Login

प्रेम फॉरेव्हर (अंतिम भाग) (भाग-४)

प्रेम कधीही विरत नाही... प्रेम अनंत असतं. खरं प्रेम अनेक अडथळे पार करून, अगदी पैशाची सीमारेषा ओलांडून अजरामर होत असतं. अशाच अजरामर प्रेमाची कथा... प्रेम फॉरेव्हर...
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(जलद कथालेखन)

शीर्षक : प्रेम फॉरेव्हर (अंतिम भाग) (भाग-४)

आतापर्यंत ओजसला 'अरे-तुरे' बोलणारी ईश्वरी आता परत ४ वर्षांपूर्वीप्रमाणे बोलताना 'तुम्ही' म्हणाली होती. हा बदल त्याला संभ्रमात पाडून गेला. त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तिने नाक वर ओढतच त्याच्याकडे पाहिले.

"असे काय बघत आहात? तुमच्यामुळे आज आपण या स्थितीत आहोत. काय गरज आहे महान व्हायची? मला कधीच काही सांगायचे नाही, हाच निर्णय होता ना तुमचा? स्वतःच निर्णय घेऊन मोकळे झालात, माझे काय? जर तुमच्यासाठी मी माझ्या सुखाचा त्याग केलेला तुम्हाला पटणार नव्हते तर माझा विचार करून तुम्हाला स्वतःचे सुख डावलण्याचा अधिकार कुणी दिला? सांगा ना... का नाही सांगितले कधी की— ईश्वरी तुझे बाबा मला लग्न मोडायला आग्रह करत आहेत... का नाही सांगितले की तुम्ही मला विसरत आहात? का नाही सांगितले की तुम्ही आजारी आहात, तुमच्या मेंदूत गाठ आहे? का नाही सांगितले बोला ना... का तुम्ही स्वतःलाच विलन रिप्रेझेंट केले माझ्या समोर? का तुम्हीच सॅक्रीफाईज करायचे? का तुम्ही एकट्यानेच विरह भोगायचा? का तुम्हीच सर्व संकटांना सामोरे जायचे? एवढे महान होण्याची हौस का आहे तुम्हाला ओजस... सांगा ना..." ती रडतच त्याला जाब विचारत होती.

तिचे शब्द ऐकून तो थक्क झाला. तो गोंधळून तिच्याकडे पाहत होता.

"तुला कसे आणि कधी कळले?" त्याने आश्चर्याने विचारले.

"४ वर्षांपूर्वीच..." ती उत्तरली आणि त्याला दुसरा आश्चर्याचा धक्का बसला.

"काय?" अक्षरशः डोळे मोठे करत त्याने विचारले. "पण कसे?"

"ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या डोक्यात गाठ आहे, हे कळले त्या दिवशी मीसुद्धा माझ्या नर्स मैत्रिणीला भेटायला गेले होते. तुम्ही आणि बाबा मला तिथे दिसले. मी काळजीनेच तुमच्याजवळ येत होते आणि तेवढ्यात तुमच्या दोघांमध्ये झालेले संभाषण थोड्या अंतरावर उभी असताना ऐकू आले. मला तर एक क्षण कळलेच नाही कोणत्या गोष्टीसाठी रडावे... माझा होणारा नवरा आजारी आहे यासाठी... की तो माझ्या बाबांच्या प्रस्तावाला होकार देऊन माझ्याशी लग्न मोडायला निघतोय यासाठी... जाब विचारायचा होता; पण मला तुमची मेडिकल कंडिशनही जाणून घ्यायची होती. मैत्रिणीच्या मदतीने मी माहिती काढली आणि त्यानंतर मला कळून चुकले की तुमच्या समाधानासाठी वागावे तुम्हाला अपेक्षित तसेच... एकीकडे मला माहिती होते की तुम्ही मला विसरत आहात; पण मी तुम्हाला मला विसरू दिलेच नाही. तुमच्या अवतीभवती राहून आपल्या आठवणी नानातऱ्हेने जिवंत ठेवल्या. तुम्ही स्वतःही मला न विसरण्याचे बरेच प्रयत्न केले. त्यापैकीच एक प्रयत्न म्हणजे तुम्ही डायरी मेंटेन केली आणि त्यात सातत्याने माझ्याबद्दल लिहून ठेवले. त्याचाच परिणाम आहे की ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही अगदी सारे काही विसरलात तरी मला विसरू शकले नाहीत. ही आपल्या प्रेमाची अचिव्हमेंट होती, तरीही आपले लग्न मोडले तेव्हापासून आजपर्यंत मी सगळ्यांना भासवत राहिले की मी तुमचा तिरस्कार करते आणि सगळ्यांच्या नकळत मी तुमच्यावर जीवापाड प्रेम करत राहिले." ईश्वरीने तिच्या माहितीतला भूतकाळ सांगितला. सर्वकाही ऐकून तिच्या प्रेमापुढे तो निःशब्द झाला होता. तिला घट्ट मिठी मारावीशी वाटत होती की लगेच तिच्या अस्तित्वाची त्याला जाणीव झाली.

"तुझ्या भावनांचा आदर आहे मला, माझेही प्रेम आहे तुझ्यावर; पण आता ते योग्य नाही. तुझे लग्न झाले आहे. आता तू सर्वस्वी अद्वैत सरांवर प्रेम करायला हवे." मन घट्ट करून तो तिला स्वतःपासून दूर लोटत म्हणाला.

"मी का करू त्यांच्यावर प्रेम? त्यांच्यावर प्रेम करण्याचा अधिकार फक्त त्यांच्या बायकोला आहे." ती गालातल्या गालात हसत खांदे उडवत म्हणाली.

"हो आणि ती तू आहेस." त्याला तिचे हसू आधी दिसलेच नाही म्हणून तो म्हणाला.

"कोण पसरवत आहे ही अफवा?" हनुवटीवर बोट ठेवत ती नाटकी आवाजात म्हणाली.

"हं? काय सुरू आहे? माझ्या डोक्याचा भुगा होतोय आता. अद्वैत सरांनीच तर मघाशी तू त्यांची बायको आहेस असा परिचय करून दिलेला ना?" तो कपाळावर अंगठा घासत वैतागून म्हणाला.

"अच्छा ते होय! ते तर सहज बोलले होते..." ती ओठांतले हसू दाबत म्हणाली.

"म्हणजे?" आता त्याने डोळे बारीक केले.

"अद्वैत माझ्या मैत्रिणीचे पती आहेत आणि माझे भाऊजी आहेत." ती खुदकन हसत म्हणाली.

"काय?" बिचारा ओजस कोणती प्रतिक्रिया द्यावी, याच विचारात गुरफटून गेला.

"हो. तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी कट रचलेला मी... माझ्याशी लग्न मोडायला निघाले होते ना, मग शिक्षा नको?" ती गाल फुगवून म्हणाली.

"अच्छा! राग मानू नकोस; पण तू तर हे माझे ऑपरेशन झाले तेव्हाच करू शकली असतीस. मग चार वर्षे का वाट पाहिलीस?" त्याने हलकेसे हसत शांत मुद्रेने विचारले.

"मला तुम्हाला एवढ्या सहज भेटायचे नव्हते. आधी तुम्ही फायनॅन्शियली अनस्टेबल होते म्हणून तुम्हालाही इनसिक्योर वाटायचे. ऑपरेशननंतर तुम्हाला शुन्यातून सुरुवात करावी लागली. स्थिरस्थावर करता करता दोन वर्षे निघून गेले. त्यानंतर दोन वर्षे तुम्ही एकट्यानेच धडपड करत तुमच्या कंपनीची धुरा सांभाळलीत पण आता मदतीसाठी बाहेर पडलात. मला हीच वेळ योग्य वाटली. शिवाय आणखी एक कारण म्हणजे बाबांना सांगायचे होते की पैसा म्हणजे सर्वकाही नव्हे. ते मला श्रीमंत घराण्यातील स्थळे दाखवत राहिले आणि मी 'सारे पुरुष एका माळेचे मोती' म्हणत नकार देत राहिले. यातूनच त्यांना आताशः त्यांच्या चुकीचा पश्चात्ताप झाला आणि त्यांनी सर्वकाही माझ्यापुढे कबूल केले." ईश्वरी म्हणाली.

"बाप रे! किती पेशन्स ठेवून वागलीस आणि किती दूरदृष्टी बाळगून फासे फेकत राहिलीस. सलाम आहे तुला..." ओजस म्हणाला.

त्याला तिच्या बुद्धी चातुर्याचा व एकंदरीत तिचा अभिमान वाटत होता व स्वतःच्या चुकीच्या निर्णयाचा पश्चात्ताप!

"ह्म्म... त्याचेच फळ माझ्या समक्ष उभे आहे. काय मग लग्न करणार ना माझ्याशी?" तिने तिच्या पर्समधल्या मुंडावळी त्याला दाखवत विचारले आणि त्यावर तो गालात लाजला.

"ओ... लाजू नका. स्पष्ट सांगा. हो की नाही? की जाऊ मी माझ्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून घेणारा एखादा उतावीळ नवरा शोधायला?" खोटी धमकी देत ती म्हणाली.

"नको. मी करणार लग्न तुझ्याशी; पण एका अटीवर..." तो जरा विचार करत म्हणाला.

"किती भाव खाता हो... असो. बोला..." तिने डोळे बारीक केले; पण लगेच ऐकायला सरसावली.

"मी अजूनही फायनॅन्शियली अनस्टेबल आहे तर जोपर्यंत कंपनीला योग्य भागीदार मिळत नाही आणि माझ्या बिझनेसला आर्थिक स्थैर्य मिळत नाही तोपर्यंत पोस्टपोन करूया का?" तिला विश्वासात घेत त्याने विचारले.

ती नकार देणार नाही ठाऊक होते पण तिचे मत जाणून घ्यायचे होते. ती काही बोलणार तेवढ्यात अद्वैत म्हणाला...

"मग उद्याच उरकून घ्या लग्न! कारण तुमच्या कंपनीचा खरा भागीदार तुम्हाला मिळालाय आणि तो मी आहे." अद्वैत मंद हसत म्हणाला.

"तुमच्या मदतीचा हात अमूल्य आहे; पण सॉरी सर... मला माझ्या सामर्थ्यावर गुंतवणूकदार शोधायचा आहे." ओजसने त्याचे स्पष्ट मत मांडले.

"मग मी काही दानधर्म करण्यासाठी गुंतवणूक करायला सज्ज नाही झालोय. मला तुमच्या कंपनीचा भाग व्हायचे आहे. आय ॲम इन्टू क्रिएटिव्ह बिझनेस. इट्स माय एक्सपर्टीज आणि मी मघाशी हरभऱ्याच्या झाडावर नाही चढवले हो तुम्हाला... मी माझे प्रामाणिक मत सांगत होतो. मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, म्हणजे आहे आणि माझ्या खऱ्या बायकोने कधीच परवानगी दिली आहे या बिझनेस डीलसाठी, म्हणून तुम्हाला भागीदारी मला द्यावीच लागेल." अद्वैत आग्रही स्वरात म्हणाला.

"तुम्ही माझी दिशाभूल करत नाही ना? तुम्ही नक्की इंटरेस्टेड आहात ना?" तो खात्री करून घेत होता.

"कोणताही उद्योजक विरंगुळा म्हणून गुंतवणूक करत नाही. जिथे तन-मन-धन तिन्हींचा सदुपयोग होईल तिथेच गुंतवणूक करतो. आता शंकाकुशंका विचारून झाल्या असतील तर निघायचे का? काय आहे मी एक तासासाठी पूर्ण कॅफे बुक केला होता. आता एक तासाला पाच मिनिट राहिले आहेत, यापेक्षा आणखी वेळ घेतला तर मला महागात पडेल ओ... चार उद्योग सांभाळत असलो तरी घरी बायको पैशा-पैशाचा हिशोब घेते. तुम्हाला नाही कळणार माझी व्यथा... आता लग्न होईलच तुमचेही मग बसू चाय पे चर्चा करत निवांत, चालेल ना?" अद्वैत मुद्दाम नाटकी सूर ओढत वातावरण हलके करत म्हणाला आणि ते दोघेही त्यावर खळखळून हसले.

थोड्या वेळाने अद्वैत त्यांचा निरोप घेऊन निघून गेला; पण ते दोन जीव— ओजस आणि ईश्वरी, तिथेच बसून बराच वेळ नजरेने हितगुज साधत राहिले. कदाचित चार वर्षांची कसर भरून काढत होते.

समाप्त
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)

0

🎭 Series Post

View all