Login

प्रेम आणि संयम....भाग 1

प्रेमाने जग जिंकता येत
प्रेम आणि संयम....भाग 1
चॅम्पियन ट्रॉफी 2025
ऋतुजा वैरागडकर

रात्रीचे आठ वाजले होते, अनघा भराभर हात चालवत होती. स्वयंपाक करत होती. समीर केव्हाही घरी येईल, ती वाट बघत होती. दरवाज्याची बेल वाजली तिने दरवाजा उघडला, त्यांनी बॅग सोफ्यावर फेकली. ती पटकन पाणी घेऊन आली.
"हे काय ग्लास असाच घेऊन आली ट्रे कुठे आहे?"

“काय ग. इतकी साधी गोष्ट तुला करता येत नाही?”

“काय करत असतेस तू दिवसभर? तुला काहीच जमत नाही.”

“तुला ना अक्कलच नाही. जरा डोके चालवत जा." त्याने ऑफिसचा सगळा राग तिच्यावर काढला हे नेहमीचं होतं.

“देवाने सुंदरता तर दिलीच नाही पण बुद्धीही दिली नाही.” हे  वाक्य रोजच अनघाच्या कानावर पडत होते.

दोन मिनिट दीर्घ श्वास घेऊन ती कामाला लागली.

अनघाचा नवरा समीर रोज तिला घालून पाडून बोलायचा. लग्नाला बरेच वर्ष झालेली होती. पण त्याच्या वागण्यात काहीही बदल होत नव्हता. नंतर मारायलाही सुरुवात केली होती.

मूड चांगला असला तर प्रेमाने वागत होता, नाहीतर छोट्या छोट्या गोष्टींवरून खूप चिडत होता. तो खूप अहंकारी झाला होता, मीच श्रेष्ठ हा त्याचा स्वभाव झाला होता.

तो भांडला की अनघा गप्प बसत होती कारण शब्दाने शब्द वाढतो हे तिला माहीत होतं.

ती ही हुशार समजूतदार मुलगी होती.

तो चिडला की ती शांत व्हायची. राग  तिलाही यायचा, चीड यायची पण राग राग करून उपयोग होणार नव्हता. तिला तिचा संसार वाचवायचा होता.

तो नॉर्मल व्हावा म्हणून त्याच्याशी अजून जास्त प्रेमाने वागत होती. आधीपासून ऐकून होती लग्नानंतर सासरचं घर तिचं घर असतं. कितीही काहीही झालं तरी आपण जुळवून घ्यायचं. हेच डोक्यात ठेऊन अनघा व्यवस्थित वागत होती. एक दिवस हे नीट होईल तिला खात्री होती.

सासरी सांगायची सोय नव्हती, माहेरच्यांना त्रास द्यायचा नव्हता आणि म्हणून अनघा शांत होती.

कधी कधी तो विचार करत होता ‘मी हिला इतकं बोलतो तरी ही शांत कशी काय राहू शकते?’
पण त्याला फक्त तिची शांतता दिसत होती त्यामागचं तिचं दुःख, तिचा त्रास दिसत नव्हता.

तिला त्याला प्रेमाने जिंकायचं होतं. दाखवून द्यायचं होतं की पैशापेक्षा किंवा अहंकारापेक्षा प्रेमात जास्त ताकद आहे. हिंसा करून प्रत्येक गोष्ट मिळवता येत नाही.