Login

प्रेम लग्नानंतरचे भाग - २

लग्नानंतरची प्रेम कथा....
प्रेम लग्नानंतरचे भाग - २

सुरुवातीला वंशिका समजूतदार असल्यामुळे तिने सगळं काही सहन केलं.समजून घेतलं.पण आता प्रत्येक माणसाची समजून घेण्याची आणि सहन करण्याची ही एक क्षमता असते...मर्यादा असते.पण त्या सगळ्या अगदी हद्दपार झाल्या होत्या. आणि तिचा संयम ही आता संपत चाललेला होता.


आणि ह्याला कारण म्हणजे तिच्या सासऱ्यांचे जुनाट बुरसटलेले विचार. आणि त्यांच्या चालीरीती... आणि त्यांच्या म्हणण्यानुसार वागणं. हे  मात्र वंशिकाला खूप जड जात होतं. पण अभय चांगला असल्यामुळे तो सांभाळून घ्यायचा.
आध्ये मध्ये दोघांमध्ये थोडेसे खटके उडत होते. पण दोघेही एकमेकांना समजून नि सांभाळून घेत होते.



अभय वंशिकाला समजून घ्यायचा. तिची परिस्थिती समजून घ्यायचा. तिची अवस्था समजून घ्यायचा.पण अभयची अवस्था त्या पुढची होती. वडिलांच्या पुढे  काही चालतच नव्हतं. त्यांना स्वातंत्र्य नावाचा प्रकारच नव्हता. वडील म्हणतील ती पूर्व दिशा... असा प्रकार त्यांच्या घरी असायचा.

दोघे पैसा कमवायचे.बाहेर दोघांच नाव होतं. प्रतिष्ठा होती. मानसन्मान होता.पण घरी मात्र हे सगळं अगदी दुय्यम दर्जाच मानलं जायचं. इथे बाबा म्हणतील तीच पूर्व दिशा.. बाबांचाच अखेरचा शब्द. असं काहीसं होतं? त्यांचे निर्णय किती चुकीचे असले तरी ते यांनी मान्य करायलाच हवेत अशी धारणा.


त्यामध्ये नवरा बायकोमधली प्रायव्हसी किंवा बाकीच्या गोष्टी अशा काही राहतच नव्हत्या. वंशिकाला तर या सगळ्याचा खूपच राग यायचा. चिडचिड व्हायची. त्रास व्हायचा. आणि मग अभयने तिच्यामध्ये थोडेसे खटके उडायचे. पण दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्यामुळे दोघेही एकमेकांना समजून घेत होते.


भांडण, वादविवाद हे प्रत्येक नात्यांमध्ये आणि प्रत्येक नवरा बायकोंमध्ये होतच असतात. जसे त्या दोघांमध्ये होते. पण ह्याला कारण मात्र त्याचे बाबा होते. घरात आईचं सुद्धा काही चालायचं नाही. सून आली तरी सुद्धा 'रांधा, वाढा  नि उष्टी काढा.' इतकंच काय ते त्यांचं आयुष्य होतं.

आणि मग वंशिका त्यांना समजवायला गेली तर त्या,
'पती हाच परमेश्वर. पती हाच देव.' या तत्त्वावरती चालणाऱ्या होत्या. त्यामुळे वंशिका त्यांना काही फार असं सांगायला जात नव्हती. आणि तिलाही माहिती होतं की आता इतके वर्ष झाले आहेत.जे इतक्या वर्षात बदललं नाही ते आता ती पूर्ण कसं बदलणार? पण तिला अभय मात्र पुरेपूर साथ द्यायचा.


पण हे कधीतरी असलं तर ठीक आहे. पण आता हे रोजचं झालं होतं. ती अक्षरश:  कंटाळून जायची. पण तरीदेखील  वंशिका समजूतदार असल्याने तशीच त्या घरांमध्ये ती राहत होती. एकत्र कुटुंब होतं? पण सगळ्यांची अवस्था सारखीच होती? सासऱ्यांच्या पुढे कधी कोणाचं चालतच नव्हतं.


नवरा बायकोंना मूल कधी व्हावं? याचा निर्णय सुद्धा तिच्या सासऱ्यांच्या मनावरती असायचा.नाहीतर मग टोमणे सुरूच. म्हणजे त्यांना जर का फ्युचर प्लॅनिंग वगैरे काही करायचं असेल तर त्याला वावच नव्हता. हे सगळं अगदी तिचे सासरे म्हणतील तसंच व्हायचं. आणि आता वंशिका आणि अभयच्या पाठीमागे सुद्धा मुलासाठी तगादा लावलेलाच होता.


वंशिकाला तर माहेरी जायला सुद्धा मिळत नव्हतं. कारण तिला मग अभयची काळजी लागून राहायची. कारण तो मुळातच शांत होता. त्यामध्ये डॉक्टर असल्यामुळे त्याचा दिवस नि रात्र कशी असायची हे तिला चांगलंच माहिती होतं.

त्याला असं हक्काने भांडताना किंवा मग कुणाचं मन दुखवताना तिने कधी पाहिलेलच नव्हतं. त्यामुळे तिला त्याची चिंता लागून राहायची. तशी तीही शांत आणि अबोल, समजूतदार असली तरी सुद्धा दोघांमध्ये ती तशी बोलकी होती. अर्थात या सगळ्या वातावरणामुळे अभय शांत झाला होता.मुळात तो मूळचा बोल घेवडाच होता.

तिचं कॉलेजचं रुटीन सुरू झालं आणि त्याचं हॉस्पिटलचं की दोघांना एकमेकांसाठी वेळच मिळत नव्हता. त्यामध्ये कोणाचं तरी लग्न,कोणाची तरी वास्तुशांती, कोणाचं तरी साखरपुडा, मग कोण आलं... कोण गेलं... कुणाचा दहावा तर कुणाचं आणि काय... असं म्हणतच इकडे तिकडे पाहुणेरावळे सतत असायचे. त्यामुळे तसा त्यांना अलीकडच्या काही दिवसांमध्ये एकांत फार कमीच मिळत होता.


असेच दिवसांमागून दिवस जात होते. आणि अशातच वंशिका ला दिवस गेले. घरामध्ये आनंदी आनंद झाला. एकत्र कुटुंब असलं आणि सगळीकडे सासऱ्यांचं चालत असलं...तरी सुद्धा सगळी माणसं एकमेकांना धरून होती. त्यामुळे अर्थातच अभयचं आणि वंशिकाचं बाळ येणार म्हटल्यानंतर प्रत्येकाला आनंद  हा झालाच होता.


पण आई होणं प्रत्येक आईसाठी  जस अवघड असतं. तसच ते वंशिकासाठी सुद्धा होतं.तिला भयंकर त्रास व्हायचा. उलट्या  व्हायच्या.मळमळ व्हायची. चक्कर येणं आणि सोबतच बीपीचा त्रास सुद्धा सुरू झालेला होता. पण ती कॉलेजला सुट्टी टाकू शकत नव्हती. कारण तिथे गेल्यानंतर थोडा वेळ तरी तिला स्वतःसाठी मिळत होता. पण त्रास मात्र भरपूर होत होता. जरा सुद्धा काही खाल्लेलं किंवा प्यालेलं तिला पचत नव्हतं.
सगळं पटकन बाहेर पडायचं. कोरड्या उलट्या सतत सुरू होत्या.


पण तिची अशी अवस्था पाहून सासऱ्यांनी तिला थोडे दिवसांसाठी रजा घ्यायला नाही तर कायमचीच नोकरी बंद करायला सांगितली. असं पण त्यांना तिने नोकरी केलेली आवडतच नव्हतं. पण अभयची तिला साथ होती. पण आता तिची अशी कंडिशन पाहून अभयने सुद्धा त्याला दुजोरा दिला. आणि तिने डायरेक्ट राजीनामाच देऊन टाकला.


आता ती चोवीस तास घरातच होती. घरात राहण्याची सवय नसल्यामुळे तिला थोडे दिवस जड गेलं. पण सासूबाईंसोबत इकडे तिकडे जायची.कधीतरी कंटाळा आला तर ती माहेरीही जाऊन येत होती. माहेरी काही माहेर पणाला जास्त दिवस राहता येतच नव्हत. त्यामुळे ती सासरीच असायची.

पहिल्या तीन महिने तर तिला खाल्लेलं काहीचं पचत नव्हत. आणि काही खाऊही वाटत नव्हतं. पण तीन महिन्यानंतर मात्र थोडीशी तिच्यामध्ये सुधारणा होऊ लागली. खाल्लेलं थोडं थोडं पचू लागलं आणि तब्येतही सुधरू  लागली.


पाचव्या महिन्यापर्यंत तिला नवीन नवीन काहीतरी खावंसं वाटत होतं. त्यानंतर सातव्या महिन्यापर्यंत तिचे गालही वर आले. तब्येतही चांगली सुधारली.आणि सातव्या महिन्यानंतर मात्र आणखीनच नाजूक परिस्थिती झाली. पायही सुजू लागले. बीपीचा त्रास सुरू झाला होता त्यामुळे सतत काही ना काहीतरी त्रास होत होता.

पाठीला ओढ बसत होती.त्यामुळे पाठीत कळ मारायची. कंबर दुखायची. डोकं दुखायचं. पण इतका सगळा त्रास करून शेवटी नऊ महिने झाले आणि त्यानंतर पाचव्या दिवशी तिने एका गोड नि गोंडस मुलाला जन्म दिला.


त्या नवजात बाळाला हातात घेताच अर्थात इतक्या महिन्यांचा त्रास त्यापुढे वंशिकाला काहीच वाटला नाही. तिला तरी फक्त तिचं ते छोटसं पिल्लूच दिसलं. तो सगळा त्रास अगदी दुय्यम वाटून गेला. आणि अशीच अगदी सेम कंडिशन अभयची होती. कारण त्याने वंशिकाला स्वतःच्या डोळ्यांसमोर इतक्या त्रासातून जाताना पाहिलं होतं. पण आता आपल्या बाळाला हातात घेतल्यानंतर त्या त्रासाचं पारणं फिटल्यासारखंच वाटलं दोघांनाही.

नॉर्मल डिलिव्हरी असल्यामुळे तिला अगदी चार ते पाच दिवसातच डिस्चार्ज देण्यात आला. आणि सव्वा महिन्याने बाळाचं बारसं करण्यात आलं. बाळाचं नाव 'वेदांत' ठेवलं.
सासऱ्यांना मुलगा पाहिजे होता आणि तिला पहिला मुलगा झाला. त्यामुळे तर वेदांतचा कोड कौतुक खूपच होत होत.

वेदांत आयुष्यात आल्यापासून मात्र वंशिका थोडीफार आनंदात राहत होती. पण आत्ता वंशिका देखील हळूहळू आपला हट्ट चालवायला शिकली होती.सरळ सांगून ऐकत नसतील तर युक्तिवाद करून तिला हवं ते बरोबर घेत होती.


वेदांत नंतर मात्र तिने दुसऱ्या बाळाचा चान्स काही घेतला नाही. अभयला मुलीची आवड होती. पण वंशिकाने  निर्णय घेतला की एकाच मुलावर बास करणार.नंतर  दुसर अपत्य नको. आणि तिने अभयला देखील तसं बजावून सांगितलं आणि अभय ने आपल्या बायकोच्या प्रेमाखातर ते मान्य ही केलं.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all