Login

प्रतिक्षा फक्त तुझीच भाग ८

तिला पडणारा ओरडा तिला ऐकायचा होता, त्यानंतर तिचं ते पाडलेल तोंडही बघायचं होत. म्हणून ती देखील हळूच अश्विनीच्या मागे मागे गेली. जशी अश्विनी त्या सीईओच्या केबिनमध्ये घुसली तशी सूप्त इच्छा पूर्ण होणार. या कल्पनेने मनीषा अजूनच उत्साहात आली
मागील भागात.

अश्विनीने तिच्या कॅबीनमध्ये आल्या - आल्या पहिले सुहास सरांना फोन लावला. दिल्लीला झालेल्या मिटींगमध्ये कंपनीच्या मुख्य ऑफीसमध्ये तिची चांगलीच छाप पडलेली होती. त्यावेळेस सीईओसोबत म्हणजेच सुहाससोबत अश्विनीच्या मोबाईल नंबरची देवाणघेवाणही झाली होती. त्यानंतर ते सीईओ झालेले होते. त्यांच फक्त नावच जरी जाहीर झालेलं होत. तरी अश्विनीची त्यांच्याशी आधीच चांगलीच ओळख झाली होती.

“सर, कोणाला पाठवलतं तुम्ही?” त्यांनी फोन उचलल्या उचलल्या त्यांच्या 'हॅलो' या शब्दाचीही वाट न बघता अश्विनी त्यांना वैतागून विचारू लागली.

आता पूढे.

“वाटलचं मला, तु मला फोन करशील ते.” सुहास हसतच बोलले. “बेटा तो आपलाच माणूस आहे. प्लिज त्याला सांभाळुन घे.”

बऱ्याच वर्षांनी तिच्या आईनंतर तिला कोणीतरी इतक्या प्रेमाने बेटा बोललेलं होत. त्यामूळे तिच मन लागलीच भरुन आल.

“हॅलो अश्विनी.” अश्विनीची काहीच प्रतिक्रिया न आल्याने त्यांनी परत अश्विनीला आवाज दिला.

“ठिक आहे सर.” अश्विनीने तिचे डोळे हलकेच पुसले. “पण मग त्याला सांगून ठेवा. उगाच माझ्या कामात लुडबुड करायची नाही.”

“अगं हो.” अश्विनीला लहान मुलीसारख बोलताना बघून सुहास यांना जरा हसायलाच आल. “तो ही कंपनीचा मुख्य भागच आहे. वेळ आली की त्याची ओळखही तुला करुन देईल. तोपर्यंत त्याला सांभाळ. त्या पूर्ण ऑफीसमध्ये किती राजकारण चालत ते तूला चांगलच माहीती आहे. त्यामुळे मी फक्त तुझ्यावरच विश्वास ठेवु शकतो.”

“हो बरोबर आहे, आजच त्याला बऱ्याच मुली चिपकण्याचा प्रयत्न करत होत्या.” अश्विनी तिचं तोंड वाकड करत बोलली. “त्याला कोणाच्याही जाळ्यात मी सापडू देणार नाही.”

“कोणाच्याही काय? तुझ्याच जाळ्यात अडकायची हौस आहे त्याला.” सुहास हलकेच सुस्कारा टाकत बोलले.

“काय?” ते हळूच बोलल्याने अश्विनीला काही त्यांच बोलण ऐकू आल नव्हत. म्हणून ती पुन्हा विचारू लागली.

“काही नाही, तो पटकन कोणावरही विश्वास ठेवतो.” सुहास स्वतःला सावरत बोलले.

“ठिक आहे सर.” अश्विनी आता नॉर्मल झाली. “पण कामाच्या बाबतीत तुमच्यासारखा ख…..” अश्विनीनने जीभ चावली. “म्हणजे स्ट्रिक्ट तर नाही ना?”

“बोल ना, खडूस बोल.” सुहास यांना अश्विनीच बोलण समजून गेल होत. “सगळेच मला त्याच नावाने बोलतात ना. मग आता तू ही बोल.”

“सॉरी सर.” अश्विनी हलकेच हसत बोलली.

“हो, तो कामाच्या बाबतीत खुपच कडक आहे. कामाच्या जागी काम आणि मस्तीच्या जागी मस्ती अस त्याच आहे.” सुहास त्याच कौतुक करत बोलले.

हे ऐकून अश्विनीच्या कपाळावर आठ्या आल्या. “त्यापेक्षा तुम्हीच आले असते ना?”

“नाही ना.” सुहास “मला पुण्याला जायचं आहे. म्हणून तर त्याला पाठवलं आहे.”

“ओके सर.” अश्विनीने फोन ठेवून दिला आणि एक दीर्घ श्वास घेतला. ‘त्याचा काय संबंध आहे सरांसोबत? जे तो कंपनीचा भाग आहे आणि नंतर ओळख करून देतो बोलले. आता त्याच आडनाव पण आठवत नाहीये. त्यावरून तरी काहीतरी हिंट मिळाली असती.’ फोन ठेवल्यावर ती एवढं सगळ मनातच बोलली. नंतर एक सूस्करा सोडत तिच्या कामाला लागली.

आता तिच्या डिपार्टमेंटची टिमही आली. पण ती अशी का वागली? हे तिला विचारण्याची हिम्मत कोणाचीही झाली नव्हती.

अश्विनी तिच्या कामाच्या विचारात असताना तिच्या कॅबीनच्या इंटरकॉमवर तिचा फोन वाजला. तशी तिच्या विचारांची तंद्री भंग पावली आणि तिने तो फोन उचलला. तिला त्यांच्या मुख्य मॅनेजरचा फोन आला होता आणि तिला त्यांच्या केबिनला बोलावून घेण्यात आल होत. आता तिला कशासाठी बोलावलं जात होत. ते तिला चांगलंच माहिती होत. पण तरी तिला त्याची भीती नव्हती. करणा तो सीईओ नव्हता हे तिला माहिती होत. त्यामुळे तिच्याविरुद्ध तो काही कारवाई करण्याची हिम्मत करणार नव्हता. तिने काही विचार केला आणि तिच्या केबिनच्या बाहेर पडली.

तिला सीईओच्या कॅबीनकडे जाताना बघून मनीषाच्या मनात खूपच उकळ्या फुटायला लागल्या. तिला पडणारा ओरडा तिला ऐकायचा होता, त्यानंतर तिचं ते पडलेलं तोंडही बघायचं होत. म्हणून ती देखील हळूच अश्विनीच्या मागे मागे गेली. जशी अश्विनी त्या सीईओच्या केबिनमध्ये घुसली तशी सूप्त इच्छा पूर्ण होणार. या कल्पनेने मनीषा अजूनच उत्साहात आली आणि त्याच केबिनच्या अवतीभोवती घुटमळू लागली.

“मे आय कम इन सर?” अश्विनी कॅबीनचा दरवाजा नॉक करत विचारू लागली.

“येस कम इन.” आतून आवाज आला. तशी अश्विनी केबिनमध्ये गेली.

“मला बोलावलत?” अश्विनी त्याच्याकडे सरळ दुर्लक्ष करत त्यांच्या मुख्य मॅनेजरला विचारू लागली.

‘काकांनी हिच्याबद्दल एकदम बरोबर सांगीतल. इतर मुलींसारखी नाही राहिली ही.’ तो मनातच विचार करत बोलला.

“तू सरांसमोरुन थेट वर का निघुन आलीस?” मुख्य मॅनेजर सौम्य भाषेतच बोलत होता. कारण तिच्याइतकी प्रामाणिक स्टाफ तिथे दुसरी कोणीच नव्हती. “किती बेजबाबदार वागणं होत तुझ? निदान तुझ्याकडून तरी ही अपेक्षा नव्हती अश्विनी.”

“सर ते काय झाल.” अश्विनीही सौम्य भाषेतच बोलायला लागली. “सकाळीच आईला दवाखान्यात घेऊन जाव लागलं होत. त्यामुळे माझा चहा नाश्ता काहीच झाला नव्हता. मग मला जरा चक्कर आली होती. म्हणून मी सरांची परमीशन घेऊनच वर निघून आली. हवं तर सरांना विचारा.” अश्विनीने त्याच्याकडे बघून डोळे वटारले.

‘आधीसारखीच आहे. मारकी म्हैस.’ तो मनातच बोलला होता. “हो, मला बोलली होती.” त्याने तिची बाजू सावरली.

तस तिच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित झळकलं. ‘नाही बोलून सांगेल कोणाला?’ ती मनातच त्याला बघून बोलली. तिकडे त्यानेही हलकीच नकारार्थी मान हलवली.

“अच्छा, मग आधीच सांगायचं ना.” मुख्य मॅनेजर आता काळजीने बोलले. “अजूनही बरं वाटत नसेल तर रेस्ट रुममध्ये जाऊन आराम कर.”

“नो थॅंक्स सर. नाऊ आय एम फाईन.” अश्विनी मंद स्मित करत बोलली.

“ठिक आहे,” मुख्य मॅनेजर “मग कॅन्टीनमध्ये जाऊन नाश्ता कर. नंतर काम कर.”

“ठीक आहे सर.” अश्विनीने अजूनही मंद स्मित करतच बोलली.

अश्विनीने त्याच्याकडे कडक नजर टाकली आणि तिथून बाहेर पडली. तिच्यामागे तोही लागलीच बाहेर आला. कारण तिला चक्कर आल्याच तर तिने खोट सांगितलं होत. पण ती तिच्या आईबद्दल कधीच खोट बोलत नव्हती. म्हणून तिच्या आईच्या चौकशीसाठी तो तिच्या पाठी लगेच निघाला होता. पण अश्विनी तोपर्यंत निघून गेली होती. ‘अरे पायाला भिंगरी लावली आहे काय?’ तो मनातच विचार करत राहीला. नंतर त्याच लक्ष तिथे घुटमळणाऱ्या मनीषावर गेली. जी त्याला पाठमोरी उभी होती.

अश्विनीला ओरडा पडला नाही म्हणून ती जरा नाराज झाली होती. त्या केबिनमधून बाहेर पडलेल्या अश्विनीला तिने आठ्या पाडून पहिले देखील होते. पण त्याचा अश्विनीवर काहीच परिणाम झाला नव्हता. उलट अश्विनी तिच्यासमोरच अशा कामाच्या वेळेस कॅन्टीनला गेली. ते बघून ती तिच्याच विचारात हरवली गेली.

“तुम्हाला काही काम नाहीये का?” तो कडक आवाजात बोलला.

मागून आलेल्या आवजाने मनीषा पहिले तर दचकलीच. मागे वळून पाहिल्यावर ती त्याला बघून अजूनच घाबरली.

क्रमशः

अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all