चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(जलद कथालेखन)
(जलद कथालेखन)
शीर्षक : प्रेम फॉरेव्हर (भाग-१)
ओजसची आज खूप मोठी मिटींग होती. त्याने कलात्मक लाकडी वस्तूंचा (आर्टिस्टिक आर्टिफॅक्ट्स) एक छोटेखानी व्यवसाय स्थापन केला होता. उत्पादन दर्जेदार असले तरी व्यवसाय नवखा असल्याने नफा नाहीच्या प्रमाणात होता; त्यामुळेच त्याने गुंतवणूकदार शोधण्याची धडपड सुरू केली होती.
आधीच व्यवसाय स्थापन करण्यासाठी त्याने बॅंकेकडून कर्ज घेतले होते म्हणून तिकडे त्याचा निभाव लागणार नाही, त्याला ठाऊक होते. त्या व्यवसायाची स्थापना करण्यासाठी त्याने जीवाचे रान केले होते. खूप काही मागे सोडले होते आणि आता या वळणावर त्याला त्याचा व्यवसाय डबघाईला जाऊ द्यायचा नव्हता, म्हणून तो त्याच्या कंपनीचे २५% शेअर्स गुंतवणूकदारांना देण्यासाठी सज्ज झाला होता; परंतु तरीही फार काही सकारात्मक प्रतिसाद येताना त्याला जाणवला नाही.
सगळी दारे बंद झाली, असे वाटत असतानाच त्याच्या व्यवसायात भागीदार होण्यासाठी एका गुंतवणूकदाराने पुढाकार घेतला होता; पण ओजसने प्रत्यक्ष भेटून त्यांच्यापुढे सविस्तर प्रस्ताव मांडावा, असा आग्रहदेखील त्यांनी केला होता. नकार देण्याचा पर्याय ओजसकडे नव्हताच; त्यामुळे होकार देत दिनांक आणि वेळ ठरवून घेतली.
ठरल्याप्रमाणे वेळेच्या आधीच त्याने सर्व तयारी केली आणि निघाला मिटींगसाठी. काही वेळातच तो ऐच्छिक स्थळी पोहोचला. वेळ बघितली तर त्या व्यक्तीला येण्यास आणखी अवकाश असल्याचे लक्षात आले, म्हणून तिथेच बसून तो शांत चित्ताने त्याच्या प्रस्ताव सादरीकरणाचा मनोमन सराव करू लागला.
साधारण पंधरा मिनिटे झाली आणि तो व्यक्ती तिथे आला. त्या व्यक्तीला पाहून ओजस अदबीने उठून उभा राहिला. हातात हात मिळवून त्याने अभिवादन केले. त्यानंतर दोघेही बसले. त्या व्यक्तीची परवानगी घेऊन त्याने प्रस्ताव सादर केला. प्रत्येक मुद्द्याचे विश्लेषण करून सांगितले. त्याच्या उत्पादनाची भविष्यकालीन मागणी, नफा यांचा आराखडा नीट समजावून सांगितला. शिवाय व्यवसायासंबंधी त्याच्या मनात असणारे भविष्यकालीन ध्येय सांगून त्याने शब्दांना पूर्णविराम लावला.
"अं... बघा, ओजस वानखेडे, मला तुमच्या या कंपनीत पोटेन्शियल दिसत आहे आणि मला अशा एखाद्या क्रिएटिव्ह कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची आवड खूप आधीपासून आहे. मला तुमचे प्रेझेंटेशनसुद्धा खूप आवडले. पद्धतशीर, अगदी सोप्या भाषेत तुम्ही मुद्दे मांडलेत. इट वॉज रिअली एक्सिलेंट. आय ॲम टोटली इम्प्रेस्ड." तो व्यक्ती— अद्वैत साबळे म्हणाला.
"मिन्स अ लॉट सर. खूप खूप आभार." ओजस नम्रपणे म्हणाला.
"फ्रॅंकली स्पिकींग, माझा निर्णय झाला आहे; पण मी कोणताही निर्णय घेण्याआधी माझ्या बायकोचे मत विचारात घेत असतो. सो इफ यू डोन्ट माईंड..." अद्वैत काहीसा चाचरत म्हणाला. बराच श्रीमंत होता, अनेक व्यवसाय सांभाळत होता; पण आवाज कायम सौम्य असायचा त्याचा.
"हो, तुम्ही कॉल करू शकता त्यांना. मी वाट पाहतो." तो म्हणाला.
"नाही तसे नाही. ती इथेच शॉपिंगसाठी आलेली, मी तिला मघाशीच कॉल करून कळवले होते. आता पोहचेल ती इतक्यात... तर तुमची काही हरकत नाही ना ती आपल्याला जॉईन झाली तर?" अद्वैत ओजसचे हावभाव टिपत म्हणाला.
"माझी काहीच हरकत नाही, तुम्ही बोलवा त्यांना. त्यांनी समोरासमोर निर्णय कळवला तर आणखी स्पष्टता मिळेल मला." ओजस विना हरकत म्हणाला.
"ठीक आहे." अद्वैत किंचित हसला.
थोड्या वेळाने साधारण पाच मिनिटांत फोनवर बोलतच एक २८ वर्षांची तरुणी तिथे आली. तिला पाहून गालातल्या गालात हसत अद्वैत म्हणाला, "आल्या आमच्या राणी सरकार."
त्याचा प्रसन्न चेहरा पाहून ओजसला काहीसा हेवा वाटला. मनातले विचार झटकून अद्वैत ज्या दिशेने पाहत होता तिकडे पाहिले; पण अद्वैतच्या पत्नीला पाहून पाणी पिणाऱ्या ओजसला जोरदार ठसका लागला. खोकतच त्याने चेहरा पुसला. सुदैवाने पाणी इतरत्र कुठे सांडले नव्हते.
तो तिच्याकडे एकटक पाहत होता. जांभळ्या रंगाची साडी नेसून, केसांची वेणी घालून त्यात गजरा माळला होता. तिचा श्रृंगार खूप साधा भासत असला तरी अतिशय खास दिसत होती. त्याची नजरच हटत नव्हती तिच्यावरून; पण तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राकडे आणि भांगेतल्या कुंकवाकडे गेले.
आधीपासून मर्यादा ओळखून वागणारा पुरुष होता तो, आताही स्वतःला सावरून तो शांत बसला; पण मनात मात्र त्याने एकेकाळी उद्गारलेले एकच वाक्य घोळत होते— 'मला माझे ध्येय गाठण्यासाठी खरा अडथळा तू वाटतेस म्हणून मी आपले नाते तोडतोय.'
त्याच्या मनात भूतकाळाचे पडसाद उमटत होते आणि इकडे अद्वैत त्याला हाका मारत होता. अद्वैतचा आवाज कानावर पडताच तो भानावर आला.
"ओजस, काय झाले? कुठे हरवलात?" अद्वैतने काळजीने विचारले.
"माफ करा. ठसका लागल्याने थोडा सुन्न झालो होतो." ओजसने मुद्दाम बहाणा केला.
"ओके. तर मी तुमची ओळख करून देतो. या आमच्या राणी सरकार— ईश्वरी आणि राणी सरकार, हे आहेत..." अद्वैत ओळख करून देत होताच की तेवढ्यात ईश्वरी म्हणाली.
"ओजस क्षीरसागर..."
"अगदी बरोबर पण एक मिनिट, तुला कसे माहिती यांचे नाव? तुम्ही कधी भेटलात का आधी?" अद्वैतने गोंधळून विचारले. ओजस नजर चोरत होता पण ईश्वरी त्याच्याकडे तिच्या तीक्ष्ण नजरेने पाहत होती. डोळ्यात हलकेसे पाणी तरळत होते. त्यांना डोळ्यांतच अडवण्याचा प्रयत्न सुरू होता.
"बोलू नंतर त्याविषयी पण आता इथे मला बोलावण्याचे कारण सांगाल?" ती अद्वैतकडे वळून म्हणाली.
"तू आधी बस निवांत, मग बोलू सविस्तर." असे बोलतच तिच्याही नकळत त्याने तिच्या हातातील पिशव्या घेतल्या आणि तिला पद्धतशीर बसता यावे, म्हणून खुर्ची मागे सरकवली. तिनेही त्याच्याकडे बघत हसूनच डोळे मिचकावले. त्यावर तो किंचित लाजला आणि त्याच्या खुर्चीवर बसला.
त्यांचे नजरेचे खेळ तिरप्या कटाक्षाने ओजस पाहत होता. मन खजील होत होते; पण शांत बसून होता. कित्येक विचार डोक्यात घुसखोरी करत होतेच की अद्वैतचा आवाज त्याच्या कानात शिरला.
"ईश्वरी, ओजस यांची स्वतःची स्टार्टअप कंपनी आहे, ते आर्टिस्टिक आर्टिफॅक्ट्सचे उत्पादन करतात. मला त्यांच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट आणि पोटेन्शियल तर दिसतेच आहे; पण ओजसचा स्वभावही भावला. आय थिंक वी विल बी फायर, इफ वी वर्क टुगेदर. शिवाय मी त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना हवी तेवढी इन्व्हेस्टमेंट केली तर मला २५ टक्क्यांची भागीदारी मिळेल." अद्वैत ईश्वरीला सर्वकाही पद्धतशीरपणे सांगत होता.
"ह्म्म." त्या दरम्यान ती शांतपणे ऐकून हुंकार भरत होती. त्याने पुढे ओजसने सादरीकरणात सांगितलेले मुद्दे तिलाही नीट समजावून सांगितले.
सर्व समजावून झाल्यानंतर तो म्हणाला, "तू मला बोलली होतीस ना मी अशा एखाद्या क्रिएटिव्ह बिझनेसचा पार्ट व्हायला हवे! तर ही संधी चालून आली आहे. मला खूप आवडले आहे या कंपनीचे स्ट्रक्चर्स, फिचर्स आणि लॉंग टर्म गोल्स; त्यामुळे मी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर तुझे काय मत आहे? आर यु ओके विथ इट?" बोलताना सध्या अद्वैतचे पूर्ण लक्ष ईश्वरीकडेच होते.
"ॲक्च्युली अद्वैत, आय ॲम नॉट ओके विथ इट. माझी इच्छा नाही की तुम्ही या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करावी." ती तिचे मौन सोडत धीरगंभीर स्वरात म्हणाली.
तिचे शब्द ऐकून अद्वैतच्या कपाळावर आठ्या पडल्या; पण ओजसचा चेहरा निर्विकार होता, जणू त्याला आधीच त्याची कल्पना होती.
"कळले तुमचे मत. येतो मी." निमूटपणे तो उठत म्हणाला आणि तिथून जाण्याची तयारी करू लागला.
"नाही, थांबा ओजस. बसा काही वेळ." अद्वैत विनंतीवजा आदेश देत म्हणाला. त्याचा आवाज ऐकून नाईलाजानेच ओजस तिथे थांबला.
ईश्वरीकडे वळत अद्वैत तिला म्हणाला, "ईश्वरी, काय झाले? एरवी कधी तू मला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी थांबवले नाहीस मग आज का? तुला या कंपनीत ग्रोथ दिसत नाहिये का? की आर्टिफॅक्ट्स आवडले नाहीत? की कॉस्टिंग रुचली नाही?"
त्याचे प्रश्न ऐकून ईश्वरीच्या चेहऱ्यावरील हावभाव मात्र क्षणात झरझर बदलले. ओजसची मान खाली होती पण त्याचेही कान तिचे उत्तर ऐकण्यासाठी टवकारले होते.
क्रमशः
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा