Login

प्रवास एकटीचा भाग -3

प्रेम आंधळं असतं पण ते आपण कुठपर्यंत निभावू शकतो हे सर्वस्वी आपल्यावर असते


विषय - प्रेमकथा
स्पर्धा - राज्यस्तरीय करंडक कथामालिका स्पर्धा
शीर्षक - एकटीचा प्रवास भाग - 3 


किरण सकाळी लवकरच गावी पोहोचला . आजूबाजुला छान प्रसन्न थंड वातावरण होत . गावाकडची सकाळ म्हणजे दारापुढे सडा रांगोळी , पक्षांची कलरव , शाळेत जाणाऱ्या मुलांची लागलेली शर्यत , फुलांभोवती बागडणारे फुलपाखरे असे सगळे बघत बघत तो घराजवळ आला .
              
     थोडा घाबरतच घराच्या दरवाजापाशी येऊन थांबला . नेहेमीप्रमाणे घराचा दरवाजा उघडाच होता , सगळ्यांच्या स्वागतासाठी . पोहोचल्यावर पहिले प्रियाला मेसेज करून सांगितलं की घरी पोहोचलोय मी , नाहीतर उगाच काळजी करत बसायची ती .

     किरणला दारात पाहून आई किचनमधून बाहेर आली .
"अरे थांब थांब , तिथेच थांब तू ."

"ए काय ग आई ...!"

"अरे थांब की दारातच "

               आईने त्याच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि किरण घरात आला . आत येताच त्याने आईला कडकडून मिठी मारली .

"किती सुकलंय माझं पोरगं , जेवण बिवन करतोस की नाही तिकडे , की नुसतं कामच करतो ."

आल्या आल्या आई सुरू झाली .

आपलं पोरगं तब्येतीने कितीही चांगलं असलं तरीही प्रत्येक आईला आपल्या पोराकडे पाहून असच वाटत असतं .

     " काहीही काय बोलतेस आई , इतका चांगला तर दिसतोय मी ठणठणीत . हा मध्ये जरा पोट सुटलं होत माझं , म्हणून आता जिम लावलीये मी . त्यामुळे कदाचित थोडा बारीक झालोय , बारीक म्हणण्यापेक्षा मी व्यवस्थित फिट अँड फाईन झालोय ."

"चल काहीतरीच तुझं , कसलं फिट अँड फाईन . तोंड बघ कस माकडासारखं दिसायला लागलंय . सगळी हाडं दिसतायेत . आता आलाच आहेस तर चांगलं खाऊ पिऊ घालते तुला ."

"हो म्हणजे जातांना अजून चार पाच किलो वाढवूनच जाणार मी ." आणि दोघेही हसत हसत आत गेले .

"तात्या कुठे दिसत नाही आई , कुठं गेलेत ."

"अरे ते रानात गेलेय , येतील दुपारच्या जेवणापर्यंत ."

"तोपर्यंत तू फ्रेश हो आधी , मी नाश्ता बनवते तुझ्यासाठी . "

मागच्या अंगणात तांब्याच्या बंबात पाणी तापत होत . एका बाजूला रेडीओ लावलेला होता आईने , सकाळी सकाळी छान भावगीतं , भक्तिगीत गाणी ऐकत ऐकत कामं करायची तिची आधीची जुनी सवय अजूनही तशीच होती आणि तिची ही सवय मला सुद्धा लागलेली . सकाळ झाली की मी सुद्धा गाणी लावतो , हा पण आईसारखी जुनी नाही तर आजची गाणी ऐकतो . हेच जर आईच्या भाषेत सांगायचं झालं तर निव्वळ "धांगडधिंगा" . सवय एक पण आता प्रत्येकाची आवड वेगळी असणारच ना .

बंबातून येणाऱ्या पाण्याच्या वाफेमुळे समजले की पाणी तापलंय चांगलंच . कडकडीत पाण्याने आंघोळ करून फ्रेश झाल्यावर छान वाटत होतं , सगळा थकवा नाहीसा झाला .

           आईने मस्त गरमागरम वाफाळती पोह्यांची प्लेट समोर धरली . ते खाऊन पोट इतकं भरलं की बसल्या बसल्या डुलक्या घेत होता किरण . मग तिथेच जरावेळ एक झोप काढली , रात्री गाडीत झोप काही होत नाही म्हणून तिथेच बसल्या बसल्या डोळा लागला . दुपार कधी झाली ते कळलंच नाही .

फोनवर बोलत बोलत तात्या दुपारी घरी आले , त्यांचा आवाजच पुरेसा होता जाग यायला  .

"काय उठताय ना चिरंजीव , खूपच दमलेले दिसताय ."

तात्यांचा आवाज ऐकून किरण खाडकन उठून बसला .

"कधी आलास ??? "

"हे काय तासाभरापूर्वीच आलो , तुम्ही रानात गेले होते तेव्हा ."

"हम्मम्म , मळ्यात पाणी पाजायला गेलो होतो . ह्या वेळेस द्राक्षांची छाटणी जरा लवकर करावी लागेल . पावसाचा काही भरोसा नाही . नाहीतर नुकसान होईल खूप आपल्याला . त्यामुळे जरा लक्ष द्यावं लागतंय सारखं रानात जाऊन ."

तात्या दमून आलेले दिसतं होते खूप . किरणने उठून लगेच त्यांना पाण्याचा तांब्या हातात दिला . दुपारचा एक वाजत आला होता . भूक ही लागलेली होती खूप .

"वसुधा , ए वसुधा ..... वाढताय ना जेवायला ."

"हो हो , थांबा जरा वेळ गरम भाकरी वाढते ."

     तात्यांना जेवतांना भाकरी अगदी गरमागरम लागायची , म्हणजे ताट वाढलं की त्यात तव्यावरची भाकरी काढून द्यायची इतकी गरम . मग आई आधी ताट वाढायला घ्यायची आणि एकीकडे भाकरी करायला सुरुवात करायची .

      आम्ही दोघे बाप लेक आज सोबत जेवायला बसलो  . आईने मस्त भरलेली वांगी , आमटी भात आणि गरमागरम ज्वारीची भाकरी ताटात वाढली . मग काय रोजच्या पेक्षा चार घास जरा जास्तच जेवण झालं .

जेवण अगदी पोटभर झालं , उठायला ही येत नव्हतं इतकं जास्त . आईच्या हातची चव तिकडच्या हॉटेलच्या जेवणाला थोडीच येणार होती . तिकडे तर मेसच जेवण करून तोंडाची चव बिघडलेली पण आज मात्र मनसोक्त जेवण झालं .

"वाढू का रे आणखी एक भाकरी " , आईने पुन्हा विचारले .

"नको ग , पोट फुटेल आता माझं इतकं खाल्ल्यावर ." किरण हात धुवत बोलला .

"चल , काहीही काय बोलतोस . दोन भाकरी खाऊन कसलं पोट फुटतंय तुझं ."

        तात्या जेवण करून उठले आणि बाहेर सोफ्यात जाऊन बसले . जेवणानंतर त्यांचा आवडता पितळेचा पानाचा डबा घेतला , त्यातून सुपारी काढली आणि ती कातरु लागले . खाऊच्या पानाला आधी थोडासा चुना लावला मग कात घातली आणि कातरलेली सुपारी भरून पान तयार करून तोंडात घालणार त्याबरोबर बोलायला सुरुवात झाली .

"हे काय ऐकतोय मी ??? "

"का ... का .... काय तात्या ."
सुपारी कातरण्याचा करकर आवाज किरणच काळीज कापत होता . कारण तात्यांचा आवाज म्हणजे एकदम भारदस्त , ते काहीही बोलले तरी ओरडल्या सारखे वाटायचे .

"तू मुलगी शोधून ठेवलीस म्हणे ."

"ते तात्या , शोधली नाही मी काही . ऑफिसमध्ये आम्ही सोबत काम करतो , ती माझी चांगली मैत्रीण आहे ."

          "चांगलं काम करतोस की ऑफिसमध्ये , मैत्रिणी गोळा करण्याच . पण फक्त मैत्रीच ठेवा मग तुमच्यात . त्यापुढे जाण्याचा प्रयत्न देखील करू नका ."
तात्या त्यांच्या कडक आवाजात किरणला बोलत होते .

 "आणि मी सांगेन तेच करायचं , नोकरीसाठी गेलात ना तिकडे , मग फक्त तेच करा . इतर काही पाहू नका , आम्ही बघू तुमच्यासाठी काय ते . तुम्ही तसदी घेऊ नका त्याची इतकी . अजून जिवंत आहोत म्हटलं आम्ही .
काय , कळलं का ??? "

"हो ... हो तात्या ."

"मी काय म्हणते , एकदा बघून तरी ....... "

"काहीही बोलू नका तुम्ही , तुमची कामं आवरा आधी ."

          आई ही तिथेच उभी होती . पण तीच काही एक ऐकून घेतलं नाही . तिने बोलायचा प्रयत्न देखील केला , पण काही फायदा नाही झाला .

       ती सुद्धा खाली मान घालून ऐकत होती . तीच काही ऐकलं नाही तर आम्ही तर लांबच आहोत .

          किरण उदास मनाने नुसताच उभा होता . खूप चीड येत होती त्याला , पण तो बोलू शकत काही . तात्यांचा धाकच तितका होता सगळ्यांवर की अगदी आई सुद्धा घाबरायची त्यांना . त्यांच्यासमोर कोणाची बोलायची हिंमत व्हायची नाही . कडक शिस्तीचे गुरुजी म्हणून आख्ख्या गावात त्यांची ओळख होती .




सौं तृप्ती कोष्टी ©®
जिल्हा - सांगली , सातारा
0

🎭 Series Post

View all