Login

प्रतिक्षा फक्त तुझीच भाग ३

आज ती खडूसपणाचाही कहर झालेली तिच्या तिथल्या स्टाफला दिसत होती. आजवर त्यांनी फक्त तिला ते नावच ठेवल होत. पण आज तर तिच ते प्रत्यक्ष रुप बघून सर्वांनाच टेन्शन आल होत.
मागील भागात.

आपल्या आईला किचनमध्ये काम करताना बघून अश्विनी जरा चिडलीच. “आई कितीवेळा तरी सांगीतल की स्वयंपाकासाठीच त्या मावशी येतात. त्या पण खुप छान स्वयंपाक बनवतात. मग तु का दमतेस?” अश्विनी चिडून बोलली.

“बघ ना.” कांता मावशींनीही अश्विनीच्या सुरात तिचा सूर मिसळवला. “मी त्यांना सांगून सांगून थकले, पण त्या काही ऐकतच नाही. तू गेल्यावर तर माझा एक शब्द तरी ऐकतील. वरून काहीना काही अजून काढतच बसतील.”

कांता तिच्या आईची तक्रार तिच्याजवळ करायला लागली. तर इकडे तिची आई कांताला ‘गप्प बस.’ चा इशारा करुन करून थकली.

आता पूढे.

पण कांता मावशी आज काही थांबल्या नव्हत्या. आज मिळालेल्या संधीच सोन करत त्यांनी अश्विनीच्या आईच्या सगळ्याच गोष्टी अश्विनीला सांगून दाखवल्या. तिनेही त्या सगळ्याच गोष्टी तिच्या आईवर नजर रोखून शांतपणे ऐकून घेतल्या.

“त्यांना तुझ्यावरच लक्ष ठेवायला सांगीतल आहे.” अश्विनी कमरेवर तिचे हात ठेवत बोलली. “त्या खोट नाही बोलणार.”

“बरं बाई.” तिची आई नाटकी आवाजात कान पकडून बोलली. “चुकलं माझं. आता नाही काही करणार. बस?”

तिची अशी लहान मुलीसारखी नाटक बघून अश्विनीचा राग लगेच ओसरला गेला आणि तिने हसतच तिच्या आईला मिठी मारली. मग त्या दोघी हॉलमध्ये येऊन चहा प्यायला बसल्या. पण अश्विनीला नेहमीसारखा उशीर झाला आणि तिला कामावर जायची घाई झाली. मग तिने कसातरी तो चहा संपवला. त्यात तिची जीभही जरा पोळली.

“अगं, जरा हळू.” तिची आई वैतागून बोलली. तस तिने परत तिच्या आईला फक्त हसून दाखवलं आणि तिचा निरोप घेत तिच्या ऑफिससाठी पळाली.

त्यानंतर कांता आणि तिची आई निवांत बसल्या. त्या घरात घाई गडबडीची एकच तर माणूस होती ती. आता ती गेल्यावर कसलीच गडबड नसायची. मग त्या दोघी निवांत त्यांची काम करत बसायच्या.

नवी मुंबईमध्ये असणाऱ्या त्या भल्या मोठ्या बिझनेस पार्कमध्ये त्या आय टी कंपनीची स्वत:ची अशी १२ मजल्याची इमारत होती. त्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर त्या कंपनीचे एक - एक डिपार्टमेंट होत. त्यापैकी सातव्या मजल्यावरच्या डिपारटमेन्टची मुख्य मॅनेजर म्हणून अश्विनी काम करत होती. अश्विनी तिच्या ह्या कंपनीच्या ऑफिसजवळ पोहोचली आणि तिने तिची गाडी पार्किंगला लावली.

अश्विनीला कालच कंपनीच्या मुख्य ऑफीसमधून ईमेल आला होता. तसा तो प्रत्येक मॅनेजरला आलेला होता. पुढच्याच आठवड्यात कंपनीच्या त्या ब्रांचमध्ये, त्या कंपनीचे मूख्य सीईओ येणार होते. पुढील महिनाभर ते या पूर्ण ऑफीसच कामकाज बघणार होते. त्यांना त्यांच्या कंपनीच्या ह्या ब्रांचमध्ये काही नवीन प्रोजेक्ट्स राबवायचे होते. त्याच्या अभ्यासासाठी ते येणार होते. त्यांना त्यांच्या मनासारखा परीणाम जर दिसला तर ते ऑफीस नवीन प्रोजेक्टसाठीचे मुख्य ऑफीस केले जाणार होते. यावर तिथल्या बऱ्याच स्टाफचे प्रमोशन, इंक्रीमेंट अवलंबून होते.

ते सीईओ येण्याआधीच त्यांची बरीच माहीती त्या ऑफीसला पोहोचली होती. जसे की ते खूपच स्ट्रिक्ट आहेत. थोडीशी जरी चुक झाली तरी जागेवरच कामावरून कमी करतात. शिस्तीत झालेली कसुर त्यांच्यासाठी तर मोठा गुन्हाच होता. यामुळेच ऑफीसच वातावरण खूपच ढवळून निघाल होत.

त्या कंपनीच्या तिथल्या ब्रांचच्या पूर्ण ऑफीसमध्येच आजपासून खूप धावपळ सूरू झाली. म्हणूनच अश्विनी आज लवकर येऊन ऑफीसची राहिलेली काम उरकायच्या मागे लागली. ज्यांच्या कामात चुका रहात होत्या त्यांच्यावर तिचा जणु कोपच होत होता. आज तर ती खडूसपणाचाही कहर झालेली तिच्या तिथल्या स्टाफला दिसत होती. आजवर त्यांनी फक्त तिला ते नावच ठेवलं होत. पण आज तर तिच ते प्रत्यक्ष रुप बघून सर्वांनाच टेन्शन आल होत. कंपनीच्या त्या पूर्ण इमारतीमध्ये तिची अशीच ओळख होती.

अश्विनीने आज सकाळी घरातून निघताना चहा घेण्याव्यतिरीक्त दूसरा काहीच नाश्ता केला नव्हता. ऑफिसमध्येही आल्या आल्या कामाच्या नादात ती ऑफिसच्या कॅन्टीनमध्येही जायला विसरली. पण जेव्हा पोटाच्या भुकेने त्याची जाणीव करून दिली. तेव्हा मात्र तिचे काम करणारे हात थांबले आणि काहीतरी खायला म्हणून ती ऑफीसच्या कॅन्टीनला गेली. तिथे तिला तिच्या डिपार्टमेन्टचा काही स्टाफ दिसला. तिने निट पाहील तर ते दोघे हातात हात घालून मस्त त्यांच्याच धुंदीत निवांत बसले होते. त्यांना सकाळीच अस निवांत बसलेलं बघून तिचा राग अजूनच उफाळून आला. ती दोघांच्या मागे जाऊन उभी राहीली. तरी दोघांना ती आल्याची भनकही लागली नव्हती.

“कॅन्टीन स्टाफच्या सुविधेसाठी दिलेलं आहे.” अश्विनी कडक आवाजात बोलली. “ज्यांना सकाळी काही खायला जमत नाही किंवा ज्यांचे कुटुंब बाहेर आहे, त्यांना दूपारच जेवण मिळाव म्हणून हे दिलेल आहे. तुम्हाला जर फक्त बसून प्रेमाच्याच गप्पा मारायच्या असतील तर कायमचे बाहेर जा.”

अचानक आवाज आला म्हणून पहीले तर ते दोघेही दचकलेच. नंतर अश्विनीला बघून घाबरले आणि मान खाली घालून उभे राहीले.

“सॉरी मॅम.” रेवा बारीक आवाजात बोलली.

“सॉरी मॅम.” संतोषही तिच्याच सुरात हळूच बोलला.

“झाला असेल नाश्ता तर जाऊ शकता.” अश्विनीचा स्वर अजूनही कडकच होता. “बरीच काम राहिलेली आहेत.”

तसे ते दोघ पटकन तिथून बाहेर पडले.

“इतकही खतरूड नसाव माणसाने.” संतोष चालता चालता चिडून बोलला.

“हो, पण मग आपलही चुकलंच ना.” रेवा त्याला समजावण्याच्या सुरात बोलली. “इथे कामासाठीच येतो ना आपण.”

“मुळात ना, त्यांना प्रेम म्हणजे काय? तेच माहीती नाही.” संतोष अजूनही चिडूनच बोलत होता.

“त्यांना जर प्रेम समजलं नसत ना, तर स्टाफसाठी इतक्या सुविधा त्यांनी ठेवायलाच लावल्या नसत्या.” रेवा हलकेच हसत बोलली. “ऑफीसमधून घरी जायला जर कोणाला खूपच उशीर झाला ना, तर त्यांच्यासाठी ऑफीसची गाडी पाठवतात. तेही अगदी घरापर्यंत. या गोष्टीसाठी हेड ऑफिसला त्या भांडल्या होत्या.”

“मग प्रेम हा विषय काढला की काय होत त्यांना?” संतोष विचार करत बोलला.

“ते तर त्याच सांगु शकतात.” रेवा संतोषची फिरकी घेत बोलली. “तू जाऊन विचारतोस का?”

“नको गं.” संतोष घाबरला. “त्यापेक्षा कामाला लागुयात.”

मग ते दोघही त्यांच्या कामाला लागले. अश्विनीनेही त्या कॅन्टीनला फक्त टोस्ट सँडविच खाल्ले. त्यानंतर एक कॉफी घेऊन ती तिच्या कॅबीनकडे निघून आली. त्यानंतर तिचा पूर्ण दिवस कामामध्येच गेला. टोस्ट सॅन्डविच खाल्ल्यामुळे तिला दूपारचीही भूक लागली नव्हती. बाकीच्या स्टाफने तर दूपारच जेवण उरकून घेतलं होत.

साधारणतः चार वाजेच्या सुमारास अश्विनीला कॉफीची तलफ आली. थोड हात, पाय आणि मन ह्या तीनही गोष्टींना आराम देण्यासाठी ती परत कॅन्टीनमध्ये चालली गेली. कॅन्टीनकडे जात असताना तिला आईने दिलेल्या जेवणाच्या डब्याची आठवण आली. तसा तिने डोक्यालाच हात लावला. आता जर तो डबा तिने तसाच घरी नेला असता. तर तिला बरीच बोलणी बसणार होती. जे प्रत्येक आईच हक्काच शास्त्र असत. अशीही तिला आता जरा भूक पण जाणवायला लागली होती. म्हणून ती परत तिच्या केबिनकडे आली आणि तिचा तो डब्बा घेऊन कॅन्टीनकडे गेली. कॉफी घेण्याआधी तिने तो डबा संपवला. नंतर तिने कॉफी देखील घेतली.

आता एवढं सगळ पोटात ढकलल्यामूळे अश्विनीच पोट तुडुंब भरलं गेल. मग काय? कॅन्टीनकडे यायच्या आधी डब्याच्या विचाराने जो हात तिने कपाळाला लावला होता. तोच हात आता तिने तिच्या पोटाला लावला.

क्रमशः

अष्टपैलू लेखन स्पर्धा.

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all