Login

प्रतिक्षा फक्त तूझीच भाग २५

‘अश्विनीने तिच्या काकुच्या भावाला नादाला लावलं?’ हा प्रश्न त्याला आता सतावू लागला. कारण ती अशी मुलगी तर नव्हतीच. त्यानंतर ती तिच्या काकुच्या भावाच्या समोर देखील आलेली दिसत नाही. तिच्यावरचा हा आरोपच त्याला सहन होत नव्हता. ही गोष्ट नक्कीच साधी नव्हती.
मागील भागात.

काही दिवसांनी तिच्या वडीलांच्या भविष्य निर्वाह निधी बाबत अश्विनीच्या आईला समजले. अश्विनीच्या वडिलांचे मित्र आणि त्यांची बायको त्यांना रस्त्यात भेटले असताना त्यांनी अश्विनीच्या आईच्या कानावर त्याबद्दल माहीती टाकली. तस त्यांच्या आधीच्या घरी त्याबद्दलच पत्र तर गेल होत. पण अश्विनीच्या त्या घरातल्या माणसांनी त्याबद्दल अश्विनी व तिच्या आईला काहीच कळवले नव्हते.

आता पूढे.

वडीलांच्या मित्राकडून या भविष्य निर्वाह निधीबाबत समजताच. अश्विनी लागलीच तिच्या वडिलांच्या ऑफिसवर गेली आणि लागणारी सगळ्या कागदपत्रांची माहीती घेऊन पुढच्या दोन ते तिन दिवसात ती त्यांच्याकडे जमा केली. ही गोष्ट जशी तिच्या आधीच्या घरी समजली. तसे तिचे काका – काकु आणि आत्या लगेच त्यांच्यासोबत गोड - गोड बोलायला लागले होते. त्यांच ते गोड बोलण ऐकून अश्विनीची आई तर लगेच विरघळून गेली होती. पण आता अश्विनी त्यांच्यासमोर ठाम उभी राहीली. असही तिला त्यांच्याकडुन तसूभरही माया कधीच मिळाली नव्हती. मग तिनेही ती दाखवणे बंद करून टाकले.

कागदपत्रे जमा केल्याच्या पुढच्या दोन दिवसातच ते सगळेच अश्विनीच्या मावशीकडे आले होते. त्यावेळेस अश्विनीने पाहिलं की तिच्या काकूचा भाऊ तर आला नाही ना? नंतरच तिने बोलायला सुरवात केली होती.

“हे बघा काका.” अश्विनीच्या आवाजात कडकपणा होता. “तुमच गोड बोलण कशासाठी आहे ते आम्हाला चांगलच माहीती आहे. तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मी कधीच काही मागितलं नाही आणि मला त्यात काडीमात्रही इंटरेस्ट नाही. पण जर माझ्याकडुन माझ्याच वडीलांच्या पीएफचे पैसे लाटायचा विचार जरी करत असाल ना. तर एकच लक्षात ठेवा. तुम्हाला मिळालेली संपत्ती ही वडिलोपार्जित आहे. ते तुमच्या वडिलांच्या पाचही भावांना माहिती नाही आणि त्यांचेही वारसदार आहेत. त्या सगळ्यांनाच गोळा करीन आणि ज्यावर तुम्ही मजा मारताय ना त्यातून तुम्हालाच कमी करेन.”

“बघा, एवढीशी पोर.” अश्विनीच बोलण तिच्या काकूच्या बरचं जिव्हारी लागलं होत. “कशी तिची जीभ चुरुचुरु चालवतेय. हेच शिकवलं का तुम्ही तुमच्या मुलीला?” अश्विनीच्या आईकडे बघत तिची काकु बोलली.

“हे तुम्ही बोलताय?" अश्विनी तिरकस हसत बोलली. "तुम्ही तुमच्या सासूसोबत कशा बोलत होत्या ते सांगू का?” अश्विनीनेही तिचा आवाज वाढवला.

आजवर अश्विनीच्या आईने अश्विनीला बऱ्याच वेळा बोलण्यासाठी आवरलं होत. पण आता सगळच सहनशक्तीच्या पलीकडे गेल होत. म्हणून ती देखील आता गप्पच बसली होती. कधी कधी समोरच्या लोकांना त्यांची जागा दाखवून देण ही तितकचं गरजेच असतं.

अश्विनीच्या या वाक्यावर ते सगळेच शांत झाले. शेवटी अश्विनीची अट त्या सगळ्यांना मान्यच करावीच लागली. दोघींना तिच्या वडीलांच्या पीएफची बऱ्याचपैकी रक्कम मिळाली. त्यातून त्यांनी भाड्याने एक घर घेतलं. काही रक्कम अश्विनीच्या एमबीएच्या फीसाठी काढून ठेवली. तस तिला कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचं होत. पण आता तेवढी फी गोळा करण शक्य नव्हतं आणि कोणाकडूनही तिने मदतीची अपेक्षाही केली नव्हती. बाकी राहिलेली रक्कम बँकेत व्याजावर ठेवून दिली. त्यातून दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळणार होती. ती घरखर्चाला पुरणार होती.

पैशाची चिंता जरी मिटलेली असली तरी नव्याने सुरवात करायची होती. त्यामुळे सुरवातीला जरा जास्तच पैसा खर्च झाला होता. अश्विनीच्या मावशी आणि काकांनी तर त्यांना लगेच दुसरीकडे घर घ्यायला मनाई देखील केली होती. पण अश्विनी आणि तिची आई त्यांना नम्रपणे नकार देत भाड्याच्या घरात रहायला आले.

पुढचं शिक्षण चालू होईपर्यंत अश्विनीने ती नोकरी केली. त्यातही तिला पुरुषांच्या किळसवाण्या नजरेचा, स्पर्शाचा सामना करावा लागला होता. एकदाचा पूढचा प्रवेश झाला आणि तिने लगेच ती नोकरी सोडली. आताच कॉलेज सकाळच्या वेळेत होत. म्हणुन तिने दुपारनंतरची वेगळी पार्टटाइम नोकरी शोधली.

लहानपणापासून घरातलं मुकलेलं प्रेम, घरच्याचं लोकांनी ठेवलेला अविश्वास, नोकरीवर आलेले वाईट अनुभव या सर्वांनी हसती - खेळती अश्विनी खूपच कडक स्वभावाची झाली. ती कॉलेज आणि नोकरी करुन रोज रात्री तिच्या आईच्या कुशीत रडत राहायची. तिच्या पार्टटाइम नोकरीचा पहीला पगार येईपर्यंत तो महीना काढणं खूपच जड गेल होत.

नंतर जसजसा पगार येत गेला, तसतसा त्यांच आयुष्य पूर्वपदावर यायला लागलं. आता अश्विनीच्या आईची तब्येतही वरचेवर खराब होत होती. तिच्या या परिस्थितीचा फायदा ही तिच्या जॉबवरच्या आणि कॉलेजमधल्या मुलांनी घेऊ पाहीला होता. पण तेव्हाची अश्विनी त्यांना पुरुन उरली होती. कॉलेजसाठी तर दुसरा पर्याय नव्हता आणि लगेच दुसरा जॉबही मिळणार नव्हता. कधी तिच एमबीए पुर्ण होत? अस तिला झालं होत.

तिच्यासाठी एक गोष्ट चांगली होती की तिच्या ह्या कॉलेजचे सर चांगले होते. त्यांनी अश्विनीला शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिची खूप मदत केली होती. जस की जॉबसाठी कॉलेजचची वेळ ॲडजस्ट करणे, महागातली पुस्तक तिला उपलब्ध करुन देणे. फी भरण्यासाठी सवलत देणे इ. ती अभ्यासात मुळातच हुशार होती. त्यामुळे ती एमबीए देखील खूपच चांगल्या मार्कांनी पास झाली होती. तिच्या याच मार्कांवर तिच्या सरांनी तिला या ईनामदारांच्या मोठ्या कंपनीत प्लेसमेंट करुन दिली होती. तेव्हापासून ती त्या कंपनीत प्रामाणिकपणे काम करत होती.

एवढं सगळ माहीती झाल्यावर नीरजला अश्विनीबद्दल अजुन अभिमान वाटायला लागला. आज तिच्याकडे जे काही होत, प्रशस्त घर, गाडी, महागडा मोबाईल, महागडे घड्याळ, घरात ब्रांडेड फर्निचर, इंटीरियर हे सगळेच तिने तिच्या मेहनतीने मिळवलं होत.

पण याचबरोबर आयुष्यात प्रेमही तितकचं महत्वाच होत याची जाणीव आता अश्विनीला करुन द्यायची होती. नीरजने त्याचा लॅपटॉप बंद केला आणि त्याच्याच विचारात तो झोपायला चालला होता. तेवढ्यातच एक विचार त्याच्या मनात चमकला.

‘अश्विनीने तिच्या काकुच्या भावाला नादाला लावलं?’ हा प्रश्न त्याला आता सतावू लागला. कारण ती अशी मुलगी तर नव्हतीच. त्यानंतर ती तिच्या काकुच्या भावाच्या समोर देखील आलेली दिसत नाही. तिच्यावरचा हा आरोपच त्याला सहन होत नव्हता. ही गोष्ट नक्कीच साधी नव्हती.

बेडवर पसरायला गेलेला तो आता परत उभा राहून त्याच्याच खोलीत येरझारा मारू लागला. सुहास यांनी पाठवलेल्या माहितीमध्ये त्यापुढे दुसरी कूठलीच माहिती नव्हती. याचा अर्थ ती गोष्ट लपवल्याची दाट शक्यता त्याला दिसून आली.

त्याने लगेच त्याचा तो दुसरा मोबाईल काढला आणि परत त्याच इंस्ट्रक्शन दिलेल्या माणसाला फोन लावून अश्विनीची काही माहिती मिळाली का? ते विचारू लागला. खासकरून अश्विनीच्या काकुच्या भावाची माहिती तत्काळ स्वरुपात काढायला लावली. त्याची ती रात्र त्याच विचारात जागली गेली. तिच्या मनातल्या भावना अडवायच कारण त्यात सुद्धा लपलं असल्याचं त्याला सतत वाटायला लागल.

दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे नीरज ऑफीसला पोहोचला. पार्किंगला तिची गाडी आधीच आलेली त्याला दिसली. म्हणजे ती आज त्याच्याही आधी ऑफिसला आली होती. मग त्याने एक सुस्कारा सोडला आणि त्याची गाडी लावून तो त्याच्या केबिनकडे जाऊ लागला. त्याच्या केबिनकडे जाताना तिची देखील केबिन रस्त्यात त्याला येत होती.

मग काय? तिच्या कॅबीनसमोरुन जाताना नीरज तिच्या कॅबीनमध्ये डोकावला.

“गुड मॉर्निंग फ्रेंड.” नीरज उगाच त्याची बत्तीशी दाखवून बोलला.

अचानक आलेल्या आवाजाने कामात असलेली अश्विनी जरा दचकलीच. तिने तिची खाली असलेली मान वर करून पाहिलं तर तिला नीरज दिसला.

“अंऽऽ” अश्विनी गोंधळून बोलली. “हा गुड मॉर्निंग सर. काही काम होत का?”

“नाही.” नीरज त्याची खांदे हलकेच उडवत बोलला. “म्हटल आपल्या फ्रेंडला भेटुया.”

“फ्रेंड?” अश्विनीच्या चेहऱ्यावर आठ्या पाडल्या.

क्रमशः

अष्टपैलू लेखन स्पर्धा.
कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all