चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
(जलद कथालेखन)
(जलद कथालेखन)
शीर्षक : प्रेम फॉरेव्हर (भाग-३)
ओजसने जी माहिती दिली ती ऐकून ईश्वरी थक्क झाली होती. तिची अशीच काहीशी प्रतिक्रिया असेल, याची खात्री त्याला होती; म्हणून तो तिचे हावभाव टिपत पुढे बोलू लागला...
"हो, तुझे बाबा मला अनेकदा एकांतात भेटायचे आणि म्हणायचे की तुझ्यासाठी श्रीमंत घरातील स्थळे चालून येत आहेत, तुला मागणी घालत आहेत पण तू माझ्यासारख्या—आर्थिक स्थैर्य नसणाऱ्या व्यक्तीला पसंत केले आहेस आणि इतर कोणत्याही मुलाचा विचार करत नाहियेस. माझ्यामुळे तुझे भविष्य अंधाराने वेढले जात आहे. मला जर तुझी काळजी वाटत असेल तर मीच तुला लग्नाला नकार द्यावा, असे सांगायचे. कारण त्यांच्या मते, लग्नानंतर तुला माझ्यामुळे बऱ्याच गोष्टी सॅक्रीफाईज कराव्या लागतील आणि बाबा कोणाचेही असो ते आपल्या लेकीला अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत. म्हणून तुझे बाबा त्यांच्या ठिकाणी योग्यच होते." ओजस म्हणाला.
सहसा लोक स्वतःची बाजू योग्य दर्शवण्यासाठी, स्वतःला श्रेष्ठ भासवण्यासाठी इतरांची भूमिका लक्ष पटीने चुकीची मांडण्याचा प्रयत्न करतात; पण ओजस तत्क्षणी तसे काहीच करत नव्हता.
"म्हणजे तू माझ्या बाबांसाठी आपले प्रेम नाकारलेस? जर असे झाले तर... तसे झाले तर... असे विचार करून माझा हात सोडलास? तू प्लॅन केल्याप्रमाणे आपले भविष्य नसू शकते, असा विचार करून आपले लग्न मोडलेस? किती भित्रा असशील रे तू..." ईश्वरी त्याच्याकडे तुच्छ नजरेने बघत, दात ओठ खात म्हणाली. रागाने तिच्या मस्तिष्काची शीर फुगली होती.
"नाही, तू गैरसमज करतेय. ते कारण नव्हते." त्याने खुलासा केला.
"मग?" तिने भुवया आकसून घेतल्या.
"तुझे बाबा सतत मला माघार घ्यायला सांगत होते; पण मीसुद्धा माझ्या मतावर ठाम होतो. मला खात्री होती की जरा वेळ लागेल पण तू सोबत असशील तर अशक्यही साध्य करता येईल मला! लग्नाला एक महिनाच उरला होता; पण तरीही तुझे बाबा मला इन्फ्ल्युएंस करू पाहतच होते म्हणून एक दिवस, मी तुझ्याशीच लग्न करणार हे स्पष्ट त्यांना बजावले आणि परत कधीच त्यांनी मला लग्नाला नकार देण्यासाठी कन्व्हिन्स करू नये, असेही सांगितले. थोडे हिरमुसले ते पण मलाही तुला गमवायचे नव्हते. मी त्यांना निरोप देण्यासाठी अंगणात सोडायला गेलो होतो की अचानक डोळ्यावर अंधारी आली आणि मी बेशुद्ध होऊन पडलो. जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. बरेच तास उलटले होते. मला काय झाले होते याचे निदान लावण्यासाठी अख्खे दोन दिवस कित्येक चाचण्या करण्यात गेले. शेवटी त्या एका टेस्टचे रिपोर्ट्स आले आणि चित्रच बदलले." बोलता बोलता आठवणींची सावली मध्येच त्याच्या डोळ्यासमोर थुईथुई नाचत होती.
"कोणती टेस्ट? आणि काय होते रिपोर्ट्समध्ये?" ईश्वरीच्या हृदयाची धडधड एकाएकी वाढली होती.
"एमआरआय टेस्ट... माझ्या मेंदूचे एमआरआय रिपोर्ट्स दाखवत डॉक्टरांनी सांगितले की माझ्या मेंदूत एक गाठ आली आहे आणि ती खूप अवघडलेल्या स्थितीत आहे. ती गाठ ऑपरेशन करून लवकरात लवकर बाहेर काढणे गरजेचे आहे कारण त्या गाठीमुळे माझ्या स्मरणशक्तीवर परिणाम होतोय. डॉक्टरांनी माझी रॅपिड मेमरी टेस्ट केली. ज्यात त्यांनी आठवणींशी संबंधित प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची उत्तरे देताना कळले की मी माझ्याही नकळत माझ्या बऱ्याच आठवणी विसरत चाललोय. कालांतराने माझ्या लक्षात आले की मी आपल्या दोघांचे क्षणही विसरतोय. आपली पहिली भेट मला अंधूक अंधूक आठवत होती. त्यानंतरचेही आपल्या आयुष्यात आलेले बरेच हळवे क्षण माझ्या आठवणीतून कधीच गहाळ झाले होते. माझी स्मरणशक्ती पाहताच डॉक्टर म्हणाले की वेळीच काही केले नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल, इतकी की मी पूर्णपणे तुलाच विसरेल. माझ्या आठवणींचा कप्पा पुरता रिकामा होईल. इतरांविषयी तर विसरणारच पण स्वतःविषयीही मी विसरणार. हे सर्वकाही डॉक्टर मला एक्सप्लेन करत होते तेव्हा तुझे बाबा तिथेच होते. त्यांनी एक शेवटचा प्रयत्न करून कदाचित त्या क्षणी प्रस्ताव मांडला होता लग्न मोडण्याचा... मी होकारच देईल अशी खात्री नव्हती त्यांना; पण प्रयत्न केला त्यांनी आणि यावेळी त्यांना यश आले मी सरतेशेवटी होकार दिला आपले लग्न मोडायला..." तो बोलून शांत झाला आणि ती आताशः पुरती सुन्न झाली.
काय आणि कशी प्रतिक्रिया द्यावी, या पेचात ईश्वरी सध्या अडकली होती. डोळ्यांना कधीच पाझर फुटला होता आणि अश्रू गालावर ओघळत होते.
"लग्न आपले होते मग एकटा निर्णय घेऊन कसा मोकळा झालास? का मला अंधारात ठेवलेस? का?" ती ओजसकडे पाहत काहीशी चिडूनच म्हणाली.
"कारण तुला मी सांगितले असते तर तू स्वेच्छेने तुझ्या सुखाचे सॅक्रीफाईज करून माझी सोबत केली असतीस आणि मला तेच नको होते. तुला तीळ तीळ तुटताना पाहता आले नसते मला. शिवाय, ईश्वरी मी तुला विसरत चाललोय, हे असे सांगून तुला डोळ्यांआड पाणी लपवून, उसने हसण्यासाठी प्रवृत्त करू शकणार नव्हतो मी; म्हणून माझा नाईलाज झाला. तुझ्या बाबांनीच सांगितले की मी हुंडा मागितला तर तूच लग्न मोडायला पुढाकार घेशील, म्हणून काळजावर दगड ठेवून त्यादिवशी तुला नको नको ते बोललो. तुलाच अप्रत्यक्ष बळजबरी केली लग्न मोडण्यासाठी, इव्हन दो आय वॉज मॅडली इन लव्ह विथ यू... तुला माझ्यासाठी झुरताना पाहणे माझ्यासाठी खरी शिक्षा होती म्हणून मुद्दाम तुझ्या मनात मी स्वतःची तशी छवी निर्माण केली आणि मग अपेक्षेप्रमाणे घडले, तू स्वतःच लग्न मोडलेस." ओजस बोलता बोलता भावूक झाला होता म्हणून किंचित डोळे वर करून डोळ्यातील पाणी लपवले त्याने...
"आय ॲम सॉरी... मी... मी तुझा तिरस्कार केला; पण कधी सत्य जाणून घेण्याची धडपडच केली नाही. किती सहन केलेस तू... आय ॲम रियली सॉरी... प्लीज मला माफ कर. माझ्या रागापुढे मी आपले प्रेम विसरले. बाबा तुझ्याशी जे वागले त्यासाठी त्यांच्या वतीने मीच माफी मागते. एवढी वर्षे तू जे आरोप ऐकून घेतलेस त्यासाठी मी दिलगीर आहे आणि मला आनंद आहे की माझी पहिली निवड चुकीची नव्हती. तू... तू हिरा आहेस." असे म्हणत ती रडत त्याच्या मिठीत शिरली.
त्यानेही तिला कवटाळून घेतले. तिथे कोण आहे, कोण काय विचार करेल, अशा विचारांना तिलांजली देत तो त्या क्षणाला आयुष्यभरासाठी आठवणींच्या कप्प्यात साठवून घेत होता.
"अद्वैत हा खूप निर्दयी माणूस आहे. तुम्ही चुकूनही याच्याशी डील करू नका. प्लीज, तुम्हाला माझी शपथ..." ते शब्द कानावर पडले आणि त्याची तंद्री भंग पावली.
आजूबाजूला कटाक्ष टाकला तर लक्षात आले त्याने तिला कोणतीही कबुली दिलीच नव्हती. तो फक्त एक भास होता त्याच्या मनाचा आणि नजरेचा खेळ होता.
त्या परिस्थितीत तो स्वतःवरच खिन्न हसून जागेवरून उठला, लॅपटॉप बंद केले आणि परत एकदा कोणतेही स्पष्टीकरण न देता तिथून जाऊ लागला. पावले जड झाली होती. ते अंतर पार करावे वाटत नव्हते पण ईश्वरीकडे पाहून तो मनातच स्वतःला आधार देत म्हणाला, 'काही हरकत नाही. प्रत्येक प्रेमकथेचा शेवट लग्न नसतोच. काही कथा लग्नानंतरही अविरत सुरू राहतात आणि काही मुळातच अपूर्णच लिहिल्या जातात...'
तो चार पावले दूर गेला असेलच की पळतच ईश्वरी त्याच्या जवळ आली आणि त्याच्या पाठीवर फटके मारत रडायला लागली.
"खूप निष्ठूर आहात तुम्ही... खूप निर्दयी आहात. तुम्हाला मन नाही. तुम्हाला हृदय नाही. तुम्ही स्वार्थी आहात..." ती रडतच बोलत होती.
तो तिच्याकडे वळला. त्याने गोंधळून एकदा तिच्याकडे आणि एकदा अद्वैतकडे पाहिले. अद्वैतच्या ओठांचा कोपरा किंचित वर उंचावलेला जाणवला. त्या परिस्थितीशी त्या दोघांचेही हावभाव काही जुळत नव्हते. त्याने अद्वैतकडे दुर्लक्ष करून ईश्वरीकडे लक्ष केंद्रित केले तर ती अजूनही त्याला रडतच फटके मारत होती.
क्रमशः
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
©®सेजल पुंजे.
(संघ-कामिनी)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा