Login

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -४६

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!

प्रीती.. पर्व दुसरे!

भाग -छेचाळीस.

"जर मी तिला आत्ता विचारेन, तर ती कदाचित होकार देईल. माझ्यात गुंतत जाईल.नंतर माझा ट्रेनिंग पिरेड असेल तेव्हा तिथे तिच्या आठवणीने मी आणि इकडे ती होरपळत राहू. त्यापेक्षा सगळं आटोपले की मगच बोलेन. एका हातात नवे जॉईनिंग लेटर आणि दुसऱ्या हातात माझ्या प्रेयसी कम बायकोचा हात असेल. कसा वाटला हा प्लॅन?"

"हम्म! तसा ओके ओके आहे. पण तुझे सर्व ठरले आहे तर मला कशाला विचारतोस? चल निघते मी राधाई वाट बघत असेल." ती कार अनलॉक करत म्हणाली.

"प्रीती.."

त्याच्या अलवार हाकेने ती शहारली. "नीट जा आणि पोहचली की कॉल किंवा मेसेज कर. बाय." फार्मल बोलून त्याने तिला बाय केले, तिनेही बाय करून कार तिच्या बंगल्याच्या दिशेने वळवली.

******

रात्रीचे टिपूर चांदणे पडले होते. प्रीती खिडकीतून बाहेर बघत होती. चंद्राची शीतलता तिच्या काहूर माजलेल्या मनाला थंडावा देण्याचा असफल प्रयत्न करत होती.

"दी, मला ना ते कृष्णासर फार आवडलेत." तिच्याजवळ येत निकी म्हणाली.

"निकी?"

"म्हणजे मला जीजू म्हणून चालतील ते."

"वेडी आहेस का? काही काय बोलतेस?" प्रीतीने तिला एक फटका दिला.

"नो दी. त्यांच्या डोळ्यात कधी बघितलेस का? तुझ्यासाठीचे प्रेम किती ओतप्रोत भरून आहे? आणि तुझ्याही डोळ्यात ते दिसतेच की."

"निकी, असे काही नाहीये गं."

"दी, मी तुझ्यापेक्षा लहान असले, तरी प्रेमाचा अनुभव माझ्या गाठीशी आहे बरं का. मला बरोबर कळतं कोणाच्या मनात काय आहे ते."

"ठीक आहे, आजीबाई. जा झोप आता नाहीतर मी मामांना सांगेन."

प्रीतीच्या धमकीने निकी तिच्या खोलीत व्हीलचेअर घेऊन पळाली.

*****

'किती समजदार आहे कृष्णा? माझा किती विचार करतो. त्याचा विचार करायला मग मला काय हरकत आहे? तसाही मला तो आवडतोच की. त्याच्या प्रेमात पडलेय मी, हेही तितकेच खरे आहे. मग तो जसा त्याच्या भावना व्यक्त करतो, ते मला का जमत नाही?'

विचाराच्या गर्तेत असताना मेसेज ट्यूनने तिला त्यातून बाहेर काढले.

'वेडूली, जास्त विचार करू नकोस. आता शांत झोप. उद्याची मिटींग तुला यशस्वी करायची आहे ना? मग त्यासाठी उद्या तुझे फ्रेश दिसणेही महत्त्वाचे आहे. तेव्हा आता झोपायचं, ओके? गुडनाईट!'

कृष्णाच्या मेसेजने तिच्या ओठावर मोठी स्माईल आली. तिने उद्याच्या विचारात बेडवर अंग टाकले.त्याचे विचार मात्र मनातून जात नव्हते.

'तो केवळ आयपीएस एक्झाम क्रॅक केली हे सांगायला इथे आला होता, माईशी माझ्याबद्दल बोलायला आला होता की आणखी काही? त्याने एका केसचा उल्लेख केला होता पण त्याबद्दल तर काहीच बोलला नाही.'

'जाऊ दे, सांगायचे तेव्हा तो सांगेलच. प्रीती मॅडम,आता जास्त विचार करत राहिलात तर परत त्याचा मेसेज यायचा. त्यापेक्षा झोपलेलं बरं.' तिने अलगद डोळे मिटले.


इकडे कृष्णादेखील तिच्या विचारात हरवला होता. त्याला दुपारी केबिनमध्ये बघून तिला झालेला आनंद, तिने अचानक मारलेली मिठी, सोनियाला बोललेले जाणून घेण्यासाठी केलेले लुटपुटीचे भांडणआणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर उमटलेले लज्जेचे भाव..! सारे काही जसजसे त्याला आठवत होते, त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित उमटत होते.

'इथे कशाला आलोय हे तिला सांगायला हवे होते का? खरं तर तिला सांगायला म्हणूनच तर तिच्या ऑफिसला गेलो होतो. उद्या तिला सोबत घेऊनच माझ्या मिशनवर जाण्याचा प्लॅन होता पण उद्याच तिची महत्त्वाची मिटिंग असल्याने सांगू शकलो नाही. तिला हे कारण पटेल ना?' त्याच्या डोक्यात प्रश्न पडला होता.

'नाही पटले तरी मी जेव्हा तिला हे सरप्राईज देईल तेव्हा ती नक्कीच खूष होईल.'

ओठावर स्मित घेऊन त्याने डोळे मिटले.

******


ओठावर लिपस्टिक फिरवून तिने पुन्हा एकदा आरशात नजर टाकली.

'परफेक्ट!' मनाने हिरवी झेंडी दाखवली आणि ती स्मितवदनाने खोलीबाहेर आली.


"प्रीती! कसली गोड दिसते आहेस गं. थांब मला आधी तीट लाऊ दे." राधामावशी तिला काजळ लावत म्हणाली.


आज प्रीती खरंच खूप आकर्षक दिसत होती. ती आज मुद्दामहून साडी नेसली होती. सोनेरी रंगाची काठ असलेली फिकट गुलाबी रंगाची साडी, त्यावर साजेसे असे कानातील स्टड, गळ्यात छोटूसे पेंडन्ट असलेली नाजूक चैन आणि चेहऱ्यावर हलकासा मेकअप. गुलाबी रंगात ती गुलाबाची कळी अगदी खुलून दिसत होती.

रात्री उशिरा झोपी गेली तरी लवकर उठून तिने आपले वेळेत आवरले होते.


"अगदी सोनासारखीच दिसतेस." तिला बघून विरेन म्हणाला.

"दिसणारच. शेवटी तिचीच लेक ना मी?" डोळे मिचकावत ती हसून म्हणाली.

"बरं, राधाई मी माईला भेटते आणि लगेच निघते."

"आणि नाश्ता?" राधामावशी.

"अगं हॉटेलमध्ये सगळं शेड्युल अरेंज्ड आहे, काळजी करू नको."

"ते मला ठाऊक नाही. तू सोनियाला भेटून लगेच ये, मी नाश्ता तयार ठेवते." राधामावशी.

"बरं" म्हणून प्रीती सोनियाच्या खोलीत गेली.


"माई, बघ. तुझी लेक आज तुझी जागा घेऊन मिटिंगमध्ये प्रेजेंटेंशन देणार आहे. खरं तर मला हे नकोय गं माई. सोनप्रीतमध्ये तुझ्या ठिकाणी मी कोणालाच इमॅजिन करू शकत नाही, अगदी स्वतःलाही नाही. ही मिटिंग इम्पॉर्टन्ट आहे म्हणून. पण हे शेवटचं हं. यापुढे मला हे असे नाही जमणार. माई, आय वॉन्ट यू बॅक. मला तू परत हवी आहेस. अगदी पूर्वी होतीस तशी हवी आहेस. प्रेजेंटेशन असले की तू नेहमी नेसतेस म्हणून मीसुद्धा तुझ्यासारखी पिंक साडी नेसलेय. मामाही म्हणाले की मी अगदी तुझ्यासारखी दिसते. पण माई, मी म्हणजे तू नाही होऊ शकत ना गं? आपल्या सोनप्रीतची तुझी कामं तुलाच करावी लागतील, मला नाही जमायचं ते."


डोळ्यातील अश्रुंचा बांध थोपवून धरत प्रीती बोलत होती. तिने हलकेच सोनियाच्या पायाला स्पर्श केला आणि मग आशीर्वादासाठी तिचा हात आपल्या डोक्यावर ठेवून ती बाहेर आली.


कार चालवताना प्रीतीची नजर कृष्णाने दिलेल्या गणेशमूर्तीवर पडली. 'बाप्पा, सर्व सुरळीत पार पडू दे.' तिने मनातच देवाला आवळले.

हॉटेलमध्ये ती वेळेच्या अर्धा तास आधीच पोहचली. मिटिंगसाठी बुक केलेल्या हॉलमध्ये ती प्रवेशली तेव्हा तेथील नजरा तिच्याकडे वेधल्या होत्या.


मिहीरने तिला पाहिले आणि तो पाहतच राहिला. तिची ती डौलदार चाल, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि गुलाबी साडीतील उठून दिसणारे सौंदर्य बघून त्याचे मन भूतकाळात गेले. सोनियाला तो पहिल्यांदा भेटला तेव्हा तीही अशीच तर होती, आत्मविश्वासाने परिपूर्ण अशी! आणि अंगावरील ती गुलाबी साडी तिच्या सोज्वळ रुपाला आणखी खुलवत होती.


"गुडमॉर्निंग अंकल!" त्याला असे एकटक पाहताना बघून प्रीतीने त्याला ग्रीट केले.

"गुडमॉर्निंग डिअर! तुला बघितले आणि सोनियाच डोळ्यासमोर उभी आहे असा भास झाला." तो बळेच हसून म्हणाला. त्याला दाखवायचे नव्हते पण डोळ्यातील तरळणारा थेंब प्रीतीला दिसलाच.

"नेक्स्ट प्रेजेंटेशनला तीच इथे असणार, डोन्ट वरी." ती म्हणाली. "आणि येताना माईचे आशीर्वाद मी घेऊन आलेय तेव्हा त्या रूपाने ती इथेच आहे असे समजायला आपल्याला हरकत नाही ना." ती हळवे होत म्हणाली.


"येस! बरं, पंधरा मिनिटांनी मिटिंग सुरू होईल. तुझे काही प्रीप्रेशन बाकी असेल तर तुझ्या रूममध्ये जाऊन बघून घे आणि शार्प पंधरा मिनिटांनी इथे ये." तो.

तिने मान डोलावली आणि ती तिच्या स्पेशल खोलीत गेली.

*****


"साहेब, कालपासून तुमची ही दुसरी फेरी आहे. मोठे साहेब नाहीतच तर मग तुम्हाला आत कसं सोडायचं ना? आणि तुम्ही कोण आहात हेसुद्धा तुम्ही मला सांगत नाही आहात मग कसं आत पाठवायचं?" एका मोठ्या बंगल्याच्या गेटवर उभा असलेला गार्ड कृष्णाची वाट अडवून बोलत होता.


"अच्छा, म्हणजे तुमच्या साहेबांना भेटायला येणारा प्रत्येकजण तुम्हाला सगळं डिटेल्स सांगूनच आत जातो होय? साहेबांचे तुम्हीच बॉस वगरे आहात की काय?"


"तसे नाही हो साहेब. पण महिन्यापूर्वीच मी इथे कामाला रुजू झालोय. पहिलीच नोकरी आहे. ओळख न सांगताच असं कोणाला आत पाठवत गेलो तर माझी नोकरी जाईल ना? आणि मला पैशांची गरज आहे हो. नोकरी सुटलेली परवडायची नाही मला." गार्ड म्हणाला.

"मी इन्स्पेक्टर आहे. आता तरी जाऊ द्याल ना?"

"पोलीस? काय झालं साहेब? आमचे साहेब तर खूप चांगले आहेत, मग पोलीस इथं कशापायी?" तो घाबरून म्हणाला.


"मी पोलिसात आहे, हे फक्त तुला माहितीये ओके? आता आत जाऊ की दाखवू तुला पोलिसी खाक्या?"

शर्टच्या बाह्या वर करत कृष्णा म्हणाला.


"अहो, साहेब खरंच घरात नाहीयेत. काल ते मुंबईला होते. रात्री परतले आणि आता अर्ध्या तासांपूर्वीच बाहेर गेले. दोनेक तासांनी येतील बहुतेक." हात जोडून तो.

"आणि त्यांची मुलगी?"

"छोट्या मॅडम तर साहेबांच्या आधीच बाहेर गेल्या. त्या काही सायंकाळशिवाय परतायच्या नाहीत."

"खरं सांगताय ना?"

"देवाशप्पथ! आणि मी का खोटं बोलू ना?" तो.

"ठीक आहे. मी दोन तासांनी परत येतोय. त्यांच्या कानावर मात्र काही घालायचं नाही, कळलं ना? नाहीतर तुम्ही सरळ लॉकअप मध्ये असणार."तिथून निघत कृष्णा म्हणाला.

******


"गुडमॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम!" प्रीतीने सुरुवात केली तसे कॉन्फरन्स हॉलमध्ये असलेले सगळे लक्ष देऊन ऐकायला लागले.

"टुडे वी आर गॅदर हिअर फॉर सम स्पेशल पर्पज.. " तिचे आत्मविश्वासाने प्रेजेंटेशन सुरू होते आणि तिथे बसलेले प्रत्येकजण तिच्या शैलीने भारावून गेले होते. प्रेजेंटेशन संपले तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव होते.


".. अँड धिस इज ऑल! इफ यू आर इंटरेस्टेड टू वर्क विथ सोनप्रीत, सोनप्रीत नेव्हर डिसअपॉइंट्स यू. इफ एनी क्वेरीज, प्लीज आस्क." तिथे असलेल्या सर्वांवर नजर ती फिरवत बोलत होती.

बोलता बोलता तिची नजर मागच्या लाईनमध्ये असलेल्या एका चेहऱ्यावर खिळली आणि…


आणि पुढे काय? वाचा पुढच्या भागात.


क्रमश:

पुढील भाग लवकरच!

©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.

********

फोटो गुगल साभार.


🎭 Series Post

View all