Login

प्रेम आणि माया

A Short Story About Love And Care.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

प्रेम आणि माया

" स्विटी, जरा शांत हो बघू, बघ आलो. आपण आपल्या घरी इथे नाहीत कोणी."
सुशांत हातात मांजरीचं पिल्लू घेऊन तिला गोंजरत, तिच्याशी प्रेमाने बोलत घरात शिरला.

त्या इवल्याश्या पिल्लासाठी ते सगळं नवीनच होतं, म्हणून ते आजूबाजूला बघत हालचाल करत हलक्या आवाजात माऊ... माऊ... करू लागला.

" नाही ओरडायचं बाळा, आत बघ तुझे आणखीन मित्र आणि मैत्रिणी सुद्धा आहेत."

आत आल्यावर तो थेट त्याच्या खोलीत गेला. खोलीचा दरवाजा उघडल्यावर आधीपासून तिथे  काही कुत्रे आणि मांजरे होती. त्याच्या हातातल्या त्या पिल्लाने त्यांना बघितलं आणि ते घाबरून आणखीन बारीक होऊन सुशांतच्या कुशीत बसलं.

" स्विटी बाळा, घाबरायचं नाही. हे सगळे आपले मित्र आहेत. चल ह्यांना भेट बघू."
इतकं बोलून सुशांत तिला घेऊन खाली जमिनीवर बसला आणि त्याने तिला खाली ठेवले.

खाली ठेवलं तरी, ती सुशांत पासून लांब जायला तयार नव्हती. ती तशी मागे त्याला रेटून बसून राहिली. त्यांच्या समोर असलेले दोन कुत्रे आणि तीन मांजरी मग स्वतःहून पुढे तिच्या जवळ आल्या आणि तिचा वास घेऊ लागले. कुत्रे काही वेळाने त्या पिल्लाला प्रेमाने चाटू लागले.  बहुतेक पिल्लाला कोणी न काही बोलता त्यांच्या प्रेमाची भाषा कळली. त्याच्या चेहऱ्यावरची भीती जाऊन आता तेज दिसू लागले.

ते त्यांना भेटायला जागेवरून त्याच्या पायांवर उठणार तोच ते पुन्हा कोलमडून खाली पडले. त्याच्या मागच्या दोन्ही पायानं जखमा झाल्या होत्या. इतर प्राण्यांना ते कळताच, ते सगळे त्याच्या अगदी जवळ येऊन बसले आणि त्याचा लाड करू लागले. ते बघून सुशांतला आनंद झाला. त्याच्या चेहऱ्यावर आपसूकच हसू आलं.

" बाबा, आज कोणाला घेऊन आलास?  बरं बघू जरा." सुशांतला हाक देत त्याची आई खोलीच्या आत आली.

" अरे, केवढे ते लहान पिल्लू आहे. कुठे सापडलं ते तुला? त्याच्या आई कडून तर नाही ना रे उचलून आणलस?" खोलीत येऊन पिल्लाला बघत त्याची आई त्याला प्रश्न विचारू लागली.

" नाही गं आई, बिचारी रस्त्याच्या शेजारी एका कोपऱ्यात घाबरून बसली होती. घरी येताना मला दिसली. मी तिला उचलून घेतली, तर खूप घाबरली होती. तिच्या मागच्या दोन्ही पायांना जखमा झाल्या होत्या. मग तसंच आधी तिला आपल्या डॉक्टर जोशींकडे घेऊन गेलो. त्यांनी तिच्या पायाला पट्टी केली खायला दिलं, तेव्हा कुठे आता जरा नीट वाटत आहे ती." त्याचं ते बोलणं ऐकून त्याची आई देखील काळजीने खाली बसून तिच्या जखमी पायाला पाहू लागली. 

सुशांत नंतर आता कोणी तरी, परत नवीन माणूस पाहिल्यावर ती घाबरून सुशांतला चिकटून बसली.

" अरे, केवढे हे लहान पिल्लू आहे. कुठे सापडलं ते तुला? त्याच्या आई कडून तर नाही ना रे उचलून आणलंस?" खोलीत येऊन पिल्लाला बघत त्याची आई त्याला प्रश्न विचारू लागली.

" काय माहीत गं आई?  मी तिथे बहुतेक उशिरा पोहोचलो, पण नशीब ती माझ्या नजरेस पडली. डॉक्टर म्हणाले की, भाजलेल्या जखमा होत्या, तिच्या पायावर. काही वेळापूर्वी तिथून एक मिरवणूक सुद्धा गेली होती. बहुतेक त्यांच्याकडूनच ते झालं असावं, पण आता काळजी करण्याचं कारण नाही, डॉक्टरांनी पट्टी केली आहे आणि काही औषधं पण दिली आहेत. ती लवकरात लवकर बरी होईल आणि तिने तिथे अगदी पोटभर खाल्ले आहे. बिचारी कधीची भुकेली होती काय माहीत ? आता इथे बाऊलमध्ये खायचं ओतून तिच्याजवळ ठेवतो. तिला भूक लागेल तेव्हा खाईल, आता चल मला खायला दे काही तरी, मला भूक लागली आहे." सुशांत त्याच्या आईला म्हणाला. आता चल मला खायला दे काही तरी, मला भूक लागली आहे." सुशांत त्याच्या आईला म्हणाला.

" हो देते, जेवण तयार आहे. तू उठ, चल फ्रेश हो. मी जेवण वाढते. तिला असुदे ह्यांच्या सोबत ते घेतील तिची काळजी. नीट गुणी पोरं आहेत माझी सगळी." इतकं बोलून सुशांतची आई स्मित करून सुशांतच्या मागून खोली बाहेर गेली.

सुशांत आणि त्याची आई दोघेच त्या घरात राहत होते. त्यांच्या जवळ वडिलोपार्जित चिक्कार पैसा होता, तरी सुशांत त्यांचं जुनं किरणामालाचं दुकान सांभाळत होता. ते त्यांच्या पूर्वजांपासून चालत आलं होतं. त्या दोघांनाही प्राण्यांची खूप आवड होती. खास करून रस्त्यावर राहणाऱ्या कुत्रा आणि मांजरीची. त्यांना कधीही कोणी असं जखमी अवस्थेत भेटलं की, ते त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी आणत असे. त्यागोष्टीत दोघांनाही आनंद मिळत असे.

सुशांत फ्रेश होऊन आई सोबत बोलत बसला. जेवायला बसण्याआधी त्याने पुन्हा एकदा त्या पिल्लावर नजर टाकली. ते आता त्यांच्या मध्ये छान रमले होते. त्या दोघांनी घरी ठेवलेल्या प्राण्यांना चांगली शिकवण आणि शिस्त लावली होती. त्यांच्या प्रेम आणि मायेमुळे ते सगळे फारच प्रेमळ झाले होते.

सुशांत आणि त्याच्या आईच्या जेवता जेवता छान गप्पा रंगल्या. जेवून झाल्यावर सुशांत आईला कामात मदत करून आपल्या खोलीत झोपायला गेला. त्याच्यासोबत त्याने त्या पिल्लाला देखील घेतले. बेडवर त्याने त्याला त्याच्या शेजारीच झोपवले. मग लाईट बंद करून तो देखील झोपून गेला.

काही वेळाने, त्याच्या कानात जोर जोरात गाण्यांचा आवाज ऐकू येऊ लागला. गाढ झोपेत असल्यामुळे त्याने तो दुर्लक्ष केला, पण पुढच्याच क्षणी अगदी त्याच्या कानाच्या बाजूलाच मोठा धडाम sss असा मोठा आवाज झाला. त्या आवाजाने तो बावरला. त्याने घाबरून लगेच डोळे उघडले. डोळे उघडताच त्याला त्याच्या आजूबाजूला सर्वत्र फटाक्यांचा धूर दिसू लागला. कोणी तरी मुद्दाम त्याच्या बाजूला तो बॉम्ब लावला होता. तो धूर काहीसा कमी होताच त्याला दिसले की, तो एका रस्त्याशेजारी झोपला होता, एक छोटीशी मांजर होऊन ! रस्त्यावरून कसली तरी मिरवणूक जाताना त्याला दिसली. त्याने पुढे काही हालचाल करण्याआधीच त्याला समजले की, त्याच्या बाजूला भली मोठी फटाक्याची माळ पसरवलेली आहे. त्याच्या अवती भवती त्याला वाचवेल असं कोणीच नव्हतं. तो उठून धावणार त्या आधीच त्या पोरांनी ती माळ पेटवली. ती जोरजोरात फुटू लागली. फुटत फुटत ती त्याच्या अगदी जवळ येऊ लागली.

त्याच्या आवाजाने आधीच त्याच्या कानठळ्या बसत होत्या, सोबत भीतीने त्याच्या हृदयाचे ठोके भलतेच वाढले होते. आज तो मरणार हे त्याने मनाशी नक्की केलं. तरी एक शेवटचा प्रयत्न म्हणून, त्याने उठून अंगातील सर्व जोर एकवटून लगेच बाजूला उडी मारली, पण दुर्दैवाने त्याच्या दोन्ही पायानं जखमा झाल्या. तो जखमी होऊन बाजूला पडला. तिथे उपस्थित कोणाचाच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. फटाके लावणारी पोरं त्या हसताना दिसली. शेवटी इतकासा जीव तो, स्वतःला किती आणि कसा वाचवू शकणार होता?

तो बाजूला जाऊन वेदनेने कळवळू लागला, पण त्या भयानक जीव घेण्या आवाजात त्याच्याकडे कोणाचं लक्ष जाणारच नव्हतं. त्याला तिथून दूर जाणं गरजेचं होतं. तो कसा बसा तिथून पुढच्या दोन पायांच्या आधाराने सरपटत रस्त्याच्या कडेला जाऊ लागला.

रस्त्याच्याकडेला एका दगडाच्या मागे जाऊन तो डोळ्यांमध्ये अश्रू आणून आपले जखमी पाय चाटू लागला.

' किती वाईट झाली आहे ही मनुष्य जात. स्वतःच्या मनोरंजनासाठी ते कोणाला इजा पोहोचवत आहेत, कोणाला दुःख देत आहेत, ह्याचे त्यांना भान राहिलेलं नाही.

आई गं... माझे दोन्ही पाय भाजून निघाले त्यात त्यांना कोणता असुरी आनंद मिळाला देव जाणे. देवा का रे असा जन्म दिलास? तो नसता दिलास तरी चालला असता. ह्या पृथ्वीचा मालक आता फक्त हा एकटा मनुष्य झाला आहे. इथे आमच्या सारख्या मुक्या प्राण्यांना काही किंमत नाही. देवा तूच वाचव ह्या असह्य वेदने पासून...'
तो रडत आपल्या जखमांना चाटत मनातल्या मनात स्वतःशी बोलू लागला. ते करता करता अचानक त्याला भीतीने भुरळ आली आणि तो तिथेच दगडा मागे बेशुद्ध पडला.

अचानक सुशांतचे डोळे उघडले. तो घाबरून उठून बसला. त्याच्या डोळ्यांमधून घळा घळा अश्रू वाहू लागले. तो रडतच बाजूला शांत झोपलेल्या त्या निरागस पिल्लाला पाहू लागला.

" किती यातना सोसल्या आहेत ह्या इवल्याश्या जीवाने खरंच. देवा तुझे आभार, जी माझी नजर त्याच्यावर पडली. खरंच बाळा, ही मनुष्य जात खूप स्वार्थी झाली आहे. त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो  आणि ह्या पुढे मी तुझी काळजी घेईन. अजिबात घाबरायचं नाही." तो त्या पिल्लाच्या अंगावरून हलकासा हात फिरवून म्हणाला. 

ते मात्र त्या स्पर्शाने डोळे बंद ठेवून जागेवरच पुन्हा तसेच शांत झोपी गेले. 

सुशांत जेव्हा जेव्हा कोणत्या प्राण्याला घरी घेऊन येत असे, त्याला नेहमी त्या त्या रात्री स्वप्नामध्ये त्या प्राण्याला माणसांकडून झालेली कष्ट अनुभवायला मिळायचे ते ही स्वतः त्या रुपात जाऊन. ते सगळे अनुभव घेताना त्याचे हृदय कळवळून उठायचे. त्याला मनुष्य असल्याची लाज वाटायची.

पण मनुष्य असून सुद्धा मनुष्य जाती सारखे नाही वागायचे, हे त्याने मनाशी पक्क केलं.

त्याने आपल्या शिक्षणाचा वापर करून ऑनलाईन लोकांमध्ये ह्याविषयी भावनिक व्हिडिओ बनवून जनजागृती सुरू केली. सोबतच त्याने आई सोबत बोलून त्याच्या घराशेजारी असलेला प्लॉट विकत घेतला. तिथे त्याने एक सुंदर आणि सुरक्षित शेड बनवलं. मग तिथे स्विटी सारखे अजून प्राणी त्याने आणून त्यांना प्रेम आणि माया देऊ लागला.

त्याने लोकांना देखील असे कोणी गरजू प्राणी त्यांच्या आसपास आढळल्यास त्याच्या जवळ आणून सोडायचे आवाहन केले. त्याने त्या शेड बाहेर बोर्डच लावला ,
' प्रेम आणि माया .'