Login

प्रीती.. पर्व दुसरे! भाग -७५

कथा सोनियाची.. तिच्या प्रीतीची!
प्रीती.. पर्व दुसरे!
भाग -पंच्याहत्तर.

"मॉम, आँटी.." एकाएक निकीने दोघींना मिठी मारली.
"वेलकम टू इंडिया." तिने हसून ग्रीट केले.

सोनिया गोंधळून बघत होती. ओळखीचा स्वर कुठून आला, त्याचा ती अंदाज लावत होती.तिचा गोंधळ बघून विरेन बाजूला झाला आणि तिच्यासमोर दोन हँडसम पुरुष आले.

"विश्वास दादा, रजत दादा?" ती शॉक होऊन दोघांकडे पाहत राहिली.

तिच्यासमोर तिचे दोन्ही दादा समोर होते. दोघांनी जवळ येऊन तिला प्रेमाने मिठी मारली. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. इतके मोठे सरप्राईज आपल्याला मिळेल याचा तिने विचारही केला नव्हता. तिघांच्या डोळ्यातून केवळ आसवं वाहत होती.

"सोना, रडतेस काय अशी? अशा शुभ प्रसंगी रडायचे नसते." विश्वास तिचे डोळे पुसत म्हणाला.

"दादा, माझ्या आयुष्यातील हा खूप मोठा दिवस आहे. माझी सगळी प्रेमाची माणसं आज माझ्या सोबतीला आहेत. आय एम सो हॅपी. थँक यू. थँक यू व्हेरी मच." रजत आणि विश्वासचे हात हातात घेऊन ती म्हणाली.

"ऊंहूं ऊंहूं.. थोडं क्रेडिट मला पण द्या. आफ्टर ऑल सगळा प्लॅन तर माझा आहे." निकी खाकरत म्हणाली.

सोनिया तिच्याकडे पाहतच राहिली.

"ॲक्च्युली, आत्तू, मी कॉलवर डॅडशी बोलले होते. बाबा आणि माझे मिळून प्लॅनिंग चालले होते. मग लग्नात तुला गिफ्ट म्हणून आम्ही सगळ्यांना बोलावून घेतले." सोनियाच्या मिठीत शिरत ती म्हणाली.

"तुला माहित नाही निकी, आपल्या प्रेमाची माणसं आपल्याला परत भेटणं म्हणजे किती मोठी गोष्ट असते. थँक्स निकी. तू माझ्यासाठी जे काही केलेस ना, त्याबद्दल या शिवाय दुसरे शब्दच माझ्याजवळ नाहीत."

"अगं आत्तू इतकी नको ना इमोशनल होऊस. आणि बाकीच्या मेम्बर्सना पण भेट की. ते कधीचे तुला भेटायला खोळंबले आहेत." निकीच्या बोलण्यावर सोनियाने तिला हसून बाजूला केले.

"हे डॅड आणि हे रजत अंकल. तू यांना ओळखतेसच." निकी डोळा मारून तिला म्हणाली. "नॉऊ मीट माय मॉम,मिसेस रिता विश्वास आणि ही माझी आँटी, मिसेस सारिका रजत." त्या दोन सुंदर स्त्रियांकडे बघून तिने सांगितले.
"आणि मॉम, ही सोना आत्तू, तुम्ही ओळखले असेलच. आणि ही आहे आत्तूची प्रिन्सेस, प्रीती दी."
निकीने सर्वांना एकमेकांची ओळख करून दिली.

सोनियाने रिता आणि सारिकाला आलिंगन दिले. प्रीतीही त्यांच्यात सामिल झाली.

"आजवर तुमच्याबद्दल खूप खूप ऐकलं होतं पण कधी साधं बघितलेही नव्हते. आज मात्र भेटण्याचा योग आलाय. खूप छान वाटत आहे." रिता म्हणाली.

"आणि प्रीती तू सुद्धा किती गोड आहेस? तुझे डोळे तर सेम सोनियासारखे आहेत." सारिका म्हणाली.

"लेडीज गँग, याला सुद्धा भेटा. हा आहे आमचा हँडसम रॉकी. रजत अंकलचा मुलगा." एका पंधरा वर्षांच्या गोल गुटगुटीत मुलाला निकीने समोर केले.

"हाय ऑंटी, हाय दी. ग्लॅड टू मीट यू." त्याने हसून ग्रीट केले.

"हाऊ स्वीट यू आर! सेम हिअर डिअर." प्रीतीने त्याला हग केले.


सोनियाची पूर्ण फॅमिली आज एकत्र होती. तिच्या मनातील भावना तिलाच ठाऊक होत्या. हे क्षण आयुष्यात परत कधी येतील असे वाटले नव्हते. आज तिला हे सारे स्वप्नवत वाटत होते. सोनियाच्या आयुष्यात खरोखरीच सोनियाचा दिन उगवला होता.

सगळीकडे आनंदी आनंदाचे वातावरण होते. लग्नसोहळा आणि त्यात पूर्ण परिवार एकत्र आलेला होता. आणखी तिला काय हवे होते? यावेळी डोळ्यातील आनंदाश्रुना बाहेर पडण्यापासून कसे ती कसे रोखू शकणार होती?

"लेट्स एंजॉय." प्रीतीने तिच्या माईच्या मनाची अवस्था अचूक हेरली आणि हळदीचे भांडे तिथे घेऊन आली. मघाचा सुरू असलेला खेळ परत सुरू झाला. परत एकदा हळदीने माखणे, डान्स अन आनंदाची उधळण सुरू झाली.


*******

लग्नघटिका समीप येऊ लागली तसे सोनियाच्या हृदयात धडधडायला लागले. नारिंगी रंगाची पैठणी नेसून, अंगावर दागिने लेवून ती बसली होती. नववधूचे तेज चेहऱ्यावर आले होते. आधीच मूर्तिमंत सौंदर्याची खाण असलेली ती अधिकच सुंदर भासत होती. मोहन तिच्याशेजारी होता. वय वाढले असले तरी त्याचे राजबिंडे रूप अजूनही तसेच होते. दोघांची जोडी अगदी मेड फॉर इच अदर दिसत होती. सोनियाच्या बाजूने तिचे संपूर्ण कुटुंबीय होते तर मिहीरचे कुटुंब आता मोहनचे बनले होते. माही त्याच्याकडे जातीने लक्ष घालून सर्व विधी करून घेत होती.

"शुभमंगल सावधान!" भटजी म्हणाले तसे दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. नंतर सुरू झाली सप्तपदी. सप्तपदी.. सात वचनांची! दोघांनी आजवर एकमेकांना सोडले नव्हतेच. हृदयाच्या गाभाऱ्यात त्यांचे प्रेम तसेच होते. काही वचनं तर त्यांनी इतक्या दिवसात नकळत पाळली होतीच आता वेळ होती त्यांच्या पुर्ततेची.

इकडे प्रीतीच्या मनात मात्र सारखी खळबळ माजली होती. काहीतरी मिसिंग आहे हे वारंवार मनात येत होते. आजच्या या प्रसंगी शालिनी आणि आबा हवे होते असे सारखे तिला वाटत होते.

तिने आजूबाजूला नजर फिरवली. माई आणि बाबा दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असा होता. स्वीटी आणि समीर यांचा हलकाफुलका रोमान्स चालूच होता. निकी -रॉकी, तिन्ही मामा - मामी..सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. राधाई तर खूपच खुश होती.

मिहीरही आता निवळला होता. सत्य परिस्थिती त्याने स्वीकारली होती. तुषार आणि माही आपला मुलगा आणि होणाऱ्या सुनेल बघून मनात त्यांचे सुरुवातीचे दिवस आठवत होते.

सोनप्रीतचा संपूर्ण स्टॉफ आज तिथे हजर होता. तिथे जमलेले प्रत्येकजण सोनियाचे लग्न एन्जॉय करत होते. सगळे कसे एकदम परफेक्ट वाटत होते. तीही खुष होती पण तरीही तिचे मन मात्र स्वस्थ नव्हते.

सप्तपदीचे वचन सुरू असताना प्रीतीची नजर माई बाबावर खिळली होती.ओठावर हलके स्मित उमटले होते. अचानक तिच्या अस्वस्थ मनाने काय कौल दिला कुणास ठाऊक? पण तिची सोनिया मोहनवर खिळलेली नजर प्रवेशद्वाराकडे वळली. तिकडे बघताक्षणी तिला अकल्पित असा भास झाला.असे वाटले जणू काही तिथे कृष्णा दाराला रेलून उभा आहे. दोन्ही हात त्याच्या जीन्सच्या पॉकेटमध्ये घालून मंदपणे हसून तिच्याकडे बघतो आहे.

'वेडीच आहे मी. कसले कसले भास होतात मला.' डोक्यावर हात मारत ती मनात म्हणाली.

तिथली नजर काढून तिने सभोवताल पाहिले. सर्व लग्नाच्या विधी बघण्यात मग्न होते. तिची नजर परत एकदा बाहेरच्या दिशेने वळली आणि पुन्हा तिला तिथे कृष्णा दिसला.

'खरंच तो आहे का तिथे? की अजूनही मला भासच होतो आहे?' विचार करत कोणाच्या नकळत तिने स्वतःला चिमटा काढला. प्रवेशद्वारावरचे तिला दिसणारे दृश्य मात्र अजूनही तसेच होते.

'सारे खेळ हे या वेड्या मनाचे आहेत.' स्वतःला समजावत तिने सोनिया आणि मोहन कडे लक्ष द्यायला सुरुवात केली. पण पुढल्या क्षणी पुन्हा तिची भिरभिरणारी नजर तिकडेच गेली. या वेळी मात्र तिथे कोणीच नव्हते.

'खरंच वेडूली आहे मी.' मनात बोलत ती मंदपणे हसली.

"हाय. मघापासून मलाच शोधते आहेस ना?" तिच्या कानात अगदी हळुवार आवाज आला.

तिने झटक्याने मान वळवली तर थोड्यावेळापूर्वी प्रवेशद्वाराजवळ दिसणारा कृष्णा अगदी तिच्या बाजूला उभा होता.

'किती हे भास? काय होतेय मला हे आज?' तिने स्मित करून उसासा टाकला.

"ए वेडू, अगं खरंच मी आहे इथे. कसं पटवून देऊ तुला?" तो पुन्हा कानाशी येऊन कुजबुजला.

अलगद त्याने तिचा हात हातात घेतला. तो हवाहवासा स्पर्श आणि त्याचे गरम श्वास तिला एकदम जाणवले. 'तो खरंच आहे' या भावनेने तिच्या हृदयात असंख्य फुलपाखरे उडायला लागली. एकावेळी शंभर गुलाब फुलावेत तसा तिचा चेहरा क्षणात फुलला.

"तू अचानक कसा आलास?" त्याला तिथून बाजूला घेऊन जात तिने विचारले.

"अरे, अचानक कुठे? माझ्या सासूबाईंचे लग्न असल्यावर मी येणार नाही का? आणि तुलाही माझी आठवण छळत होती ना? मग तू मला मिस करशील आणि मी तुझ्यापर्यंत पोहचणार नाही असे कधी झालेय का?" मिश्किल हसत त्याने तिला प्रतिप्रश्न केला.
त्याच्या बोलण्यावर ती चक्क लाजली.

"ओय होय! तुला लाजताही येते तर." तो पुन्हा मिश्किल हसला.

"गप रे. आणि मला सांग तू एकटाच आलाहेस का?" ती विचारत होती.

"नाही. मी तर पूर्ण बाराती सोबत घेऊन आलोय. आता मला सोडून तुझे लक्ष दुसऱ्या कुणाकडे जात नाही त्याला मी काय करावे?" त्याचा मूड तसाच होता.

"म्हणजे?" तिने नजरेने विचारलेल्या प्रश्नाला त्याने नजरेनेच उत्तर दिले आणि समोरच्या रांगेत बसलेल्या देवकीकडे बोट दाखवले. आत्तापर्यंत समोरच्या रांगेतील या खुर्च्या रिकाम्या होत्या. त्या आता भरल्या होत्या. एका खुर्चीवर देवकी आणि बाजूला तिचे आबा बसले होते. ते बघून ती भारावली.

"कृष्णा तू आबांना घेऊन आलास? तुझे त्यांनी कसे ऐकले?" डोळ्यात पाणी घेऊन तिने विचारले.

"कृष्णा है तो सब मुमकिन है." कुर्त्याची कॉलर टाईट करत तो म्हणाला.

:
क्रमश:
पुढील भाग लवकरच!
©®Dr. Vrunda F.(वसुंधरा..)
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
प्रकाशनाचे अधिकार लेखिकेकडे राखीव.
********
फोटो गुगल साभार.
*******
प्रिय वाचक मित्र मैत्रिणींनो सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार!
मागच्या वर्षी प्रीती लिहायला सुरुवात केली आणि वेळेअभावी प्रीतीच्या जन्मानंतर मला ती कथा थांबवावी लागली. त्या कथेला मिळालेले तुमचे प्रेम, तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि दुसरे पर्व कधी असे येणारे खूप सारे मेसेज या सर्वांनी मला नवे पर्व लिहायला भाग पाडले.

आजचा हा पंच्याहत्तरावा भाग. कथा सुरू करताना इतके भाग होतील असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. आजवरच्या माझ्या कथामालिकांपेक्षा या कथेचे इतके जास्त भाग झालेत आणि याचे सर्व श्रेय तुम्हाला जातेय.

आता सगळीकडे दिवाळीचे वेध लागलेत. माझी कथाही शेवटच्या टप्प्यात आलीये. पुढच्या काही भागात ही कथा संपेल. तोवर असेच प्रेम करत रहा आणि वाचत रहा.
धन्यवाद!

🎭 Series Post

View all