प्रेम पालवी भाग 2

प्रेम पालवी सुंदर प्रेम कथा
प्रेम पालवी भाग 2

©️®️शिल्पा सुतार

सानिका तिच्या विचारातून बाहेर आली. "काय करणार आधी येवून? तू बिझी तुझ्या बायको सोबत. उगीच तुला डिस्टर्ब होईल."

"माझी बायको इथे कुठे आहे. काहीही आपल. तुला तर माझ नाव घ्यायचं असत." आदित्य म्हणाला.

"ए प्लीज आता भांडु नका बर." खूप मजा येत होती. डीजे वर सगळे नाचत होते. रात्री जेवण करून ती घरी परत आली.

रात्री तिच्या डोळ्यासमोर आदित्य होता. उद्या त्याच लग्न होईल. मला तो परत कधीच भेटणार नाही. ती साक्षी त्याला मला भेटू देणार नाही.

सकाळी लवकर उठून तिने तयारी केली. साडीत ती खूप छान दिसत होती. हलका मेकअप केला. हा ही उगीच कार्यक्रम आहे म्हणून. नाहीतर या तयारीला काही अर्थ नाही. मुळात सुंदर ती अजून गोड दिसत होती.

"आई बाबा तुम्ही येताय ना?"

हो. ते तिघे हॉलवर आले.

लग्न हॉलवर काल सारखा उत्साह नव्हता. सगळेजण कुजबूज करत होते. त्यांच्या ग्रुप एका बाजूला बसला होता.

"काय झालं? सगळे असे शांत का? " सानिका विचारात होती.

" तुला काही समजलं का?"

" नाही."

"नवरी पळून गेली."

"काय? साक्षी पळून गेली? फारच डेंजर मुलगी आहे. आपण आधीपासून आदित्यला म्हणत होतो तिच्याशी लग्न करू नकोस."

"तिला एका सिरीयल मध्ये हिरोईनची ऑफर आली. त्यामुळे ती लग्नाला नाही म्हणत होती. आदित्य बळजबरी करत होता. घरच्यांची दबावाखाली येऊन तिने होकार दिला होता. काय झालं माहिती नाही. काल रात्रीपर्यंत होती. सकाळी गायब झाली."

" आदित्य कुठे आहे? "

सगळे आदित्यच्या रूममध्ये गेले. तो आई-बाबांशी काहीतरी जोरजोरात बोलत होता. त्याची आई रडत होती. सानिका पटकन काकूं जवळ गेली.

"आम्ही आधीच याला म्हणत होतो त्या मुलीशी लग्न करू नको हा अजिबात ऐकत नाही."

कोणीतरी बोलवायला आलं. काकू बाहेर गेल्या. बाकीच्या ग्रुपचं बोलून झाल्यानंतर सानिका आदित्य जवळ गेली. त्याने तिला मिठी मारली. तो रडत होता. तिला ही कसतरी झालं. "आदित्य प्लीज त्रास करून घेवू नकोस. "

"साक्षी कशी करते. तिला माझ्याशी विशेष अटॅचमेंट नव्हती. मीच हे नात बळजबरी निभावत होतो." त्याने सांगितल.

"अस असतांना तू लग्नाचा निर्णय कसा काय घेतला?" सानिकाला आश्चर्य वाटलं.

"मला वाटल ती संसारात रमेल, चांगली वागेल. अस फिल्मी जगात एकदम करीयर होत का. लोक फसवतात. "

" नाही ना, ते मायाजाल आहे."

" तुला समजत तिला का समजत नाही. अतिशय विचित्र मुलगी ती साक्षी." आदित्य चिडला होता.

" सोड ते. जा तिला शोध आपण तिला समजावु." सगळे म्हणत होते.

"नाही आता तिचा माझा काही संबंध नाही. खूप चान्स दिले. आता मी माझ मन म्हणेल ते करेल."

बाकीचे बाहेर बसले होते. सानिका त्याच्या जवळ होती. तिने त्याला पाणी दिल.

"सानू एक विचारू? "

"काय?"

"आपण काय करायला हव. जो आवडतो त्याच्या सोबत रहायच. की प्रॅक्टीकल व्हायचं? " तो तिच्याकडे बघत होता.

"जो आवडतो त्याच्या सोबत रहा आदित्य. आयुष्य अस वाया घालवू नकोस." ती सहज म्हणाली.

"तु माझ्याशी लग्न करशील?"

ती त्याचाकडे बघत होती.

"मी खर बोलतो आहे. मला बरेच दिवस झाले अस वाटत आहे तू मी आपण परफेक्ट कपल आहोत. जेवढ तू मला समजून घेतल. सांभाळल, तेवढ कोणीच केल नाही. कित्येक वेळा ठरवल की हे तुझ्याशी बोलू का? पण हिम्मत नाही झाली."

"मी हे लग्न करू शकत नाही. माझा घटस्फोट झाला आहे आदित्य. तु साक्षीला शोध. नाहीतर दुसर्‍या मुलीशी लग्न कर. परत अस बोलू नकोस."ती चिडली.

"आदित्य, काका ऐकत नाहीत. कसतरी करता आहेत." ते सगळे तिकडे गेले. सानिकाचे आई, बाबा ही तिथे होते. सगळे त्यांना समजावत होते.

सानिका, आदित्य जवळ उभी होती. तो त्याच्या बाबांशी बोलत होता. "बाबा आज लग्न होईल. तुम्ही टेंशन घेवू नका."

" मुलगी कोण आहे?" त्यांनी विचारल.

"काका ,काकू ,आई ,बाबा मला तुमच्याशी बोलायच आहे." आदित्य म्हणाला.

"नाही आदित्य. प्लीज." सानिका मधेच म्हणाली. ती तिथून जात होती. त्याने तिला थांबवलं.

आदित्य, सानिका शेजारी बसलेले होते. समोर दोघीकडचे आई बाबा होते.

"काय झालं?"

"मला सानिकाशी लग्न करायच आहे. माझ तिच्यावर प्रेम आहे. ते ही खूप आधी पासून." आदित्य म्हणाला.

"हे आधी समजल नाही." त्याची आई म्हणाली.

" समजल होत पण हीच लग्न झालं होत. कोणालाही विचार ग्रुप मधे."

"नाही तरी तुम्ही दोघ लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. तुम्ही प्रेमात होता असं आम्हाला वाटलं. " सानिकाची आई म्हणाली.

"आमच अस काही नव्हतं. आदित्यने साक्षीशी लग्न करायचं ठरवलं होत ना. आता तिला शोध. तुम्ही तुमचे नीट रहा. आम्ही दोघे तर मित्र आहोत. आम्ही लग्न कस करणार?" सानिका म्हणाली.

"सानिका ऐक बेटा काय अस? नीट विचार करून बोल. " तिची आई म्हणाली.

"पण आजच लग्न व्हायला हव का? उद्या ती साक्षी परत आली तर माझ काय होईल? मला यात पडायच नाही." तिला माहिती होत साक्षी किती डेंजर आहे.

"माझा आणि साक्षीचा आता काही संबध नाही." आदित्य म्हणाला.

"काल पर्यंत लग्नासाठी तू उत्सुक होता ना." सानिका त्याच्याकडे बघत होती.

"आमच्यात एवढ प्रेम होत तर ती गेली असती का? हे नात कधीच संपल होत. मी लास्ट चान्स देत होतो. तू सांग तू ही मला पसंत करतेस. मी ही तुला. तुला माहिती आहे मनाच मनाशी नात काय असत. माझ्याशी लग्न करशील. " आदित्य तिच्याकडे बघत होता.

" नाही, कारण तुझी पहिली चॉईस मी नाहिये. मी साक्षी सारखी सुंदर नाहिये. ती इथे नाहिये म्हणून ही जागा मला मिळते आहे. मला हे लग्न करायच नाही. " ती डायरेक्ट म्हणाली.

" हे चुकीच आहे सानु. तू माझी पहिली चॉईस आहेस. मी कधी सांगितल नाही मला तू खूप आवडते. आता अस होणार नाही. तुला ही माहिती आहे आपण सुखी राहू. कोणीही येवू दे तुझी जागा आता कोणी घेणार नाही. माझ चूकल तेव्हा मला समजल नाही. यावर विचार कर. "

"सानिका, आदित्य यांच लग्न होईल. " सानिकाचे बाबा म्हणाले.

" बाबा. "

"हो बेटा. "

"आई तू तरी सांग. मला लगेच लग्न करायचं नाही ते पण या आदित्यशी तर बिलकुलच नाही. "

बाबा तिला बाजूला घेऊन गेले ते बराच वेळ तिच्याशी बोलत होते.

" बेटा आदित्यला तू लहानपणापासून ओळखते ना. सांग तो कसा आहे?"

"बाबा तो खूप चांगला आहे. शिकलेला आहे .भरपूर कमावतो. मला समजून घेतो. "

" तू त्याच्या सोबत सुखी रहाशील मला खात्री आहे. ते लोक अडचणीत आहेत आणि त्यांना मदत करायला पाहिजे. आदित्य समोरून म्हणतो आहे काय हरकत आहे."

🎭 Series Post

View all