चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(जलद कथालेखन)
(जलद कथालेखन)
शीर्षक : प्रेम फॉरेव्हर (भाग-२)
"बोल ना..." ईश्वरीला गप्प बसलेले पाहून परत एकदा स्वतःच्या प्रश्नांची नजरेनेच आठवण करून देत अद्वैतने तिला बोलायला सांगितले.
"नाही हो. कंपनीत पोटेन्शियल आणि ग्रोथ आहे की नाही, हे माझ्यापेक्षा तुम्हालाच चांगले कळते. राहिला प्रश्न आर्टिफॅक्ट्सचा तर तेही सुंदर आणि क्रिएटिव्ह आहेत. त्यांची किंमतही क्वालिटीनुसार योग्यच आहे, उलट या महागाईच्या काळात बऱ्यापैकी स्वस्त आहे; पण..." ईश्वरी बोलता बोलता थांबली आणि ओजसकडे पाहू लागली.
"पण काय?" अद्वैतला अजूनही त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नव्हते.
"पण मला या कंपनीचे सर्वेसर्वा ओजस क्षीरसागर यांच्याशी तुम्ही कोणतीही बिझनेस डील करू नये, असे वाटते. आय डोन्ट वॉन्ट यू टू वर्क विथ हिम. दॅट्स इट, नथिंग एल्स." ती अद्वैतचा हात हातात घेऊन ठामपणे म्हणाली पण तिरपा कटाक्ष ओजसवर होताच तिचा... कदाचित कशाचा तरी ध्यास होता तिला आणि त्याच्या नजरेत उत्तर शोधायचे होते; पण ओजस मात्र नजरेला नजर मिळवत नव्हता.
"पण का ईश्वरी? प्लीज स्पष्ट सांगू शकतेस का?" अद्वैतने भुवया जुळवून विचारले.
"अद्वैत, मी तुम्हाला माझ्या एक्स फियांसेबद्दल सांगितले होते, आठवतेय? तुमच्या आधी मला एक स्थळ आलेले... आमची मने जुळली, आमचा साखरपुडा झाला. साखरपुड्यानंतर एकमेकांच्या आवडी-निवडी जाणून घेण्यासाठी, एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी साधारण दोन वर्षे आम्ही डेटही केले; पण एकाएकी लग्नाच्या एक महिन्यापूर्वी माझे लग्न मोडले." ईश्वरी अद्वैतशी वेगळ्याच विषयावर बोलायला लागली.
त्या आठवणी आठवून तिच्या आवाजासह बदलणाऱ्या हावभावातूनही तिचा संताप व्यक्त होत होता.
"हो तू बोलली होतीस पण त्याविषयी आता का बोलतोय आपण?" तिला होणारा त्रास अद्वैतला कळत होता म्हणून तो परत मुख्य मुद्द्याकडे वळला. सहसा ती विषयाचे विषयांतर करत नसायची; पण आज तिच्या वागण्यात फरक जाणवून अद्वैत पेचात पडला होता.
"कारण तो व्यक्ती इथे आहे, आपल्यासमोर बसून आहे आणि तुम्ही त्याच्याशीच बिझनेस डील करू पाहत आहात." जळजळीत कटाक्ष ओजसवर टाकत ती रूक्ष आवाजात म्हणाली.
"काय?" तिचे शब्द ऐकून अद्वैत आश्चर्यचकित झाला आणि त्यांच्या समोरच बसलेल्या ओजसकडे अविश्वासाने पाहू लागला.
"हो अद्वैत, ओजस क्षीरसागरच आहे माझा एक्स फियांसे... तोच उलट्या काळजाचा माणूस, ज्याने मला संसाराची गोड स्वप्ने दाखवली आणि जेव्हा वेळ आली त्या स्वप्नांना वास्तविकतेचे स्वरूप देण्याची, आपल्या प्रेमाने घरटे बांधण्याची तेव्हा पळ काढला. लग्नाला मोजून एक महिना बाकी होता तेव्हा मला सांगण्यात आले की त्याला त्याचे ध्येय गाठण्यासाठी खरा अडथळा मी वाटते म्हणून तो माझ्याशी नाते तोडत आहे, जुळलेले लग्न मोडत आहे आणि जर माझी इच्छा असेल की आमचे लग्न व्हावे तर माझ्या आई-बाबांनी हुंडा म्हणून त्याच्या स्टार्टअपसाठी भांडवल द्यावे, अर्थात तो सांगणार तेवढा आकडा. तो आकडा होता— १ करोड. पहिल्याच भेटीत मी स्पष्ट सांगितले होते की मला हुंडा पद्धत आवडत नाही. देणाऱ्याची चीड येतेच पण घेणाऱ्याचीही येते, तरीही ऐनवेळी एकतर १ करोड रुपयांचा हुंडा, नाही तर लग्न मोडणार अशी धमकी देणारा महापुरुष आहे हा सज्जन माणूस." ओजसकडे पाहून ईश्वरी तिच्या मनात साचलेला भावनांचा गाळ आज रिता करत होती.
"काय सांगतेस काय? याचा अर्थ ओजसच आहेत तुझ्या ट्रॉमाचे कारण?" अद्वैतला अजूनही तो जे ऐकत होता त्यावर विश्वास बसत नव्हता.
"हो म्हणून मला असे वाटते की तुम्ही या निष्ठूर, पाषाणहृदयी माणसाशी व्यवहार करू नये. ह्याच्यासाठी पैसाच सर्वकाही आहे. आज त्याला गरज आहे म्हणून तो अदबीने वागत आहे; पण उद्या तुमच्यापेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक करणारा गुंतवणूकदार मिळाला तर तो तुमच्याशी विश्वासघात करायला मागे-पुढे पाहणार नाही. त्याला नात्यांची जराही जाणीव नाही. सेल्फ सेंटर्ड आहे हा... स्वार्थी आहे खूप..." ईश्वरी रागात बोलत होती.
तिच्या डोळ्यात पाणी साचले होते; पण तिने भावनांवर संयम साधला होता. ती इतक्यात खचणार नव्हती. अद्वैत तिला सावरत होता पण ओजसकडे खाऊ की गिळू नजरेने पाहण्याचे कामही सुरूच होते.
ओजस मात्र मान खाली घालून ईश्वरीचा एकेक शब्द ऐकत होता. आज तब्बल ४ वर्षांनंतर पाहिले होते त्याने तिला... तिला पाहताक्षणीच डोळ्यांपुढे आठवणींची रेलचेल सुरू झाली होती. तिला पाहून आजही नजरेचा ठोका चुकला होता; पण तिला प्रेमळ कटाक्षाने पाहण्याचा हक्क तो गमावून बसला होता.
जिच्या डोळ्यात त्याने काही काळापूर्वी नितांत प्रेम पाहिले होते तेच डोळे आज त्याच्याकडे तिरस्काराने बघत होते. त्याला कधीच नावानेही हाक न मारणारी ती त्याच्याविषयी खूप तुच्छतेने बोलताना त्याला जाणवत होती आणि यावर तो कोणता आक्षेपही घेऊ शकणार नव्हता. तिच्या शब्दांनी त्याच्या हृदयावर वार होत होते, मनाला वेदना होत होत्या; पण तो एखाद्या पाषाणाप्रमाणे प्रत्युत्तर न देता ऐकत होता, कारण ती वेळ त्याने स्वतःच स्वतःवर ओढवून घेतली होती.
"खूप घाण विचारसरणी आहे ह्याची... हा कोणाचेही प्रेम डिझर्व्ह करत नाही. जो व्यक्ती स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या आई-बाबांची शेवटची आठवण विकू शकतो, तो काय माझ्यावर प्रेम करणार? ह्याचे खरे प्रेम पैशांवरच. हा कधीच कोणावर प्रेम करू शकत नाही, माझ्यावरही केले नव्हते." ती बोलली आणि ओजसने घट्ट मुठी आवळल्या.
प्रत्येकाची ऐकून घेण्याची एक मर्यादा असते. त्यालाही होती आणि आता ती मर्यादा तिने भंग केली होती; म्हणून मौन सोडत बोलत सुटला तो...
"काय म्हणालीस? मी... मी प्रेम केले नव्हते तुझ्यावर? मी उलट्या काळजाचा माणूस आहे? असा कसा तू एकतर्फी निर्णय घेतलास? तुलाच कधी माझे प्रेम कळले नाही कदाचित. माझ्यासाठी कधीच पैसा महत्त्वाचा नव्हता. माझी स्वप्ने नक्कीच मोठी होती; पण त्या स्वप्नांसाठी मी तुझ्या भावनांशी खेळ करावा, इतकाही मी लाचार नाही. मलाही आवडायचीस तू, माझेही प्रेम होते तुझ्यावर. जीव होतीस तू माझा म्हणून तुला वेदनेत तळमळताना पाहण्याचे धाडस कधीच करू शकलो नाही. आताही तू मला एवढे बोललीस; पण तुझ्या शब्दांपेक्षा तुझ्या डोळ्यात अश्रू पाहून मी घायाळ होतोय. नाही पाहू शकत मी तुला असे रडताना... ना आता, ना तेव्हा... म्हणून तर मी तुझ्या नजरेत स्वतःला विलन रिप्रेझेंट केले; पण याचा अर्थ मी प्रत्यक्षात विलन आहे, असे नाही. मीही प्रोटोगॉनिस्ट आहे पण दुर्दैवाने माझी कथा अपूर्णच राहिली." आधी चिडून बोलणारा त्याचा स्वर हळूहळू सौम्य झाला होता.
"म्हणजे? तुला म्हणायचे काय आहे?" ती कपाळावर आठ्या पाडून त्यालाच पाहत होती.
"काही नाही. मी ओघाओघात काहीही बडबडत सुटलो. कळले तुमचे माझ्याविषयी आणि माझ्या स्टार्टअप कंपनीविषयी मत... आता रजा घेतो." आता बऱ्यापैकी शांत झाला होता म्हणून विषय बदलत ओजस म्हणाला.
"नाही, जोपर्यंत तू सर्वकाही कबूल करत नाहीस तोपर्यंत तू कुठेही जाऊ शकत नाहीस. मला आज कळूच दे काय झाले होते चार वर्षांपूर्वी... का लग्न मोडले होतेस तू जर पैसा हे कारण नव्हते तर? कधीतरी तू माझ्यावर प्रेम केले असशील तर त्या प्रेमाची शपथ आहे तुला, सांग मला सर्वकाही..." ती आता गांभीर्याने बोलत होती. तिने शपथ दिली आणि त्याचा नाईलाज झाला. दीर्घ श्वास घेत तो बोलायला लागला.
"४ वर्षांपूर्वी मी माझा व्यवसाय उभारण्याच्या उंबरठ्यावर नक्की होतो, धडपड करत होतो; पण माझ्या प्रत्येक फ्युचर प्लॅन्समध्ये तू होतीस, ईश्वरी. या अशा भविष्याची मी कधीच कल्पना केली नव्हती." त्याने बोलता बोलता उसासा घेतला. ती हाताची घडी घालून शांतपणे बसली होती.
"आपले लग्न जुळले तेव्हापासून बऱ्याच चांगल्या गोष्टी घडल्या होत्या. मी तर तुझ्याशी नाते जोडून खूप आनंदी होतो पण..." एकदा तिच्याकडे पाहून तो थांबला. तिचे हावभाव स्थिर होते.
"पण तुझे बाबा आनंदी नव्हते." त्याने खाली पाहतच त्याचे वाक्य पूर्ण केले.
"काय?" तिने आवाज वाढवत विचारले.
क्रमशः
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा