प्रेम पालवी भाग 1

प्रेम पालवी सुंदर प्रेम कथा
प्रेम पालवी भाग 1

©️®️शिल्पा सुतार

सानिका ऑफिस मधे कामात होती. पाच वाजले अजून अर्धा तास. आज तिला थोडा कंटाळा आला होता. चहा झाला. ती ईमेल चेक करत होती. आदित्य तिने नाव बघितल. ती मागे सरकून बसली. दोन मिनिट त्या नावाकडे बघत होती.

आधी फोन वर हे नाव दिसल्यावर किती आनंद व्हायचा. आता? आता ही होतो. ती तिची तिची हसली. तिने मेल उघडला. लॅपटॉप जवळ ओढला. त्याच्या लग्नाची पत्रिका होती. तिने दोन मिनिट डोळे मिटले. दिर्घ श्वास घेतला. ठीक आहे तो माझा नाही. होऊ ही शकत नाही. पत्रिका वाचली. छान. अभिनंदनाचा रीप्लाय दिला. थोड्या वेळाने ती घरी निघाली. ऑफिस कॅबने तिला सोसायटीच्या गेट समोर सोडल. ती हळूहळू चालत येत होती. आदित्य तुझे विचार काही मनातून जात नाहीत.

अश्या या सांजवेळी
आठवण तुझी येते
तुला भेटण्याची
वाट मी पहाते

कशी समजावू सख्या
या वेड्या मनाला
कळेना रे ही प्रीत
तुझी या मनाला

जर ती साक्षी आदित्यच्या आयुष्यात नसती तर? मी आणि आदित्य सोबत असतो. आमची लहानपणा पासुन मैत्री होती ना. साक्षी प्रकरणानंतरच तो माझ्यापासून दूर गेला.

तु माझा होता आदित्य. पण तुला मी तुझी वाटलीच नाही. साक्षी अशी कशी मधेच आली. सगळं गणितच बदललं. तू दूर गेलास ते कायमचा. त्या साक्षीला मी आदित्यशी बोललेलं आवडायचं नाही. म्हणून मी त्या ग्रुप मधे जाणं सोडलं. त्याला विसरले.

अस विसरले म्हटलं म्हणून झालं का? मनाचे मनाशी असलेले पाश तुटतात का? माझ्या बाजूने मी आदित्य मधे गुंतले होते. तो पहिल्या पासून खुशाल चेंडू होता. त्याला नेहमी भरपूर मैत्रिणी होत्या.

शिक्षण झाल्यावर लगेच मला स्थळ आलं. माझ लग्न झालं. माझ्या मनात आदित्य होता. नवर्‍याच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाही. घरच्या लोकांना हवी होती सुपर वुमन. वेंधळी, काही येत नाही, असे बरेच लेबल लावून कायमसाठी माहेरी आली. घटस्फोट ही झाला. ते त्रासदायक दिवस आठवले की अंगावर काटा येतो.

घरचे अजूनही लग्नासाठी म्हणतात. माझ मन नाही. आता मला हा जॉब आणि आई बाबा यांच्या सोबत रहायच आहे.

माझा डिवोर्स झाला सगळीकडे समजल. नातेवाईक वाटेल ते बोलत होते. मी त्रासात होते. बाकीच्या फ्रेंड्स सोबत आदित्य भेटायला आला होता. माझ्या जवळ बसुन होता. काही म्हणाला नाही. त्याचा किती आधार वाटला होता. त्याला किती दुःख झाल होत समजत होतं.

विचार करत सानिका घरी आली. गेट उघडत होती. तिचा फोन वाजला. तिने बघितल आदित्य होता. अरे वाह तिच्या चेहर्‍यावर हसू होत. आमंत्रण देण्यासाठी फोन केला असेल. लग्न करतो आहे त्याने स्वतः हून सांगितल नव्हतं. म्हणून तिला राग होता. जेव्हा जवळचा मित्र असा वागतो तेव्हा वाईट वाटणारच.

असू दे आजकाल मला कोणी काही सांगत नाही. त्यांना नजर लागेल अशी भीती वाटते. माझ्या पासून सगळे लांब असतात. ती थोडी उदास हसली.

एकाकी आयुष्य माझ
तोच माझा सोबती
पुसे ना कोणी दु:ख
या एकट्या रात्री

"बोल रे आदित्य घरी आलास का?" तिने मूड बदलला.

"कालच आलो सानू. तू कशी आहेस?"

" मी मजेत आहे. काल आलास आणि आज फोन करतो आहेस? आपण भेटलो असतो ना. अरे हो आता तू कशाला माझ्याशी बोलशील? मोठे लोक तुम्ही. तू काय बाबा पुण्याला नोकरी करतोस. कॉम्प्युटर इंजिनिअर, साहेब बाबा." ती त्याची गम्मत करत होती.

"पुरे सानू. तुला काय मीच भेटलो गम्मत करायला. बर ते सोड तुला समजल असेल माझ लग्न आहे. लग्नाला यायच हं." तो थोड हळू आवाजात म्हणाला.

"आता सांगतो आहेस? इतक्या उशीरा?" ती चिडली.

"मग काय तांदूळ निवडण्या पासून येणार होतीस?"

"जा मी येतच नाही. काय मुलगा आहेस. नेहमी वाकडं तिकडं बोलतोस." ती चिडली.

"बर बाई राग सोड .लग्नाला ये. आपला पूर्ण ग्रुप आहे. "

"बर ."

"काका काकू कुठे आहेत?" त्याने विचारल.

"आई आदित्यशी बोल. "

"हो पत्रिका मिळाली. हो आम्ही येवू. तुझ अभिनंदन आदित्य."

" आई ठेवला का फोन? हा आदित्य बघ ना. खरच लग्न करतोय?" सानिका म्हणाली.

"हो त्यात काय? तुम्ही मुलं योग्य वयात आहात. तूच आपली नाही नाही करते."

सानिका गप्प झाली. आता माझा विषय वेगळा आहे ना. मी एकटी ठीक आहे. मी परफेक्ट नाही. मला काही येत नाही. ऑफिस, घरकाम म्हणजे तारेवरची कसरत. या पासून मी दूर बरी. आयुष्यात प्रेम एकदाच होतं. माझ ते करून झालं आहे.

आदित्य एकमेव असा मुलगा जो माझा मित्र होता आणि आहे. काहीही झाल की आदित्य अस आदित्य तस. आमच्या सोबत रहाता रहाता तो आणि साक्षी कधी वेगळे झाले ते समजल नाही. ती सेकंड इयरला आमच्या ग्रुप मधे नवीन आली होती. अगदी टापटीप, हेरॉईन जशी. सगळे म्हणायचे हिच्या कडून छान कस रहायच टिप्स घ्या.

सानिका रोज त्या दोघांना बघायची. आदित्य तिच्या सोबत खुश होता. खोल कुठे तरी मनाच्या एका कोपर्‍यात तिला त्रास व्हायचा. कोणाला सांगणार. नंतर ती दुसरीकडे बसायची. काहीही करा. वाईट वाटत उगीच.

"सानू चहा घे." लता ताई जवळ येऊन बसल्या. दोघी आदित्य बद्दल बोलत होत्या.

"आई अग, ती साक्षी एवढी काही खास मुलगी नाही."

"अस म्हणु नये सानू."

"खरच मी तिला ओळखते. आमच्या वर्गात होती. अग ते दोघे नुसते भांडत असायचे."

"आपल्याला काय. ते त्यांच त्यांच बघतील. जा आवरून ये."

बाबा आले. जेवण झालं. सानिका तिच्या रूम मधे होती. मैत्रीणीच्या ग्रुप वर मेसेज सुरू होते.

"आदित्यच्या लग्नाला जायच आहे."

"उद्या हळद आहे. अनारकली घालू."

"परवा लग्नात साडी नेसू या. "

"हो चालेल. "

सानिका दुसर्‍या दिवशी ऑफिस मधे गेली. हाफ डे घेतला.

त्यांचा पूर्ण ग्रुप हळदीच्या प्रोग्राम मध्ये पोहोचला. आदित्य दिसला. पांढरा कुर्ता पायजमा मधे तो खूपच हँडसम दिसत होता. एकदम रुबाबदार. बॉडी ही छान. सानिकाने दुसरीकडे बघितल. माझी नजर व्हायची. तो सगळ्यांना भेटत होता.

"हे कोण आल आहे. सानिका. माझी प्रिय मैत्रीण. पण काय हे सानू? तू किती वेळेवर येते आहेस? काही मदत करत नाही. थोड तर आधी यायच. मी नर्व्हस आहे. आता माझ्या सोबत रहा." तो तिला भेटला.

आधी कस जाणार? मंगलकार्ये आहे. लोक मला अश्या ठिकाणी येवू देत नाही. मी दिसली की त्यांच्या कपाळावर आठ्या येतात. मी दूर बरी. खरच आपण पुढारलेल्या विचारांचे आहोत का? मोठ मन, चांगले विचार अजूनही फक्त बोलायच्या गोष्टी आहेत. मला विचारा माझ्या सोबत काय काय होतं. लोक पाण्यात बघतात. माझ्या मनात धडकी भरली आहे.

🎭 Series Post

View all