प्रेम हे बावरे! भाग - दोन.

वाचा एक अनोखी प्रेमकथा!
प्रेम हे.. बावरे!
भाग - दोन.

एकमेकांकडे पाहून दोघांनाही आश्चर्य वाटले.
बॉसच्या खुर्चीवर तोच बसला होता, बसमध्ये तिच्या बाजूला बसलेला. निल!

"राधा तू? तू काय करते आहेस इथे?" त्याच्या त्या घाऱ्या डोळ्यातील आश्चर्य कायम होते.

"मी मुलाखतीला आलेय सर." तिचा स्वर शांत.


"तुझ्यासारखी टॉपर मुलगी माझ्या ऑफिसमध्ये? सगळं काही ठीक आहे ना राधा?" त्याच्या डोळ्यात काळजी होती.

"सर, कॉल मी अनुराधा. मुलाखत सुरु करायची?" तिने शांतपणे विचारले. डोळे तसेच, भावहीन.

'हिने अजूनही ओळखलं नसावं का मला? शक्य नाही ते.' त्याच्या मनात असंख्य विचार.

फार्मल इंटरव्ह्यू झाल्यानंतर ती बाहेर आली. रिजल्ट उद्याला कळणार होता. बाळाला सांभाळत ती निघाली. तो मात्र तिच्याच विचारात गुंतला.

******

आठ वर्षांपूर्वीचा हाच तो पाऊस, श्रावणातला! क्षणात सरसर बरसणाऱ्या सरी तर क्षणात पडणारे लख्ख ऊन.
त्याच उन्हपावसातल्या श्रावणात भेटलेली ती!

कॉलेज मध्ये बारावीला लेट ऍडमिशन म्हणून आलेली,
नाजूकशी. सावळीच पण चेहऱ्यावर तेज असलेली. लांबसडक केस, मध्यम बांध्याची. साधीशीच. तरीही तो अडकला तिच्यात, तिच्या त्या काळ्याभोर पाणीदार डोळ्यात.

बारावीत दोनदा नापास झालेला तो. मित्रांचा निल्या.
गोरापान, घाऱ्या डोळ्यांचा. चेहरा दाढीमीशांनी वेढलेला.
अगदी टपोरी गुंड्याटाईप.

अख्या कॉलेजमध्ये गुंडगिरी करण्यात फेमस. वडिलांविना पोर म्हणून मोठया कष्टाने आईने त्याला वाढवले, पण पोरगं पार वाया गेलेले. आईच्या कष्टाचे खायचे नी कॉलेजमध्ये येऊन मजा करायची एवढेच त्याचे काम.

आणि अशा या निल्याच्या बदामी घाऱ्या डोळ्यात तिचे ते काळेभोर डोळे घर करून गेले. रोज तिच्या वाटेवर तो गुलाबपाकळ्या टाकून वाट बघायचा. त्याच्यासमोर तिच्याकडे वाकडी नजर करून कोणी पाहील तर शपथ!

हळूहळू तिलाही हे जाणवयला लागले. एक दिवस हिम्मत करून तिने विचारलेच.

"काय रे काही कामधंदे नसतात का तुला? का उगा माझ्या मागे लागलाहेस?"

"आवडतेस तू आपल्याला. दिलात बसली आहेस एकदम." तो तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला.

"शी.. काय भाषा आहे तुझी. ती सुधार आधी. नी मग बोल माझ्याशी." त्याच्या नजरेला भाव न देता ती तुसडेपणाने म्हणाली.

"तुझ्यासाठी काय पण. तू म्हणशील ते करायला तयार आहे आपण." त्याची ती नजर तशीच स्थिर.


"हो? मग या खेपेला बारावी पास होऊन दाखवायचं तेही फर्स्ट क्लास घेवून. नंतरच माझ्याशी बोलायला यायचं." आपले लांबसडक केस हलवून ती निघाली.

"राधा, ऐक ना. तुझं चॅलेंज स्वीकारलं मी. सत्तरच्या वर पर्सेंटेज नाही मिळालेत ना तर नाव नाही लावणार निलय म्हणून." तिच्याजवळ जात तो म्हणाला.

"राधा नव्हे अनुराधा आहे मी." ती चिडून.

"ते इतरांसाठी. माझ्यासाठी फक्त राधाच. राधानील काय मस्त वाटतं ना?" तो हसत म्हणाला.

"आता माझ्याशी डायरेक्ट बारावीच्या रिजल्टनंतरच बोलायचं कळलं?" त्याच्यासमोर बोट दाखवून ती निघून गेली.

त्याच्या कॉलेजच्या फेऱ्या आता कमी झाल्या होत्या. तिला वाटले, घाबरला असेल तो. ती गुंतली अभ्यासात.


त्यानेही पहिल्यांदा रात्रंदिवस एक करून अभ्यास केला. आणि खरंच आश्चर्य, एव्हरीबडी गेट शॉक्ड, निल्याभाई एकदम रॉक!
पंच्याहत्तर परसेन्टेज.
:
क्रमश :
©®Dr. Vrunda F. (वसुंधरा..)
आतातरी राधा निलशी बोलेल का वाचा पुढील भागात.

🎭 Series Post

View all