Login

प्रतिक्षा फक्त तुझीच भाग ६

ह्या सगळ्यांना अस येताना बघून तो गांगरून गेला. ‘काकांनी पत्ता तर चुकीचा दिला नाही ना?’ हा विचार त्याच्या डोक्यात घुमायला लागला.
मागील भागात.

आज सकाळी अश्विनीला स्वतःहून जाग आली. तिला उठवायला नेहमी येणारी आई, आज एवढा वेळ झाला तरी आली नाही म्हणून अश्विनीला जरा ते वेगळचं वाटलं. म्हणून ती लगेचच तिच्या आईच्या खोलीकडे गेली. तिची आई आज अजूनही झोपलेलीच होती. तिला उठवायला म्हणून अश्विनीने तिला हात लावला तर तिचं अंग खूपच गरम लागल. आईला चांगलाच ताप भरल्याचे तिला समजले. तिने पटकन आईला उठवले. कांता मावशीच्या मदतीने तिचं थोडक्यात आवरलं आणि तिला पटकन दवाखान्यात घेऊन गेली.

आता पूढे.

आईला घेऊन जाणाऱ्या अश्विनीला कांता मावशी सांगून थकल्या की त्या तिच्या सोबत जातील. पण अश्विनीने त्याचं काहीच ऐकून न घेता स्वतःच आईला दवाखान्यात घेऊन गेली. अश्विनीने आधीच डॉक्टरांना फोन केलेला असल्याने त्या जश्या दवाखान्यात पोहोचल्या तस त्यांना आतमध्ये तपासायला घेण्यात आल. डॉक्टरकडून आईची तपासणी झाली. त्यांनी काहीच गंभीर नसल्याचे सांगीतल्यावर अश्विनीच्या जीवात जीव आला. ती एकच अशी होती जीने तिची साथ कधीच सोडली नव्हती.

तपासून झाल्यावर अश्विनीच्या आईने अश्विनीला जबरदस्ती ऑफिसला जायला सांगीतल. पहिले तर अश्विनी जायला तयार नव्हती. पण आईने डॉक्टरांचं बोलण तिला आठवून दिल्यावर ती आईला कांता मावशींसोबत पाठवायला तयार झाली. तिथून निघता निघताही अश्विनीने दोघींना खूप साऱ्या सूचना दिल्या. नंतरच ती ऑफिससाठी निघून गेली. एकवेळ तर अश्विनीच तिची आई असल्यासारखी तिला वाटली.

इकडे कंपनीत मात्र आजची ही संधी कोणीच सोडायला तयार नव्हते. कारण आज तर त्या कंपनीचे नुकतेच सीईओ म्हणून नियुक्त झालेला तो येणार होता. त्याच्यासमोर सगळ्यांनाच स्वतःची इमेज चांगली करायची होती.

आजच्या ह्या संधीचा फायदा उचलत आज त्या पूर्ण ब्रांचचा मुख्य मॅनेजर याला तिच्याविरुध्द खूप काही सांगायचा प्रयत्न करण्यात आला. पण त्याने अजून तिच्याविरुध्द एक अक्षरही काढलं नव्हतं. ती कशी होती? हे त्याला चांगलच माहिती होत. ह्या ऑफिसमधल राजकारणही त्याला नवीन नव्हत. त्या ऑफिसला जॉईन होऊन फक्त चार ते पाच वर्षात ती त्या ब्रांचच्या एका डिपार्टमेन्टची मॅनेजर झाली होती. तिची हीच प्रगती खूप जणांना खटकत होती. त्यात तिचा तो निष्टुर स्वभाव देखील याला कारणीभूत होता. तिचं जितका स्वभाव कडक होता. तसच तिचं कामही तसच कडक असायचं. सगळ अगदीच वेळेवर असायचं. कधी कधी तर त्या ब्रांचच्या मुख्य मॅनेजरच्याही चूका लगेच लक्षात आणून देत होती. त्यामुळे तिच्यापासून सगळेच वचकून असायचे.

तो यायची वेळ तर होऊन गेली होती. पण त्याचा अजून काहीच पत्ता नव्हता. त्याच्या उशिरा यायचं बाकी स्टाफला काहीच पडलं नव्हतं. फक्त तिच्या आधी तो इथे यायला हवा होता. जेणेकरून तिची पहिलीच भेट खराब होऊन येणारे पूढचे प्रोजेक्ट तिला मिळणार नव्हते.

पण नशीब नावाची पण गोष्ट असते की, जी नेहमीच साथ देईल अशी नसते. पुढच्या काही मिनिटातच ती त्या ऑफिसच्या बिंल्डिंगजवळ येऊन पोहोचली. तिला आलेलं बघून तिच्यावर जळणाऱ्यांनी दुःखाचा श्वास सोडला.

अश्विनी धावत पळतच तिच्या ऑफिसला पोहोचली. ती आजही नेहमीप्रमाणे सलवार कमीजवर आली होती. तिला कपड्यांसाठीची झगमग कधीच आवडलेली नव्हती. बाकी महीला तर पार्टीला जाताना घातले जाणारे कपडे घालून आल्या होत्या. तर काही मुलींनी खूपच छोटे कपडे घातले होते. त्यांच्या त्या झगमटापुढे अश्विनी खूपच साधी दिसत होती. पण तिची काम करण्याची पध्दत, वागण्यातला कठोरपणा आणि बोलण्यातला स्पष्टवक्तेपणा यामुळे तिच्यासमोर तिच्याविरुद्ध बोलण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती.

तिच्याविरुध्द त्या ऑफीसमध्ये बरेच राजकारण खेळलं गेल होत. पण तिच्या हुशारीपुढे प्रत्येक वेळेस ते चांगलच तोंडावर आटपलं होत. तिच्यासोबत इतके खेळ खेळून सुद्धा तिने कधीच कोणाविरुद्ध अस राजकारण केल नव्हतं. प्रगती करावी ती आपल्या हिमतीवर करावी, दूसऱ्यांना मागे खेचून नाही. या मताची ती होती.

“बघा ही महाराणी आताशी आली.” मनीषा त्यांच्या ब्रांचच्या मूख्य मॅनेजरच्या कानात बोलली. तस त्यांनी मनीषावर एक रागीट कटाक्ष टाकला. मग मात्र मनीषा तिचं तोंड वाकड करत शांत झाली.

थोड्याचवेळात एक छोटीशी गाडी त्या इमारतीच्या आवारात शिरली. तसे बाकीचे त्या गाडीकडे गोंधळून बघू लागले. कारण कंपनीचा सीईओ म्हटला तर तो अश्या छोटीश्या गाडीत येण शक्यच नव्हत.

ती गाडी त्या सगळ्यांच्या पुढ्यात येऊन उभी राहिली आणि त्यातून तो उतरला. गाडीतून उतरल्यावर त्याचीही नजर ह्या सर्वांवर गेली. मग तोही या सगळ्यांकडे गोंधळून बघू लागला. मग त्याने त्याच गोंधळात मागे वळून पाहिलं. तर मागे कोणीच नव्हत. त्याने परत त्या सगळ्यांवर नजर टाकली तर त्यातला एक माणूस त्याच्याकडे येताना दिसला.

त्याला गाडीतून उतरलेलं बघून बाकी तर जागेवरच उभे होते. पण त्या ब्रांचचा मुख्य मॅनेजर चेहऱ्यावर हलकचं स्मित ठेवत लगेच त्याच्याजवळ जायला निघाला. तसे त्याच्यापाठी बाकी सगळेही निघाले.

ह्या सगळ्यांना अस येताना बघून तो गांगरून गेला. ‘काकांनी पत्ता तर चुकीचा दिला नाही ना?’ हा विचार त्याच्या डोक्यात घुमायला लागला.

“वेलकम सर.” मुख्य मॅनेजर अदबीने बोलला.

तसा तो चमकून त्याला बघू लागला. ‘याला कसं समजल? मला कोणी ओळखू नये म्हणून मी ह्या छोट्याश्या गाडीत आलो.’

त्याच्याकडून काहीच प्रतिसाद न आल्याने तो मॅनेजर पुन्हा बोलला. “सर, वेलकम.”

तसा विचारात हरवलेला तो त्याच्या विचारातून बाहेर आला. “तुम्हाला कसं समजलं की तो मीच आहे?” त्याने बारीक डोळे करून विचारलं.

“ते सुहास सरांनी तुमचा फोटो आधीच पाठवला होता.” मुख्य मॅनेजर चेहऱ्यावर हलकचं स्मित ठेवत बोलला. “तुम्ही पहिल्यांदाच इथे येणार होते म्हणून.”

‘काका, मी साधा माणूस बनून येणार होतो ओ.’ तो मनातच चिडून बोलला. ‘सीईओ कधी साधा माणूस असतो का? आता तिच्याशी कस बोलू मी?’ तो मनातच भांडायला लागला. पण तस चेहऱ्यावर दाखवू न देता त्याने त्या मॅनेजरकडे बघून हलकचं स्मित केल आणि त्यांनी आणलेलं पुष्पगुच्छ स्वीकारलं.

मुख्य मॅनेजरने त्याच स्वागत केल्यावर बाकी स्टाफही लगेच त्याच्याजवळ जाऊन त्याच फुल देऊन स्वागत करू लागला. काही मुलींनी तर त्याची थेट गळाभेटही घ्यायचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र त्याने जरा चिडून त्यांच्यावर नजर टाकली. मग त्या लगेच बाजूला झाल्या.

अश्विनी मात्र नेहमीप्रमाणेच मागेच उभी राहिली. जिथे पुढे राहायचं असत, तिथेच ती पुढे जाऊन उभी राहत होती. ते आले म्हणून लगेच जाऊन त्याला मिठ्या मारणे, गळाभेट घेणे तिला आवडतच नव्हत. बाकी सगळ्यांनी त्यांची त्यांची भेटण्याची हौस फिटवल्यानंतर ती त्याला भेटण्यासाठी दोन पावलं पुढे आली. त्याला बघून तिला काहीतरी वेगळेच जाणवलं.

तो जसा बाकी घोळक्यातून मोकळा झाला तसा तो अश्विनीला स्पष्ट दिसला. तेव्हाच तिला समजलं की हा तो सीईओ नसून कोणीतरी दुसराच माणूस होता. मग त्याला बघून ती जागीच थांबली आणि त्याला रोखून बघत राहिली. पुढच्याच सेकंदाला त्याची नजरही तिच्यावर गेली आणि तोही स्तब्ध झाला. त्याने मनातच स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला.

“तू?” अश्विनी कपाळावर आठ्या पाडून मोठ्याने बोलली.

तसे त्याने त्याचे डोळे घट्ट मिटून घेतले.

क्रमशः

अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all