधा माणूस बनूनच तिच्यासमोर जाईल.”

तस बाकीच्यांनी एकमेकांकडे पाहील.

“अरे मग तिचं लग्न झाल असेल तर?” रक्षाने अजून एक शंका उपस्थित केली.

“काकांनी उगाच का मला सांगितलं असेल?” नीरजच्या चेहऱ्यावर हसू आज काही कमी व्हायला मागत नव्हतं.

“जा मग लवकर,” रक्षा उत्साहात येत बोलली. “मला माझी सून लवकर घरी हवी आहे. खूप गोड मुलगी होती रे तेव्हा.”

“पण आता खूप खडूस झाली आहे म्हणे.” नीरज हलकाच उसासा टाकत बोलला. “त्या ब्रांचमधले तिला तर थेट दगडच बोलतात.”

आता मात्र बाकी विचारात पडले.

“पण माझ्या दादासाठी तर काहीच अशक्य नाहीये.” तन्वी तिच्या दादाला धीर देत बोलली.

“बघ काय ते लवकर.” विकास त्या विषयाला तिथेच थांबवत बोलले.

मग तो विषय तिथेच थांबवला गेला. त्यांनी त्यांचा नाश्ता आटोपला आणि ज्याच्या त्याच्या कामाला लागले. तन्वी तिच्या कॉलेजला गेली. नीरज आज त्यांच्या नवी मुंबईच्या ब्रांचला जाणार असल्याने विकास आज त्यांच्या मुख्य ऑफिसला गेले.

नीरज त्याच आधीच आवरून आला होता. म्हणून आता नाश्ता आटपून तो सरळ घराच्या बाहेर पडला.

(काही दिवसांपूर्वी.)

नवी मुंबईतल्या उच्च मध्यमवर्गीय भागातली ती इमारत. त्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावरच दोन बेडरूम असलेला प्रशस्त अस घर. त्या घरात राहणारी माणस फक्त दोन ती आणि तिची आई. त्यासोबत त्यांच्या घरात कामाला असणाऱ्या कांता मावशी ह्या तिसऱ्या, या व्यतिरिक्त कोणी नाही. नातेवाईकांची साथ तर कधीच सुटली होती.

ते गोड गुलाबी अशा थंडीचे दिवस होते. ह्या दिवसात कोणाची लवकर उठायची इच्छा तर होत नसते. पण कामामुळे, पोटा पाण्याच्या प्रश्नामुळे उठाव तर लागतच.

म्हणून ती देखील अंगावरच पांघरूण पूर्ण शरीराभोवती गुंडाळून घेत मस्त झोपलेली होती. तिच्या आईने तिला सकाळपासून तिला दोन वेळा आवाज दिला होता. पण पहिल्या आवाजाच्या वेळेस तिला काहीच फरक पडला नव्हता. दुसऱ्या आवाजाच्या वेळेस तिने फक्त हुंकार भरला होता. जो तिच्या खोलीतून तिच्या आईपर्यंत तर काही पोहोचला नव्हता. शेवटी त्या वैतागूनच स्वतःच तिच्या खोलीत आली.

“अगं उठ.” तिची आई तिला मोठ्याने आवाज देत बोलली. “तुला आज लवकर जायच आहे ना ऑफीसला. कालपर्यंत तर भुणभुण चालु होती माझ्या कानाशी की लवकर उठवं म्हणून आणि आता कधीचा आवाज देत आहे तर मस्त पसरुन झोपली आहे. नंतर उशीर झाला तर मला सांगायच नाही.”

तिच्या आईची सकाळची कॅसेट सुरू झाली. ज्याने कोणत्याही मुलाची अथवा मुलीची परत झोपायची हिम्मत होत नसते. पण अशा गुलाबी थंडीत झोपही आपल्याला तितकीच घट्ट मिठी मारते. मग काय? ती परत पसरुन झोपणार तोच तिला काल तिच्या ऑफिसमध्ये आलेला ईमेल आठवला. मग ती खाडकन उठून बसली. तिला उठलेलं बघून तिची आई तिच्यासमोर येऊन दत्त सारखी उभी राहीली.

“सुप्रभात मातोश्री.” तिने तिची बत्तीशी दाखवली. आईचा तो चिडका चेहरा बघून तिने लगेच मवाळ भूमिका स्विकारली होती.

“लगेच लाडात यायची गरज नाहीये.” आई वैतागूनच बोलली. “जा आता, आंघोळ कर पटकन. बाकी मी आवरुन ठेवते.”

तिच्या मवाळ आवाजावरुनच तिची पुढची वाक्य तिच्या आईला आधीच समजून जायची. तिच हे नेहमीच होत. उशीर झाला की आईला लाडीगोडी लावत स्वतःच आवरुन द्यायला लावायची. तिच्या आईला पण तिचे हे सगळेच नखरे माहीती होते. पण तिची आजवरची धावपळ, संघर्ष, आलेल्या मोठमोठ्या संकटाचा धैर्याने केलेला सामना हे सगळेच आठवून ती तिला थोडीशी का असेना? मदत म्हणून तिच सगळेच आवरुन देत होती. शेवटी आज तिच्याच कष्टामुळेच त्यांना हे सुगीचे दिवस बघत होते.

आईच बोलण ऐकून ती पटकन आंघोळीसाठी पळून गेली.

‘वेडी’ तिला अस पळत जाताना बघून तिची आई हलकेच हसत बोलली.

ती अश्विनी सावंत. वय वर्ष ३३, प्रगल्भ बुध्दीमत्तेची मालकीण. त्या बुध्दीमत्तेच्या जोरावरच वयाच्या तिशीलाच ऑफीसच्या एका डिपार्टमेन्टची मुख्य मॅनेजर झाली होती. अतिशय कडक स्वभाव. कामावर असताना चेहऱ्यावरून माशीही हलणार नाही इतका निर्विकार चेहरा. ती शेवटचं कधी हसली होती? ते देखील तिला सांगता येणार नव्हतं. त्या निर्विकार चेहर्‍यावर राग सोडला तर दुसरी कोणतीच भावना दिसत नव्हती.

तिचं राहणीमानही खूप साध होत. कामावर जाताना पंजाबी ड्रेस, कुडता पायजमा याव्यतिरिक्त दुसर काहीही घालत नव्हती. मेकअप म्हणजे तिच्यासाठी फक्त एक चेहऱ्यावरची क्रीम, त्यावर पावडर आणि शेवटी गंध किंवा टिकली. तिचा हा साधेपणाही तिच्या त्या गोऱ्या रंगावर अगदीच खुलून दिसायचा.

आयुष्याच्या शाळेने तिला वयाच्या आधीच खूप काही शिकवलं होत. त्यामुळेच ती इतकी कठोर ह्रदयाची बनलेली होती. तिच्या त्या कठोर ह्रदयाच्या कोशात तिच्या आईशिवाय इतर कोणालाही जागा नव्हती. अगदी प्रेमालाही नव्हती.

तिच लग्नाच वय उलटून चाललं होत. पण ती लग्नासाठी देखील तयार होत नव्हती. ही एकच चिंता तिच्या आईला लागून राहिली होती. तिच्यानंतर तिला सांभाळणार कोणीतरी असाव अस तिच्या आईला मनापासुन वाटतं होत. पण तिच्या मनात लग्न, प्रेम याबद्दल खूपच राग भरलेला होता. लहानपणापासुन प्रेम आणि लग्न म्हणजे फक्त अविश्वास, मारहाण, शिव्या, अपमान एवढचं तिने पाहीलेलं होत. त्यामुळे ती सध्यातरी लग्नासाठी तयार होईल अस काही तिच्या आईला वाटत नव्हतं.

'देवा,' अश्विनीची आई आता मनातच बोलू लागली. "आता तूझ्यावरच सगळ सोडते आहे. मी किती दिवस तिला पुरणार हे फक्त तूलाच माहीती आहे. किमान माझे डोळे मिटण्याआधी कोणीतरी तिच्या आयुष्यात असा मूलगा येऊदे की जो तिच्या या बेरंग आयुष्यात प्रेमाचे खूप सारे रंग भरेल.' तिने नकळत भरून आलेले अश्रू आवरता आवरता हलकेच पासून घेतले.

अश्विनी आवरुन येईपर्यंत तिच्या आईने अश्विनीला लागणार ऑफीसच सामान बाहेर काढून ठेवलं. नंतर तिचा डबा आणण्यासाठी ती किचनमध्ये निघून गेली. अश्विनी आवरून बाहेर आली. सगळ काही काढून ठेवलेलं बघून तिने हलकेच हसत पटकन ऑफीसला जायची तयारी केली.

तिचं आवरून ती बाहेर आली.

“आलीस का?” आईने किचनमधून अश्विनीला आवाज दिला. “चहा थंड होतोय.”

आपल्या आईला किचनमध्ये काम करताना बघून अश्विनी जरा चिडलीच. “आई कितीवेळा तरी सांगीतल की स्वयंपाकासाठीच त्या मावशी येतात. त्या पण खुप छान स्वयंपाक बनवतात. मग तु का दमतेस?” अश्विनी चिडून बोलली.

“बघ ना.” कांता मावशींनीही अश्विनीच्या सुरात तिचा सूर मिसळवला. “मी त्यांना सांगून सांगून थकले, पण त्या काही ऐकतच नाही. तू गेल्यावर तर माझा एक शब्द तरी ऐकतील. वरून काहीना काही अजून काढतच बसतील.”

कांता तिच्या आईची तक्रार तिच्याजवळ करायला लागली. तर इकडे तिची आई कांताला ‘गप्प बस.’ चा इशारा करुन करून थकली.

क्रमशः

अष्टपैलू लेखन स्पर्धा
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all