Login

प्रीती.. पर्व दुसरे! भाग - ४८

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!


प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -अठ्ठेचाळीस.

"सॅम, मला त्याला असे दुःखी नाही रे बघवत. तुला आज मी घरी घेऊन जाणार होते. आपल्याबद्दल सांगणार होते. त्याला जेव्हा सांगेन की त्याची लाडकी प्रेमात पडलीय, ती लग्न करणार आहे तर तो केवढा हॅपी होईल. मला आजच्या दिवशी तो दुःखी न दिसता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा आहे, म्हणून हा सगळा खटाटोप." ती हळवी झाली होती.
त्याने उठून तिला मिठी मारली.

"सॅम तू येशील ना घरी?" तिच्या डोळ्यात पाणी होते.

"इतकी बबली गर्ल असलेल्या तुझ्या आयुष्याची ही बाजू मला माहीतच नव्हती गं. मी येईन, नक्की येईन." तिच्या पाठीवरून हात फिरवत तो म्हणाला.

"आय लव्ह यू सॅम!" तिचा स्वर भिजला होता.

"लव्ह यू टू डिअर." तिच्या कपाळावर किस करत तो.

*****

प्रीतीने डोळे उघडले आणि ती उठायला गेली, तसे सलाईन लावलेल्या तिच्या हाताला झटका बसला.

"आँऽऽ.." ती वेदनेने कळवळली.

"प्रीतीऽऽ" तिचा आवाज ऐकून मिहीर तिच्याजवळ आला.

"अंकल, हे काय आहे? ही सलाईन अँड ऑल..?" ती विचारत होती.

"प्रीती, हे तर मला विचारायला हवे ना? काय चाललंय तुझं? अचानक चक्कर येऊन पडलीस. बरं झालं कुठे लागले नाही ते. किती गं हा हलगर्जीपणा? तुझा बीपी एकदम डाउन झाला होता. आपण आपल्या फूडप्रॉडक्टची मार्केटिंग करतोय आणि तू स्वतःच्या खाण्यापिण्याची आबाळ करायचीस, हे कुठल्या तत्वात बसतं?" मिहीर बोलत होता.

"अंकल, तुम्ही मला रागावताय?" ती ओठांचा चंबू करून म्हणाली.

"नाही, ते फक्त तुझी माईच करू शकली असती. मी तर तुला केवळ समजावू शकतो. प्रीती, यू आर फ्युचर ऑफ सोनप्रीत. प्लीज टेक केअर ऑफ युअरसेल्फ." त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल काळजी आणि प्रेम स्पष्ट दिसून येत होती.

"सॉरी अंकल." तिने एका हाताने आपले कान पकडून इवलुशा चेहऱ्याने म्हणाली.
त्याने किंचित हसून तिचे नाक ओढले.

"अंकल आपली मिटिंग?"

"ती मी पुढे ढकललीय."

"ओह, सॉरी. माझ्यामुळे.."

"प्रीती,डोन्ट बी सॉरी. तू आणि सोनिया कंपनीच्या आधी आहात हे विसरू नका." त्याच्या डोळ्यात उगाचच पाणी जमा झाले. "तसेही डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितले आहे, त्यामुळे तू टेंशन घेऊ नकोस." डोळ्यातील अश्रुंना आवरत तो पुढे म्हणाला.
त्याच्या मनाची अवस्था प्रीती समजू शकत होती. तिने त्याच्या हातावर हात ठेवला आणि एक छोटेसे स्मित केले.

"अंकल, मिटिंगसाठी जे गेस्ट होते, त्यांची लिस्ट मिळेल का?" तिला मघाशी नजरानजर झालेला चेहरा आठवला. पाच मिनिटांनी ती बोलती झाली.

"पुन्हा तेच? सोड ना तो विषय आणि आज बोनस जाहीर करायचा होता हे आठवतेय ना?"

"ते बरे विसरेन मी? बट अंकल, प्लीज मला ती लिस्ट दाखवा ना." ती म्हणाली.

"तू कधीतरी हार मानली आहेस का?" तिच्यासमोर लॅपटॉप ठेवून त्यात आजचे डिटेल्स दाखवत तो म्हणाला.

तिने त्याच्याकडे एकवार हसून पाहिले. सगळ्यांची नावे वाचताना तिला हवे असलेले नाव दिसले.
'मिस्टर मोहन पाटील. एसएम ग्रुप्स अँड कंपनी.'
तिच्या नजरेने त्याच्या नावासोबतच त्याचा पत्तादेखील टिपला. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलायला लागले होते.

"अंकल, आपण बोनस जाहीर करणार होतो ना, तो करूयात." ती.

"तू आधी आराम कर. नंतर ऑफिसला गेलो की मग बोलूया."मिहीर.

"अंकल, ऑफिसला जायची गरज नाहीये." तिने बोलता बोलता गुगल मीट अरेंज केली आणि संपूर्ण स्टॉफला जॉईन व्हायला मेसेज केले.

"हॅलो डिअर्स, आज आपल्या सोनप्रीतच्या सर्वेसर्वा सोनिया मॅमचा वाढदिवस आहे. त्यांनी सोनप्रीत उभारले असले तरी तुमच्या सर्वांच्या सहकार्याशिवाय ही प्रगती शक्य नव्हती. म्हणून आज खास वाढदिवसानिमित्त आम्ही बोनस जाहीर करतो आहोत. प्रत्येकाच्या अकॉउंट मध्ये अर्ध्या तासात ती रक्कम जमा होईल."

"मॅम, किती परसेंट?" एका मेम्बरने विचारले.

प्रत्येकाला त्यांच्या पेमेंटच्या हंड्रेड परसेंट रक्कम जमा होईल."

"या महिन्यात एकदम डबल पेमेंट!" कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. प्रीतीचेही ओठ उमलले. लॅपटॉप बाजूला ठेवून तिने मिहीरकडे नजर टाकली.

"प्रीती? हंड्रेड परसेंट बोनस? अशाने तर कंपनीचे दिवाळे निघायचे." मिहीर हसला.

"अंकल सोनप्रीतचे दिवाळे कधीच निघणार नाही. इतके सेन्सिबल स्टॉफ आपल्याकडे असताना हे शक्यच नाही." ती स्मित करून म्हणाली.

"बरं अंकल, मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाऊन येतेय."

"नो प्रीती, तुला आरामाची गरज आहे. तुला मी जाऊ देणार नाही. तुला आणखी काही झाले तर पुढे सोनियाला मी काय उत्तर देऊ?" मिहीर हळवा झाला होता.

"अंकल, हे माईसाठीच तर चाललंय ना? मी जे करतेय त्याचा तिला नक्कीच आनंद होईल." तीही हळवी झाली.

"तिला मध्ये आणलेस की मी काहीच म्हणणार नाही हे तुला चांगलेच माहित आहे. ठीक आहे जा तू, पण किमान एकटी तरी जाऊ नकोस. ड्राईव्हरला सोबत घेऊन जा. आत्ताच दोन ड्रीप लाऊन झाल्या आहेत." तो.

"अंकल.."

"प्रीती, नो आर्ग्यूमेंट्स प्लीज. तू कुठे जात आहेस हे मी विचारणार नाही. बिनधास्त जा. ड्राईव्हर तुला सोडून देईल. काम आटोपले की कॉल कर, तो तुला रिसिव्ह करायला देखील येईल. गॉट इट?" ती पुढे बोलण्यापूर्वी मिहीर बोलला. त्याच्या शब्दात एक अधिकारवाणी होती.

तिने ओठ रुंदावून मान हलवली. नर्सने हाताची सलाईन काढल्याबरोबर ती दुसऱ्या क्षणाला हॉटेलबाहेर पडली. जिथे जायचेय तो पत्ता डोक्यात अगदी फिट्ट बसला होता. ते स्थळ आले तसे कारमधल्या गणेशमूर्तीला मनापासून नमस्कार केला आणि ड्राईव्हरला कार थांबवायला लावली.


"दादा, मझे काम झाले की मी कॉल करून कळवेन. तेव्हा मला घ्यायला या. आता निघा तुम्ही." तिने गेटवरूनच गाडी परत पाठवून दिली.


*******

"मॅडम, तुम्ही साहेबांना भेटू शकत नाही." गार्डने तिला अडवले.

"मी कोण आहे हे माहितीये तुम्हाला? सोनप्रीत कंपनीची एच आर आहे. आत्ता मिस्टर पाटीलांची जी मिटिंग होती, त्याबद्दल चर्चा करायला आले आहे. जर का मला आत सोडणार नसाल तर तुमची नोकरी गेलीच म्हणून समजा." तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला.

"अहो, सॉरी मॅडम. तुम्ही एवढ्या मोठया मॅडम आहात हे माहित नव्हतं. जा की तुम्ही आत." त्याचा आवाज वरमला.

सोनप्रीत इतके प्रसिद्ध आहे हे तिला नव्याने कळले. तिने परत त्याच्याकडे एक करडी नजर टाकली आणि ती आत गेली.

"मॅडम, अहो तुम्ही कोणीही असाल, पण साहेब तुम्हाला नाही भेटायचे." कामवाल्या काकू प्रीतीला सांगत होत्या.


"त्यांना भेटल्याशिवाय तर मी आता जाणार नाहीये. कुठे आहेत तुमचे साहेब?" प्रीतीने प्रश्न केला.

"ते त्यांच्या आर्टरूम मध्ये आहेत. तिथे असले की ते कोणालाच भेटत नाही, अगदी त्यांच्या लेकीला सुद्धा." काकू.

"ठीक आहे. मला तिथे घेऊन चला." प्रीती.

"मी तुम्हाला दरवाज्यापर्यंत सोडते. पुढचं तुमचं तुम्ही बघा. मला माझी नोकरी गमावायची नाहीये." काकू.
प्रीतीने तिच्याकडे बघून स्मित केले.


******
त्याचे हात भराभर फिरत होते. आतापर्यंत पांढराशुभ्र असलेला कॅनव्हास रंगाने सजत होता. कित्येक वर्षांपासून हृदयात असलेला चेहरा तो रेखाटत होता. आज नेमके त्याचे हात त्याला दगा देत होते. राहून राहून त्याच्या नजरेसमोर सोनप्रीतच्या एचआर चा चेहरा झळकत होता.

दारावर ठकठक झाली तेव्हा प्रथम त्याने तिकडे दुर्लक्ष केले. पुन्हा मात्र तो आवाज येत राहिला तेव्हा , त्या आवाजाने त्याला चीड यायला लागली.

"कुठलेही डिस्टर्बन्सेस नकोत हे मी तुम्हाला सांगितले होते ना? मग का परत दार ठोठावत आहात?" तो आतूनच गरजला.

त्याच्या आवजाने तसूभरसुद्धा फरक न पडता बाहेरची ठकठक तशीच चालू होती. तो आता आणखीनच चिडला. हातातील कुंचला शेवटचा कॅनव्हासवर फिरवून तो दाराजवळ आला.

"मला डिस्टर्ब करायचे नाही हे बोललो होतो ना?" दार उघडून तो पुन्हा ओरडला. समोर कामवाल्या काकू असाव्यात हे त्याने गृहीत धरले होते.

खोलीचा दरवाजा उघडताक्षणी त्याची नजर तिथे उभे असलेल्या प्रीतीवर गेली आणि त्याचवेळी तिची नजर आत कॅनव्हासवर रेखाटलेल्या चित्राकडे. तो तिच्याकडे स्तब्ध होऊन बघत होता आणि ती त्या चित्राकडे. आत्तापर्यंत डोळ्यासमोर झळकणारा चेहरा प्रत्यक्षात परत एकदा समोर होता आणि तिच्या नजरेसमोर कॅनव्हास उमटलेले चित्र होते, साक्षात तिचेच प्रतिबिंब. तोच चेहरा, तीच गुलाबी साडी, डोळ्यातील निळा सागरही अगदी तसाच.

तिची नजर त्याच्या कुंचला पकडलेल्या बोटांकडे गेली आणि चटकन शालिनीचे शब्द आठवले, "तुझे बोटंदेखील अगदी मोहनसारखीच आहेत, लांबसडक!" ते शब्द आठवले आणि डोळ्यात पाणी जमा झाले. ज्याला शोधायला काय काय नाही केले नि हा साक्षात तिच्यासमोर उभा होता.

"मिस्टर मोहन?" तिने त्याच्याकडे बघून विचारले. तो प्रश्न होता की तोच मोहन आहे ही ती स्वतःला पटवू पाहत होती तिलाही कळले नाही.

तो मात्र तसाच उभा होता, स्थितप्रज्ञ! 'ही म्हणजे नेमकी आहे तरी कोण? सकाळपासून डोळ्यसमोरून एक क्षणही हलली नाही आणि आता समोर उभी आहे. का असं वाटतंय की खूप जवळची आहे ही, माझ्या सोनियाची प्रतिकृती आहे ही.' त्याचे डोळे कठोकाठ भरले.

"मिस्टर मोहन, मे आय कम इन?" तिच्या आवाजाने तो बाजूला सरला. आजवर त्याने त्याच्या लाडक्या लेकीला सुद्धा कधी आपल्या आर्टरूममध्ये प्रवेश दिला नव्हता. प्रीतीने म्हणताक्षणी त्याने आपसूकच तिला आत यायला वाट मोकळी करून दिली. तिने आत प्रवेशून संपूर्ण खोलीभर एक नजर फिरवली आणि भारावल्यागत ती पाहतच राहिली..
:

क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.