Login

प्रेम म्हणजे नक्की काय? अंतिम

प्रेम
नेहा जितके दिवस हॉस्पिटलमध्ये होती तितके दिवस प्रशांत देखील तिच्यासोबत राहिला.

नेहाला प्रशांतने हॉस्पिटलमधून घरी आणलं.

दोघेही बेडरुमध्ये गेले. प्रशांत पाहतो तर काय बेडरूममध्ये फुगे पसरले होते.

नेहाला त्याने हात पकडून बेडवर बसवलं.

चारी बाजूने रूम पाहिली.

"नेहा, हे काय आहे? सगळीकडे फुगे?"

"त्यादिवशी व्हॅलेंटाईन डे होता म्हणून मी आपला रूम सजवला होता." नेहा म्हणाली.

ते ऐकून प्रशांत खुश झाला.

बेडवर पिशव्या होत्या.

प्रशांतची नजर त्यावर गेली.

"नेहा, हे काय आहे?"

"व्हॅलेंटाईन डे होता ना म्हणून मी आपल्या दोघांसाठी शॉपिंग केली होती."

त्याने तिच्या कपाळावर किस घेतला.

त्याने टी शर्ट बाहेर काढलं.


छान गिफ्ट रॅप केलं होतं, त्यावर लिहिलं होतं

"टू माय लव्ह."

ते पाहून प्रशांतच्या डोळ्यात वेगळीच चमक आली.

नेहाने इतकं सगळं केलं होतं. त्याने तिच्यासाठी असं काहीच केलं नव्हतं.

त्याचा चेहरा उतरला.

"काय झालं? तुम्हाला आवडलं नाही का?"

"नेहा, खूप आवडलं. तू इतकं सगळं केलं आणि मी मात्र काहीच केलं नाही. सॉरी नेहा."


"तुम्हाला माहित आहे का तुम्ही त्यादिवशी माझ्यासाठी खूप काही केलं."


तो विचार करू लागला.

त्याने तर साधं गुलाबाचे फुल देखील दिलं नव्हतं.

"नेहा, मी काहीच केलं नाही."


"हे तुम्हाला वाटतंय; पण मला त्या अवस्थेत बघून अगदी रडायला लागला. त्यादिवशी जेव्हा आई म्हणाली की, ती मला घरी घेऊन जाईन तेव्हा किती कासावीस झाला होता. लगेच आईला म्हणाला, नेहाची काळजी मी घेणार. लगेच माझ्यासाठी पंधरा दिवसाची सुट्टी काढली.
हॉस्पिटलमध्ये मी जेवल्याशिवाय जेवायचा नाही. माझ्यासाठी किती धावपळ केली. रात्री देखील माझ्यासोबत राहिलात. तुमची रात्री झोप झाली नाही की, तुम्हाला त्रास होतो पण तरीही माझ्यासाठी तिथे राहिलात, इतकी काळजी घेतली आणि म्हणता काहीच केलं नाही?" हे सारं बोलत असतांना तिच्याही डोळ्यात पाणी आलं.


"नेहा, हे माझं कर्तव्य आहे. तू माझी बायको आहे. तुझ्यासाठी हे सगळं केलंच पाहिजे."

"हो का फक्त कर्तव्य आहे? प्रेम नाही?"


त्याने तिला घट्ट मिठी मारली.


"नेहा, त्यादिवशी शामल काकूंचा फोन आला, तुझा अपघात झाल्याची बातमी ऐकली आणि माझे हात पाय गळून गेले. तू कशी असशील? तुला किती त्रास होत असेल हाच विचार करत होतो; पण तुला जेव्हा बघितलं तेव्हा जीवात जीव आला. हे सगळं प्रेमच होतं नेहा, प्रेमच होतं. स्वतःला विसरून गेलो मी. तू लवकरात लवकर बरी व्हावी हीच देवाकडे प्रार्थना करत होतो. नेहा, मला तुझ्यासारखं व्यक्त होता येत नाही. तू जश्या तुझ्या भावना बोलून दाखवते तसं मला जमत नाही. मी आधीपासून असाच आहे आणि एक घटना घडली, त्यामुळे मी अजूनच शांत झालो."

"काय घडलं?"


" नेहा, हा किस्सा मी तुला सांगितला नाही; पण आज सांगतो. कॉलेजमध्ये एक मुलगी मला खूप आवडू लागली. प्रिया नाव होतं. पहिलं प्रेम म्हण. व्हॅलेंटाईन डे ला धाडस करून मी कॉलेजमध्ये तीला प्रपोज केला आणि तिने माझ्या कानाखाली मारली आणि माझ्यावर खूप भडकली. सगळी मुलं आणि मुली माझ्याकडे बघून हसत होते. मला फार वाईट वाटलं, त्यादिवसापासून भीती बसली. अल्लड वय ते काय कळायचं. नंतर मी माझ्या अभ्यासाकडे लक्ष दिलं. स्वतःच्या करियरवर लक्ष केंद्रित केलं. तो प्रसंग माझ्या मनात कायम घर करून बसला. त्यानंतर प्रेम तर सोड पण मी त्यांनंतर कोणत्याही मुलीशी मैत्री केली नाही. एक दिवस आई बाबांनी मला तुझा फोटो दाखवला. तुला पाहिलं आणि असं वाटलं तूच माझी योग्य जोडीदार होशील.
तू आली आणि माझ्यासोबत घरालाही आपलंसं केलं. साखर विरघळावी अगदी तशीच तू माझ्या आयुष्याचा भाग झाली. नेहा, खरंच मी तुझ्याशिवाय काहीच नाही. तू माझं सर्वस्व आहे." हे बोलत असतांना त्याच्या चेहऱ्यावर सर्व भाव स्पष्ट दिसत होते.


"किती दुःख मनात होतं? मला का नाही सांगितलं?" त्याची हनुवटी अलगद हातात धरत म्हणाली.

"नेहा, काही घटना इतक्या नकोश्या होतात की त्या सांगू देखील वाटत नाही. असंच झालं समज."

त्या घटनेमुळे प्रशांतच्या आयुष्यावर इतका वाईट प्रभाव झाला होता की बोलताना देखील त्याचा आवाज थरथरत होता.

नेहाला त्याच्यासाठी वाईट वाटलं.


"बरं झालं प्रियाने नकार दिला." ती हसत म्हणाली.

"काय बोलतेय नेहा?" तो तिच्याकडे निरखुन पाहू लागला.

"प्रियाने जर होकार दिला असता तर तुम्ही तिच्याशी लग्न केलं असतं मग मला तुमच्यासारखा प्रेम करणारा, काळजी करणारा नवरा नसता भेटला ना."

"वेडाबाई." तिच्या गालावरून अलगद हात फिरवला. तो देखील हसू लागला.


"बरं कोणत्या कानाखाली मारली होती?"

"नेहा, प्लिज आता सोड ना विषय. प्लिज."

"सांगा ना?"

"डाव्या गालावर."

तो मान झुकवत म्हणाला.

नेहाने त्याच्या डाव्या गालावर किस केला.

"आता प्रियाने मारलेली कानाखाली विसरायची, कारण ही तुमच्या हक्काची बायको तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणार आहे."

तर अशा पद्धतीने नेहा आणि प्रशांतचा व्हॅलेंटाईन डे साजरा झाला होता. प्रशांत सारखा जीव लावणारा नवरा तिच्या आयुष्यात आला, त्यामुळे ती रोजच व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करू लागली.

जोडीदाराला गिफ्ट देणं, गुलाबाचे फुल देणं यापेक्षाही महत्त्वाचं असतं कठीण काळात आपल्या जोडीदारासोबत उभं राहणे, त्याला प्रेम करणे. बरोबर ना?
समाप्त.
अश्विनी ओगले
काय मग आवडली का नेहा आणि प्रशांतची लग्नानंतरची प्रेम कथा? आवडल्यास एक लाईक जरूर द्या. कंमेंटमध्ये कथा कशी वाटली ते सांगा.
कथेचा वापर कुठेही करू नये. तसे केल्यास कारवाई करण्यात येईन.