Login

प्रवास एकटीचा भाग - 34

प्रेम आंधळं असत पण ते नात शेवटपर्यंत निभावण आपल्यावर असत


विषय - प्रेमकथा


प्रवास एकटीचा भाग - 34


लग्नाची केरळी पद्धत तर खूपच सुंदर होती , बघण्यासारखा सोहळा होता . आता किरण आणि प्रिया दोघेही फोटो काढून काढून खूप दमले होते . त्यादोघांना आता थोडा आराम पाहिजे होता म्हणून त्यांना आपापल्या रूममध्ये पाठवले . आता ते डायरेक्ट मराठी पद्धतीने लग्न करण्यासाठी तयार होऊनच येणार होते .

वेदीकाने प्रियासाठी घेतलेली नऊवारी साडी काढली . तिच्या रूममध्ये जाऊन तिला सगळा साज आणि साडी देऊन आली . मेकअप वालीला तिच्या लग्नातील फोटो दाखवला आणि सांगितले की असाच मराठी मेकअप कर म्हणून .

प्रिया तर लागली तयारी करायला , आता किरणला तयार करायचे होते . त्याला तयार करण्यासाठी सुधाकरला त्याचे लवकर आवरावे लागत होते , तो पटकन तयार झाला आणि किरणला मदत करू लागला . गडद हिरव्या रंगाचा सिल्कचा कुर्ता आणि त्याखाली मोती कलरचे सिल्कचे धोतर . गळ्यात मोत्यांची माळ , डोक्यावर टोपी आणि कपाळावर मोत्यांच्या मुंडावळ्या ... असा किरण आपला नवरदेव तयार झाला .

तिकडे प्रियाने गडद हिरव्या रंगाची नऊवारी साडी घातलेली . त्यावर दिलेले सगळे दागिने घातले आणि हातात हिरव्यागार काचेचा चुडा भरला . केसांचा सुंदर आंबाडा घातला आणि त्याला गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवले . बाजूने मोगर्याच्या फुलांचा गजरा लावला . तिकडे गजरे मिळतातच खूप सुंदर . सगळ्यांसाठी खास एक गजरेवाली बोलावली होती . तिने प्रत्येकीला दोन दोन गजरे तयार करून दिले .

मराठी पद्धतीने लग्नाची तयारी करायला सुधाकर आणि तात्या उभे होते . सगळं काही झाल्यावर किरण आणि प्रियाला बोलवण्यात आले .

प्रिया त्या नऊवारी साडीत अतिसुंदर दिसत होती . किरणला तर काय बोलू आणि काय नाही असे झाले होते , तो फक्त बघतच बसला होता तिच्याकडे .

वेदीकाने दिलेले सगळे दागिने घातले आणि तिचे आधीचे दागिनेही होतेच गळ्यात त्यामुळे तिचा गळा अगदी भरगच्च दिसत होता . कपाळावर चंद्राची कोर आणि नाकात मोत्याची नथ घातल्या मुळे आणखीनच सुंदर दिसत होती प्रिया . सगळी तयारी झाल्यावर आता प्रियाच्या कपाळावर मुंडावळ्या सुद्धा बांधल्या होत्या नाजूक मोत्यांच्या .

दोघांना स्टेजवर बोलवण्यात आले , एकमेकांची नजरानजर झाल्यावर दोघेही भारावून गेले होते . हातात हात घेऊन स्टेजपर्यंत चालत जात दोघेही एकमेकांनाच बघत होते . वेदीकाने मागून सांगितले पुढे बघा म्हणून , तेव्हा कुठे ते भानावर आले .

स्टेजवर त्यांच्या मागे मामांना उभं केलं . दोघांच्या बरोबर मध्यभागी अंतरपाट धरले आणि तात्यांनी मंगलाष्टके म्हणायला सुरुवात केली . वेदीकाने घरी तयार केलेल्या लाल पिवळ्या अक्षता सगळ्यांना वाटल्या . त्या सगळ्यांनी नवरदेव नवरीच्या दोघांच्या अंगावर टाकायच्या म्हणून प्रत्येकाला सांगण्यात आले .

मंगलाष्टके पूर्ण झाली आणि सुधाकरने किरणला उचलून घेतले . प्रिया आधीच उंचीने कमी असल्यामुळे तिला वरमाला घालायला जमत नव्हते . प्रियाचे भाऊ धावत तिच्या मागे आले आणि दोघांनी तिला उचलून घेत किरणच्या गळ्यात वरमाला घातली . एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन दोघांनी एकमेकांचे हसत हसत अभिनंदन केले .

          आता खाली पूजेची तयारी केलेली होतीच . किरणने पहिले तिला मंगळसूत्र घातले आणि तिच्या भांगेत कुंकू भरले . त्यानंतर बाकीचे आणखी दुसरे घेतलेले दागिने पण घातले . वेदीकाने जाऊन तिच्या पायात जोडवी घातल्या . प्रिया तर आता पूर्णपणे मराठी मुलगी दिसत होती . तिच्या मम्मी पप्पांना आणि इतर नातेवाईकांना हे मराठी पद्धतीने लग्न खूप आवडले .

      वेदीकाने दोघांची उपरण्याने गाठ बांधली . सप्तपदी पण लगेच करून घेऊ म्हणून छोटासा होम केला आणि त्याभोवती पाटावर सात सुपाऱ्या मांडल्या . प्रत्येक फेरा पूर्ण करत एक एक सुपारी बाजूला करत दोघेही अग्नीच्या साक्षीने सात फेरे आणि हातात हात घेऊन एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन घेत होते . प्रत्येक फेऱ्याच महत्व आणि त्यामागचा अर्थ तात्या माईकवर सगळ्यांना हिंदीतून सांगत होते .


हे लग्न पण खूप सुंदर पद्धतीने झाले , सगळ्यांना खूपच आवडले हे . सगळे आपापल्या फोनमध्ये व्हिडीओ काढत होते . प्रियाचे सगळे नातेवाईक तात्यांजवळ येऊन खूप छान केले अस त्यांना सांगत होते .

प्रियाला ही खूप आनंद झालेला , तिला हे सगळं नवीन होत . लग्नानंतर दोघांनी थोरा मोठयांचा जोडीने वाकून नमस्कार केला .

आता बाकी होता तो फक्त उखाणा , वेदीकाने तिच्या कानात हिंदीतून उखाणा सांगितला होता . तोच तिने कसाबसा म्हंटला .

" माथेपे बिंदी और हरी चुडीया , किरण के साथ गुजरे जीवन की घडिया "

तिने हा उखाणा माईकवर घेताच टाळ्यांचा कडकडाट झाला .

आता सगळे पाहुणे मंडळी जेवायला बसली होती . संध्याकाळचे सात वाजून गेले होते , त्यामुळे ज्यांचे लहान मुलं आहेत ते सगळेच जेवायला निघाले . बाकीचे फोटो काढण्यासाठी स्टेजवर गर्दी करू लागले .

थोडा वेळ मोकळा मिळाला की लगेच फोटोग्राफरने त्यांना बाजूला नेऊन खूप छान छान पोज मध्ये त्यांचे फोटो काढून घेतले . आई आणि तात्यांना बोलवून किरणने त्यांच्यासोबत पण बरेच फोटो काढले , फक्त त्यादोघांचे ही फोटो काढून घेतले कारण ते कधी जोडीने फोटो काढायला उभेच राहायचे नाही . पण आता चांगला चान्स होता त्यामुळे घेतले काढून . सुधाकर आणि वेदिका ही तयार होते फोटो सेशन साठी . त्यांची ही सगळी हौस पूर्ण झाली .

   ह्या फोटोच्या भानगडीत खूप वेळ होऊन गेला होता . किरण प्रिया स्टेजवर मस्त एकमेकांसोबत गप्पा मारत बसलेले होते . इतक्यात प्रियाच्या बहिणींचा घोळका तिथे आला आणि त्याच्या भोवती जीजू जीजू करून बोलू लागल्या . जास्तकरून इंग्लिश मध्येच बोलत होत्या सगळ्या कारण हिंदी पण कोणाला जास्त येत नव्हती , जी येत होती ती सुद्धा तोडकी मोडकी येत होती . पण इंग्लिश मात्र एकदम फाडफाड बोलत होत्या सगळ्या .

        आई तात्यांना किरण आणि प्रियाला बघून खूप समाधान वाटत होते . त्यांच्या दोन्ही मुलांचे लग्न खूप छान पार पडले होते . आणि दोघेही खूप आनंदी होते त्यांच्या संसारात , घरी गेल्यावर त्यांनी पुजा करायचे ठरवले किरण प्रियाच्या हाताने .

      आता खूप भूक लागलेली होती सगळ्यांना , पाहुणे मंडळी सगळी जेवून बसली होती . त्यामुळे आता फक्त घरातले बाकी होते . त्यांना सगळ्यांना एका मोठ्या गोलाकार टेबलवर केळीच्या पानात जेवण वाढले .

    केळीच्या पानात जेवायला आईला खूप आवडले होते . सगळे पदार्थ खूपच चवदार बनलेले होते . किरण प्रियाने दोघांनी एकमेकांना पहिला घास भरवला आणि जेवण केले . दोघांचे तसेही पोट भरलेलेच होते ... आनंदाने . त्यामुळे दोघेही काही जास्त नाही जेवले .



सौं तृप्ती कोष्टी ©®
जिल्हा - सांगली , सातारा


🎭 Series Post

View all