Login

प्रेम की मैत्री भाग ४(अंतिम भाग)

प्रेम की मैत्री भाग ४(अंतिम भाग)
" विशू तूझ्या येण्याने माझ्या आयुष्यात मैत्रीचं एक सुंदर पान उघडलं गेलं होतं. जगायला एक नविन मित्र भेटला होता. मानवच्या आठवणीं सोबत मी जगत होती रे. पण तूझ्या सोबतच्या मैत्री ने नव्याने हसायला शिकत होते. तूझ्या सोबत मैत्री निभावत असताना माझ्या आणि मानवच्या आठवणी थोडया धूसर व्हायला लागल्या होत्या. तूझ्या मैत्रीचा रंग हळू हळू आयुष्यात चढू लागला होता. आपण सोबत किती छान वेळ घालवला आहे ना ! आपलं आरव सोबत पार्क मध्ये फिरणं असू दे. किंवा एका बेंच वर बसुन सोबत बघितलेला सूर्यास्त असु दे. आपण किती साऱ्या गोष्टी एकमेकांच्या सोबत केल्या आहेत. विक एंड च आपलं औटिंग असु दे किंवा एकत्र बनवलेला इंडीयन डिशेस असू दे. खूप छान वेळ आपण एकमेकांच्या सोबत घालवला आहे."

" सुरभी तू तर सगळ्या आठवणी अगदीं कविता म्हणल्या सारख्या मांडत आहेस." तिच्या बोलण्याने त्याच्या डोळ्यासमोर इतक्या दिवसांचा मैत्रीचा प्रवास उलगडला गेला होता तिच्याकडून ते सगळे ऐकणं देखील सुखद अनुभव होता.

" विशू आपली मैत्री पण एखादया कविते सारखीचं आहे ना ! " सुरभी दाटलेल्या आवाजात म्हणाली.

" मला वाटतं आपली मैत्री पण एखाद्या कविते सारखी हवी. छोटी पण सुखद. मनाला आनंद देणारी. विशू त्यासाठीच मला वाटतं आपल्या वाटा वेगवेगळ्या होणं योग्य आहे." ती डोळे मिटून म्हणाली. तिने चहाचा कप ट्रे मधे ठेवला. मग एकदम उठून उभी राहिली. त्याचा रिकामा कप ट्रे मध्ये ठेवून ती निघाली. त्याआधीच त्याने तिला अडवल. तिचा हात हातात घेत तिला विचारलं,

" सुरभी तू काय म्हणत आहेस. मला समजेल असं सांग. मनात गील्ट वाटतं आहे. मी काय करू ? मला समजेल अशा सोप्या भाषेत सांग. स्पष्ट करुन सांग." तो हट्ट करत म्हणाला.

" विशू, तु माझ्या सोबत जितके दिवस घालवले, मैत्रीच्या नात्याने , ते दिवस ते क्षण माझ्या आयुष्यात आपल्या मैत्रीची अमूल्य भेट आहे. त्या आठवणी मी मनाच्या कप्यात जपून ठेवल्या आहेत. हे आपल्या आवडीचे मोहाचे क्षण आपला असा एकमेकांच्या सोबतचा वेळ जर जास्त वाढला तर ते चांगलं नाही. कधी कधी अशा मैत्रीला पण वेळेची काळी नजर लागते. या काळात माहीत नाही आपण किती खऱ्या खोट्या गोष्टींचा सामना केला असता. त्यातून आपण दुखी झालो असतो. आपलं नात फारच वेगळ्या वळणावर उभ आहे. ते मैत्रीच्या पलीकडचं पण प्रेमाच्या अलीकडच आहे. प्रेम आणि मैत्री या मध्ये एक खोल दरी आहे. या नात्याला काहीच नाव नाही. ना कोणत भविष्य आहे. त्यापेक्षा या वळणावर हसुन एकमेकांचा निरोप घेऊ. आपल्या सुखद आठवणी सोबत घेऊ.
विशू तुझ लग्न झालं आहे. सृष्टीच तुझ्यावर भरपूर प्रेम आहे. ती तूझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. तू तुझ्या आयुष्यात परत जा. सुखाने संसार कर. मी मानवच्या आठवणी सोबत आयुष्य जगू शकते. माझ्या कडे माझ्या आयुष्याचा आधार आहे. जगण्याचं धेय्य आहे. ते साध्य करता करता आयुष्य कधी संपेल कळणार पण नाही." चेहेऱ्यावर उसन हासू खेळवत सुरभी म्हणली.

" मला वचन दे तु आयुष्यात मला कधीच भेटण्याचा प्रयत्न करणारं नाही. मला फोन करणारं नाही किंवा इमेल पण करणारं नाहीस. जेव्हा कधी माझी आठवण येईल तेव्हा सृष्टीचा हात हातात घेऊन सूर्यास्त बघ. प्रेमाच्या कविता वाच. तुझं आयुष्य खूप सुंदर आहे. ते भरभरून जग." असं म्हणून ती हलकेच त्याच्या हातावर डोकं टेकवते. त्याच्या नजरेत तिचं प्रतिबिंब दिसत होत.
त्याच्या गालावर कळत नकळत ओठ टेकवते.

" विशू मला प्रेमाची छोटी कविता व्हायला आवडेल,कादंबरी नाही."

त्याच्या कडे न बघता तिने तो ट्रे उचलला. भांडी स्वच्छ धुवून ठेवली.तिचं सगळं सामान घेतल. आरवला घेऊन ती तिच्या घरी निघाली. विश्रुत तिच्या बोलण्याने स्तब्ध झाला होता. ती गेली तरी देखील बाल्कनीत बसुन तो दुर जाणाऱ्या तिच्या कारला बघत होता.

इतक्यात त्याचा फोन वाजला. सृष्टी होती. त्याने फोन उचलला. समोरून तिच्या आवाजाचा खळखळाट ऐकु येत होता.त्याच्या येण्याने तिला किती आनंद झाला होता हे आवाजातून समजत होत. तो फक्त हुंकार देत होता. फोन ठेवल्यावर त्याने पुन्हा एकदा बाहेर बघितलं. तर तिची कार दिसत नव्हती रस्ता मोकळा होता.

त्या मोकळ्या रस्त्याकडे बघत तो इतकचं म्हणाला,

" सुरभी तू बरोबर बोलतं आहेस,  आपलं नात फारच वेगळ्या वळणावर उभ आहे. ते मैत्रीच्या पलीकडचं पण प्रेमाच्या अलीकडच आहे. प्रेम आणि मैत्री या मध्ये एक खोल दरी आहे. या नात्याला काहीच नाव नाही. ना कोणत भविष्य आहे. त्यापेक्षा या वळणावर हसुन एकमेकांचा निरोप घेऊ. आपल्या सुखद आठवणी सोबत घेऊ."

नव्या उत्साहाने तो त्याचं पॅकिंग करू लागतो.

खरं आहे ना, काही गोष्टी या सुखद वळणावर सोडून देणं योग्य असतं !

समाप्त

© ® वेदा

कथा आवडल्यास कॉमेंट मध्ये सांगा.

या कथेचा वापर यू ट्यूब किंवा इतर कुठेही आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.